सर्व भारतीय सण-समारंभ हे मुळात निसर्गस्नेहीच. पर्यावरण, ऋतू, त्यांतील बदल यांना अनुसरून, त्यांना अनुरूप अशा पद्धतीने भारतीय सण साजरे केले जात. हळुहळू त्यातील सत्व गेले आणि कर्मकांडांची फोलपटे उरली. त्यातून अनेक उत्सवांना बाजारू स्वरूप प्राप्त झाले. त्याहून खेदाची बाब म्हणजे या उत्सवांचे निसर्गाशी असलेले नातेच विसरले गेले. निसर्गालाही देव मानणाऱ्या भारतीय संस्कृतीला हे लांच्छनास्पदच. त्यात बदल व्हायला हवा. गणेशाच्या मंगलमूर्तीपासून उत्सवाच्या स्वरूपापर्यंत अनेक गोष्टींतून उत्सवातील निसर्गस्नेह वाढवता येईल. ‘लोकसत्ता’ने त्या दृष्टीने सालाबादप्रमाणे यंदाही पर्यावरणस्नेही गणेशोत्सव मूर्तीस्पर्धाही आयोजित केली आहे. त्या उपक्रमाच्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या रूपरंगावर एक दृष्टिक्षेप.

बाजार मांडला..

सर्व भारतीय सण-समारंभ हे मुळात निसर्गस्नेहीच. पर्यावरण, ऋतू, त्यांतील बदल यांना अनुसरून, त्यांना अनुरूप अशा
पद्धतीने भारतीय सण साजरे केले जात. हळुहळू त्यातील सत्व गेले आणि कर्मकांडांची फोलपटे उरली. त्यातून अनेक उत्सवांना बाजारू स्वरूप प्राप्त झाले. त्याहून खेदाची बाब म्हणजे या उत्सवांचे निसर्गाशी असलेले नातेच विसरले गेले. निसर्गालाही देव मानणाऱ्या भारतीय संस्कृतीला हे लांच्छनास्पदच. त्यात बदल व्हायला हवा. गणेशाच्या मंगलमूर्तीपासून उत्सवाच्या स्वरूपापर्यंत अनेक गोष्टींतून उत्सवातील निसर्गस्नेह वाढवता येईल. ‘लोकसत्ता’ने त्या दृष्टीने सालाबादप्रमाणे यंदाही पर्यावरणस्नेही गणेशोत्सव मूर्तीस्पर्धाही आयोजित केली आहे. त्या उपक्रमाच्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या रूपरंगावर एक दृष्टिक्षेप.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात जनमत एकवटण्यासाठी घरच्या देव्हाऱ्यात विराजमान झालेल्या गणपतीला सार्वजनिक स्वरूप दिले आणि पुण्या-मुंबईत धूमधडाक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला. काळाबरोबर गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत गेले आणि उद्दिष्टही. गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाला बाजारू स्वरूप येऊ लागले आहे. एके काळी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते हिरिरीने सामाजिक कार्यात सहभागी होत होते. संकटात सापडलेल्यांसाठी संकटमोचक बनून धाव घेत होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपला गणपती नवसाला पावतो अशी जाहिरातबाजी करीत भाविकांना आकर्षित करण्याकडे कार्यकर्त्यांचा कल वाढला आहे. त्यात अर्थकारणही दडले आहे. परिस्थितीनुरूप मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही बदल होत गेले. तसेच ते गणेशमूर्तीबाबतही होत गेले.
सत्तरच्या दशकापर्यंत घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती पुजण्यात येत होत्या. त्याच सुमारास हळूहळू गणेशमूर्तीची उंचीही वाढत गेली आणि ऐंशीच्या दशकामध्ये तर काही मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणेशमूर्ती साकारण्यासाठी वापर सुरू केला. शाडूच्या मातीच्या तुलनेत हलक्या आणि कमी किमतींमुळे भाविकांकडून या मूर्त्यांना मागणी वाढत गेली. प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणाला घातक ठरत असल्याचे लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला. आता तर एकटय़ा मुंबईत लाखोंच्या संख्येने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विकल्या आणि विकत घेतल्या जात आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या विरोधात ओरड सुरू केली आहे. पण भाविकांमध्ये जनजागृती करण्यात सर्वच जण अपयशी ठरले आहेत.
