05 April 2020

News Flash

तान्हाजीला छपाक

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या अंतिम फेरीत प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी वक्त्यांच्या भाषणांचे संपादित अंश..

(संग्रहित छायाचित्र)

* श्रुती बोरस्ते – नाशिक (प्रथम क्रमांक)

इतिहास रंजक असतो. तो वर्तमानात उभं राहून भविष्यात डोकावण्याची संधी देतो, म्हणून तो महत्त्वाचाही असतो. वास्तव हे अनाकर्षक आणि भयाण असतं. ते वर्तमानात उभं राहून वर्तमान आणि भविष्यातल्या समस्यांच्या जाणिवांना स्पर्श करतं. असं म्हणतात की, ‘युद्धस्य कथा रम्य:’.. म्हणजे युद्धाच्या गोष्टींमध्ये रमायला सामान्य माणसांना खूप आवडतं. पण रणभूमीवरच्या आणि गडकिल्ल्यांवरच्या युद्धांच्या गोष्टींमध्ये रमत असतानाच माणूस म्हणून आपल्या आजूबाजूच्या अनेक पातळ्यांवरच्या, अनेक स्वरूपांच्या युद्धांकडे मात्र आपलं काही प्रमाणात दुर्लक्ष होतं. हेच युद्ध जेव्हा कलेच्या माध्यमातून आपल्यासमोर आणलं जातं, तेव्हा त्यातलं नेमकं निवडायचं काय, ही प्रेक्षक म्हणून आपल्या अभिरुचीची परीक्षा असते.

गड जिंकण्यासाठी मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाची आणि विजयाची कथा सांगणारा ‘तान्हाजी’ आणि नकाराच्या बदल्यात चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला झेलावा लागलेल्या आणि हिंसेला बळी पडलेल्या लक्ष्मी अग्रवालची गोष्ट सांगणारा ‘छपाक’.. या दोन्ही सिनेमांमधून मनोरंजनाचे उपभोक्ते असलेल्या आपण प्रेक्षक म्हणून निवड केली ती मात्र इतिहासाचीच. एकाच वेळी प्रदर्शित होऊन ‘छपाक’ हा ‘तान्हाजी’च्या यशावर त्याच्या शब्दश: अर्थाप्रमाणे शिंतोडे उडवील की काय असे वाटत असतानाच; शिंतोडे उडाले खरे, पण ते ‘छपाक’वर. याचं कारण असं की, त्याच काळात घडलेल्या आणि वरवर पाहता अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या, पण त्याच्या मुळाशी गेल्यानंतर या सगळ्याला एक वेगळाच अर्थ आहे अशा घटना.  म्हणूनच हा विषय फक्त सिनेमापुरता मर्यादित राहिला नाही, तर अनेक पातळ्यांवरच्या युद्धाचा विषय बनला.

