शिक्षणाचा बाजारहाट
‘तुमच्या बच्चूला कोणत्या शाळेत घातलं?’ या  प्रश्नामध्ये उत्सुकतेऐवजी ‘प्रतिष्ठा’ शोधण्याची खोच दडलेली असते. शिक्षण विस्तारले.. नवे प्रवाह आले.. तरी ‘मुलाचे शिक्षण’ या मुद्दय़ाशी जोडली गेलेली प्रतिष्ठा कमी झाली नाही. किंबहुना, शिक्षणाचे आयाम बदलण्यात हाच मुद्दा मोठा ठरत आहे. पूर्वी मूल कोणत्या शाळेत जाते, यावरून ते किती हुशार हे ठरायचे. त्या वेळी शिक्षणाचे माध्यम हा मुद्दाच नव्हता. कालांतराने इंग्रजी माध्यम की मराठी, असा प्रश्न उपस्थित झाला. अगदी थोडय़ाच दिवसांत ‘माध्यम’ हे जवळपास गृहीतच धरले गेले आणि ‘शाळा कोणत्या बोर्डाची?’ असा प्रश्न समोर येऊ लागला. मात्र आता प्राथमिक शिक्षण हे ‘शाळा कोणत्या बोर्डाची?’ या प्रश्नालाही मागे सारून ‘कोणती शिक्षण पद्धती?’ या प्रश्नाकडे प्रवास करत आहे. एसएससी, सीबीएसई, आयसीएसई यांची चर्चा तर कधीचीच मागे पडली. कारण आता यांच्या स्पर्धेला आयजीसीएसई, आयबीसारखी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळेही दंड थोपटून उभी ठाकली आहेत.
विद्येच्या माहेरगावी शिक्षण-मंडई
पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधून दिसणारे हे चित्र आता अर्धनागरीकरण झालेल्या छोटय़ा शहरांतही दिसू लागले आहे. अपवादात्मक ठिकाणी त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढला आणि प्रयोगशील शिक्षणही मिळू लागले. मात्र बहुतांश ठिकाणी किमान सुविधा, प्रशिक्षित शिक्षकांअभावी कच्ची मडकी तयार करण्याचाच धंदा वेगाने सुरू आहे.
मायीचा कच्चा माल मावशीच्या दारात!
‘माय मरो अन् मावशी उरो’ असे म्हणतात. पण याचा अर्थ माय मारून मावशीला जगवायचे असा होत नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात मात्र सर्वानी हाच अर्थ गृहीत धरलेला दिसतो. कधीकाळी जिल्ह्य़ाच्या ठिकाणी एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा असायची आणि आíथकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांची मुले या शाळेत दिसायची. गेल्या दहा वर्षांत जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणीही अशा शाळा वाढल्या. गेल्या चार-दोन वर्षांत तर गावपातळीवरही हे इंग्रजी शाळांचे पीक फोफावले आहे. ‘अ’ अननसाचाऐवजी ‘ए’ फॉर ‘अ‍ॅपल’ असे शब्द आता ऐकू येतात. जागोजागी चित्रविचित्र नावांचे ‘इंग्लिश स्कूल’ असे फलक लागलेले दिसतात. त्यांना शाळा तरी कसे म्हणावे? रस्त्यालगत टीनपत्र्याचे शेड ठोकलेले. कुठे लाकडी पार्टिशन आणि त्यावर रंगवलेले मिकी-माऊस किंवा ‘जॅक अँड जिल, वेंट अप द हिल’ यांसारख्या चार-सहा ओळी. समोर एक-दोन घसरगुंडय़ा.
दर्जा सुमारच
एवढय़ाच भांडवलावर हा धंदा चालतो. एक तर वसुली भरमसाट होते आणि कोणत्याच सरकारी नियंत्रणाची भीती नाही. जरा गांभीर्याने पाहिले तर ही फसवणूक अक्षरश: डोळे पांढरी करणारी.
गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात शिक्षणाच्या पार चिंध्या उडाल्या. जी माणसे गावपातळीवर नेतृत्व करणारी, त्यांची मुले तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळेत. त्यामुळे गावातल्या शाळेला कोणी वालीच नाही अशी परिस्थिती. नेमके याच काळात खासगी शाळांचे पेव फुटले आणि आता इंग्रजी शाळांचा बाजार सुरू झाला. आपला मुलगा किंवा मुलगी इंग्रजी शाळेत आहे याचे खेडय़ातल्या पालकांना कोण अप्रूप. जे आपल्याला मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळाले पाहिजे ही त्यापाठीमागची भावना. त्यातूनच इंग्रजी शाळेकडे वाढता कल. आपले लेकरू घरी आल्यानंतर आपल्याला मम्मी-पप्पा म्हणते, काकाला अंकल म्हणते, चारचौघांत विचारले तर त्याला वर्गात घोळून घोळून पाठ केलेली एखादी ‘पोएम’ म्हणता येते. अशा सगळ्या आभासी जगातच हे सर्व सुरू आहे.
