06 August 2020

News Flash

युवा स्पंदने : नक्षलसावटातील अज्ञाताचे जिणे

पोलीस भरती सोडली तर गडचिरोलीत सध्यातरी दुसरी कोणतीही नोकरी उपलब्ध नाही.

(संग्रहित छायाचित्र)

देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

महाराष्ट्राच्या अर्धनागरी आणि ग्रामीण भागांतील तरुणाईचा ठाव घेणाऱ्या सदरातील हा दुसरा लेख, गडचिरोली जिल्हय़ातील शिकलेल्या, सरकारी नोकरी मिळवू पाहणाऱ्या तरुणांची कशी कोंडी होते याचे इत्थंभूत वास्तव मांडणारा..

एटापल्लीहून कसनसूरकडे निघाले की रस्त्यात हालेवारा नावाचे गाव लागते. गाव व रस्त्याला लागून असलेल्या एका शेतात धानाची कापणी करत असलेल्या एका आदिवासी महिलेला सहज विचारले, एकटीच का कापणी करते?नवरा कुठाय? मुले कुठे गेली? नवरा जंगलात गेला व मुलगा घरी आहे, असे उत्तर मिळताच सहज उत्सुकता चाळवली. तू काम करते व मुलगा घरी का, असा प्रश्न करत चल, तुझ्या मुलाला भेटू, म्हणत तिला गावात आणले. दबकत गावात शिरलेल्या त्या महिलेच्या घराच्या अंगणात प्रवेश केला तर घराला मोठे कुलूप! ते पाहून आश्चर्य वाटले. तिने कुलूप काढल्यावर घरात प्रवेश केला, तर २४ वर्षांचा तरुण पुस्तक वाचत बसलेला. त्याला बोलते केल्यावर कळलेली कथा दहशतीने ग्रस्त असलेल्या गडचिरोलीतील तरुणांच्या व्यथेवर नेमकी बोट ठेवणारी. हा तरुण अमरावती विद्यापीठातून कृषी विषयातील पदव्युत्तर परीक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर वसतिगृहात राहण्याचा त्याचा प्रयत्न फसला व नाइलाजाने त्याला घरी परतावे लागले. एक शिक्षित तरुण गावी परत आला हे नक्षल्यांना कळले तर ते त्याला जबरीने दलममध्ये घेऊन जातील ही घरच्यांची भीती. त्यामुळे, ‘‘आई-वडील त्याला रोज घरात कोंडतात व कामाला जातात. नोकरी मिळेपर्यंत तरी असेच लपतछपत दिवस काढावे लागणार, एकदा ती मिळाली की आई-वडिलांसकट येथून बाहेर पडणार,’’ हे त्या तरुणाचे शब्द अजूनही कानात घुमतात.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत गडचिरोलीतील तरुणाईचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्या प्रत्येक आशा-आकांक्षेला भीती व दहशतीची किनार आहे. नक्षलींचा प्रभाव असलेल्या दुर्गम भागात तरुणांना आजही चोरून-लपून मोबाइल वापरावा लागतो. कारण काय तर नक्षलींचा विरोध. आता दोन महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. भामरागड तालुक्यातील इरपनारच्या बेबी गंगा मडावी या बारावी शिकलेल्या तरुणीला नक्षल्यांनी गोळ्या घालून ठार केले. पोलीस दलात जाण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त करणाऱ्या बेबीला नक्षल्यांनी अडवले. तिच्याजवळ मोबाइल सापडला. त्यात अनेक पोलिसांचे क्रमांक होते. एवढे निमित्त या तरुणीचा जीव घेण्यासाठी पुरेसे ठरले.

