डॉ. मानसी गोरे, डॉ. मीनल अन्नछत्रे

भांडवलदार पराकोटीचे नफेखोर आणि शोषक असतील, तर हे शोषण सर्वच साधनसामग्रीचे असते.. हे जगाच्या लक्षात आणून देताना कार्ल मार्क्‍सने मानव आणि पर्यावरण यांमधील दरीचाही उल्लेख केला. या मार्क्‍सची जन्मद्विशताब्दी येत्या शनिवारी आहे, त्यानिमित्त मार्क्‍सवादातील पर्यावरण-विचाराची रूपरेषा मांडणारे टिपण..

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

आपण सर्व जण कार्ल मार्क्‍स याला एक जर्मन तत्त्ववेत्ता, क्रांतिकारक अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक समाजवादाचे संस्थापक म्हणून ओळखतो. मार्क्‍सचे हे योगदान मानवी जीवनाच्या जवळपास प्रत्येक अंगाला स्पर्शणारे आहे. कार्ल मार्क्‍स याच्या वैचारिक योगदानात अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, नीतिमत्ता अशा सर्व पलूंचा प्रामुख्याने विचार केला जातो. या सर्व घटकांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून, अतिशय ठामपणे व सूत्रबद्ध पद्धतीने अभ्यास करून मार्क्‍सने भांडवलशाही पद्धतीत अंतर्भूत असलेल्या परस्परविरोधी शक्तींमुळे अपरिहार्य ठरणाऱ्या क्रांतीचे चित्र आपल्यासमोर मांडले आहे. या क्रांतीचा उद्घोष करताना मानव आणि पर्यावरण यांच्यात तयार होणारी दरी आणि मानवाने सातत्याने केलेला पर्यावरणाचा ऱ्हास यांवरील मार्क्‍सची भूमिका, हा फारसा प्रकाशझोतात न आलेला विषय!

मार्क्‍सच्या कोणत्याही सिद्धांताच्या वा विचारांच्या मुळाशी भांडवलशाही पद्धतीत होणारे कामगारांचे शोषण आणि एकूणच उत्पादन प्रक्रियेत क्रयवस्तूंना असलेले अनन्यसाधारण महत्त्व हे दिसते. ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ (१७७६) हा अर्थशास्त्रातील पायाभूत ग्रंथ लिहिताना वैचारिक पातळीवर अ‍ॅडम स्मिथने दर्शवलेली भांडवलशाही आणि प्रत्यक्षात कामगारवर्गाचे शोषण करणारी भांडवलशाही यांत खूप तफावत होती. कार्ल मार्क्‍सने निडरपणे भांडवलशाहीचे खरे रूप लोकांसमोर आणले. भांडवलदारांचे वर्चस्व असलेल्या उत्पादन प्रक्रियेत कामगारांची श्रमशक्ती हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. वस्तूला तिचे उपयुक्तता वा विनिमय मूल्य हे केवळ कामगारांच्या योगदानामुळे प्राप्त होत असते. आणि असे असूनसुद्धा त्यांना त्याचा मोबदला न देऊन भांडवलदार केवळ स्वतच्या नफ्याची बाजू पाहात आहेत, हे मार्क्‍सला चीड आणणारे होते. इथे खरी परिस्थिती दाखवताना मार्क्‍सने, ‘सामाजिक दरी’ , ‘आर्थिक दरी’, आणि ‘मानव आणि पर्यावरण यांच्यातील दरी’ असे संदर्भ दिलेले आढळतात. भांडवली पद्धतीने केलेल्या शेती व उद्योगांमुळे मालक-गुलाम, शेतमालक-शेतमजूर व कारखानदार आणि कामगार असे समाजाचे वर्गीकरण होऊन ‘सामाजिक दरी’ तयार होते. मग जो जास्त प्रबळ, ज्याच्याकडे अधिसत्ता त्याच्याकडे पसा यातून अति श्रीमंत आणि खूप गरीब अशी न मिटणारी ‘आर्थिक दरी’सुद्धा निर्माण होते. या सगळ्या प्रक्रिया सुरुवातीला भौतिक पद्धतीने होत जातात. मुळातच कोणत्याही वस्तूंच्या उत्पादनात कामगारांना मिळणाऱ्या वेतन व कामगारांनी बनविलेल्या वस्तू बाजारात विकताना भांडवलदारांना मिळालेला नफा यामधील मोठय़ा तफावतीमुळे आर्थिक स्तरावर भांडवलदार व कामगार यांच्यात ताणतणाव निर्माण होतात.

