23 March 2019

News Flash

परीक्षा पद्धतीचे गणित चुकतेय!

एकूण अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती यांच्यामध्ये महत्त्वाचा बदल व्हायला हवा हे स्पष्ट आहे.

मंगला नारळीकर

शालान्त परीक्षेत दरवर्षी लाखाहून अधिक विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण होतात. ज्यांना अभियांत्रिकी, संगणकशास्त्र अशा क्षेत्रांत जावयाचे नाही त्यांच्यासाठी आजच्या नववी-दहावीच्या गणिताच्या अभ्यासक्रमातील जवळपास अर्धा भाग आवश्यक नाही. त्यामुळे एकूण अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती यांच्यामध्ये महत्त्वाचा बदल व्हायला हवा..

ठरवलेल्या अभ्यासक्रमाची शक्य तेवढी चांगली, समजण्याजोगे स्पष्टीकरण देणारी, रंजक अशी पाठय़पुस्तके तयार झाली, तरी गणित शिक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही याची जाणीव आहे व त्यासाठी वेगळा प्रयत्न व्हायला हवा हे मनापासून वाटत आहे. दरवर्षी १५ लाखांहून जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसतात, त्यातील अनेक विद्यार्थी गणितात व कदाचित आणखी विषयात नापास होतात. पूर्वी या नापासांचे प्रमाण खूप जास्त होते. ते कमी होण्यासाठी आता परीक्षा पद्धती बदलली आहे. २० गुण अंतर्गत चाचणीसाठी, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत ४०% गुण अगदी सोप्या प्रश्नांसाठी असे ठेवूनदेखील एक लाखाहून जास्त विद्यार्थी गणितात नापास होतात. जेमतेम पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गणितातील क्षमता पुरेशा नसतात. एकूण अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती यांच्यामध्ये महत्त्वाचा बदल व्हायला हवा हे स्पष्ट आहे.

जवळजवळ निम्मे विद्यार्थी दहावीनंतर गणिताचा अभ्यास करत नाहीत. जे विद्यार्थी विज्ञान, इंजिनीअरिंग, स्थापत्यशास्त्र, उच्च गणित, संगणक यांचा अभ्यास करणार असतील, त्यांनाच गणिताचे अधिक ज्ञान आवश्यक असते. इतर सामान्य विद्यार्थी, जे स्वतंत्र उद्योग, व्यवसाय, विविध लहान नोकऱ्या किंवा कौशल्याधिष्ठित काम करतात, त्यांच्यासाठी आजच्या नववी-दहावीच्या गणिताच्या अभ्यासक्रमातील जवळपास अर्धा भाग आवश्यक नाही. त्यांच्यासाठी नववी व दहावी साठी गणिताचा सोपा O level (ordinary level)किंवा साधारण स्तर आणि गणिताचा अधिक अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्यांना A level (Advanced level) किंवा प्रगत स्तर असे दोन अभ्यासक्रम असावेत. अर्थात दोन स्तरांवरील परीक्षा वेगळ्या असाव्यात. सामान्य स्तरासाठी अभ्यासक्रम बराचसा आठवीच्या अभ्यासक्रमासारखा व त्यात थोडे संख्याशास्त्र, आय कर, जीएसटी यांची ओळख असावी. त्यासाठी लागणारी शेकडेवारीची गणिते आधी शिकवलेली असतात. प्रगत स्तरासाठी सध्याच्या अभ्यासक्रमात किंचित वाढ करून अधिक आव्हानात्मक गणिते शिकवता येतील. सामान्य विद्यार्थी आणि प्रज्ञावंत विद्यार्थी दोघांचेही अधिक चांगले शिक्षण त्यामुळे होईल आणि मूल्यमापनही न्याय देणारे होईल.

सध्या मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिकेत अंदाजे ४०% गुणांचे प्रश्न अगदी सोपे, सामान्य विद्यार्थ्यांना येतील असे असतात व जेमतेम ५ ते ८% गुणांचे प्रश्न आव्हानात्मक असतात. उरलेले मध्यम काठिण्यपातळीचे असतात. त्यामुळे कमी क्षमतेच्या विद्यार्थ्यांना पुरेसे प्रश्न सोडवता येत नाहीत तर प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा कस पाहण्यासाठी पुरेसे प्रश्न नसतात. सोपा अभ्यासक्रम आणि त्यावर ६०% सोपे उपयोजन असणारे प्रश्न व ४०% मध्यम उपयोजन असणारे प्रश्न असले, तर ड लेव्हल ची परीक्षा थोडा अभ्यास केला तर सहज पास होता येईल. तसा अभ्यासक्रम व परीक्षा असेल, तर अंतर्गत गुणांची कुबडी लागणार नाही. प्रचंड संख्येने विद्यार्थी नापास व निराश होणार नाहीत. या उलट लेव्हल अच्या परीक्षेत ५०% गुणांचे प्रश्न मध्यम काठिण्यपातळीचे आणि उरलेले क्रमाने थोडेथोडे अवघड असले, तर त्यांच्या अभ्यासक्रमाला न्याय देणारी, त्यांचा कस पाहणारी परीक्षा असेल. उच्च गणिताच्या अभ्यासाची त्यांची तयारी अधिक चांगली होईल. सध्याची परीक्षा पद्धत पुढे गणिताचा अभ्यास न करणारे कमी क्षमतेचे विद्यार्थी, तसेच उच्च गणिताचा अभ्यास करू इच्छिणारे प्रज्ञावान विद्यार्थी, दोघांनाही न्याय देत नाही.