इतिहास हा स्थिर असतो, तो एका जागी थांबलेला असतो; पण वास्तव मात्र प्रवाही असतं. ‘छपाक’ नावाच्या एका वास्तवरूपी प्रवाहामध्ये जेव्हा ‘तान्हाजी’ नावाचा एक इतिहासरूपी घटक आला, तेव्हा ‘छपाक’चे ‘तान्हाजी’वर आदळणे इतक्या जलद गतीने झाले, की प्रेक्षकांनी स्वीकारण्याच्या तुलनेत असो, प्रसिद्धीच्या तुलनेत असो वा ‘सिनेमांच्या निकषांवर यशस्वी ठरला’ असे म्हणतात त्या निकषांवर असो; ‘तान्हाजी’ खरा उतरला. पण ‘तान्हाजी’चे हे ‘खरे उतरणे’ मात्र समाज म्हणून आपली बेगडी प्रगल्भता पुन्हा एकदा सिद्ध करणारे ठरले. ‘पुन्हा एकदा सिद्ध करणारे ठरले’ असे मी जाणीवपूर्वक म्हणते, कारण ‘तान्हाजी’ आणि ‘छपाक’ हे आताचे तात्कालिक उदाहरण असले तरी या आधीसुद्धा आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत आणि त्या प्रत्येक उदाहरणामध्ये इतिहासाला जेव्हा जेव्हा वास्तवाशी सामना करावा लागला त्या प्रत्येकवेळी इतिहासच जिंकला. पण इतिहासाच्या त्या जिंकण्यातून आमच्या हाती मात्र काहीच आले नाही. म्हणजे आकाशातून गारा पडाव्यात, त्या आम्ही हातात झेलाव्यात, पण मूठ उघडल्यानंतर मात्र त्या गारांचे पाणी होऊन जावे इतके तात्पुरते काहीतरी आम्हाला प्रत्येकच वेळी मिळालं. म्हणून हा विषय फक्त ‘तान्हाजी’ आणि ‘छपाक’ या दोन सिनेमांपुरता मर्यादित वाटत नाही, तर हे दोन सिनेमे सिनेविश्वातल्या ज्या दोन प्रतलांमधून येतात त्या दोन प्रतलांचा आणि त्यामुळे दोन चित्रपट विश्वांचाच हा वाद वाटतो. एक सिनेविश्व- जे इतिहास लोकांसमोर मांडून लोकांच्या आतमध्ये धगधगणाऱ्या एखाद्या कोपऱ्याला हात घालून त्यांना आकर्षित करण्याचं तंत्र वापरतं; तर दुसरं सिनेविश्व- वास्तव लोकांसमोर मांडून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची दाहकता दाखवून देण्यासाठी प्रयत्न करतं. अशा दोन चित्रपटांच्या प्रतलांमधील आणि चित्रपट बनवण्याच्या मानसिकतांमधीलच हा वाद वाटतो.

खरं तर सुरुवातीला चित्रपट हा एक वैज्ञानिक चमत्कार होता. या माध्यमातून गोष्ट सांगता येते हे लक्षात आल्यावर सुरुवातीला सगळ्यांना परिचित असणाऱ्या आणि आकर्षक वाटणाऱ्या अशा पौराणिक, ऐतिहासिक कथांचा भडिमार झाला. काळाची गरज लक्षात घेऊन त्यानंतर स्वातंत्र्यलढय़ाविषयी प्रेरणा देण्याचं कामही याच माध्यमाद्वारे झालं. चित्रपट या माध्यमाचा प्रभाव आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद लक्षात घेऊन सामाजिक विषमता, अन्याय, सामाजिक वास्तव यांना वाचा फोडणारे चित्रपटही तयार होऊ लागले. अशा चित्रपटांची निर्मिती होणं हे खरं तर चित्रपटाचा कला म्हणून विकसित होण्याचं एक महत्त्वाचं लक्षण होतं. म्हणजे ऐतिहासिक, पौराणिक चित्रपट ते वास्तववादी चित्रपट इथपर्यंत चित्रपटांच्या प्रगतीचा मार्ग लक्षात घेतला आणि त्याचा संदर्भ आताच्या काळाशी लावला, तर प्रचंड तफावत दिसते. वास्तववादी सिनेमे ते पुन्हा ऐतिहासिक पौराणिक कथानकं हा चित्रपटांच्या परतीचा प्रवास हे फक्त चित्रपटांचीच अधोगती नाही, तर समाजमनाच्या रसिकतेची आणि मनोरंजनाच्या गरजांचीही अधोगती दाखवून देतं. ‘तान्हाजी’ आणि ‘छपाक’ हे केवळ दोन तात्पुरते सिनेमे नाहीत, तर हे सिनेविश्वातील दोन वेगवेगळ्या प्रवाहांचे चेहरे आहेत.

ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा आपल्याला अजिबातच नवी नाही. पण या प्रवाहाप्रमाणेच वास्तववादी चित्रपटांचाही प्रवाह जुना आहे. पण भाषणाचा विषय केवळ ऐतिहासिक सिनेमे आणि वास्तववादी सिनेमे इतकाच मर्यादित असता तर इथेच थांबता आलं असतं.