या सर्व प्रक्रियांचे सामाजिक स्तरावरील परिणाम, एका बाजूला सर्व सुखे व ऐषारामात जगणारे, सधन असे भांडवलदार व दुसऱ्या बाजूला किमान किंवा निर्वाह वेतनावर जगणारे, आर्थिक पिळवणूक होणारे, शोषित जीवन जगणारे व या सर्व गोष्टींमुळे प्रत्यक्ष उत्पादित वस्तू, उत्पादन प्रक्रिया यापासून दुरावलेले कामगार यांच्यातील वर्गकलह (क्लास स्ट्रगल) स्पष्ट करतात. या आर्थिक व सामाजिक परिणामांची पुढील अवस्था म्हणजेच मानवी जीवन व पर्यावरण यांच्यातील वाढती दरी किंवा फूट. कोणत्याही भांडवलशाहीत उत्पादन शक्ती ही अतिशय महत्त्वाची भौतिक परिस्थिती असते. यामध्ये सजीव वस्तूंचा म्हणजे कामगार, मजूर, संशोधक, अभियांत्रिकी आणि सजीवेतर वस्तूंचा म्हणजे जमीन, कच्चा माल, यंत्रे यांचा समावेश होतो. इथेच नेमका मानवी जीवन व पर्यावरण यांना जोडणारा दुवा म्हणून श्रमशक्ती किंवा पर्यायाने कामगार हा घटक भांडवलदारांच्या अतिरिक्त नफ्याच्या लोभापायी निसर्गापासून हळूहळू दुरावत जातो.

मानवी जीवन व पर्यावरण यांच्यातील वाढती दरी याबद्दलचा मार्क्‍सचा विचार हा १८१५ ते १८८० या काळातील ब्रिटनमधील दुसऱ्या कृषी क्रांतीशी निगडित आहे. या काळातील सनातनवादी माल्थस व रिकाडरे यांना अपरिचित असणारे पण जर्मन कृषी रसायनशास्त्रज्ञ लायबिग याच्या १८४० मधल्या भांडवलशाही पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीमुळे जमिनीतील पोषक तत्त्वांचा चक्रीय प्रवाह खंडित होऊन होणाऱ्या जमिनीच्या घटणाऱ्या सुपीकतेसंबंधीच्या विवेचनाच्या आधारे मार्क्‍सने यासंबंधीचे आपले विचार मांडले. त्याने समाज व पर्यावरण यात निर्माण होणारी दरी स्पष्ट करताना ऐतिहासिक पुरावे देऊन असे सांगितले की आपल्या सतत वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर होणाऱ्या मानवी हस्तक्षेपात नकळतपणे कामगारवर्गाने वा श्रमशक्तीने हातभार लावला आहे. भांडवलशाहीच्या विकासाच्या प्रक्रियेत वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करून, त्याचे उत्पादन मूल्य कमी करून आपला जास्तीत जास्त नफा करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेमुळेच निसर्गातून मोठय़ा प्रमाणावर कच्चा माल घेऊन त्यावर कामगारांनी प्रक्रिया करून तो ग्राहकांना विकताना निसर्गावर अतिक्रमण झाले आहे. जेवढय़ा प्रमाणात व ज्या ठिकाणाहून निसर्गाकडून मानवाने संसाधने घेतली त्या प्रमाणात, त्या ठिकाणी त्याचे उलटपक्षी पुनर्भरण झाले असते तर ही दरी निर्माण झाली नसती. परंतु भांडवलशाहीमध्ये निसर्गातील घटकांचे नैसर्गिकरीत्या होणारे चक्रीय पुनर्भरणच खंडित झाले. भांडवलशाही समाजव्यवस्थेपूर्वी झाडे व मानवी समाज यांच्याकडून निर्माण होणारा कचरा हा खताच्या रूपाने जमिनीतील पोषक तत्त्वे कायम राखत होता. परंतु भांडवलशाहीमध्ये शेतीचे मोठय़ा प्रमाणावर खासगीकरण होऊन शहरे व खेडी यात या कचऱ्याचे व खताचे असंतुलन निर्माण झाले. वस्तूंच्या उत्पादनातही तेच झाले. खेडय़ातील नैसर्गिक पर्यावरणातून मोठय़ा प्रमाणावर कच्चा माल उचलून जास्त नफ्यासाठी तो शहरातील सधन ग्राहकांना विकताना या नैसर्गिक पुनर्भरणाच्या प्रक्रियेला मोठीच खीळ बसली. यामुळे खेडय़ातील नैसर्गिक पर्यावरणातील पोषक तत्त्वांची खूप हानी झाली, तर शहरातील उद्योगधंद्यांमुळे नद्या व शहरे यांचे प्रदूषण वाढले. अशा प्रकारे मार्क्‍सच्या मते भांडवली पद्धतीच्या शेती व उद्योगांमुळे निसर्गातून माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या गरजा भागविण्याच्या क्षमतेवर बंधने आली व तसेच मानवाकडून निसर्गाला मिळणाऱ्या मातीतील पोषक तत्त्वांच्या नैसर्गिक पुनर्भरणावर मानवी हस्तक्षेपामुळे मर्यादा आल्या. मूठभर भांडवलदारांच्या खासगी नफ्यासाठी व त्या नफ्याच्या ईष्रेपोटी नैसर्गिक साधनसंपत्तीची फार मोठी हानी झाली. हे चक्र भांडवलशाहीच्या आद्यकाळापासून आजतागायत सुरूच राहिले आहे.

