ऑलिव्हर हार्ट आणि बेंट होमस्ट्रॉम यांनी विकसित केलेली कॉन्ट्रॅक्ट थिअरीही आर्थिक उद्दिष्टे गाठण्यात करारांचे महत्त्व अधोरेखित करते. यांची सैद्धांतिक कामगिरी महत्त्वाचीच, परंतु ती अर्थशास्त्रातील नोबेलसाठी पात्र ठरली हे अधिक सुखावणारे आहे.  गेल्या काही वर्षांतील अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांनी केलेले काम पाहता ही निवड नवलाचीही ठरत नाही. बाजारावर आधारलेल्या मुक्त व्यवस्थेला मानवी चेहरा प्रदान करणारे संस्थात्मक बदल रुजविणाऱ्या सैद्धांतिक मांडणीच्या गौरवाची एक परंपराच नोबेलने सुरू केल्याचे दिसते. दारिद्रय़ आणि विषमता निर्मूलन आणि त्यायोगे समाजकल्याण हे गेली काही वर्षे अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांचे अभ्यास विषय असावेत हाही योगायोग नाही.

पुरस्काराला महती असतेच, त्यातही नोबेलसारखा जागतिक पुरस्कार मिळविणे ही अतुल्य कामगिरीच असते. हा पुरस्कार मिळविणारे मग अनेकांसाठी परब्रह्मच. अखिल मानवजातीच्या कल्याणाचे सामथ्र्य असणाऱ्या अजोड कामगिरीलाच या पुरस्काराने गौरविले जाते. अन्य पुरस्कार शाखांचे ठाऊक नाही, परंतु नोबेलसाठी पात्र ठरलेल्या अलीकडच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतांचा माग घेतल्यास त्यांचे पुरोगामित्व स्पष्टपणे जाणवते. हे पुरस्कारपात्र अर्थसिद्धांत म्हणजे एक विचारप्रवाहच असल्याचे आढळते. जसे मराठी साहित्य विश्वात संत वाङ्मयाचे आणि त्यातही तुकारामाच्या गाथांचे जे सामाजिक स्थान आहे, तशीच सामाजिकता या अर्थवेत्त्यांनी जपल्याचा पुरेपूर प्रत्यय येतो. गेल्या वर्षीचे अर्थशास्त्रातील नोबेलविजेते अँगस डिटन यांचेच पाहा. वस्तूंचा उपभोग आणि प्रत्यक्ष उत्पादन यांची सांगड घालून विषमतेच्या मुळावर घाव घालणाऱ्या संशोधनाची डिटन यांची कामगिरी त्यांना नोबेल मिळवून देणारी ठरली. काहींच्या वाटय़ालाच धनधान्य आणि निरोगी आयुष्यमान कसे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. म्हणूनच मग डिटन यांनी एक राष्ट्र म्हणून स्वास्थ्य व संपत्तीची कास धरणारा मुक्तीचा मार्ग पुढे आणला. मोक्ष हा इहलोकीच प्राप्त करावयाचा असतो, हे ते ठासून सांगतात. हीच सामाजिकतेची मालिका चालू वर्षांचे अर्थशास्त्रातील नोबेलविजेते ऑलिव्हर हार्ट आणि बेंट होमस्ट्रॉम या संयुक्त मानकऱ्यांच्या कामातही सुरू राहिलेली दिसून येते. डीटन यांच्याप्रमाणे यंदाचे हे नोबेलवंतही युरोपात जन्मलेले पण अध्यापन व संशोधनासाठी अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्यांनी विकसित केलेली ‘कॉन्ट्रॅक्ट थिअरी’ ही आर्थिक उद्दिष्टे गाठण्यात करारांचे महत्त्व अधोरेखित करते.

