डिजिटल भारताचे स्वप्न पाहात असतानाच त्याबरोबर येणारी आव्हानेही खूप मोठी असणार आहेत. यातील सर्वात मोठे आव्हान आहे महाजालात सध्या सर्वच देशांसाठी त्रासदायक ठरलेल्या सायबर गुन्ह्य़ांचे. गेल्या वर्षांत अनेक सरकारी संकेतस्थळांपर्यंत सायबर हल्ल्यांची झळ पोहोचली. म्हणूनच आता सायबर सुरक्षेकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.
भविष्यात सायबर युद्धाचा धोका असून, अतिरेक्यांकडून माहितीचा पुरवठा खंडित करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, हा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अलीकडेच दिलेला इशारा अत्यंत गंभीर आहे. या युद्धाचा धोका किती जवळ आला आहे याची चुणूक चीन आणि अमेरिका यांच्यातील सायबर युद्धाने दाखविली आहेच. या युद्धातील एक प्रमुख अस्त्र म्हणजे हॅकिंग. दुसऱ्याच्या संगणकातील गोपनीय माहितीवर संगणकीय तंत्रज्ञानाच्या साहय़ाने घातलेला डाका म्हणजे हॅकिंग. हा काही नवा प्रकार नाही. संगणक आणि इंटरनेट अगदी बाल्यावस्थेत होते तेव्हा म्हणजे ९०च्या दशकातही हॅकिंग होतच होते. मात्र २०००च्या दशकात ज्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढत गेला त्या प्रमाणात हॅकिंगचे प्रमाणही वाढत गेले. अधूनमधून त्या बातम्या आपल्याही कानावर येत असतात. सीबीआय, भारतीय सैन्यदल, पंतप्रधानांचे कार्यालय यांच्या संकेतस्थळांनाही त्याची झळ बसली आहे. त्याचा वचपा म्हणून भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानी संकेतस्थळे हॅक केली, अशा बातम्याही वाचायला मिळतात. अमेरिका आणि चीन यांच्यात तर हे सायबर विश्वातील महायुद्ध सतत सुरूच असते. अलीकडेच आयसिस या संघटनेचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते. एकंदर हे सायबर युद्धातील अण्वस्त्रच म्हणावयास हवे. ते ज्यांच्या हातात त्यांना म्हणतात हॅकर. आजच्या घडीला शालेय अभ्यासापासून ते बँकांच्या व्यवहारांपर्यंत अनेक गोष्टी ऑनलाइनवर अवलंबून आहेत. यामुळे जर भविष्यात हॅकर्स ग्रुपने मोठा हल्ला करण्याचे ठरवले, तर ते एखाद्या देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडू शकतात.
हॅकिंगचे बदलते प्रकार
‘टेकडाऊन’ या जॉन मार्कॉफ आणि सुटोमू शिमामुरा यांच्या पुस्तकातून आणि त्याच नावाच्या हॉलीवूड चित्रपटातून प्रसिद्ध झालेला केविन मिटनिक हा असाच एक गाजलेला हॅकर. नंतर एक दंतकथाच बनली त्याची. मिटनिकसारखे हॅकर वैयक्तिक स्वार्थासाठी माहिती चोरी करीत असत. तो काळ पासवर्ड क्रॅक करून अथवा लबाडीने मिळवून हॅकिंग करण्याचा होता. कालांतराने ही प्रक्रिया बदलली आणि बॅकडोअर हॅकिंग सुरू झाले. यामध्ये आपल्या ई-मेलवर अथवा सोशल नेटवर्किंग साइटवर िलक पाठवल्या जातात. या िलक्सवर आपण क्लिक केले की, आपला संगणक दुसऱ्याच्या ताब्यात जातो. त्याचबरोबर ई-मेल हॅकिंगही होत असे, तेही कालांतराने बंद झाले. यानंतर फिशिंग घोटाळे समोर आले. याच्याही पुढे जाऊन थेट संकेतस्थळ हॅक करण्यापर्यंत हॅकर्स पोहोचले, पण संकेतस्थळ हॅक करून फारसे काही मिळत नाही. ते हॅक करेपर्यंत असलेली माहिती आणि दहशत यापलीकडे संकेतस्थळ हॅकिंगचा फायदा होत नाही. यामुळे हॅकर्स छुप्या मार्गाने संकेतस्थळात शिरून तेथेच वास्तव्य करून राहणे पसंत करतात.
