|| डॉ. नरेंद्र जाधव

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ  डॉ. दीना खटखटे यांचे अलीकडेच निधन झाले. या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारा लेख..

अस्सल मराठी माणसाची तीन वैशिष्टय़े सांगितली जातात : जिभेने तिखट, वृत्तीने हेकट (उदा. ‘प्रश्न तत्त्वाचा आहे!’), पण मनाने निष्कपट. ही तिन्ही स्वभाववैशिष्टय़े एकत्र आणली, त्यांना कुशाग्र बुद्धिमत्ता, अपार व्यासंग आणि प्रकांडपांडित्य यांची जोड दिली आणि वर कोकणी खवचटपणाची फोडणी दिली तर जे काही आगळेवेगळे एकमेवाद्वितीय रसायन तयार होईल ते म्हणजे डॉ. दीनानाथ (ऊर्फ दीना) खटखटे!

अमेरिकेत वॉशिंग्टन डी.सी.च्या परिसरात पाच दशकांहून अधिक काळ वास्तव्य केल्यावर वयाच्या नव्वदीत पोहोचलेल्या डॉ. दीना खटखटे यांनी १५ सप्टेंबर रोजी शेवटचा श्वास घेतला आणि श्रेष्ठ भारतीय अर्थतज्ज्ञांच्या मांदियाळीतील एक लखलखता हिरा निखळला. एका विलक्षण अर्थपर्वाची अखेर झाली.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)मध्ये कार्यरत असताना डॉ.  खटखटेंनी लक्षणीय योगदान दिले. त्या आंतरराष्ट्रीय संस्थेत ‘सेंट्रल बँकिंग डिपार्टमेंट’ उभारण्याची संकल्पना त्यांचीच. त्याची उभारणी आणि प्रतिष्ठापनादेखील केली ती खटखटे यांनीच.  मौद्रिक अर्थनीती (मॉनेटरी इकॉनॉमिक्स) आणि वित्तीय संस्था आणि नीती हे डॉ. खटखटेंचे विशेष आवडते विषय. ‘मनी अ‍ॅण्ड मॉनेटरी पॉलिसी इन लेस डेव्हलप्ड कंट्रीज’ (१९८०), ‘नॅशनल अ‍ॅण्ड इंटरनॅशनल अ‍ॅस्पेक्ट्स ऑफ फायनान्शियल पॉलिसीज् इन लेस डेव्हलप्ड कंट्रीज’ (१९८१) तसेच मनी अ‍ॅण्ड फायनान्स इश्यूज्, इन्स्टिटय़ूशन्स अ‍ॅण्ड पॉलिसीज् (१९९८) हे डॉ. खटखटेंनी लिहिलेले किंवा संपादित केलेले ग्रंथ मौद्रिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जगभरात मौलिक ठेवा मानले जातात. ग्रंथलेखनाबरोबरच डॉ. खटखटेंनी विपुल शोधनिबंध लिहिले आणि अत्यंत नावाजलेल्या जर्नल्समध्ये प्रकाशित केले- क्वार्टरली जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स, दि रिव्ह्य़ू ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिक्स, दि ऑक्स्फर्ड इकॉनॉमिक पेपर्स, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड कल्चरल चेंज आणि वर्ल्ड डेव्हलपमेंट ही त्यातली ठळक नावे. आपल्या अर्थशास्त्रीय लेखनातून डॉ. खटखटे यांनी स्वयंप्रज्ञेचा एक वेगळाच ठसा उमटविला.

इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकली  हे आपल्या देशातील एक अग्रगण्य दर्जेदार साप्ताहिक. अनेक दशके डॉ. खटखटे यांनी त्याची पाठराखण केली. ते साप्ताहिक चालविणाऱ्या ‘समीक्षा ट्रस्ट’चे ते पदाधिकारीदेखील होते. या साप्ताहिकामध्ये डॉ. खटखटेंनी ‘पोटोमॅक म्युसिंग्ज’ ही लेखमाला दीर्घकाळ लिहिली. ‘क्विन्स इंग्लिश’वरचे डॉ. खटखटेंचे असामान्य प्रभुत्व आणि अर्थशास्त्रापलीकडच्या अनेकविध विषयांवरचे त्यांचे मनस्वी आणि तरीही खटय़ाळ चिंतन यामुळे खटखटेंचा तो ‘कॉलम’ कॉलम न राहता त्याचा ‘पिलर’ झाला! त्यातले काही लेख ‘रूमीनंट्स ऑफ अ गाडफ्लाय’ या नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत.

१९७७ साली डॉ. आय. जी. पटेल रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर झाले त्या वेळी वॉशिंग्टनला जाऊन त्यांनी डॉ. खटखटेंची खास भेट घेतली आणि खटखटेंनी रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून भारतात परतावे अशी त्यांना गळ घातली. त्याच कालावधीत, व्यक्तिगत आयुष्यात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांमुळे (एकुलत्या एका मुलाचे आकस्मिक निधन) डॉ. खटखटे सैरभैर झाले होते. त्यांनी गव्हर्नर आय. जी. पटेलांची ऑफर सरळ सरळ नाकारली. नंतरच्या काळात मात्र आपल्या निर्णयाचा त्यांना पश्चात्ताप झाल्याचे जाणवत असे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर होणे डॉ. खटखटेंना सहज शक्य होते, पण ती संधी आपण स्वत:च धुडकावून लावली याची त्यांना वाटणारी हळहळ त्यांच्या जवळच्या सर्वानाच जाणवत असे.

