समकालीन ज्वलंत विषयांवर त्या त्या क्षेत्रातील भाष्यकार अथवा तडफेने काम करणाऱ्या मंडळींना बोलावून चर्चा घडवून आणणारे व्यासपीठ ‘मुंबई कलेक्टिव्ह’चे दुसरे पर्व ९-१० डिसेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडले. एरवी वैचारिक कार्यक्रमांना अभावाने दिसणारी तरुणाईची दमदार उपस्थिती ही त्याची जमेची बाजू.. मात्र सम्यक लढय़ासाठी सर्वसमावेशी दिशा देऊ पाहणाऱ्या व्यासपीठापुढेही सहमती-सामोपचाराचे आव्हान आहेच..

भक्ती आणि विद्रोह तसे पाहता दोन वेगवेगळे तरी एकमेकाजवळचे आविष्कार आहेत. परंपरेने ती आपल्या सामाजिक घुसळणीची अभिन्न अंगेही राहिली आहेत.

भक्ती, ज्ञान, वैराग्याने ओथंबलेली तुकोबाची वाणीही विद्रोहाचा सूर आळवते आणि सांगून जाते-

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ।।

संतांच्या त्या कीर्तिसंपन्न परंपरेत भक्ती हेच विद्रोहाचे निशाण घेऊन पुढे आलेले आपल्याला दिसते.

अस्मिता, समाजभान, सुधारणा आणि नवसृजन ही सारी भक्ती आणि विद्रोहाच्या निरंतर सुरू राहिलेल्या संगराची अपत्ये आहेत. हा संगर आधुनिक काळातही वेगवेगळ्या तऱ्हेने सुरू आहेच. वैरागी, निरिच्छ तुकोबाच्या पदरी त्या काळी शिव्याशाप, लांच्छन, हालअपेष्टा आल्या. आज उमटणाऱ्या प्रतिक्रियाही जवळपास अशाच आहेत. शिव्यांचे स्वरूप आणि ती पोहोचविण्याची माध्यमे मात्र बदलली आहेत. आई-बहिणींच्या नावाने उद्धार, शेजारच्या राष्ट्रात रवानगी, पगारी ट्रोल्सद्वारे पाठलाग वगैरे सारे आज झेलावे लागते. बंडाची किंमत म्हणून हे सारे सोसत असलेला एक भला मोठा वर्ग आहे. हा वर्ग विचारी आहे, बुद्धिजीवी आहे. लेखक, कलावंत, नाटककार, पत्रकार, भाष्यकार, वकील, शिक्षक-प्राध्यापक, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आणि हो मोठय़ा संख्येने विद्यार्थी, युवकांचाही त्यात समावेश आहे. अशा पोसलेल्या ट्रोलधाडीला, सत्ताआश्रित भक्तांच्या धमक्यांना, पोलिसी दमनाला बधत नाही असा हा समूह एकजूटही करू लागला आहे. मागल्या शनिवार-रविवारी ‘मुंबई-कलेक्टिव्ह’ नावाचे दोन दिवसांचे विचारमंथन या अशा मंडळींचे सामाईक व्यासपीठ बनले. कलेक्टिव्हचे यंदाचे हे दुसरे पर्व होते.