प्रत्येक गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक पार कट्टा असतो. शहरातही प्रत्येक भागात एक वर्दळीचा नाका असतो. आधुनिक जगतातील हे मजूर नाके आहेत. श्रम बाजारपेठेत यांची प्रथा केव्हापासून सुरू आहे याची कल्पना नाही, पण रोजच्या रोज ठरणाऱ्या शर्तीवर बोली लावून भाडेपट्टीने अर्थात रोजंदारीने मजूर मिळविण्याचा प्रघात मुंबईसह अनेक महानगरांत आजही पाहायला मिळतो. सकाळच्या वेळी तेथे लोक एकत्र येतात. त्यातले काही रोजगाराच्या शोधातले तर काही कामकऱ्यांचा शोध घेणारे असतात. गावात कापणी, काढणी, मळणी, ऊस तोडणी, वीट भट्टी अशा कामासाठी लोक पारावर येतात. तर शहरात हलकी पण कसब व कारागिरी असलेले गवंडी काम, रंगकाम, प्लंबिंग वगैरे आणि निवडणुका असतील सभा-मिरवणुकांना गर्दीसाठी रोजंदारीवर माणसे पुरविणारे हे नाके कामी येतात. पण समजा कारखान्यात आणि कार्यालयांमध्येही जर असेच रोजच्या रोज सेवाशर्ती ठरवून कामगार-कर्मचारी मिळवायचे झाले तर? हा अगदीच अव्यवहार्य आणि तेथे काम करणाऱ्यांसाठीही अप्रतिष्ठित असा हा प्रस्ताव आहे. हे असे जरी असले तरी रोजच्या रोज नसेल पण काहीशा मोठय़ा कालावधीसाठी भाडेपट्टीवरच हा रोजगार सुरू असतो. वेतनमान, सुटय़ा, प्रलोभने, इतर अटी व सुविधा, अनेक प्रसंगी कंपनीची भाग हिस्सेदारी (स्टॉक ऑप्शन) अशा शर्ती ठरवूनच हाही श्रम बाजार आकाराला आला आहे. सभ्य भाषेत या सेवाशर्तीच्या निश्चितीला ‘कॉन्ट्रॅक्ट’ म्हटले जाते. एकदा नोकरीला चिकटला की निवृत्तीचे वय गाठेपर्यंत काही झाले तरी सेवाकाळ पूर्ण होणार आणि महिन्याकाठी वेतनही बिनघोर मिळत राहणार, असे सुशेगात दिवस इतिहासजमा झाले आहेत. आज बहुतांश नोकऱ्या या कंत्राटीच आहेत आणि हा बदल सहजपणे स्वीकारलाही गेला आहे.

बाजार व्यवस्थेत पदोपदी स्थित्यंतरे, उभे-आडवे हितसंबंध, गळेकापू स्पर्धा, किंमत-मोबदला अशा प्रत्येक बाबतीत चढाओढ सुरू असते. त्यामुळे किमानपक्षी बांधिलकी, परस्पर सहकार आणि विश्वासाने विसंबून राहता येईल अशा श्रम सामोपचाराची प्रणाली म्हणून ‘कंत्राटी’ अर्थात श्रम-कराराची पद्धत जन्माला आली. केवळ कामगार-कर्मचारी मिळविण्यासाठीच नव्हे, तर बाजार व्यवस्थेत असे अनेक सामोपचार करारांद्वारेच घडतात. मुक्त व्यवस्थेला अनागोंदीपासून वाचविण्यासाठी आखून दिलेली ती नियमांची वेस असते. व्यवस्थेच्या अर्निबधतेचा ताण सुसह्य़ करणाऱ्या अशा अनेक संस्थात्मक गोष्टी उत्तरोत्तर घडत आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणून ऑलिव्हर हार्ट आणि बेंट होमस्ट्रॉम यांनी विकसित केलेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट थिअरी’लाही महत्त्व आहे.

विद्यमान अर्थजगतात करारच आपल्या क्रिया निर्धारित करतात आणि हे करार जितके समंजस आणि सर्वसमावेशक तितके सुदृढ अर्थचक्रासाठी ते सुकर ठरतात, असे दोन या नोबेलवंतांनी आपल्या सिद्धांतातून दाखवून दिले आहे. या दोन अर्थतज्ज्ञांची कामगिरी आजच्या संदर्भात मोलाची अशी की, सद्य जागतिक अर्थव्यवस्थेपुढे जी खोल संकटे आहेत, त्यांचा वरवर दिसणाऱ्या व्यापार-उलाढालीच्या आकडेवारीतून थांग लावायला गेलो तर गोंधळात आणखीच भर पडते. त्या उलट त्यांच्या तळाशी असणाऱ्या संस्थात्मक रचना आणि तेथे करारांद्वारे साधलेला सामोपचार अथवा केलेला गुंता लक्षात घेतला जायला हवा, असे हे अर्थवेत्ते म्हणत आले आहेत. नोबेल पारितोषिकातून त्यांच्या या म्हणण्याला अधोरेखित केले गेले आणि दखलपात्रही ठरविले गेले आहे.