मानवी वसाहतींची आणि कुटुंबव्यवस्थेची निर्मिती माणसाला कधीही न संपणाऱ्या मानवी इच्छांकडे घेऊन जाऊ लागली आणि मग त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी माणसाने निसर्गावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. आज आपण ओल्या-सुक्या कचऱ्याचे विघटन, जमिनीची नापीकता, प्रदूषणाचे वाईट परिणाम, त्यामुळे जागतिक तापमानात होणारी वाढ व तिचे जगातील गरीब लोक व गरीब राष्ट्रांवर होणारे दुष्परिणाम या आणि अशासारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहोत. आज अनेक झाडे, जंगले तोडून मानवी वस्त्या विकसित होत आहेत. प्रचंड मोठय़ा प्रमाणावर होणारी वाहनांची उत्पादने, जीवाश्मइंधनांचे वाढते ज्वलन व त्यामुळे होणारे कार्बनचे प्रदूषण, हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण व या सर्व गोष्टींमुळे सतत वाढणारा जागतिक तापमान वाढीचा वैश्विक धोका हा आजच्या आधुनिक भांडवलशाहीमुळे निर्माण होणाऱ्या, ‘मानवी जीवन व पर्यावरण यांच्यातील सतत रुंदावणाऱ्या दरी’चाच परिणाम नाही का?

आजपासून साधारणपणे १५० वर्षांपूर्वी पर्यावरणाच्या या ऱ्हासाची सुरुवात झाल्याचे आपण मानतो, पण त्यामागची कारणे दाखवणाऱ्या कार्ल मार्क्‍सचे विचार, त्याचा सखोल अभ्यास व सुसूत्र विवेचन पाहून आपण खरोखरच थक्क होतो. मार्क्‍सच्या काळात इंटरनेटसारखीच काय, रेडिओसारखीही संपर्क माध्यमे उपलब्ध नसताना, वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेली मते जाणून घेऊन, त्यांच्या आधारे अर्थशास्त्रासारख्या विषयात इतके तर्कशुद्ध, ऐतिहासिक ठाम पायावर व काळाच्या पुढचे विचार मांडणाऱ्या मार्क्‍सपुढे आपण नतमस्तक होतो. आज दीडशे वर्षांनंतरसुद्धा मार्क्‍सच्या विचारांची योग्यता फार मोठी आहे असे जाणवत राहते. मार्क्‍सला त्याच्या आयुष्यात या उल्लेखनीय कार्यासाठी फारसे कौतुक प्राप्त झाले नाही. पण ५ मे १८१८ रोजी जन्मलेल्या या विचारवंताच्या दोनशेव्या जयंतीला निदान त्याच्या या कमी प्रकाशित बाजूंची चर्चा तरी सुरू व्हावी, म्हणून ही सर्व धडपड!

लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात प्राध्यापिका आहेत. ईमेल : manasigorev@gmail.com, m.annachhatre@gmail.com

मिलिंद मुरुगकर यांचे माती, माणसे आणि मायाहे पाक्षिक सदर, तसेच राजीव साने यांचे विरोध-विकास-वादहे साप्ताहिक सदर या आठवडय़ापुरते उद्या- गुरुवारी प्रकाशित होईल.