साहित्यबा विषयांवरून होणारे वादंग आणि संमेलन म्हणजे वाहती गंगा मानून त्यात आपापली घोडी न्हाण्याची चढाओढ.. हे सारेच ‘अ. भा मराठी’ साहित्य संमेलनांत नित्याचे झाले आहे. पण या साऱ्याहून कितीतरी दूरचे, आपापले पास-तिकिट सांभाळत साहित्यानंदाच्या गावी जाऊ पाहणारे कितीतरी प्रवासी याच मांडवात असतात! संमेलनाला जाण्याचा नित्यनेम न चुकता पाळणारे  असे प्रवासी आणि त्यांना भेटत गेलेले सहप्रवासी यांची स्मरणसाखळी..
साहित्य संमेलन ही साहित्याची दिवाळी असते. दिवाळी हा जसा आनंदोत्सव, तसाच साहित्याचा आनंद घेण्याचा साहित्य संमेलन हा उत्सव असतो. १९९३ पासून आतापर्यंतच्या १९ वर्षांत जवळपास १८ अ. भा. मराठी साहित्य संमेलनांना मी हजर राहिलो आहे. पण कधीही कुठलीही अपेक्षा ठेवून या संमेलनांना गेलो नाही. संमेलनाच्या चार दिवसांत अनेक गैरसोयींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे, हे मनात ठेवून मी जातो, त्यामुळेच आयोजकांतर्फे करण्यात आलेल्या राहण्या-जेवण्याच्या (सशुल्क) सोयी मला फाइव्ह स्टार हॉटेलप्रमाणे वाटू लागतात. साहित्याच्या या दीपोत्सवात अनुभवलेल्या गैरसोयी विस्मरणात जातात आणि आनंदाचे क्षण कायम लक्षात राहतात.
सन २०००च्या बेळगावच्या साहित्य संमेलनात स्नानाची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था अत्यंत गैरसोयीची होती खरी; पण तिथले लक्षात राहिले ते उत्स्फूर्तपणे, राहण्याच्याच हॉलमध्ये भरलेले ‘संमेलन’! बेळगावात एका मोठय़ा हॉलमध्ये पन्नास-साठ गाद्या पसरून प्रतिनिधींची राहण्या-झोपण्याची व्यवस्था होती. सकाळी उठल्यावर चहापान सुरू असताना एक कवी आपली कविता दुसऱ्या सहकाऱ्याला ऐकवत होता. कविता चांगली असल्याने चार आणखी श्रोते त्याच्याभोवती जमले. तिथे एक पोवाडा गायक (शाहीर) होता, त्याला स्फूर्ती येऊन त्याने एक स्वरचित पोवाडा सादर केला. मंडळी कोंडाळे करून बसली. एकेकाला काहीतरी सांगण्याची ऊर्मी येऊ लागली. एकाने आदिवासींमध्ये काम करताना आलेले अनुभव सांगितले. एकाने कथाकथन केले, तर दुसऱ्याने नाटय़छटा सादर केली. एकाने राजकीय पक्षात काम करताना आलेले अनुभव सांगितले. दोन तास ही मैफल अशी रंगली! बेळगावच्या  गैरसोयी विस्मरणात गेल्या, पण ही मैफल लक्षात राहील.
२००१ मध्ये इंदूरचे साहित्य संमेलन जास्त लक्षात राहिले ते मुंबई ते इंदूर या प्रवासामुळेच. रात्री आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंतचा हा प्रवास. योगायोग बघा, साहित्य संमेलनाला जाणारी पुष्कळशी मंडळी एकाच रेल्वे बोगीत आली होती. आमचा सातआठ मंडळींचा ग्रुप. त्यापैकी सहा सीटच्या गाळय़ात एकच अनोळखी व्यक्ती होती. आमच्या गप्पा चालू होत्या. ती व्यक्ती आमच्या गप्पा ऐकत होती व एरवी हातातले पुस्तक वाचत होती. एक दीड तासानंतर आमच्यापैकी एकाने त्या व्यक्तीला विचारले, ‘आमच्या या बडबडीचा (अर्थात साहित्य विषयकच) तुम्हाला त्रास तर होत नाही ना?’ यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘अहो त्रास कसला? तुमच्या गप्पा मलाही आवडताहेत.. मीसुद्धा इंदूरला साहित्य संमेलनासाठीच निघालो आहे. माझं नाव डॉ. आनंद यादव.’
