विकासाची वाट स्वकीयांना दाखवण्यासाठी मुंबईच्या रेल्वेपासून अनेक उपक्रमांत आघाडीवर असणारे आणि स्थानिकांची, एतद्देशीयांची बाजू समजून घेऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणारे नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट यांची आज १४८ वी पुण्यतिथी. या स्मृतिदिनी नानांच्या कुटुंबातील एक सदस्य, नानांच्या पाचव्या पिढीतील वंशज, पूर्वाश्रमीच्या मृदुला भालचंद्र शंकरशेट यांनी ‘आज’शी जोडलेला हा कालच्या आठवणींचा सांधा..
मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, त्या नामदार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांची वंशज म्हणून, आणि ते ज्या वास्तूत राहात होते त्या गिरगावातल्या भव्य वाडय़ात आमचे बालपण गेले म्हणून, ३१ जुलै रोजी नानांच्या पुण्यतिथीनिमित्त काही आठवणी लिहाव्यात असा आग्रह निकटवर्तीयांनी धरला. या आठवणी वाडय़ाबद्दलच्या आहेत.
 नानांचा काळ १८०३ ते १८६५ हा, तर माझे लहानपण १९५० ते १९६० या दशकातले. माझे आईवडील, आजी, सख्खी आणि चुलत भावंडं असे सर्व जण एकत्र राहात होतो. घर म्हणजे खूप मोठा आणि सुंदर असा वाडा होता. वाडय़ाला तळमजला आणि वर दोन मजले होते. घरासमोर आणि दोन्ही बाजूंना मोकळी आवारे, म्हणजेच मोठय़ा वाडय़ा होत्या. बाहेरून आलेल्या माणसाला घराच्या मुख्य दरवाजाकडे पोहोचायला पंधरा-वीस पायऱ्या चढाव्या लागत, नंतर एक लांबलचक ओटी होती. घरात शिरायला नक्षीदार भव्य असा पेशवेकालीन थाटाचा दरवाजा होता. घरात सर्व मिळून ३५ ते ४० माणसे होती आणि ती सर्व तळमजल्यावरच दिवसभर असल्यामुळे हा दरवाजा सकाळी सात वाजता उघडे तो रात्री ११ वाजता बंद होई. याच आमच्या घराच्या बाजूला असलेल्या आमच्या वाडीत नानांनी सुरू केलेली शाळेची छोटी इमारत होती. या शाळेचा कारभार माझे वडील (नगरसेवक व  ऑनररी मॅजिस्ट्रेट भालचंद्र शंकरशेट) व घरातील अन्य मोठी माणसे बघत. वेळोवेळी शाळेसाठी मदत करत.
तळमजल्यावर दोन मोठे हॉल, नऊ बेडरूम, एक प्रशस्त देवघर आणि पाठच्या बाजूला परसदारी लागून नऊ- सर्वाची स्वतंत्र- अशी स्वयंपाकघरे होती. अंगणात मोठे तुळशी वृंदावन होते. दोन्ही हॉलमध्ये उंच छताला मोठमोठी झुंबरे, हंडय़ा लावल्या होत्या. बैठकीला मोठे नक्षीदार सोफे आणि कोरीव काम केलेली टेबले होती. मधल्या हॉलला आम्ही माजघर म्हणत असू. रात्री या माजघरात आम्ही सर्व दहाबारा मुले शाळेचा गृहपाठ आटोपून तऱ्हेतऱ्हेचे खेळ खेळत असू. एरवी कडक शिस्तीत असणारे काही वडीलधारे याच वाडय़ाच्या दिवाणखान्यात पत्त्यांमधला ‘बिझिक’चा डाव मांडून हास्यविनोद करताना दिसत, तेव्हा आम्हा मुलांना नवल वाटे. दिवाळीत आकाशकंदील आम्ही मुले करत असू, तर फराळाचे पदार्थ सर्व बायका मिळून घरी बनवत. या वाडय़ातील गणपती आणण्याची पद्धत तर नानांच्या काळापासून जशीच्या तशी पाळली जात असे, त्या स्वागतात हौसेमुळे भरच पडत राहिली. सारेच सण उत्साहाने, एकदिलाने साजरे होत.