इंग्रजी शाळांचा ‘साहेबी’ थाट; मराठी शाळांची लागली वाट
गावातल्या जिल्हा परिषद शाळेचा एकच ड्रेस ठरलेला. पांढरे शर्ट, खाकी चड्डी. इथे शाळेगणिक पोशाखाचे रंग बदलतात. गळ्याला ‘टाय’ अडकवलेली, पायात ‘शूज’, पाठीवर ‘स्कूलबॅग’, सोबत ‘वॉटरबॅग’ असा सारा थाट असतो. आई शेताला निघाली असेल डोक्यावर टोपले घेऊन किंवा बाप शाळेच्या वेळेत बलांना घेऊन निघाला असेल तर लेकरू ‘बाय’ करणार. तो काय शिकतो, हे पाहण्याकडे कोणालाही वेळ नाही किंवा त्याला काय शिकवले जाते हे पाहण्याची कोणाला गरजही वाटत नाही. अनेकांना बिचाऱ्यांना त्यातले काही कळतच नाही. लेकरांची वह्य़ापुस्तके पाहण्याऐवजी त्यांना सुटाबुटात पाहण्यातच ज्यांना आनंद होतो, अशा पालकांच्या अभावग्रस्त मानसिकतेचा अशा शाळांनी बरोबर फायदा उचलला. वेगवेगळ्या वाहिन्यांच्या मालिकांमधून टाय-बूट घालून शाळेत जाणारी मुले खेडय़ापाडय़ांतल्या पालकांच्या मनावरही ठसली. त्यातूनच आपले लेकरूही अस्सेच दिसले पाहिजे हा भाव दृढ झाला. गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत एकही रुपया द्यावा लागत नाही, पण इथे वर्षांला दहा-बारा हजार रुपये मोजण्याची तयारी.
संक्रमित आणि संभ्रमित..!
इंग्रजीत जेमतेम पस्तीस मार्क्‍सही मिळत नाहीत म्हणून दहावी-बारावीच्या बऱ्याच वाऱ्या केलेले अनेकजण आज पालकांच्या भूमिकेत आहेत. आपली मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालून त्यांना आपला जुना बदला घ्यायचा असतो. अर्थात हे समाधान आधीच्या न्यूनगंडातून आलेले असले तरी ते खरे मात्र नसते. लेकराला इंग्रजी आले म्हणजे ते कुठेच अडणार नाही असे वाटते, पण हे इंग्रजी कोणत्या काळाचे आहे हेसुद्धा समजत नाही. मुलांमधील क्षमतांचा विकास जागच्या जागीच थांबतो, मातृभाषेतून समजल्या जाणाऱ्या ज्ञान-विज्ञानाच्या संकल्पनांना स्वत:च्या हातांनीच बांध घातला जातो. एका अर्थाने रस्त्यालगत अशी खुराडी निर्माण करून बालकांच्या प्रतिभेचीच कत्तल केली जात आहे. अंगभूत क्षमता विकसित होण्याआधीच खुडण्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत डी. एड्, बी. एड्. होऊन नोकरीच्या शोधात असणारे अनेकजण गावात आहेत. त्यातल्याच काहींना नाममात्र पसे देऊन अशा शाळांमध्ये राबवून घेतले जाते.
किमान सुविधा नाहीत, प्रशिक्षित किंवा तज्ज्ञ शिक्षक नाहीत. सगळी कच्ची मडकी तयार करण्याचाच धंदा वेगाने सुरू आहे. आपली फसवणूक होत आहे हे ज्यांना कळत नाही अशा पालकांच्या आकांक्षांचेच कंपोस्ट खत तयार केले जात आहे. त्यांच्या स्वप्नांशी हा जीवघेणा खेळ सुरू आहे. ना धड मराठीचे आकलन, ना धड इंग्रजीची समज. अशा कात्रीत ही सगळी उमलणारी पिढी उद्या शाळेतून बाहेर पडली तरीही हा सगळा कच्चा मालच राहणार. फार उशिरा कळणार की आपल्याला आईचे प्रेम मिळालेच नाही आणि सावत्र मावशीची माया हा एक आभास होता. अशा वेळी भवितव्याबद्दल अश्रू ढाळूनही काहीच होणार नाही.
कल इंग्रजीकडेच पण..