..डॉ. यादवांसारखे एक ज्येष्ठ ग्रामीण कथा-कादंबरीकार आमच्यासोबत होते, याचाच आनंद. परिचय झाल्यावर तेही आमच्या गप्पांत सामील झाले. त्याच रेल्वे डब्यात चित्रपट दिग्दर्शक राम गबालेही होते. त्यांचा परिचय करून घेतला आणि त्यांना आमच्याच कोंडाळय़ात बोलावून घेतले. राम गबाले पक्के गप्पिष्ट. पु. ल. देशपांडे यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.. ‘देवबाप्पा’ हा त्या काळात गाजलेला त्यांचा चित्रपट. त्याच्याही आठवणी निघाल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीचा एक वैभवशाली कालखंडच गबाले यांनी गप्पांमधून उभा केला. त्याच डब्यात प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले होत्या. त्यांचाही परिचय झाला. दरवर्षी साहित्य संमेलनाला जाणाऱ्या पुण्याच्या लेखिका-कार्यकर्त्यांचा एक ग्रूपही त्याच डब्यात होता. मग सकाळी त्यांचा परिचय होऊन त्यांच्याशीही विविध विषयांवर गप्पा झाल्या. ही सारी मंडळी इंदूर संमेलनाच्या मंडपात तीन दिवस कुठे ना कुठे भेटतच होती.
औरंगाबादच्या साहित्य संमेलनात डॉ. सरोजिनी वैद्य यांच्याबरोबरच्या गप्पा कधीही विसरता येणार नाहीत. आम्ही मुंबईकर कोंडाळे करून चहा पीत भोजनमंडपात बसलो होतो. तिथं डॉ. वैद्य चहाचा कप घेऊन आल्या. कुठून आलात, असा त्यांनी सहजच प्रश्न केला. ‘मुंबईहून’ असे उत्तर दिल्यावर ‘दरवर्षी संमेलनाला येता?’ हा त्यांचा पुढचा प्रश्न. एकाने त्यांना खुर्ची पुढे केली. त्या बसल्या आणि चहा पिता-पिता तासभर काव्यशास्त्रविनोदन म्हणाव्यात अशा गप्पा रंगल्या. डॉ. वैद्य यांचा समाज, साहित्य आणि भाषा यांचा अभ्यास व साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रातील त्यांचा अनुभव त्यांच्या सहज बोलण्यातूनही जाणवत राहिला.
त्या औरंगाबाद (२००४) संमेलनाच्या  आठ वर्षे आधी, म्हणजे १९९६ साली आळंदीच्या साहित्य संमेलनात थंडीत कुडकुडत रात्री दोन-अडीच वाजता ऐकलेले लता मंगेशकर यांचे जादूभरे स्वर, शिवाजी सावंत, बाबा कदम यांच्या विविध संमेलनांत ऐकलेल्या मुलाखती, अहमदनगर येथील साहित्य संमेलनावर (१९९७) आलेला तो मोर्चा आणि पुण्याच्या २००९च्या संमेलनात त्या वेळचे सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी मराठी भाषेसंदर्भात मांडलेली सरकारची भूमिका, त्याला तितक्याच मुद्देसूदपणे प्रा. पुष्पा भावे यांनी दिलेले उत्तर हे आजही आठवते.
साहित्य संमेलनांतून होणारी अध्यक्षांची भाषणे नंतर छापील पुस्तिका वाचल्यानंतरच नीट कळतात. छापील भाषण वाचण्याऐवजी उत्स्फूर्तपणे विचार मांडण्याचा प्रयोग पुण्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांनी केला होता, तो निश्चित स्वागतार्ह आहे. ज्या ज्या ठिकाणी ही संमेलने होतात, तेथे केवळ तीन-चार दिवस साहित्याचा जल्लोष न होता संमेलनापूर्वी आणि संमेलनानंतरही त्या शहरांत वाचनसंस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने सबंध वर्षभर तरी विविध उपक्रम व्हावेत. पुण्यातील संमेलनाने करून दिलेली ही सुरुवात चांगली आहे. ठाण्यातील संमेलनास जोडून बालवाचक संमेलन, आदिवासी संमेलन आणि महाविद्यालयीन वाचक-लेखक संमेलन असे उपक्रम झाले, ही चांगली गोष्ट झाली.
साहित्य संमेलनांवर होणाऱ्या प्रचंड खर्चावर आज टीका होते आहे. कालानुरूप ही संमेलने अशीच खर्चीक होत जाणार, असे दिसते. अशा वेळी ‘कितीही महागाई असली तरी आपण दिवाळी साजरी करतोच की नाही? या वर्षी साखर महाग आहे म्हणून कुणी यंदा लाडू-करंज्या नकोत असं म्हणत नाही..
तसंच या साहित्याच्या दिवाळीचं आहे.’ अशा अर्थाचे उद्गार शांताबाई शेळके यांनी कराडमधील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून काढले होते, हे आठवू लागते! आमच्यासारखे अनेक प्रतिनिधी अगदी दरवर्षी स्वखर्चाने येत असतील, पण एकंदर खर्च भागवण्याकरिता प्रायोजक शोधणे ही आयोजकांपुढील मोठी समस्या असते, हे मान्य करायलाच हवे.