मोहन अटाळकर, अमरावती

करोना संकटामुळे यंदा गावोगावच्या जत्रा अद्यापि बंद आहेत. ग्रामीण अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या जत्रांनी वर्षांनुवर्षे लोकजीवनात रंग भरला. आज ग्रामीण जीवनातील हा ऊर्जास्त्रोतच नेमका हरवला आहे. विदर्भात जत्रांच्या या मालिकांमधून होणाऱ्या आर्थिक उलाढालीशिवाय त्याला अनेक अन्य पैलूही आहेत. जत्रेत एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू मिळत असल्याने ग्रामीण लोकांचा हा हक्काचा ‘मॉल’च करोनाने हद्दपार केलेला आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

ग्रामीण संस्कृतीचे अभ्यासक अनिल लळे सांगतात, यंदाच्या वर्षांत जत्रांवर करोनाचे काळे सावट आले. सगळ्याच जत्रांची गेल्या अनेक दशकांची परंपरा यंदा खंडित झाली आहे. जत्रा भरत नसल्याने त्यावर आधारित अर्थकारणही ठप्प झाले आहे. जत्रांच्या निमित्ताने ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक विक्रेते, दुकानदार आणि व्यापारी गावांतून येत असतात. वाहतूक, दळणवळण, खेळणे-पाळणे, खाद्यपदार्थ विक्रीच्या माध्यमातून दरवर्षी उपलब्ध होणारी जत्रेतील ही बाजारपेठ यंदा नसल्याने कोटय़वधीची उलाढाल थांबली आहे. त्याचा मोठाच फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला आहे.

गर्दी टाळण्यासाठी सण-समारंभ, उत्सवांवर बंदी कायम आहे. विदर्भात खरिपाच्या हंगामानंतर पौष महिन्यात विविध ठिकाणच्या देवस्थानांत जत्रा भरत असतात. अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी येथील जत्रा, बहिरम, ऋणमोचन, पिंपळोद, भंडारा जिल्ह्यातील माडगी, बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा अशा अनेक जत्रा प्रसिद्ध आहेत. निरनिराळ्या भागांतून भक्त आणि व्यापारी या जत्रांसाठी आवर्जून येत असतात. पाळीव जनावरांची खरेदी-विक्री हे अनेक जत्रांचे प्रमुख आकर्षण असते. त्यासोबत कृषीउपयोगी अवजारे, साहित्य, घोंगडय़ा, सतरंज्या अशा विविध वस्तूंची दुकाने जत्रेत असतात. दहा ते पंधरा दिवस चालणाऱ्या या जत्रांमध्ये कोटय़वधी रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते. विदर्भात सर्वदूर लहान-मोठय़ा जत्रांची मालिका याच काळात सुरू असते.

अनिल लळे सांगतात, ‘करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बहिरम यात्रा प्रथमच रद्द झाली आहे. त्यामुळे जत्रेत दुकाने लावून गुजराण करणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांसह मंदिर प्रशासनालाही उत्पन्नाच्या स्रोताअभावी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले बहिरम बाबा मंदिर जत्रेचे दरवर्षी भव्यदिव्य रूप असते. राज्यातूनच नाही तर देशभरातून हजारो भाविक या यात्रेत आपली हजेरी लावतात. दरवर्षी सुमारे ४० दिवस इथे जत्रा भरते. ज्यात जीवनावश्यक वस्तूंसह मनोरंजनाची विविध साधने ग्राहकांना उपलब्ध होतात. विशेषत: मातीची भांडी आणि लोकरी कापड, हातमागावरचे तडव, शेती व गृहोपयोगी सामान हमखास मिळते. येथे मातीच्या हंडीत शिजवलेले रुचकर खाद्यपदार्थ हे या जत्रेचे वैशिष्टय़ आहे. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी यात्रेकरू राहुटय़ांतून मुक्कामही ठोकतात. येथील मटण हंडी सुप्रसिद्ध आहे. स्थानिक परिसरातील रहिवाशांसह नजीकच्या मध्य प्रदेशातील व राज्यातील खव्वये या जत्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु यंदा करोना संकटामुळे प्रथमच जत्रेची ही परंपरा मोडली आहे. सैलानीबाबाची यात्रा, सालबर्डीची यात्रा, बहिरम, कौंडण्यपूर अशी जत्रांची मालिकाच या भागात असते. त्यावर ग्रामीण जीवनाचे मोठे अर्थकारण अवलंबून असते. पण यंदा ते पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

बहिरम यात्रा रद्द झाली असली तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही इथे पोलीस बंदोबस्त आहे. यात्रा परिसरात कुणालाही भोजनावळी, भंडाऱ्याची परवानगी नाही. शिदोरी आणून समूहाने जेवण करण्यास, जेवण देण्यास पोलिसांनी मनाई केलेली आहे. इतरही ठिकाणी यात्राबंदी आहे. या परिस्थितीत धार्मिक पर्यटन परंपरादेखील खंडित झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर येथील मारोती महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रदीप देशमुख सांगतात, ‘जत्रा या केवळ मनोरंजनाचे निमित्त नाहीत, तर ग्रामीण अर्थकारणाला चालना देणाऱ्या त्या चालत्या-फिरत्या अर्थवाहिन्या आहेत. बंदीमुळे अनेक लहान-मोठय़ा व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहेच; शिवाय यानिमित्ताने होणारा लोकांमधील संवादही ठप्प झाला आहे. धार्मिक कारणामुळे का होईना, लोक एकत्र येण्याचे हे एक माध्यमच करोनाने हिरावून घेतले आहे.’

कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त अशोक पवार सांगतात, ‘ग्रामीण जीवनात जत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरीप हंगामातील सहा महिन्यांच्या परिश्रमांनंतर विरंगुळा व धार्मिक परंपरांचे पालन अशी सांगड घालणारा हा उत्सव असतो. पण करोना संकटामुळे यंदा विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. हा फुलांचा सुगीचा हंगाम आहे. अनेक लहान लहान शेतकरीही नगदी पीक म्हणून फुलांचे उत्पादन घेतात. यात्रा-जत्रांमध्ये फुलांना मोठी मागणी असते. मात्र, प्राप्त परिस्थितीत त्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.’

करोनाने जत्रा-यात्रांमधून हजारो गावकऱ्यांना मिळणारा आनंदच हिरावून घेतलाय. यात्रा रद्द झाल्याने होणारे हे आर्थिक नुकसान पुढच्या काळात भरून निघेलही कदाचित; पण वर्षांनुवर्षे ग्रामीण जीवनात निखळ आनंद देणाऱ्या या जत्रांमधून करोनाने ‘माणूस’च हद्दपार केलाय.. तो के व्हा परत येईल, याची प्रतीक्षा आहे.