20 September 2019

News Flash

भारतीय संरक्षणसिद्धतेचे उद्गाते!

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची १३० वी जयंती आज साजरी होत आहे; त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीरांचे हे स्मरण. सावरकरी राष्ट्रवादात संरक्षणसिद्धता आणि सज्जता महत्त्वाची होतीच आणि

| May 28, 2013 05:00 am

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची १३० वी जयंती आज साजरी होत आहे;  त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीरांचे हे स्मरण. सावरकरी राष्ट्रवादात संरक्षणसिद्धता आणि सज्जता महत्त्वाची होतीच आणि आझाद हिंद सेना उभारून प्रत्यक्ष लढणाऱ्या नेताजींनीही सावरकरांचे विचार प्रेरक मानून या फौजेतील हिंदसैनिकांना वाचावयास दिले होते, दुसऱ्या महायुद्धकाळात भारतीय तरुणांना ब्रिटिश फौजेत सामील होण्याच्या आवाहनापासून ईशान्य भारतात तेथील भौगोलिक रचना लक्षात घेऊन सैनिकी प्रशिक्षण देण्यापर्यंत अनेक सूचना त्यांनी केल्या होत्या..

स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश सत्तेशी मुकाबला करणाऱ्या फारच थोडय़ा नेत्यांनी संरक्षण, सैन्यदले, संरक्षणसिद्धता याबाबत गंभीर विचार केला. त्यात वीर तात्याराव, नेताजी सुभाषचंद्र, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा नंबर फारच वरचा आहे. इतर नेते मात्र स्वातंत्र्य मिळून आपण ‘खुर्चीवर’ विराजमान कधी होतो या विचाराने झपाटलेले होते. १९६२ च्या युद्धात चीनने जो दणका दिला त्याने भारतीय नेतृत्वाची सर्व जगात छी थू झाली, कारण ‘संरक्षण की विकास?’ (Development Vs. Defence) या चर्चेच्या गुऱ्हाळात भारतीय सैन्यदले पोरकी होऊन बसली आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा बळी ठरली.
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी सैन्यभरती सुरू केल्यावर वीर तात्यारावांनी भारतीय तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन करताच संभावित नेतृत्वाने ‘रंगरूटवीर’ म्हणून तात्यांना हेटाळले, अव्हेरले. खरे तर तेव्हा ब्रिटिश सैन्यात दाखल होणाऱ्या भारतीयांची स्थिती अस्पृश्यांच्या प्रमाणे झाली होती. स्थानिक एतद्देशीय सैनिकाला देशद्रोही ठरवत होते तर गोरा साहेब ‘काळा आदमी’ म्हणून हिणवत दुय्यम वागणूक देत होते. अशावेळी वीर तात्यारावांनी सैन्याला भावनिक, नैतिक आधार देत ब्रिटिश सैन्य प्रशिक्षण आत्मसात करण्याचा उपदेशवजा आदेश दिला. स्वातंत्र्योत्तर काळात स्वतंत्र भारताच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम, शिस्तबद्ध सैन्याची गरज राष्ट्राला अग्रक्रमाने भासेल तेव्हा तरुणांनी मोठय़ा संख्येने सैन्यात जावे, याचा प्रसार व प्रचार वीर तात्यारावांनी सुरू करताच तेव्हाही त्यांना देशद्रोही म्हणून संबोधण्यात आले होते. अहिंसा, शांती, बंधुभाव या फाजील अव्यवहार्य तत्त्वज्ञानात गुंतलेल्या सरकारला सावरकरांनी चीनच्या विश्वासघातकी व साम्राज्यशाही राक्षसी आकांक्षेची जाणीव करून दिली होती. सैन्य दलाची उभारणी करताना सप्तभगिनी (Seven Sisters) म्हणजे ईशान्य सीमा भागाकडे संरक्षणसिद्धतेवर भर देणे गरजेचे आहे, असे आग्रही प्रतिपादन वीर सावरकर व सरदार वल्लभभाई पटेल