पोलीस भरती सोडली तर गडचिरोलीत सध्यातरी दुसरी कोणतीही नोकरी उपलब्ध नाही. दर वर्षी जागा कितीही निघो, भरतीसाठी तरुण गोळा होतात १३ ते १४ हजार. त्यातले निम्मे तरी स्थानिक असतात. या सर्वाना नोकरीची संधी मिळत नाही. ज्यांच्या पदरी अपयश येते त्यांची जगण्याची कुतरओढ सुरू होते. भरतीत सहभागी झाले हे नक्षलींना कळलेले असते. त्यामुळे या तरुणांना गावात परत जाता येत नाही. या साऱ्यांच्या हाताला काम मिळेल, अशी गडचिरोलीच्या व्यापारपेठेची ऐपत नाही. मग हे तरुण वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यांत कामासाठी भटकत असतात. मध्यंतरी कोकणात आंब्याचे पॅकेजिंग करण्याच्या कामावर तीनशे रुपये महिन्याने काम करणारे तरुण मोठय़ा संख्येत आढळले. ही वेठबिगारी आहे असे लक्षात आल्यावर श्रमिक एल्गार या संघटनेने या तरुणांची सुटका केली. त्यानंतर त्यांना ठेवायचे कुठे, या प्रश्नावर बराच काथ्याकूट झाला. अहेरी तालुक्यातील गुरजाचे रामजी आत्राम व राकेश गावडे हे दोघे पोलीस भरतीत अपयशी ठरल्यावर कुठेच काम न मिळाल्याने घरी परतले. नक्षलींना कळताच ते गावात आले. त्यांच्या हाती राकेश लागला. रामजी बाहेरगावी असल्याने वाचला. भामरागड तालुक्यात इंद्रावतीच्या काठावर कंवढे नावाचे गाव आहे. तेथील एक तरुण भरतीत अपयशी ठरला व गावी परतला. नक्षलींनी त्याला उचलले. हे कळताच अख्खे गाव जंगलात नक्षल्यांकडे गेले. भरपूर विनवणी केली. शेवटी पोलिसात कधीच जाणार नाही, या गावकऱ्यांच्या हमीवर नक्षलींनी त्या तरुणाला सोडले. असे नशीब सर्वच तरुणांच्या वाटय़ाला येत नाही.

भरतीत अपयशी ठरलेले जे तरुण बाहेर काम करतात ते दुसऱ्या भरतीसाठी पुन:पुन्हा येत राहतात. त्यांचे आई-वडील त्यांना भेटायला गडचिरोलीत येतात, कारण ते गावी जाऊ शकत नाहीत. पेंढरीजवळच्या खरगीचा मुकेश नरोटे सध्या चेन्नईला एका कंपनीत अल्पवेतनावर काम करतो. तो भरतीत अपयशी ठरल्यावर गावी गेला व मारण्याची धमकी मिळताच आल्या पावली परतला. येथील प्रत्येक शिक्षित तरुणाची कथा अशीच आहे. गडचिरोलीत प्रत्येक तालुकास्तरावर शासकीय वसतिगृहे आहेत. ती कायम भरलेली असतात. सुट्टीच्या दिवसातसुद्धा! त्यांत राहणारे तरुण भरतीसाठी धावण्याचा सराव करतात, तोही एकत्रितपणे! गावात त्यांना सराव करता येत नाही. रोजच्या रोज धावणारा तरुण दिसला की नक्षली डोळे वटारतात. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असली तरी हे तरुण गावी परतत नाहीत. नक्षली जबरीने उचलून नेतील, अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते. या जिल्हय़ात अर्धवट शिक्षण घेतलेल्या तरुणांची संख्या प्रचंड आहे. शासकीय नोकरीसाठी पात्र नसलेल्या या तरुणांना नक्षलींकडे अजिबात जायचे नसते. दुर्गम भागात रोहयो अथवा वनखात्याच्या कामावर गेले तरी नक्षलींचा डोळा असतोच. अनेकदा तर ते शासकीय रोजंदारी स्वीकारायची नाही, असे फतवे काढत असतात. मग स्थलांतरणाशिवाय या अर्धशिक्षितांकडे पर्याय नसतो. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा हे टोकावरचे गाव. तिथले तरुण नागपूर व अन्य शहरांत चहाच्या टपरीवर पेले विसळण्याची कामे करतात.