पण हा विषय इथेच संपत नाही. कारण ‘तान्हाजी’ आणि ‘छपाक’ हे फक्त दोन सिनेमे नाहीत, तर दोन विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे दोन प्रातिनिधिक चेहरे आहेत, असं वाटतं. इतिहासातल्या एखाद्या घटकाचं, पात्राचं उदात्तीकरण करून ते दाखवण्याचा, लोकांच्या मनातील ज्वलनशील अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न ‘तान्हाजी’मधून झाला. हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काहीच दिवस आधी नागरिकत्वाच्या मुद्दय़ावरून आपल्या देशात पेटलेले वातावरण. त्या पाश्र्वभूमीवर ‘छपाक’मधली मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोण हिने जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध दर्शवणं, अगदी त्याच वेळेस ‘तान्हाजी’मध्ये एक भूमिका करणाऱ्या शरद केळकर या अभिनेत्याने एका मुलाखतीत ‘शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी उल्लेख करा’ असं म्हणणं, आणि या दोन्ही दृक्मुद्रणांचं समाजमाध्यमांतून एकाच वेळी प्रचंड प्रमाणात व्हायरल होणं. मला वाटतं, ही दोन दृक्मुद्रणं किंवा दोन कृती नव्हत्या, तर दोन राजकीय विधानं होती. ज्याचा बरोब्बर फायदा बॉलीवूडने उचलला. मग दीपिकाची भूमिका असलेल्या ‘छपाक’ला ‘बॉयकॉट’ करून ‘तान्हाजी’ला जाणं म्हणजे देशप्रेमी असणं, असं एक नवं समीकरण तयार झालं. खरं तर तानाजी म्हणजे गड जिंकून आणून प्रचंड शौर्याचं, पराक्रमाचं आपल्यासमोर घालून दिलेलं एक उत्तम उदाहरण होतं. आणि त्या काळी गड जिंकणं म्हणजे प्रचंड शौर्यानं, पराक्रमानं भरलेला एक पुरुष असणं, मर्द असणं. पण आताच्या काळामध्ये एका मुलीनं दिलेल्या नकाराच्या बदल्यात तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून आताचे मर्द आपली मर्दानगी सिद्ध करत आहेत. आणि आता काळानुसार आपली मर्दानगीची, पौरुषत्वाची संकल्पनासुद्धा बदलत चालली आहे. जी जास्त विघातक आहे. असे मर्द आम्हाला नको आहेत. त्यामुळे आता एक समाज म्हणून या पौरुषत्वाच्या गलिच्छ संकल्पनांना छपाक द्यायची गरज आहे. अन्यथा गड आपल्या हातून जाईल!

शेवटी सिनेविश्वाचं हे मोठंच्या मोठं वर्तुळ एका केंद्राभोवती एकवटलेलं असतं आणि ते म्हणजे तुम्ही-आम्ही प्रेक्षक. त्यामुळे काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं, याबाबत आपल्यात तयार होत चाललेली समज या एका उदाहरणाच्या आधारे ठरवता येणार नाही. प्रत्येक कलाकृती आणि सामाजिक, राजकीय भवतालाकडे बघण्याचा डोळसपणा आपण टिकवायला हवा. तो टिकवू असा आशावाद व्यक्त करताना, ज्या वातावरणात ‘तान्हाजी’ आणि ‘छपाक’चा विषय पालटला, त्याच वातावरणात गाजलेल्या फैज अहमद फैज यांच्या ओळी आठवतात. आपण समाज म्हणून या सगळ्या सिनेमांना आज सांगायची गरज आहे की- हम देखेंगे, लाजिम है, की हम भी देखेंगे!

हम देखेंगे

*उमा गायकवाड 

कोल्हापूर (द्वितीय क्रमांक)

‘सर्वात मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा

ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा

ना सागराचा, ना कूजनाचा

ना आमंत्रक ओठांतील हसण्याचा..