यांनी सरकारपुढे केले होते. परंतु आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचे डोहाळे लागलेल्या आमच्या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आणि Mountaneering warfare training  ची सैन्याची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. त्यामुळे चीनने १९६२ साली जो पराभवाचा झटका दिला, ती अखेर असे प्रशिक्षण सुरू होण्यासाठी इष्टापत्तीच ठरली. सावरकर जे सांगत होते ते किती सत्य होते याचा प्रचीती सरकारला आली. पण हजारो चौरस मैल भारताची जमीन ड्रॅगनने गिळंकृत केली हे एक विदारक सत्य आहे. वीर तात्यारावांच्या उपदेशाप्रमाणे सरकारने ईशान्य सीमेवर सैन्याची खडी तालीम मुक्रर केली असती व सैन्यदलाची साधनसामग्रीची मागणी पूर्ण करण्यात आली असती तर आज चीन सीमेवर जो आडदांडपणा करत आहे, त्याला आळा बसता.
रत्नागिरी मुक्कामी नजरकैदेत (Open Custody) असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आवर्जून त्यांची भेट घेतली होती. सामान्यत: तात्या अभ्यागताना सकाळी भेटत नसत. परंतु नेताजींना मात्र सकाळी भेटण्याचे मान्य करून एकांतात ही भेट दोन-तीन तास चालली. पुण्यात १९५२ च्या मे महिन्यात ‘अभिनव भारत’ या संस्थेच्या  कार्यपूर्ती विसर्जन सोहळ्यात वीर तात्यारावांनी या भेटीचा जाहीर तपशील दिला. भारतीय क्रांतिकारी सैनिक व जर्मन सेनानी यांच्यात झालेल्या गुप्त कराराबाबत तात्यारावांनी नेताजींना माहिती देऊन, जर्मनांच्या ताब्यात असलेले युद्धबंदी भारतीय लष्कराची बांधणी करण्यात गुंतलेले असून जपान लवकरच या जागतिक युद्धात उतरणार याबाबत रासबिहारी बोस यांचे गुप्त संदेश त्यांनी नेताजींना दाखवले. जपान लवकरच ब्रह्मदेशाकडून व बंगालच्या उपसागरातून ‘ब्रिटिश इंडिया’वर हल्ला करण्याचे मनसुबे रचत असताना तुमच्यासारख्या तरुणांनी या भारतीय सैनिकांचे सेनापतीपद भूषवावे, असे आग्रही प्रतिपादन करून नेताजींना त्यांनी, भारताबाहेर जाऊन ब्रिटिशांना जर्जर करावे असा सल्ला दिला. यावर नेताजींनी कलकत्त्यास परतल्यावर मी याबाबत निर्णय घेईन, असे सांगून त्याप्रमाणे पुढे त्यांनी भारतातून पलायन केले व  रासबिहारी बोस यांच्याकडून ‘आझाद हिंद सेनेच्या’ सेनापती पदाची धुरा सांभाळून त्या भारतीय सेनेचे नेतृत्व केले. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेचे प्रेरणास्थान वीर तात्याराव सावरकर होते, हे कै. नेताजी सुभाष यांनी २५ जून १९४४ रोजी सिंगापूर येथून ‘स्वयंघोषित भारत सरकार’च्या आकाशवाणीवरून भाषण करताना वीर तात्यारावांचे आभार मानून, सैनिकीकरणाच्या तात्यांच्या प्रचार व प्रसारामुळेच ५० हजार  भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना उभी राहू शकली हे मान्य केले. नेताजींनी वीर तात्यारावांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ या पुस्तकाचे इतर भाषांत भाषांतर करून त्या पुस्तकाच्या प्रती आझाद हिंद सेनेत वाटल्या. नेताजींची आझाद हिंद सेना इंफाळपर्यंत पोहोचताच वीर तात्यारावांनी हिंदु महासभेच्या बंगाल, आसाम, तामिळनाडू, या प्रांतांतील नेत्यांना आदेश दिला की आझाद हिंद सेनेच्या सैन्याला सर्वतोपरी मदत करा.