एके काळी बहुतांश सर्वच मूर्तिकार शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारत होते. ही मूर्ती दिसायला सुबक असली तरी तिचे वजन मात्र अधिक. ‘श्रीं’चे आगमन आणि विसर्जनाच्या वेळी जड गणेशमूर्ती उचलणे भाविकांसाठी अवघड बनत होते. ऐंशीच्या दशकात शाडूच्या तुलनेत हलक्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बाजारात आल्या आणि भाविकांनी त्याला पसंती देण्यास सुरुवात केली. आता तर मुंबईमध्ये हमरापूर- पेण, सातारा, कोल्हापूर, नगर आदी ठिकाणांहून मोठय़ा संख्येने गणेशमूर्ती येऊ लागल्या आहेत. ठिकठिकाणी गणेशमूर्तीची दुकाने थाटून तेथे या मूर्ती विकल्या जात आहेत. एके काळी पेणमधून शाडूच्या गणेशमूर्ती मुंबईत येत होत्या. पण शाडूच्या मूर्ती घडविणारे कारागीर मिळेनासे झाले आणि मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसकडे वळले. आजघडीला पेण आणि आसपासच्या गावांमध्ये गणेशमूर्तीच्या कार्यशाळा नव्हे तर कारखानेच उभे राहिले आहेत. वर्षभर मूर्ती तयार करून त्या मुंबई आणि इतर शहरांमध्ये पाठविल्या जातात. आता तर सातारा, नगर, कोल्हापूरमधूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती इतर शहरांमध्ये पोहोचत्या होऊ लागल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकणाऱ्यांनी १०० मूर्त्यांवर १० मूर्ती मोफत अशा योजना सुरू करून आपली विक्री वाढविण्याची शक्कलही लढविली आहे, तर उरलेल्या गणेशमूर्ती परत घेण्याच्या वायद्यानेही मूर्ती देण्यात येत आहेत. अशा पद्धतीने आजघडीला मुंबई-ठाण्यात तीन लाखांहून अधिक गणेशमूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने चिंता वाढविणारी आहे.
आजघडीला मुंबईत शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविणाऱ्या पारंपरिक मूर्तिकारांची संख्या अत्यंत दुर्मीळ झाली आहे. शाडूच्या मातीची वाढलेली किंमत, मातीचा तुटवडा आणि कारागिरांचा अभाव यामुळे पारंपरिक मूर्तिकार हैराण झाले आहेत. त्यातच अनेक मूर्तिकारांची पुढची पिढी अन्य व्यवसायात स्थिरावू लागली आहे. परिणामी वयपरत्वे आपल्या गणेश कार्यशाळा सुरू ठेवणे अनेकांना अवघड बनले आहे. शाडूच्या मूर्ती कमी होण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे.
आठ ते दहा किलो शाडूच्या मातीपासून एक फुटाची गणेशमूर्ती बनविली जाते. फारशी कलाकुसर नसलेली ही मूर्ती सुमारे १००० ते १२०० रुपयांना मिळते. कलाकुसर केलेली हीच मूर्ती सुमारे ३०००-३५०० रुपयांच्या घरात जाते. जसजसा मूर्तीचा आकार वाढतो तशी त्याच्या किमतीतही वाढ होते. पूर्वी पाच फुटांच्या शाडूच्या गणेशमूर्ती मिळत होत्या; परंतु आता त्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसची एक फुटाची गणेशमूर्ती ८०० रुपयांपासून मिळते. मूर्तीच्या आकर्षकतेवर तिची किंमत वाढते. हीच कच्ची मूर्ती मूळ कारखान्यात २५० रुपयांना मिळते. तिच्यावर दागिने आणि आकर्षक रंगाचा साज चढल्यावर तिची किंमत हजारावर पोहोचते. या मूर्तीची दुकाने जागोजागी थाटण्यात आली आहेत. गणेशमूर्ती विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पारंपरिक मूर्तिकार दुर्मीळ होऊ लागले आहेत. कारागिरांचा अभाव आणि मूर्तिकाम साहित्याच्या वाढत्या किमती यामुळे शाडूच्या मूर्ती साकारणारे उरलेसुरले मूर्तिकारही चिंतेत पडले आहेत. वजनाला अतिशय हलक्या आणि पाण्यात झटकन विरघळणाऱ्या कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती काही मूर्तिकार घडवू लागले आहेत. तसेच काही संस्था, संघटनांकडूनही या मूर्तीची निर्मिती होऊ लागली आहे. पण भाविकांकडून या मूर्तीना फारशी पसंती मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या मूर्तीच्या किमती इतर मूर्तीप्रमाणेच आहेत; परंतु आता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या पर्यायासाठी जनजागृतीची गरज आहे.
पारंपरिक मूर्तिकलेत तग धरलेल्या मूर्तिकारांचे संवर्धन आणि शाडूच्या मातीपासून मूर्ती घडविणाऱ्या उमद्या कलाकारांची फळी उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी गुजरातप्रमाणेच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कला केंद्रे उभारण्याची वेळ आली आहे; अन्यथा पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टरच्या मूर्तीचा बाजार दरवर्षी असाच भरत राहणार.