हल्ले, लांच्छनांची देशभरात मालिका सुरू आहे. त्यात विशिष्ट व्यक्ती, लोकसमूह, संघटना, राजकीय विचाराला लक्ष्य केले जाणे ही एक सूत्रबद्ध रचना आहे. राष्ट्राभिमान, संस्कृतीरक्षण, गो-सुरक्षा आणि अलीकडे तर धर्माभिमानी इतिहास आणि अस्मितांचा रक्षणकर्ता असे बुरखे घेऊन त्यांचा हा उत्मात सुरू आहे. दहशत, दबदबा निर्माण करणे; प्रसंगी हिंसा, हत्या करणे आणि काहीही केले तरी कायद्याने शिक्षेपासून अभय मिळेल अशी त्या मंडळींची ठाम समजूत आहे. सत्ताआश्रित आणि काही तर अगदी सत्तेच्या परिघात असलेलीच मंडळी आहेत. यावर देशभरात विरोधांचे प्रतिध्वनीही उमटत आहेत. पुरस्कार वापसी, सायन्टिस्ट मार्च अथवा नॉट इन माय नेम, आय एम गौरी यांसारख्या हॅशटॅग मोहिमांच्या रूपात तसेच संविधान जागर यात्रेसारख्या रस्त्यावरच्या आंदोलनांतून ते लोकांपुढे आले. मुंबईत यांची तीव्रता कमी-अधिक राहिली असली तरी, याच पृथक मोहिमांना जोडणारी साखळी, सामाईक व्यासपीठ या रूपात मुंबई कलेक्टिव्हचे विचारमंथन आकाराला आले आहे, असे त्याचे समन्वयक प्रा. आर. रामकुमार यांनी सांगितले. देशाच्या संविधानातील स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्याय या मूल्यांना मानणारी आणि त्यातच आपले विधान पाहणारी ही सारी मंडळी आहेत. ही मूल्येच नव्हे तर त्यांचा उद्गाता असलेले संविधानच आज धोक्यात आले ही सर्वाना सतावणारी गोष्ट आहे.

मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि सफाई कर्मचारी आंदोलनाचे पाईक बेझवाडा विल्सन यांच्या मते, माणसाचे माणसाशी असलेले नाते नासवणाऱ्या धर्म आणि जातीच्या अस्मिता टोकदार बनत चालल्या आहेत. जमिनीपासून लाखो मैल दूर अवकाशात एकाच वेळी ११४ उपग्रह सोडणे हे देशाच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीचे लक्षण निश्चितच आहे. परंतु त्याच वेळी पाच फूट खोल नाल्यातील मैला साफ करायला विशिष्ट लोकांनाच उतरावे लागते. अनेकांचा तेथेच घुसमटून जीव जातो. तर कैकांचे संपूर्ण जीवन मैला वाहण्यातच सरते. या मंडळींसाठी तंत्रज्ञानाचा पर्याय का नाही? हा राष्ट्रीय अजेंडय़ाचा विषय का बनत नाही, असा त्यांचा सवाल आहे. लेखक-पत्रकार मनोज मिट्टा यांचे म्हणणे आणखी वेगळे आहे. व्यवस्थेबद्दल, तिच्या अधिकाराबद्दल अतीव आदराची भावना आपण जनसामान्य कायम ठेवतो. प्रत्यक्षात व्यवस्थेचा अधिकारीवर्ग कायद्याच्या आडून ठरवून दिलेल्या नियमांची चौकट सतत मोडत असतो. त्या संबंधाने पळवाटांच्या तो शोधात असतो. दिल्लीतील १९८४ ची दंगल असो, २००२ मधील गुजरातमधील नरसंहार अथवा झज्जरमधील किंवा घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमधील दलितांचे पोलिसी हत्याकांड सर्वत्र शासन-प्रशासनानेच व्यवस्थेला वाकवले. गंभीर गोष्ट म्हणजे त्यांच्या या नियमभंगांना आव्हान दिले जाईल, अशी शक्यता अलीकडे धूसर बनली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कलेक्टिव्हच्या दोन दिवसांतील विविध चर्चासत्रांमध्ये बोललेल्या वक्त्यांच्या मांडणीचा सूर हा आणि असाच होता.