एका बाबतीत डॉ. खटखटे आणि प्रल्हाद केशव अत्रे यांच्यामध्ये साधम्र्य होते. दोघांनाही अधूनमधून कोणाशी तरी वाद घालण्याची खुमखुमी येत असे. डॉ. खटखटेंनी प्रभात पटनायक या डाव्या विचारांच्या अर्थतज्ज्ञाशी घातलेला वाद किंवा डॉ. रंगराजन या रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर/ गव्हर्नरशी घातलेला वाद ही काही बोलकी उदाहरणे. डॉ. मनमोहन सिंग यांना ‘मन्नू’ म्हणून संबोधणारे डॉ. खटखटे हे त्यांच्याच श्रेणीतील श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ. सर्वत्र त्यांचा आदरयुक्त दरारा. डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला त्या वेळी त्यांची जाहीर निर्भर्त्सना करण्यात पुढाकार होता तो डॉ. खटखटेंचा. डॉ. खटखटे यांच्या स्पष्टवक्तेपणा, फटकळ स्वभावामुळे किंवा कोणाचीही भीड न बाळगता, जे त्यांना वाटे ते नि:संदिग्धपणे मांडण्याच्या भूमिकेमुळे अनेक शत्रू तयार झाले. त्या हितशत्रूंनीच त्यांचा घात केला. ज्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत म्हणावे असा एकही शोधनिबंध लिहिला नव्हता अशा एका ज्येष्ठ भारतीयाच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्थापन केलेल्या एका समितीने डॉ. खटखटे यांचे संशोधनकार्य समाधानकारक नाही असा निर्वाळा दिला. केवढा हा विरोधाभास!

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून बाहेर पडल्यावर डॉ.  खटखटे हे वरिष्ठ सल्लागार म्हणून  जागतिक बँक, युनायटेड नेशन्स, आशियाई विकास बँक, आफ्रिकन विकास बँक अशा अनेक संस्थांशी जोडले गेले. ‘एन्सायक्लोपेडिया ऑफ इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ते सहसंपादक झाले. विशेष म्हणजे ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट’ या  जर्नलचे मॅनेजिंग एडिटर म्हणूनदेखील त्यांनी उत्तम कामगिरी केली.

डॉ. मनमोहन सिंग हे वित्तमंत्री असताना त्यांनी डॉ. खटखटेंना भारतात बोलावून घेतले आणि बँकिंग क्षेत्रातील तत्कालीन समस्यांची विस्तृत समीक्षा करून व्यवस्थेमध्ये सुधारणा सुचविण्याची जबाबदारी सोपविली. त्या वेळी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर होते  डॉ. सी. रंगराजन. डॉ. खटखटेंना  पाचारण केल्याचे डॉ. रंगराजन यांना मुळीच आवडले नव्हते. डॉ. खटखटे यांचे डॉ. रंगराजन यांच्याबद्दल मत फारसे चांगले नव्हते. ‘‘आपल्याला जी गोष्ट कळत नाही त्याबद्दल न बोलणेच उत्तम’’ हे डॉ. खटखटे यांनी डॉ. रंगराजन यांना सुनावल्याचे अनेकांना ठाऊक होते. डॉ. खटखटे यांनी त्या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून मला घेतले. डॉ. रंगराजन यांनी त्याला मोडता घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या दोन दिग्गजांच्या वादावादीत माझी चांगलीच गोची झाली होती. डॉ. खटखटेंनी खूप अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून थेट डॉ. मनमोहन सिंग यांना सादर केला. डॉ. मनमोहन सिंग यांना डॉ. खटखटे यांच्याबद्दल जेवढा आदर तेवढेच डॉ. रंगराजन यांच्याबद्दल प्रेम होते.  गव्हर्नर डॉ. रंगराजन यांनी वित्तमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर प्रेमाचा दबाव आणून डॉ. खटखटेंचा अहवाल दडपून टाकला.

डॉ.  खटखटेंच्या वैयक्तिक आयुष्यात कितीही चढउतार आले तरी एक गोष्ट शेवटपर्यंत कायम राहिली. भारतातून अमेरिकेत गेलेल्या- विशेषत: नाणेनिधी किंवा जागतिक बँकेत काम करणाऱ्या साऱ्याच भारतीयांचे ते आधारवड बनून राहिले. त्यांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करीत राहिले- त्यांना प्रोत्साहन देत राहिले. रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल आणि वित्त मंत्रालयाचे माजी प्रमुख अर्थसल्लागार डॉ. अरविंद सुब्रमणियम ही सर्वाना परिचित असलेली त्यातली काही नावे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि भूतान या चार देशांच्या कॉन्स्टिटय़ुअन्सीच्या कार्यकारी संचालकाचे प्रमुख अर्थसल्लागार म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. (१९९८ ते २००२) त्या कालावधीत डॉ. खटखटे यांचे अखंड मार्गदर्शन मिळाले. स्वभावाने आग्यावेताळ असलेल्या डॉ. खटखटे  यांची काळजी घेत त्यांना शांत करण्याचे काम त्यांच्या सुविद्य पत्नी शांताताई कसे करतात हेदेखील जवळून पाहता आले. खटखटे पती-पत्नीच्या निव्र्याज मायेचे छत्र लाभले. एवढेच काय, त्यांच्या राग-लोभाचा प्रसाददेखील मिळाला.

‘गेले ते दिन गेले’ असे म्हणण्याची वेळ माझ्यावर क्वचित येते. पण जेव्हा येते त्या वेळी डॉ. खटखटेंबरोबरचे मैत्र, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण यांना स्वतंत्र स्थान असते हे नाकारणे मला कदापि शक्य होणार नाही.