श्रम, संसाधने, भांडवल हे कोणत्याही ‘इझम’च्या अर्थकारणाचे मुख्य आधारस्तंभ होत. समृद्ध अर्थव्यवस्थेसाठी या तिन्ही घटकांची विपुलता असणे आवश्यक ठरते. वाढते यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या अवलंबाने पारंपरिक चौकट मोडून काढणारी बरीच उलथापालथ केली आहे. तरी कमी-अधिक फरकाने या तिन्हींवरील अर्थव्यवस्थेची मदार घटलेली नाही. श्रमाधारित औद्योगिक उत्पादन पद्धतीला नव्या तंत्रज्ञानाधारित स्वयंचलित पद्धत धडका देत आली आहे. बदललेल्या उत्पादन पद्धतीमुळे अनेक नोकऱ्या संपुष्टात आणल्या. आता तर आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठय़ावर आहोत. यातून मुख्यत: लोकसंख्यात्मक अनुकूलता असलेल्या अर्थात ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ उपभोगणाऱ्या भारतासारख्या विकसनशील देशाच्या पारंपरिक आर्थिक रचनेत मोठय़ा फेरबदलाचे कयास आहेत. नव्याने येणाऱ्या स्वयंचलित कार्यप्रणालीमुळे भारतात परंपरेने सुरू असलेल्या ६९ टक्के तर चीनमधील ७७ टक्के नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असे जागतिक बँकेने अलीकडे दिलेला अहवाल सांगतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेची सुदृढता पुन्हा कामगार-मालक या सनातन संघर्षांच्या मूळपदावर येऊन ठेपते. कलहाची जागा उभयपक्षी सौहार्दाकडून घेतली जावी यासाठी दोहोंमधील कराराच्या गुणवत्तेलाच अनन्यसाधारण महत्त्व येथेही असेल.

केवळ कर्मचारी-मालक यांच्या करारान्वये संबंधांपुरताच हा सिद्धांत मर्यादित नाही. बँकांकडून कर्ज उचल करताना, अथवा क्रेडिट कार्ड घेताना ग्राहकाकडून बँकेशी करारच केला जातो. सध्याच्या अनिश्चित जगात विमा ही प्रत्येकाची अत्यावश्यक गरज आहे. आयुर्विमा, आरोग्य विमा हा पॉलिसीधारकाने विमा कंपनीशी केलेला करारच असतो. आपला सबंध सभोवार व प्रत्येक व्यवहार हा या नात्याने कराराने बांधला गेला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कंत्राटी सिद्धान्त हा वास्तविक जगातील झगडय़ांना लक्षात घेत, भविष्यातील संस्थात्मक क्रिया सुनिश्चित करणाऱ्या सुबद्ध कराराच्या रचनेवर भर देतो. तथापि व्यवस्थापकाने संस्थेच्या दीर्घावधीतील सुदृढतेशी तडजोड करून, तात्पुरत्या वाढीची कामगिरी करून दाखवून वाढीव वेतनमान आणि भत्ते पदरी पाडून घेण्याचे धोकेही होमस्ट्रॉम यांनी आपल्या शोधनिबंधातून अधोरेखित केले आहेत. २००८ सालातील वित्तीय अरिष्टाचे मूळ हे या जोखीमेत आहे. वॉलस्ट्रीटच्या कृपेने यथेच्छ अर्थप्रदूषण फैलावणाऱ्या प्रथांनी तेथील वित्तीय बाजारात मूळ धरले. तात्पुरता बाजार बुडबुडा फुलविला गेला आणि त्या जोरावर या लबाडीत सामील असलेल्या पतनिर्धारण संस्था, इन्व्हेस्टमेंट बँकांतील उच्चाधिकारी, लेखापाल, बाजार विश्लेषक यांनी बोनस व स्टॉक ऑप्शन्सच्या रूपात रग्गड कमावले. परंतु यातून अनेक बँका बुडाल्या, महाकाय वित्तसंस्था नामशेष झाल्या. संपूर्ण व्यवस्थेलाच कडेलोटाच्या स्थितीवर ढकलले गेले.