भारतीय तरुणांनी दुसऱ्या महायुद्धाच्या दणक्याने ‘ब्रिटिश राज’ खिळखिळे होत असताना, सैनिकीकरणाची ब्रिटिशांची विनंती मान्य करून आधुनिक सैनिकी प्रशिक्षण आत्मसात करावे म्हणून वीर तात्याराव, डॉ. धर्मवीर मुंजे, मामाराव दाते, शांताबाई गोखले, ‘भाला’कर भोपटकर इत्यादींनी भारतभर भ्रमण करून सैनिकीकरणाचा प्रचार केला. यामागील हेतू होता तो स्वातंत्र्य मिळताच एक शिस्तबद्ध आधुनिक युद्धाचे तंत्र आणि मंत्र आत्मसात केलेले सैन्य भारतास लाभावे. त्यामुळेच वीर तात्याराव हे आधुनिक भारतीय संरक्षणसिद्धतेचे उद्गाते होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
१९६५ च्या युद्धात जेव्हा भारतीय सेना बर्की या पाकिस्तानी शहरापर्यंत पोहोचल्या तेव्हा वीर तात्याराव हर्षोलोत्सित झाले. बऱ्याच काळानंतर एक चांगली बातमी कानावर आली, असे म्हणत वीर तात्यारावांनी सावरकर सदनावर तिरंगा फडकावला. तेव्हा पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी वीर तात्यारावांना दिल्ली मुक्कामी निमंत्रण पाठवून त्यांचा गौरव केला होता. त्याहीआधी सैन्याच्या तिन्ही दलातील अधिकाऱ्यांत सौहार्दता, सहकार्य, समविचारांची देवाण-घेवाण व्हावी म्हणून एक ‘सैनिकी प्रबोधिनी’ असावी हा विचार प्रथम सावरकरांनीच मांडून एक आराखडा तयार केला होता, त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे खडकवासला येथील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (स्थापना : १९५४) . नाशिक येथील सैनिकी प्रशाला  (स्थापना: १९३७) ही तर डॉ. धर्मवीर मुंजे यांनी वीर तात्यारावांच्याच प्रेरणेने व आदेशाने उभी केली, हा इतिहास आहे.
संरक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, परराष्ट्र धोरण, तंत्रज्ञानाचा प्रसार, विज्ञानाचा विस्तार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सामाजिक अभिसरण, समरसता, सांस्कृतिक महत्ता इत्यादी राष्ट्रीय जीवनातील महत्त्वाच्या बाबींचा र्सवकष व सारासार विचार करून सावरकरांनी एक राष्ट्रीय विचारांची सनद समाजासमोर मांडताना आपली क्रांतिकारी सडेतोड विचारप्रणाली सोडली नाही. सावरकर नेहमी म्हणत, ‘लोकांना काय आवडते यापेक्षा लोकांना काय आवडावे हेच मी नेहमी बोलतो!’ कारण जगात सबलांच्या अहिंसेचा मान राखला जातो तर दुर्बलांच्या हिंसेला कुणी हिंग लावूनसुद्धा पुसत नाही. म्हणूनच राष्ट्राने अहिंसेचे गुण गात असतानाच शिस्तबद्ध, शास्त्रशुद्ध, शस्त्रबद्ध, क्षात्रतेजाने सळसळणारे सैन्य सीमावर्ती भागात उभे करणे, हे राष्ट्रीय आद्य कर्तव्य आहे असे मी मानतो.’
आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले वजन असावे व आपला शब्द मानण्यात यावा, असे सैनिकी धोरण भारताने आखून सैन्याची पुनर्रचना करावी, बांधणी करावी या बाबत वीर तात्याराव आग्रही होते. सैनिकीकरणाचा प्रसार हा शाळा-महाविद्यालयातून सुरू करून साहित्यिकांनी तरुणांचे स्फु लिंग पेटवणारे साहित्य निर्माण करावे, असे म्हणत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संदेश दिला होता, ‘लेखण्या तोडा, बंदुका पकडा!’
* लेखक भारतीय नौदलातील माजी अधिकारी आहेत.

First Published on May 28, 2013 5:00 am

Web Title: feature article on vinayak damodar savarkar on occasion of his 130 anniversary