या जिल्हय़ातील शिक्षण घेणाऱ्या मुलींची अवस्था तर मुलांहून वाईट आहे. त्या कायम नक्षल्यांच्या रडारवर असतात. चार वर्षांपूर्वी नक्षलींनी एका आश्रमशाळेतील तीन मुलींचे अपहरण केले होते. मुले रोजगाराच्या संधी शोधत कुठेही भटकू शकतात, पण मुलींना मर्यादा येतात. त्यांना नक्षलींकडून धोका होऊ नये म्हणून अनेक पालक मुलींच्या गळ्यात खोटी मंगळसूत्रे घालतात. लग्न झाले आहे, असे नक्षल्यांना माहीत झाले की ते त्या मुलीकडे दुर्लक्ष करतात. अलीकडच्या काही वर्षांत नक्षलींच्या दलममध्ये होणारी स्थानिकांची भरती पूर्णपणे मंदावली आहे. एखाद्दुसरा अपवाद वगळता कुणालाच तिकडे जायचे नसते. हे लक्षात आल्यावर बावचळलेल्या नक्षल्यांनी जबरदस्ती सुरू केली. ती टाळण्यासाठी दुर्गम भागातील तरुणांना अज्ञाताचे जिणे जगावे लागते.

नक्षलींपासून दूर पळणाऱ्या येथील बहुसंख्य तरुणांना मदत करतात फक्त पोलीस. जिवाला धोका असलेल्यांना ठाण्यात राहू देणे, लहानसहान कामे मिळवून देणे, धमकीमुळे कुणी अडचणीत आला तर त्याला मदत करणे यांसारखी असंख्य कामे पोलीस करत असतात. आताशा पोलीस भरतीतील पदांची संख्या घटली आहे, हे लक्षात आल्यावर पोलिसांनी गेल्या वर्षी रोजगार मेळावा घेतला. तिथे अनेक कंपन्यांना बोलावण्यात आले. यात चारशे तरुणांना नोकरी मिळाली. असे मेळावे दर वर्षी घेण्याचा मानस या दलातील अधिकारी व्यक्त  करतात. मध्यंतरी वनखात्याने येथील तरुणांना बाहेर नेऊन रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले. त्यातून अनेकांना नोकरीची संधी मिळाली. मात्र अशा प्रयत्नात सातत्य गरजेचे आहे. युती सरकारने सूरजागडला लोहखनिज उत्खनन सुरू केले. तिथे काहींना रोजगार मिळाला. आता त्यावर आधारित प्रकल्प गडचिरोली जिल्हय़ाला लागून असलेल्या आष्टीत होत आहे. तिथे या तरुणांना संधी मिळणे गरजेचे आहे. वर्ग तीन व वर्ग चारच्या शासकीय नोकऱ्यांत गडचिरोलीतील तरुणांनाच संधी द्यावी, त्यासाठी स्थानिक निवड मंडळ हवे, अशी मागणी अनेक दिवसांपासून हे तरुण करतात, पण अजून तरी त्याकडे कुणी गांभीर्याने बघितले नाही.

गेल्या चार वर्षांत नक्षलवादी चळवळ कधी नव्हे एवढी खिळखिळी झाली आहे. सध्यातरी पोलिसांची बाजू वरचढ आहे. हिंसाचारही बराच आटोक्यात आला आहे. मात्र नक्षलींचा वावर कायम आहे. त्यांच्या बैठका, हत्या क्रमाने सुरूच असतात. परिणामी, तरुणाईच्या मनातील भीती व दहशत कायम आहे. समोरचा नेमका कुणाच्या बाजूचा, नक्षलच्या की पोलिसांच्या अशा संशयाने प्रत्येकाकडे बघितले जाते. त्यामुळे फारसे कुणात मिसळायचे नाही, स्वत:च स्वत:चा मार्ग शोधायचा, अशी वृत्ती येथील तरुणांमध्ये बळावली आहे. हिंसेचा चटका सहन करावा लागणाऱ्या कुटुंबातील तरुणांच्या कथा आणि व्यथा तर आणखी वेदना देणाऱ्या आहेत. शासकीय स्तरावरून मिळणारा आर्थिक दिलासा सोडला तर त्यांच्या आयुष्यात काळोखच आहे. गडचिरोलीतील या साऱ्या तरुणाईच्या पाठीशी अख्ख्या राज्याने उभे ठाकणे गरजेचे आहे. ते सर्वाचेच कर्तव्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2019 1:17 am

Web Title: educated youth from gadchiroli want to get government jobs
Next Stories
1 अर्थशास्त्राच्या बांधावरून.. :कृषी क्षेत्र सुधारणांच्या पावसाच्या प्रतीक्षेत
2 ‘ऑगस्टा’ : सूडबुद्धी आणि अपप्रचारही!
3 विदाभान : ‘विदा’ म्हणजे नक्की काय?
Just Now!
X