हार्ट आणि होमस्ट्रॉम यांची सैद्धांतिक कामगिरी महत्त्वाचीच, परंतु ती नोबेलसाठी पात्र ठरली हे अधिक सुखावणारे आहे. गेल्या काही वर्षांतील अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांनी केलेले काम पाहता ही निवड नवलाचीही ठरत नाही. बाजारावर आधारलेल्या मुक्त व्यवस्थेला मानवी चेहरा प्रदान करणारे संस्थात्मक बदल रुजविणाऱ्या  सैद्धांतिक मांडणीच्या गौरवाची एक परंपराच नोबेलने सुरू  केल्याचे दिसते. दारिद्रय़ आणि विषमता निर्मूलन आणि त्यायोगे समाजकल्याण हे गेली काही वर्षे अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांचे अभ्यास विषय असावेत हाही योगायोग नाही. अमर्त्य सेन, गॅरी बेकर, जॉन नॅश, जॉन हरसनयी, रिनहार्ड सेल्टेन, जेम्स मिरलीस, पॉल क्रुगमन, जॉर्ज अकरलॉफ, जोसेफ स्टिग्लिट्झ आणि अँगस डिटन या अलीकडच्या नोबेल विजेत्यांच्या कामगिरीचेच पाहा. गुन्हेगारी, व्यसनाधीनता, भेदभाव आदी मानवी दुर्गुणांत आकाराला येणारे आर्थिक वर्तन आणि त्याचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम हे गॅरी बेकर यांचे योगदान नोबेलसाठी गौरवपात्र ठरले. २००१ सालचे नोबेलविजेत जोसेफ स्टिग्लिट्झ हे जागतिक व आयएमएफसारख्या सावकार संस्थेत काम केलेले अर्थतज्ज्ञ आहेत. हा अनुभव गाठीशी असूनही, अनियंत्रित बाजारव्यवस्थेचे कडवे टीकाकार म्हणूनच ते ओळखले जातात. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील  एक टक्क्य़ाविरुद्ध नव्याण्णव टक्क्य़ांचा प्रतीकात्मक संघर्ष अर्थात ऑक्युपाय चळवळीचे ते वैचारिक आधार बनले. ‘माहिती अर्थशास्त्र’ या नव्या अन्वेषण शाखेच्या संशोधनाबद्दल आणि माहितीच्या अप्रमाणबद्धतेतून पुढे येणाऱ्या संकटांच्या सिद्धांताबद्दल स्टिग्लिट्झ आणि जॉर्ज अकरलॉफ यांना संयुक्तपणे नोबेल देऊन गौरविण्यात आले. आर्थिक प्रशासनातील सहकाराचे स्थान या विषयातील योगदानाबद्दल अमेरिकेतील एलिनॉर ओस्ट्रोम व ऑलिव्हर विल्यमसन यांना २००९ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विभागून जाहीर झाले आहे. एलिनॉरच्या निमित्ताने पहिल्यांदाच अर्थशास्त्राचे नोबेल महिलेने मिळविले. नवीन संस्थात्मक अर्थकारण हे या सर्व नोबेलवंतांना एकत्र जोडणारे सूत्र आहे. या सर्वच मंडळींना राजकीय अर्थवेत्तेच म्हणूनच संबोधले जाऊ  शकेल. अरिष्टग्रस्त व्यवस्थेचा अंत टाळण्यासाठी जगभर सुरू असलेल्या धडपडीचे ब्रीद म्हणूनही जर या कोणी मंडळींची संभावना करीत असेल, तर तेही अनाठायी ठरत नाही. तथापि आर्थिकतेत या प्रत्येकाने जपलेला सामाजिक आशय पुरता स्पष्ट होतो.