सर्वात मधुर स्वर

कोठे तरी, कुणाच्या तरी

मनगटातील शृंखला खळाखळा तुटण्याचा..’

या कवितेतून कुसुमाग्रज असं सांगतात की, कुणाच्या तरी हातातील शृंखला तुटणं आणि कुणी तरी स्वतंत्रतेचा श्वास घेणं ही फारच सुंदर गोष्ट आहे. झिया उल हक यांनी जनतेला बांधलेल्या शृंखला तुटाव्यात म्हणून फैज एक काव्य लिहितात आणि आम्हीही एक दिवस स्वतंत्रतेचा श्वास घेऊ, असे म्हणतात; पण आज तीच स्वतंत्रतेची भावना निर्माण करणारी ही कविता हिंदूविरोधी आहे, असे आपले काही समाजकंटक म्हणतात.

‘हम देखेंगे..

लाजिम है कि हम भी देखेंगे

वो दिन कि जिसका वादा है

जो लोह-ए-अजम्ल में लिखा है..’

सन १९८६. सुप्रसिद्ध गायिका इक्बाल बानो यांनी फैज यांची ही कविता जेव्हा तानाशाह यांच्याविरोधात जाऊन लाहोर येथील सभागृहात गायली, तेव्हा त्या सभागृहाचेच नाही तर त्या इमारतीचेही दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर हुकूमशाहीचा निषेध करत हजारो लोकांनी ही कविता आळवली व वणव्यासारखी पेटवली. याच वणव्याची ठिणगी १७ डिसेंबर २०१९ रोजी कानपूरच्या आयआयटीत पडली.

म्हणजे भारतात जेव्हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा आला, त्या वेळी हा कायदा देशाच्या सर्वधर्मसमभावाला भेदक आहे, असं दिल्लीतील विद्यार्थ्यांना वाटू लागलं आणि त्यांनी निषेधार्थ मोर्चे काढायला सुरुवात केली. भारतात व्यक्तिस्वातंत्र्य आहे, तिथे विद्यार्थ्यांच्या निदर्शनांत वावगं काहीच वाटत नाही; पण जेव्हा त्याबद्दल त्यांच्यावर अमानुष लाठीमार होतो, तेव्हा इथल्या शासनाची आणि पोलीस प्रशासनाची ही हुकूमशाही वाटायला लागते आणि याचाच निषेध म्हणून १७ डिसेंबर २०१९ रोजी कानपूर येथील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी फैज यांची ‘हम देखेंगे’ ही नज्म गायली. ही नज्म कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हती, तर हुकूमशाहीचा विरोधात आणि लोकशाहीच्या बाजूने होती. लोकांनी मात्र याचे नाना अर्थ काढले. ज्यांना कवितेचा गंध नाही, अशांनी या कवितेचा चुकीचा अर्थ घेत सबंध भारत पेटवून दिला. त्यातही ‘सब बुत उठवाए जायेंगे’, ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ या ओळींवर भर दिला गेला; पण याचा खरा अर्थ- ‘हे हुकूमशहा, तू आणि मी, आपण सर्व एका वैश्विक शक्तीपासून बनलो आहोत.. तू या वैश्विक शक्तीपेक्षा मोठं होण्याचा प्रयत्नही करू नकोस.. कारण त्या शक्तीच्या पुढे तू जाऊ शकत नाहीस.. आम्हाला सुखाने जगू दे.. एक दिवस असा येईल की, तुझ्या हुकूमशाहीचा बीमोड होईल आणि आम्ही स्वतंत्रतेचा श्वास घेऊ’, असा असावा; परंतु भारतातील चित्र पाहता, या कवितेचा हा अवमानच म्हणावा लागेल. ‘जे न देखे रवि, ते देखे कवी’ असं म्हणतात. त्यामुळे भारतात घडलेल्या घटना आणि कवितेची पाश्र्वभूमी समजून घ्यायची असेल, तर या कवितेच्या क्षितिजापलीकडे जाऊन विचार करायला हवा.

