प्रश्न : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काय वाटते?

फादर दिब्रिटो : हा अनपेक्षित बहुमान आहे. मोठी आनंदाची गोष्ट आहे. साहित्याच्या प्रवासात वसईच प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे. या संधीचा नक्कीच वसईला फायदा होईल. साहित्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन जाण्याचा माझा मानस असेल. नव्या साहित्यिकांना अधिक प्रभावीपणे जोडण्याचा त्याचबरोबर पर्यावरण आणि माणूस साहित्याच्या माध्यमातून अधिकाधिक जवळ आणण्यावर भर असेल. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नाही तर व्यापक समाजाचा आहे.

तुम्ही नेहमी साहित्यिक राजकारणापासून अलिप्त असता. आता तुमची अध्यक्षपदी निवड झाली आहे..

फादर दिब्रिटो : साहित्य हे राजकारणापलीकडे आहे. सर्वच प्रकारचे लोक हे साहित्याने जोडले जातात. त्यात कुठलाही भेदभाव उरत नाही. त्यामुळे साहित्य आणि राजकारण यांची सांगड कधीच घालता येऊ शकणार नाही. उलटपक्षी साहित्याने राजकारणाची दिशा बदलली जाऊ शकते. साहित्याने राजकारण अधिक व्यापक आणि समाजपयोगी करता येऊ शकते.

पर्यावरण हा तुमच्या साहित्याचा केंद्र आहे. तर याचा ठसा साहित्य संमेलनात उमटणार का?

फादर दिब्रिटो : सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी प्रतिष्ठा आणि मानवी मूल्ये यांचे रक्षण. त्याला आपण अग्रक्रम दिला पाहिजे. प्रत्येक मनुष्य हा महत्त्वाचा आहे. त्याच्या मताला आणि जिवाला किंमत आहे. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘कुणाही जीवाचा न घडो मत्सर.’ ही संतांची भूमिका आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी सर्वाना घेऊन काम केले पाहिजे. कुणालाही वगळून आपल्याला देश मोठा करता येणार नाही.

तुम्ही साहित्याची सांगड निसर्गाशी घातली आहे..

फादर दिब्रिटो : मी निसर्गाच्या सान्निध्यात वाढलो आहे. निसर्गाने मला घडवले आहे. आपले पर्यावरण आपल्याला घडवत असते. त्यामुळे मी निसर्गाच्या प्रेमात आहे. निसर्ग वाचला तरच माणूस वाचणार आहे. त्यामुळे हा मुद्दा मी नेहमी मांडत असतो.

तुमचा लेखनप्रवास ‘सुवार्ता’पासून सुरू झाला..

फादर दिब्रिटो : ‘सुवार्ता’चा प्रवास माझ्यासाठी खूप हितकारक होता. तिथे मी निरनिराळे प्रयोग करू शकलो. मी माझी मते मुक्तपणे व्यक्त करत होतो. त्याची नोंद बाहेर घेतली जात होती. त्यामुळे ख्रिस्ती समाज राष्ट्रीय प्रवाहामध्ये मोठय़ा प्रमाणावर सामील झाला. नवीन लेखकांनाही संधी दिली. साहित्यिक जागृती निर्माण केली, मेळावे भरवले, संमेलने भरवली, व्याखानमाला चालवल्या. आता मागे वळून पाहताना खूप धन्य वाटते.

समाजमाध्यमांमुळे साहित्यापासून वाचकवर्ग तुटला आहे का?

फादर दिब्रिटो : समाज माध्यमे हे एक प्रभावी साधन आहे. समाजावर त्याचा परिणाम होत आहे. तो बरा की वाईट याचा अभ्यास करावा लागणार आहे. नवीन विचार येत आहेत. चांगले विचार समाजात पसरत आहेत. आता केवळ लिखित साहित्य पुरेसे नाही. त्याला आधुनिकतेची जोड देणे आवश्यक आहे. नवीन व्यासपीठाची सोय झाली आहे. त्याचा वापर केला पाहिजे. ई-पुस्तके, ऑनलाइन वाचनालय, तसेच अनेक वाचनीय गोष्टींचा प्रसार आणि प्रचार होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अशी अनेक ठिकाणी छोटी छोटी व्यासपीठे तयार झाली आहेत. अनेक प्रकाशक अशा पद्धतीने साहित्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्यातून सुंदर साहित्य जन्माला येत आहे. पण त्यासाठी वाचकवर्ग तयार करावा लागणार आहे. त्यासाठी चांगल्या संकल्पना पुढे येणे गरजेचे आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी काही योजना? 

फादर दिब्रिटो : मी काही नवे प्रयोग करणार आहे. त्यासाठी गाव, तालुका पातळीवर व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे. खूप संस्था कार्यरत आहेत. पण हे अधिक व्यापक आणि लोकाभिमुख झाले पाहिजे. नवे विचारवंत, लेखक, साहित्यिक, कवी घडले पाहिजेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम मी करणार आहे. वाचक हा शेवटचा परीक्षक आहे. जे सुंदर आहे तेच तो घेणार आहे.

(मुलाखत : प्रसेनजीत इंगळे)