हार्ट आणि होमस्ट्रॉम यांचे करार सिद्धांत हे शहरी पर्यावरणांच्या दृष्टीने निश्चितच लाभदायी आहेत. किंबहुना ते अमेरिकेतील प्रचलित आर्थिक रचनेपुरतेच मर्यादित आहेत. परंतु ग्रामीण भागातील श्रम बाजाराच्या बदलत्या परिणामांना त्यांची उपयुक्तता हा अभ्यासाचा विषय ठरेल. शेतीप्रधान अर्थव्यवस्था असाच आपल्या अर्थव्यवस्थेचा उणे-अधिक तोंडावळा आहे हे सर्वप्रथम कबूल केले पाहिजे. आजच्या धोरणकर्त्यांना ही बाब अप्रस्तुत वाटते हीच एक समस्या आहे. यातून मग शेतीची राज्यकर्त्यांकडूनच परवड आणि ग्रामीण भारतात शेतीबाबत वाढती उदासीनता असे नष्टचर्य सुरू झाले आहे. शेतकऱ्याने खस्ता खाल्लय़ा, अस्मानी आणि सुलतानी प्रतारणा सोसल्या. ज्यांना नाही सोसता आल्या त्यांनी आत्महत्या केल्या. शेतीच्या या जुन्या बदहाल व परंपरागत रूपात तरी क्वचितच बदल झाल्याचे दिसून येते. आजही आपल्याकडे शेतकऱ्याने कोणते पीक घ्यावे हे मजुरांची उपलब्ध संख्या आणि मजुरीचा दर यावरच बरेचदा ठरते. शिवाय कंत्राटी शेती, शेतीचे कंपनीकरण वगैरे नवे बदल बांधापर्यंत येऊन धडका देत आहेत. यातून ग्रामीण अस्मिता कसे आकार घेईल, नवे बदल कोणी, केव्हा व कसे घडवून आणावेत यासाठी ही थिअरी उपयोगाची ठरते काय, हे पाहावे लागेल. समान आर्थिक उद्दिष्टासाठी सामूहिक एकजूट आणि सत्तापद व जबाबदाऱ्यांचे प्रत्येकाच्या क्षमतेनुरूप करारबद्ध वाटप हाच कोणत्याही कंपनीच्या उभारणीचा पाया असतो, या मौलिक प्रश्नावर हार्ट आणि होमस्ट्रॉम यांनी प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेल्या सहकाराची आज जी बरी-बाईट स्थिती आहे, त्यावर समाधानकारक उताऱ्यासाठी (जर खरेच कुणाला हवा असेल!), हा करार सिद्धांत दिशादर्शक ठरावा. प्रश्न कॅलिफोर्नियाच्या फळ बागायतीच्या अर्थकारणाचा असो वा कोरेगावच्या सहकारी सूत गिरणीचा दोन्हींसाठी सारखाच फॉम्र्यूला उपयुक्त ठरावा, हे नवलाचे नाही. अर्थशास्त्रात साधली गेलेली ही दुनियादारीच म्हणा ना!

महत्त्वकॉन्ट्रॅक्ट थिअरीचे..

  • किमानपक्षी बांधिलकी, परस्पर सहकार आणि विश्वासाने विसंबून राहता येईल अशा श्रम सामोपचाराची प्रणाली म्हणून ‘कंत्राटी’ अर्थात श्रम-कराराची पद्धत जन्माला आली.
  • अर्थजगतात करारच आपल्या क्रिया निर्धारित करतात. हे करार जितके समंजस आणि सर्वसमावेशक तितके सुदृढ अर्थचक्रासाठी ते सुकर ठरतात, असे या नोबेलवंतानी दाखवून दिले.
  • हार्ट आणि होमस्ट्रॉम यांचे करार सिद्धांत हे शहरी पर्यावरणांच्या दृष्टीने निश्चितच लाभदायी आहेत. किंबहुना ते अमेरिकेतील प्रचलित आर्थिक रचनेपुरतेच मर्यादित आहेत. परंतु ग्रामीण भागातील श्रम बाजाराच्या बदलत्या परिणामांना त्यांची उपयुक्तता हा अभ्यासाचा विषय ठरेल.
  • सहकाराची आज जी बरी-बाईट स्थिती आहे, त्यावर समाधानकारक उताऱ्यासाठी हा करार सिद्धांत दिशादर्शक ठरावा. प्रश्न कॅलिफोर्नियाच्या फळ बागायतीच्या अर्थकारणाचा असो वा कोरेगावच्या सहकारी सूत गिरणीचा दोन्हींसाठी सारखाच फॉम्र्युला उपयुक्त ठरावा..

सचिन रोहेकर

sachin.rohekar@expressindia.com