‘सात सक्कम त्रेचाळी’समधून नागरी विभ्रम पटलावर आणणारे प्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार किरण नगरकर (हिंदुत्ववादी मंडळींसाठी नावडते व्यक्तिमत्त्व) यांच्या मते, आजचा काळ गोष्टीत शोभतील अशा कथा, मिथक, दंतकथांच्या कुरूप आणि मूर्तरूपात सुरू असलेल्या सादरीकरणाचा आहे. आजूबाजूला इतके भयंकर, अमानुष घडत असताना, त्याबद्दल दाखविलेली बेफिकिरी ही सध्या सतत बोचणारी गोष्ट असल्याची खंतवजा कबुली देताना, हताश झालो असेन, पण उमेद कायम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विस्मृतीत चाललेल्या हम-वतन संकल्पनेचा जागर स्तंभलेखक-कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी केला. आपण कोण आहोत? द्वेषभारित व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्सची गप गुमान गुलामी हीच आपली देशभक्ती? नागरिक म्हणून आपण एकमेकांचे काहीतरी लागतो हे झुंडीद्वारे ठेचून मारल्या जाणाऱ्या अखलाक, जुनैद, पेहलू खान अथवा अफराझूलबाबत का दिसून येऊ  नये? ते म्हणाले, भारतासाठी धर्मद्वेषी हिंसाचार नवीन नाही. धार्मिक दंगली या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरत्या आणि काही दिवसांपुरत्या घडतात आणि शमतातही. परंतु अकस्मात धर्माच्या नावे जमावाने एखाद्याला हेरून त्याचा मुडदा पाडणे.. असल्या अमानुषतेचे चित्रीकरण करून ते जाणीवपूर्वक समाजमाध्यमांमधून फैलावणे हे नव्यानेच सुरू आहे. शिवाय गत दोन वर्षांत अशा झुंडशाहीत बळी जाणारे ८४ टक्के मुस्लीम आणि उर्वरितांमध्ये सहा टक्के अज्ञात तर ८ टक्के दलित असणे हे काय सूचित करते. चित्रीकरणासह अनेक पुरावे समोर असतानाही बहुतांश प्रकरणांत झुंडशाहीचा बळी ठरलेले वा त्यांचे कुटुंबीयच पोलिसांकडून आरोपी बनविले जावेत? याचा अर्थ देशात तुम्ही कुठेही असा, केव्हाही मारले जाल..  धोक्याची टांगती तलवार तुमच्या शिरावर सतत असेल, असेच सूचित करणारा नाही काय? हर्ष मंदर यांनी उपस्थित केलेले हे रोकडे सवाल जमलेल्या प्रत्येकाच्या चिंतांचे प्रातिनिधिक रूप होते.

अभिनेत्री नंदिता दास यांच्या मते, दादरी, अल्वर, ऊना, सहारनपूर तर ताजी राजसमंद येथील घटना.. म्हणजे त्यांनी उत्पात करायचा आणि आपण रोषपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त करायची. ही एक न थांबणारी मालिकाच आहे, वरून दररोज नवनवे आघात सुरूच आहेत. तरी यांचे हे बुरखे फाडण्याचे काम सततपणे करावेच लागणार. यात दाभोळकर-पानसरे, गौरी लंकेश जिवानिशी जाणार. पण भीती आणि दहशतीला उत्तर आणि कठोर निग्रह आणि निर्भय सामना हेच असायला हवे. सुबोध मोरे आणि प्रा. प्रज्ञा दया पवार यांनी कोपर्डी निकालाबद्दल आनंद, तर त्याच नगर जिल्ह्य़ातील नितीन आगेच्या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले त्याबद्दल एक शब्दही नाही, या विरोधाभासावर बोट ठेवले. ढासळते अर्थकारण, दारिद्रय़, विषमतेने तळच्या लोकांची आर्थिक हलाखी, भरकटलेले परराष्ट्र धोरण, काश्मीर प्रश्नाची भळाळती जखम, शाळा-महाविद्यालयांना मेंढराचे कळप बनविणारा अभ्यासक्रमातील बदल, फेक न्यूजचा वाढता दबदबा आणि वाहिन्यांची प्राइम-टाइम बनवाबनवी असा चर्चेचा पट विस्तारतच राहिला. छद्म विज्ञानाचे गुणगान आणि अंधश्रद्धा, पाखंडाचे प्रचारक म्हणून खुद्द पंतप्रधान मोदीच भूमिका बजावताना दिसणे यावरही टिप्पणी केली गेली. या अनिष्टतेवर राजकीय आघाडीवरील पर्याय आणि सबळ उत्तराचा ऊहापोह करणारा कॉ. प्रकाश कारात यांचा तासाभराचा अभ्यासवर्गही झाला.

