युरोपीयन कौन्सिलचे अध्यक्ष चाल्र्स मिशेल आणि युरोपीयन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला फॉन देर लायेन यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांच्यासह तुर्कस्तानची राजधानी अंकारातील सरकारी चर्चागृहात बैठकीसाठी प्रवेश केला, तेव्हा त्यांच्यापैकी दोन्ही पुरुष प्रतिनिधींनी तेथे असलेली दोन खास आसने त्वरित पुढे होऊन पटकावली. त्यांच्या या कृतीने आश्चर्यचकित झालेल्या युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला काही क्षण स्तब्ध उभ्या राहिल्या. काही मिनिटांनी त्यांची आसनव्यवस्था तेथून दूरवर असलेल्या सोफ्यावर करण्यात आली. या ‘सोफागेट’ प्रकरणाचे दृक्मुद्रण प्रसारित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजनयिक शिष्टाचाराचा आणि महिला सन्मानाचा मुद्दा चर्चिला जात आहे. युरोपातल्या काही माध्यमांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे, तर काहींनी युरोपीय महासंघाच्या धोरणांतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. तुर्की वर्तमानपत्रांनी युरोपातल्या माध्यमांवर आरोपांच्या फैरी झाडताना एर्दोगान यांची पाठराखण केली आहे.

इस्तंबुलहून प्रकाशित होणाऱ्या सरकारधार्जिण्या ‘डेली सबाह’ या वृत्तपत्राने- ‘सगळे काही ठरल्याप्रमाणे आणि शिष्टाचारानुसार झाले, तेथे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन घडले नाही,’ असे असत्य विधान केले आहे. पदज्येष्ठतेनुसार युरोपीयन कौन्सिलचे अध्यक्ष हेच सर्वोच्च कार्यकारी अधिकारी असतात, युरोपीयन कमिशनच्या अध्यक्ष पदाधिकारानुसार चौथ्या क्रमांकावर असतात, अशी मखलाशी करताना बसण्याची व्यवस्था दोन्ही पक्षांनी निश्चित केली होती, तथापि युरोपीय माध्यमांनी एर्दोगान यांचे चित्र स्त्रीद्वेष्टा असे विकृत पद्धतीने रंगवले, अशी टीकाही या वृत्तपत्राने केली आहे.

आंतरराष्ट्रीय शिष्टाचार, महिला अवमान आदी महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देत इस्तंबुलहूनच प्रकाशित होणाऱ्या ‘येनी यसम’ या अन्य एका वृत्तपत्राने बैठकीत झालेल्या चर्चेच्या मुद्द्यांवर विवेचन करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. तो ‘बियानेट’ या संकेतस्थळाने इंग्रजीमध्ये भाषांतरित करून प्रसारित केला आहे. त्याचे प्रारंभ विधान- ‘शब्दांपेक्षा कृती अधिक बोलकी असते,’ असे शब्दश: बोलके आहे.

बेल्जियमच्या ‘ल सोइर’ने मात्र, युरोपीय महासंघावर टीका केली आहे. युरोपीय महासंघाला भूमिकांबद्दल स्पष्टतेची गरज असल्याचे ‘सोफागेट’ प्रकाराने अधोरेखित केले आहे, असे नमूद करताना- ‘जहाजाचे सुकाणू एकाच कप्तानाच्या हाती असेल तर युरोपला समजणे अधिक सोपे जाईल,’ या युरोपीयन कमिशनचे माजी अध्यक्ष जाँ क्लोद युन्का यांच्या विधानाचा दाखलाही येथे देण्यात आला आहे.

युरोपीय महासंघाने तुर्कस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी भूमिका इटलीतील ‘आव्हेनीअर (फ्युचर)’ या वर्तमानपत्राने घेतली आहे. ‘अनादर करणाऱ्या आणि मूलत: अस्वीकारार्ह वर्तनाचे सार्वजनिक ठिकाणचे हे प्रदर्शन हा एक लाजिरवाणा सामाजिक प्रमाद वा निर्लज्जपणा आहे. ‘सोफागेट’मधून प्रतिबिंबित होणारी प्रवृत्ती आपण सहन करू शकत नाही. युरोपीय संस्थांपैकी एका संस्थेची प्रमुख एक महिला असल्यामुळे तिच्याबाबत असा भेदभाव केला गेला. हे सहन केले जाऊ शकत नाही,’ असेही ‘आव्हेनीअर’च्या संपादकीय लेखात म्हटले आहे.

नेदरलँड्सच्या ‘डी व्होल्क्सक्रॅन्त (द पीपल्स पेपर)’ने या प्रकाराचे वर्णन ‘लाजिरवाणा तंटा’ असे करताना ही घटना युरोपीय महासंघातील क्षमता स्पर्धेचे संकेत देत असल्याचे भाष्य केले आहे. क्रोएशियाच्या ‘इव्हिनिंग पेपर’ने हेतुपुरस्सर घेतलेला सूड की शिष्टाचाराची चूक, असा प्रश्न उपस्थित करताना, कौन्सिलचे अध्यक्ष मिशेल हे २७ देशांचे प्रतिनिधित्व करीत होते, तर उर्सुला या युरोपीय प्रशासनाच्या कार्यकारी समितीचे प्रतिनिधित्व करीत होत्या, असे मत मांडले आहे. ऑस्ट्रियाच्या ‘विनर झायटुंग’ने- युरोपच्या परराष्ट्र धोरणातील ही घोडचूक, असे घडल्या प्रकाराचे वर्णन केले आहे.

‘डीडब्ल्यू न्यूज’ या जर्मनीतून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी वृत्तपत्राने युरोपीय महासंघ आणि तुर्कस्तान यांच्यातील ‘सोफागेट’ आरोपांचा खेळ आता दुसऱ्या सत्रात पोहोचल्याची टीका केली आहे. राजनैतिक चुकांनंतर युरोपीय महासंघ आणि तुर्कस्तान आता परस्परांवर दोषारोप करीत आहेत. युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष मिशेल यांनी ‘सोफागेट’प्रकरणी आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्नही येथे उपस्थित करण्यात आला आहे.

तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी युरोपीय महासंघाअंतर्गत दोन संस्थांच्या अध्यक्षांची भेट घेतली, परंतु त्यांच्यापैकी एका महिलेला समान आसन न मिळाल्याने तिला काही क्षण उभे राहून १२ फूट दूर असलेल्या सोफ्यावर बसवण्यात आले, तेव्हा एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली, अशी खंत ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तलेखात नोंदवण्यात आली आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)