जेथे नववी, दहावीचे अनेक वर्ग आहेत, तिथे काही ड लेव्हलचे तर काही अ लेव्हलचे ठेवता येतील. एकच वर्ग असेल, तर पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून कोणती लेव्हल ठेवायची ते ठरवावे. वर्ग एका लेव्हलचा असला आणि विद्यार्थी स्वत: तयारी करून वेगळ्या लेव्हलची दहावीची परीक्षा देऊ  इच्छित असेल, तर तशी परवानगी असावी. पुढे ११वी, १२वीच्या गणित परीक्षांसाठीदेखील दोन स्तर असावेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या एवढी प्रचंड आहे, की त्यात दोन स्तर करणे अवघड नाही, आवश्यक आहे. विविध क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य व प्रगत अशा दोन स्तरांवर परीक्षा घेणे हा चांगला उपाय आहे. आठवीपर्यंत एकच अभ्यासक्रम व एकच परीक्षा ठेवावी, तोपर्यंत विद्यार्थ्यांची गणितात मती व गती किती आहे, याचा अंदाज येईल.

पाचवी व आठवीसाठी स्कॉलरशिपची परीक्षा मोठय़ा प्रमाणावर घेतली जाते. त्या इयत्तांतील सामान्य परीक्षेचा स्तर आणि स्कॉलरशिप परीक्षेचा स्तर यात जो फरक, तसाच काहीसा फरक नववी व दहावीच्या दोन स्तरांमध्ये राहील. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करण्याची व सामान्यांना मूलभूत ज्ञान अधिक चांगले मिळवण्याची संधी मिळेल.

वरील मुद्दे कोणालाही पटणारे आहेत. वास्तविक बहुधा त्यांच्यामुळेच परीक्षा पद्धतीमध्ये उच्च गणित आणि सामान्य गणित असे दोन प्रकार ठेवले गेले होते. परंतु सामान्य गणित फार थोडय़ा विद्यार्थ्यांनी घेतले. आता ते बंद केले आहे व एकूण गणिताच्या परीक्षेची काठिण्यपातळी कमी केली आहे. त्याची अनेक कारणे दिसतात. दोन अभ्यासक्रम शिकवण्यास शाळांचा असहकार, पालकांच्या अवास्तव महत्त्वाकांक्षा आणि सामान्य गणिताच्या परीक्षेची काठिण्य पातळी ही कारणे दिसतात. सामान्य गणिताच्या परीक्षेची काठिण्यपातळी उच्च गणिताच्या पातळीहून बरीच कमी असायला हवी, तशी ती नव्हती. सामान्य आठवीची परीक्षा आणि आठवीसाठी स्कॉलरशिपची परीक्षा यात जसा फरक असतो, तसा फरक सामान्य गणित व प्रगत गणित यांच्या परीक्षेत असावा. सामान्य गणिताच्या परीक्षेमध्ये सोपे व मध्यम स्तरावरील प्रश्न असावेत. तसेच ही परीक्षा पास होणाऱ्यांना कॉमर्स व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध असावा. म्हणजे ही परीक्षा देणाऱ्यांनादेखील पुढे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याची पालक आणि विद्यार्थी यांना खात्री वाटेल. पूर्वीदेखील इंटर सायन्समध्ये गणित विषय सोडलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश होताच. प्रगत गणिताच्या परीक्षेत पास होणे विज्ञान शाखेत पदार्थविज्ञान, उच्च गणित यांचा अभ्यास करणे, तसेच इंजिनीयरिंग, स्थापत्यशास्त्र, संगणकशास्त्र अशा शाखांच्या अभ्यासासाठी अनिवार्य असावे. उच्च गणिताच्या परीक्षेची काठिण्यपातळी वाढवावी. सध्या ती कमी आहे. ज्यांना आयआयटीसाठी जेईईची परीक्षा द्यायची आहे, अशांना अधिक गणित यावे लागते, त्यामुळे कोचिंग क्लासेसची खूपच चलती आहे. दहावी आणि १२वीच्या परीक्षांची कमी पातळी हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. उच्च गणिताच्या परीक्षेत सोपे प्रश्न कमी आणि क्रमाने अवघड प्रश्न जास्त असावेत. ज्यांची गणित विषयात चांगली गती आणि मती आहे, अशाच विद्यार्थ्यांनी उच्च गणित निवडावे अशी अपेक्षा आहे. साहजिक मग अधिक विद्यार्थी सामान्य गणित निवडतील. त्यांच्यावरील ताण कमी होईल, ते मूलभूत गणित अधिक चांगले शिकतील आणि प्रगत गणिताची प्रश्नपत्रिका हुशार विद्यार्थ्यांना न्याय देणारी असू शकेल.

मोठय़ा संख्येच्या विद्यार्थ्यांनी नापास व निराश किंवा विषयाचे मूलभूत ज्ञान नसूनही कसे तरी पास होण्यापेक्षा थोडा पण प्रामाणिकपणे अभ्यास करून सन्मानाने पास होणे नक्की श्रेयस्कर आहे. कमजोर पचनशक्तीचा माणूस, सामान्य प्रकृतीचा माणूस आणि उत्तम पचन असून शारीरिक शक्ती कमावणारा माणूस यांचा आहार वेगवेगळा असायला हवा, हे सर्वाना मान्य असावे.

First Published on June 10, 2018 2:07 am

Web Title: exam method maharashtra education maharashtra government