News Flash

विश्वाचे वृत्तरंग : दोघांच्या भांडणात तिसऱ्याची कोंडी!

तुर्कस्तानने जुलै २०१७ मध्ये रशियाकडून एस-४०० प्रणाली २.५ अब्ज डॉलर्सना विकत घेण्याची घोषणा केली होती.

(संग्रहित छायाचित्र)

कोणत्याही मार्गाने मित्रराष्ट्र जोडण्याकडे अमेरिका आणि रशिया यांचा कल असतो. चार वर्षांपूर्वी तुर्कस्तानने रशियाचे विमान पाडले त्यावेळी तुर्कस्तान आणि रशिया यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर होत आहे, परंतु आता तुर्कस्तान आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यासाठी निमित्त ठरला तो तुर्कस्तानने रशियाशी केलेला करार. तुर्कस्तानने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी हा करार केला. मात्र, त्याची अंमलबजावणी केली तर तुर्कस्तानला अत्याधुनिक एफ-३५ लढाऊ विमानांवर पाणी सोडावे लागेल, असा इशारा अमेरिकेचे प्रभारी संरक्षणमंत्री पॅट्रीक शानहन यांनी नुकताच दिला. यामुळे या दोन ‘नाटो’ सदस्य देशांमध्ये संघर्षांची चिन्हे आहेत. माध्यमांनी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताना या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकला आहे.

अलीकडे तुर्कस्तानचे रशियाशी दृढ संबंध निर्माण झाले आहेत, असे निरीक्षण नोंदवत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने या संदर्भातील घडामोडींचा तपशील दिला आहे. ‘‘गेल्या आठवडय़ात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगन यांच्यात चर्चा झाली होती. त्यात रशियाच्या एस-४०० प्रणालीचे परिणाम अभ्यासण्यासाठी समिती नेमण्याचा प्रस्ताव एर्दोगन यांनी दिला होता. त्यात काहीच निर्णय झालेला नसला तरी ट्रम्प आणि एर्दोगन यांच्यात जपानमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेदरम्यान चर्चा होणार आहे. मात्र, त्यातून फारसे काही हाती लागण्याची शक्यता धूसर आहे’’, असे त्यात म्हटले आहे.

तुर्कस्तानने जुलै २०१७ मध्ये रशियाकडून एस-४०० प्रणाली २.५ अब्ज डॉलर्सना विकत घेण्याची घोषणा केली होती. या प्रणालीबाबत तुर्कस्तानच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच ही प्रणाली तुर्कस्तानला हस्तांतरित करण्यात येणार असल्याचा दावा रशियाने केला आहे. दुसरीकडे, तुर्कस्तानचे ४२ कर्मचारी एफ-३५ विमानांबाबत अ‍ॅरिझोना आणि फ्लोरिडामध्ये प्रशिक्षण घेत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. सध्या तुर्कस्तानच्या कंपन्या एफ-३५ विमानांचे सुमारे एक हजार सुटे भाग तयार करतात. हे काम दुसऱ्या कंपनीकडे देण्याची चाचपणी अमेरिकेने सुरू केली आहे. एफ-३५ विमानाचे कंत्राट रद्द झाल्यास तुर्कस्तानच्या कर्मचाऱ्यांनाही ३१ जुलैपर्यंत मायदेशी परतावे लागेल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

सध्या अमेरिका आणि तुर्कस्तान यांच्यात या करारावरून वाद सुरू असला तरी या देशांमधील वाद नवे नाहीत. सीरियात लढणाऱ्या कुर्दिश गटांना अमेरिकेचा पाठिंबा असल्याच्या मुद्यासह अनेक गोष्टींत उभय देशांमध्ये मतभेद आहेत, याकडे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील एका लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. रशियाची एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली अमेरिकेच्या एफ-३५ लढाऊ विमानांच्या निकट तैनात केल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात तुर्कस्तानचे रशियावरील अवलंबित्व वाढेल, ही अमेरिकेची भीती या लेखात अधोरेखित करण्यात आली आहे. रशियाच्या एस-४०० ला पर्याय म्हणून अमेरिकेने तुर्कस्तानला क्षेपणास्त्र प्रणाली देऊ केली होती. मात्र, हा प्रस्ताव खूप विलंबाने देण्यात आला. शिवाय, ही प्रणाली खूप महागडी आहे, असा दावा तुर्कस्तानने केल्याचा उल्लेख या लेखात आहे.

‘बीबीसी’च्या संकेतस्थळावरील वृत्तात पॅट्रीक यांनी तुर्कस्तानला पाठवलेल्या पत्राचा दाखला देत या प्रकरणाचा सविस्तर वेध घेतला आहे. रशियाची एस-४०० प्रणाली काय आहे, ती कशी काम करते, अमेरिकेच्या रोषाचे तुर्कस्तानवर काय परिणाम होतील, याचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. तुर्कस्तान आणि रशिया यांच्यात कराराबाबत वाटाघाटी सुरू असताना अमेरिकेने आक्षेप घेतला नाही. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर अमेरिकेने विरोधाची भूमिका घेतली, असे तुर्कस्तानच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने त्यात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेने तुर्कस्तानला दिलेल्या इशाऱ्याबाबत रशियन माध्यमांत फारशा प्रतिक्रिया दिसत नाहीत. मात्र, तुर्कस्तान- रशिया कराराबाबत दोन महिन्यांपूर्वी ‘द मॉस्को टाइम्स’मध्ये ‘अवर मॅन इन नाटो : व्हाय पुतिन लॉक्ड आऊट विथ रिसेप एर्दोगन’ या शीर्षकाचा लेख आहे. ‘‘एकही गोळी न झाडता, युद्धभूमीवर एकही रणगाडा तैनात न करता रशिया ‘नाटो’चे ऐक्य लवकरच उद्ध्वस्त करणार आहे. काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणारा विजय दृष्टिपथात आहे’’, अशा शब्दांत या लेखात रशियाच्या मुत्सद्दीपणाचे कौतुक करण्यात आले आहे. सध्या तरी अगदी तसेच घडताना दिसते.

संकलन : सुनील कांबळी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 12:02 am

Web Title: fight between us and turkey
Next Stories
1 बीटी वांग्याचे वादळ
2 चाँदनी चौकातून दिल्लीवाला : गोरक्षक मंत्री!
3 वाचन विघटनाची आणखी एक बाजू..
Just Now!
X