नाना शंकरशेट यांची ३१ जुलैला पुण्यतिथी असे. त्या दिवशी सकाळी आम्ही टाऊन हॉलमध्ये नानांचा जो भव्य पुतळा आहे, त्याला हार घालायला जात असू. त्या वेळी तेथे दुसरेही पुष्कळ लोक येत, तेही पुतळ्याला हार घालत. मग नानांच्या कार्याबद्दल भाषणे होत. संध्याकाळीदेखील एखाद्या मोठय़ा हॉलमध्ये समाजातील लोक नानांची पुण्यतिथी साजरी करीत असत. तेथेही आम्ही सर्व कुटुंबीय जात असू. एसएससीला जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीचा सत्कार इथेच होत असे. ही प्रथा अजूनही चालू आहे.
नानांची शंभरावी पुण्यतिथी होती, त्या वेळचा सोहळा तर अविस्मरणीय होता. स्मृतिशताब्दीची खास मिरवणूक झाली. ही मिरवणूक आमच्या वाडय़ापासूनच निघाली होती. फुलांनी सजवलेल्या दोन घोडय़ागाडय़ा तिच्या मध्यभागी होत्या. यापैकी एका घोडागाडीत  नानांचा फोटो घेऊन त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक बसले होते आणि आमच्यासह असंख्य लोक या मिरवणुकीत सामील झाले होते. स्मृतिशताब्दीनिमित्त आणखी एका समारंभात त्या वेळचे राज्यपाल श्री. श्रीप्रकाश यांना पाहुणे म्हणून बोलावले होते. नानांच्या सविस्तर चरित्रग्रंथाचे प्रकाशन भारताचे माजी अर्थमंत्री, उच्चविद्याभूषित आणि स्वत: जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर असणारे सी. डी. देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते सपत्नीक आमच्या घरी आले होते. घरातील वडीलमाणसांनी त्यांचे अतिशय आनंदाने स्वागत केले. नंतर पहिल्या मजल्यावरील मोठय़ा हॉलमध्ये पुष्कळ लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्या वेळी आम्ही लहान असलो, तरी हे सर्व बघताना आम्हाला अतिशय आनंद व अभिमान वाटत असे.
पण जगात कुठलीही गोष्ट निरंतर नाही, या नियमानुसार आमचा हा वाडा पन्नास वर्षांपूर्वीच पाडून त्या जागी नवीन इमारत बांधली गेली. मनुष्याला आपला भविष्यकाळ पुष्कळ प्रमाणात ठरवता येतो, पण आपला जन्म आणि आपले बालपण आपल्या हातात नसते. माझा जन्म जगन्नाथ शंकरशेट यांच्या घरात झाला आणि हा मी दैवी आशीर्वादच समजते आणि जवळपास पंचावन्न-साठ वर्षांच्या आधीच्या काळी मी माझे बालपण त्या वेळी माझे जे कुटुंबीय होते, त्या वेळी माझी जी सख्खी चुलत भावंडे होती, त्यांच्याबरोबर खूप मजेत घालवले. असे एकत्र कुटुंबातले बालपण माझे जे समकालीन असतील त्यांचेही थोडय़ाफार फरकाने असेच असेल असे मला वाटते. आजही आम्ही सर्व भावंडे समृद्ध जीवन जगत आहोत. आज टीव्ही, संगणक, मोबाइल यांसारख्या सुखसोयींच्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तरीही त्या निरागस बालपणाची मजा काही वेगळीच होती, असे माझ्याप्रमाणेच माझ्या समकालीनांचेही मत असेल.
आजही आम्ही सर्व भावंडे एकत्र जमलो की हमखास पूर्वीच्या गोष्टी निघतात आणि अत्तराच्या बाटलीतले दोन-चार थेंब शिंपडून जसे प्रसन्न व्हायला होते तसे त्या आठवणींनी आम्ही प्रफुल्लित होऊन घरी जातो. ज्यांच्यामुळे आम्हाला इतके सुंदर आणि वैभवशाली बालपण मिळाले त्या आमच्या नानांना आणि त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आमच्या ‘शंकरशेट वाडय़ा’ला या लेखाद्वारे माझा आदरपूर्वक प्रणाम.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Deputy Chief Minister Devendra Fadnavis challenges Uddhav Thackeray to show the good work he has done for Mumbai
मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप