19 September 2020

News Flash

कौटुंबिक राजकीय वाद

माजी उपपंतप्रधान देवीलाल यांनी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय लोकदलात कौटुंबिक वाद अलीकडेच समोर आला.

|| संतोष प्रधान

माजी उपपंतप्रधान देवीलाल यांनी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय लोकदलात कौटुंबिक वाद अलीकडेच समोर आला. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी पुत्र अजय चौटाला आणि त्यांचे खासदार पुत्र दुश्यंत चौटाला यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षप्रमुख ओमप्रकाश चौटाला यांनी दुसरे पुत्र अभय यांची बाजू घेतल्याने हा वाद झाला. सध्या निवडणूक होत असलेल्या तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीतही असाच वाद आहे. तमिळनाडूत एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलांमध्ये नेतृत्वावरून वाद सुरू झाला आहे. कर्नाटकात देवेगौडा कुटुंबीयातही आलबेल नाही. मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव यांनी पुढील पिढीकडे नेतृत्व सोपविले, पण घरातच यातून वाद सुरू झाले. सत्तेसाठी किंवा राजकीय महत्त्वाकांक्षेतून वडील- मुलगा, काका-पुतणे, सासरे-जावई, भाऊ-भाऊ यांच्यात अलीकडच्या काळात सर्रासपणे धुसफूस बघायला मिळते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तर आपले सासरे एन. टी. रामाराव यांना सत्तेतून दूर करून पक्ष आणि राज्याचे नेतृत्व हाती घेतले होते. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची घराणी या वादाला अपवाद नाहीत. राजकीय नेते सारी सत्ताकेंद्र आपल्याच घरात राहावीत म्हणून एकाच वेळी अनेक नातेवाईकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालतात. त्यातूनच कौटुंबिक वाद निर्माण होतात, असे अनुभवास मिळते.

राजकीय नेते, त्यांच्या घरातील वाद यांचा ऊहापोह

चौटाला कुटुंबीय – हरयाणा

माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची अभय आणि अजय ही दोन मुले. अभय हे हरयाणा विधानसभेत विरोधी पक्षनेते असून, वडील ओमप्रकाश चौटाला यांना शिक्षक भरतीत झालेल्या घोटाळाप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागत आहे. यामुळे अभय यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्याने अजय चौटाला यांचे पुत्र व खासदार दुष्यंत चौटाला यांची कोंडी झाली होती. त्यांनी काकाच्या विरोधात बंड पुकारले. त्यातूनच पक्षात फूट पडली असून, अजय चौटाला यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे कुटुंबीय

तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख व काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपला राजकीय वारस म्हणून पुत्र व मंत्री के. टी. रामाराव याला पुढे आणल्याने कौटुंबिक वादावादी सुरू झाली. आधी पुत्र रामराव आणि कन्या खासदार कविता यांच्यात स्पर्धा होती. चंद्रशेखर राव यांचे राजकीय व्यवस्थापन व तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजाविलेले त्यांचे भाचे टी. हरीश राव सध्या बाजूला पडले आहेत. चंद्रशेखर राव यांच्या मुलाचे महत्त्व वाढल्याने हरीश यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले. यातूनच मध्यंतरी राजकीय संन्यास घेण्यापर्यंत हरीश यांची मजल गेली होती. हरीश बाजूला फेकले गेल्याने तेलंगणा राष्ट्र समितीच्या प्रचारात आणि राजकीय व्यवस्थापनात या वेळी त्रुटी जाणवत आहेत.

करुणानिधी कुटुंबीय – तमिळनाडू

द्रमुक पक्षाचे सुमारे ५० वर्षे नेतृत्व केलेल्या एम. करुणानिधी यांच्या हयातीत आणि पश्चात नेतृत्वाचा वाद सुरू झाला आहे. करुणानिधी यांनी एकाच वेळी घरातील अनेकांना सत्तेत पदे दिली. यातूनच कौटुंबिक मामला वाढत गेला. करुणानिधी यांनी आपला राजकीय वारस म्हणून एम. के. स्टॅलीन यांच्यावर जबाबदारी सोपविली. दुसरे पुत्र एम. के. अलागिरी यांना हे मान्य नव्हते. स्टॅलीन यांच्या नेतृत्वाला अलागिरी यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असता, करुणानिधी यांनी माजी केंद्रीय मंत्री अलागिरी यांना बाहेरचा रस्ता दाखविला. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर अलागिरी यांनी आपण शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे. आता हा इशारा पक्षावर कितपत परिणाम करतो हे कालांतराने स्पष्ट होईलच. स्टॅलीन व कन्या काझीमोझी हे सध्या एकत्र असून, दुसरे पुत्र अलागिरी बंडाच्या पवित्र्यात आहेत.