‘हम देखेंगे..’ या कवितेतून आलेला विचार आपण पाहिला; पण त्यापलीकडे जाऊन उच्चारपद्धती बदलली की त्याचे अनेक अर्थ मला दिसू लागतात. एखादा सामान्य नागरिक जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा नेत्याकडे जातो आणि म्हणतो, ‘साहेब, तेवढं काम करून द्या ना’; तेव्हा ते अधिकारी सांगतात, ‘हम देखेंगे.’ तेव्हा त्यातील चालढकल करणारी भावना दिसू लागते.. किंवा एखाद्याला आपण अतिरिक्त ज्ञान देऊ लागलो, की समोरचा लगेच म्हणतो- ‘हम देखेंगे’; तेव्हा ‘बघू आम्ही आमचं’ असं त्याला सुचवायचं असतं.. इटलीत जेव्हा करोना साथीस सुरुवात झाली, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेनं काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत इटलीने ‘हम देखेंगे’ म्हणत पाठ फिरवली, जी त्यांना चांगलीच भोवली..

‘हम देखेंगे’मधला आशावादी सूरही आपण लक्षात घ्यायला हवा. गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांसोबत एका आंब्याच्या झाडाशेजारून जात होते. तिथे काही मुलं आंब्याच्या झाडावर दगड मारून आंबे पाडायचा प्रयत्न करत होते. तेव्हा आपण या माणसालाही दगड मारून पाहू या, असा विचार करून एका वात्रट मुलाने गौतम बुद्धांना दगड मारला. त्या वेळी ‘हम देखेंगे’ची भावना त्या मुलांच्या मनात होती; पण बुद्ध मात्र त्या मुलांकडे गेले आणि त्यांची माफी मागितली. तेव्हा बुद्धांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं, ‘‘तुम्ही असे का वागलात?’’ त्या वेळी बुद्ध म्हणाले, ‘‘मुलांनी आंब्याच्या झाडाला दगड मारले तर आंब्याच्या झाडाने त्यांना आंबे दिले, पण त्यांनी मला दगड मारला तेव्हा त्यांना देण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते. म्हणून मी माफी मागितली.’’ ही कथा सांगताना आजचे सख्खे भाऊ आठवतात. ते जमिनीच्या तुकडय़ासाठी एकमेकांना ‘बघून घेईन’ची भाषा करतात. गावात एखादी योजना येते तेव्हा ती योजना अयशस्वी होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात, तेव्हा ‘ही योजना गावात कशी येते ते आम्ही बघूच’ असे म्हणताना त्यामागे ‘नकारात्मक हम देखेंगे’चा भाव असतो. परंतु तुमच्या-आमच्यातला ‘नकारात्मक हम देखेंगे’ बुद्धाच्या ‘सकारात्मक हम देखेंगे’मध्ये रूपांतरित झाला, तर खऱ्या अर्थानं भारताचा विकास होईल. कारगिलच्या युद्धात जेव्हा पाकिस्तानी सैनिक उंच शिखरावरून गोळीबार करत होते, तेव्हा भारतीय सैनिक काय करतात हे बघूच, अशी त्यांची धारणा होती; परंतु त्या वेळी भारतीय सैनिक एकवटले आणि ‘हम भी देखेंगे’ म्हणत त्यांनी युद्ध जिंकलं. त्या वेळी त्यांच्या ‘हम देखेंगे’वर आपल्या ‘हम देखेंगे’ने मिळवलेला विजय नमूद करावासा वाटतो..

*शब्दांकन : रसिका मुळ्ये, नीलेश अडसूळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 12:18 am

Web Title: edited excerpts of speeches from the speeches of student speakers of lokasatta vakas dashashareshu abn 97
Next Stories
1 चाँदनी चौकातून : करोनाप्रहर
2 coronavirus : ‘करोना’चं सत्य
3 सरन्यायाधीश हिदायतुल्लांचा आदर्श
Just Now!
X