सायबर फौज
सायबर गुन्हय़ांचे वाढते प्रमाण आणि परदेशी सायबर हल्ले रोखण्याच्या उद्देशाने सायबर फौज तयार होत असून ती विविध पातळ्यांवर काम करते. ती सरकारी पातळीवर असते, तशीच संघटना आणि संस्था पातळीवरही असते. जगभरातील सायबर घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे काम करणारी ही सायबर फौज अमेरिकेपासून भारत-पाकिस्तानसारख्या देशांमध्येही विकसित झाली आहे. ही सायबर फौज आपल्या देशाला सायबर सुरक्षा पुरवते, तर शत्रू देशाला सायबर हल्ले करवून धोक्याच्या सूचना देत असते. देशहितासाठी केलेल्या या हॅकिंगला ‘एथिकल हॅकिंग’ म्हणतात. याची सुरुवात एफबीआयने केली असून, एके काळी त्यांच्या ‘मोस्ट वॉण्टेड’ यादीत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये असलेला हॅकर केविन मिटनिक याचीच त्यांनी एथिकल हॅकर म्हणून नेमणूक केली. मिटनिक हा हॅकिंग गुरू मानला जात असून त्याने १९९३ ते १९९५ मध्ये अमेरिकी यंत्रणेला हादरवले होते. मिटनिक केवळ हौस म्हणून किंवा आपले ज्ञान दाखविण्यासाठी हे हॅकिंग करत होता. १५ फेब्रुवारी १९९५ मध्ये मिटनिकला एफबीआयने अटक केली. मात्र सुरुवातीचे एक वर्ष त्याच्यावर कोणत्या कायद्याखाली गुन्हा दाखल करायचा यातच गेला. त्याच्या बचावासाठी अनेक आंदोलनेही झाली होती. मग खटल्यादरम्यान मिटनिकची हुशारी आणि हेतू पाहता त्याला थोडी शिक्षा देऊन सोडण्यात आले. तेव्हापासून तो एफबीआयला सायबर सुरक्षेबाबत सल्ला देतो. याच आधारावर भविष्यात प्रत्येक देशामध्ये अशी सायबर फौज तयार होऊ लागली. देशांनी उभ्या केलेल्या सायबर फौजांना तोंड देण्यासाठी समाजविरोधी गटांपासून ते दहशतवाद्यांपर्यंत त्यांनी स्वतंत्र सायबर फौजा उभारण्यास सुरुवात केली. आयसिस ही दहशतवादी संघटना फोफावण्यात समाजमाध्यमांचा मोठा हात असून त्यासाठी त्यांनी ठेवलेले सायबरतज्ज्ञ जिहादीही आहेत. या संघटना लोकांमध्ये दहशत पोहोचविण्यासाठी तसेच जिहादचा प्रचार करण्यासाठी या माध्यमाचा वापर करताना दिसतात. त्यांनी याचा मोठय़ा पातळीवर वापर करायचे ठरवले आणि सायबर यंत्रणा नेस्तनाबूत करण्याचे ठरविले तर त्यांना ते फारसे अवघड नसेल.

हॅक्टिविस्ट
सामाजिक चळवळींप्रमाणेच सायबर चळवळीही आता जन्म घेऊ लागल्या आहेत. एखाद्या गोष्टीला विरोध करण्यासाठी सरकारी साइट हॅक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका गटाने तासाभरासाठी काही सरकारी संकेतस्थळे हॅक केली होती. ‘आमची लढाई भ्रष्टाचारविरोधात आहे, देशाचे कोणतेही नुकसान करण्याचा आमचा हेतू नसल्याचे’ त्यांनी स्पष्ट केले होते. अशा गटांना किंवा व्यक्तींना हॅक्टिविस्ट म्हणतात.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com