लालूप्रसाद यादव – बिहार

चारा घोटाळ्यात तुरुंगात रवानगी झाल्यावर लालूप्रसाद यादव यांनी आपल्या दोन मुलांकडे पक्षाची सूत्रे सोपविली. धाकटा तेजस्वी याला उपमुख्यमंत्री तर थोरला तेजप्रताप याला मंत्रीपद दिले होते. पक्षाची सूत्रे हळूहळू तेजस्वी याच्याकडे जाऊ लागताच तेजप्रताप याने कुरकूर सुरू केली. सत्ता गेल्यावर दोन भावंडे एकत्र येतील ही लालूंची अपेक्षाही फोल ठरली. शेवटी पत्नी राबडीदेवी यांच्याकडे पक्षाचा कारभार सोपविण्यात आला आहे.

प्रकाशसिंग बादल कुटुंबीय – पंजाब

अकाली दलात माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबीरसिंग यांचे प्रस्थ वाढले आणि पुतणे मनप्रीतसिंग बादल हे बाजूला फेकले गेले. काका-चुलत्याने कोंडी केल्याने मग मनप्रीतसिंग यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. पुढे मनप्रीतसिंग काँग्रेसमध्ये दाखल झाले. सध्या पंजाबच्या काँग्रेस मंत्रिमंडळात मनप्रीतसिंग हे वित्त व नियोजनमंत्री आहेत.

मुलायमसिंह यादव – उत्तर प्रदेश

मुलायमसिंह यादव यांनी आपले पुत्र अखिलेश यादव यांना राजकीय वारस म्हणून पुढे आणले व त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविले. त्यातून मुलायम यांचे बंधू शिवपाल यादव यांची नाराजी वाढली. मुलगा आणि भाऊ या दोघांनाही सांभाळताना मुलायम यांना तारेवरची कसरत करावी लागली. अखिलेश यांनी वडिलांना दूर करून पक्षाची सूत्रे ताब्यात घेतली. सत्ता गमाविल्यावरही यादव कुटुंबीयातील वाद मिटलेला नाही. अलीकडेच शिवपाल यादव यांनी वेगळी चूल मांडली. भाजपला हेच अपेक्षित आहे. मुलायम यांनी लखनौ भेटीत मुलगा व भाऊ या दोघांच्या कार्यालयांना भेटी देऊन मध्यमार्ग स्वीकारला. यादव कुटुंबीयांतील वाद मिटणे कठीणच आहे.

रामविलास पासवान कुटुंबीय – बिहार

लोकजनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आपले राजकीय वारस म्हणून खासदार पुत्र चिराग याचे नेतृत्व प्रस्थापित केले. पासवान यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीने सावत्र भावावर मध्यंतरी बरेच आरोप केले. पासवान यांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्यास दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढविण्याची घोषणा आशा पासवान यांनी केली आहे. तर पुतण्याकडे सारी सूत्रे सोपविण्यात आल्याने पासवान यांचे खासदार बंधू अस्वस्थ आहेत.

देवेगौडा कुटुंबीय – कर्नाटक

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबीयातही सारे काही आलबेल नाही. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी मात्र देवेगौडा यांना घरातील वाद हाताबाहेर जाणार नाही यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना मिळणारे महत्त्व लक्षात घेता, राजकारणात सक्रिय असणारे दुसरे पुत्र रेवण्णा नाराजच होते. त्यातच रेवण्णा यांचे पुत्र प्रज्वल रेवण्णा यांनी पक्षात सूटकेस संस्कृती असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. आजोबा देवेगौडा या आरोपामुळे नातवावर संतापले. कुमारस्वामी मंत्रिमंडळात रेवण्णा मंत्री असले तरी घरातील वाद आज ना उद्या वेगळे वळण घेईल, अशीच एकूण लक्षणे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 12:03 am

Web Title: family political debate
Next Stories
1 हिंदुत्व हेच विश्वबंधुत्व
2 राहुल-कन्हैया-केजरीवाल
3 ‘किसान मुक्ती मोर्चा’ कडून अपेक्षा
Just Now!
X