विज्ञान, विवेकाची भाषा करणाऱ्या पुरोगाम्यांनीच विज्ञानाला पुरेपूर जाणलेले नाही. आपल्यातील न्यूटन झोपलेला आहे, असा टीकात्मक सूर जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याचा होता. झाडावरून पडणारे सफरचंदाचे फळ यांना दिसते, पण न्यूटनप्रमाणे त्यामागची गुरुत्वाकर्षणाची शक्ती ओळखण्याची कुवत आपण गमावून बसलो आहोत काय? मोदी-संघप्रणीत हिंदुराष्ट्रवादी राक्षस शक्तिशाली नाही, तर आपल्याला आपल्या ताकदीचा विसर पडला आहे, असे त्याने सुनावले. तो मार्क्‍सवादी, हा फुले-आंबेडकरवादी, तो समाजवादी अशी कप्पेबाजी सोडून अधिकाधिक सहमतीच्या दिशेने वळण घेणे आजच्या आव्हानात्मक स्थितीतही इतके अवघड का बनावे असा त्याचा सवाल होता.

प्रख्यात विचारवंत रावसाहेब कसबे म्हणाले, सुंदर, अर्थपूर्ण जीवनाची आस एक कविकल्पना ठरावी, इतकी आज देशाची वाईट अवस्था बनली आहे. सामाजिक क्रांती झाल्याशिवाय लोकांचा एकमेकांप्रती सद्भाव दिसून येणार नाही. अशी क्रांती मार्क्‍सवादी-आंबेडकरवाद्यांकडून होईल अशी अपेक्षा. पण दोहोंची एकमेकांविरुद्ध तोंडे आहेत आणि डाव्यांचेही जातीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.

कबीर बादल प्रेम का, हम पर बरसा आई।

अंतर भीगी आत्मा, हरी भई बनराई।।

कबिराच्या या कवनाचा आधार घेत असा सर्वाना प्रेम-आनंदाने न्हाऊन काढणाऱ्या अमृतसरींच्या वर्षांवाची आस ही नवतरुणाईकडून पूर्ण होईल, अशी कसबे यांनी आशा व्यक्त केली.

मोदी सरकारविरोधात ब्र जरी काढला तरी त्याला देशद्रोही ठरविणारा टोकाचा अविवेक एकीकडे आहे. देशभरात वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनांना नसलेला राजकीय रंग भाजपच्याच नेत्यांकडून दिला जात आहे. तर कंपू, कळप आणि विभागणीचा सोस दुसऱ्या बाजूलाही आहेच. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर डावे-उजवे, दलित-सवर्ण वादाची झळ आणि तीव्रता वाढली आहे. पण तेथेही डावे की आंबेडकरवादी दुफळीला हवा मिळत असल्याचा प्रत्यय येताना दिसतच आहे. समूह म्हणून होत नसले तरी दलित-आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि अल्पसंख्याकांतील एकेकाला गाठून अत्याचार, अनाचार सीमा लांघत चालले आहे. अशा वेळी शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजावून सांगावे लागावे, हेच आजचे मोठे आव्हान असल्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कबुली सर्वच वक्ता जणू देत होता. आंधळी श्रद्धा आणि विचारसरणीच्या तुरुंगाचा शाप दोन्ही बाजूंना आहे.

ही श्रद्धा मंदिरे आणि इझमचे तुरुंग फुटतील तर कसे हा खरा प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने ‘प्ल्युरलिझम’ अर्थात सहमती, सामोपचाराची गरज आहे, त्यासाठीच मुंबई कलेक्टिव्हसारख्या व्यासपीठांची आणि त्याच्या तत्सम अनेकानेक प्रतिरूपांची गरज..

सचिन रोहेकर sachin.rohekar@expressindia.com