सांगली तशी चांगली. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून हीच सांगली थोडीशी आक्रमकपणे वागत असल्याचे पदोपदी दिसत आहे. याला कारणही तसेच आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवून झोपी जाण्याची सवय झालेल्या सांगलीला आपल्यातीलच एखाद्याला गुरासारखे मारून खलास करण्याची मर्दुमकी तथाकथित कर्तव्यदक्ष फौजदार युवराज कामटे याने दाखविली. यामुळे सांगलीचे समाजमन पेटून उठले नसते तरच नवल.

अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोन तरुणांना शहर पोलिसांनी जबरी चोरी केल्याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच दिवशी न्यायालयात हजर करून चौकशीसाठी कोठडी मागून घेण्यात आली. रात्री या दोघांना कोठडीबाहेर चौकशीसाठी डीबी (गुन्हे प्रगटीकरण) खोलीत घेण्यात आले. या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली. कोठडीतील मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी आंबोलीच्या जंगलात नेऊन त्याचा मृतदेह जाळण्यात आला. या सर्व घटना आज समोर आल्या आहेत, या प्रकरणी फौजदार कामटे याच्यासह पथकातील चार पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमाखाली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीचे पथक करीत आहे.

मात्र तत्पूर्वी या घटनेची पाश्र्वभूमी  पाहणे गरजेचे आहे. अनिकेत ज्या दुकानात कामासाठी होता त्या लकी बॅग हाऊसच्या मालकाचा आणि त्याचा पगारासाठी वाद झाला होता. एक वेळ पगारच देणार नाही असे सांगितले असते तर वेगळे, मात्र त्या मालकाने तुझ्या पत्नीला पगार न्यायला पाठव असे सांगितल्याने हा वाद झाल्याचे अनिकेतच्या कुटुंबातील सदस्य सांगत आहेत.  या वादात पैसे चोरल्याची दुकानमालकाने तक्रार केली होती. मात्र या तक्रारीत तडजोड झाली.  यानंतर कवलापूरच्या गायकवाड नामक मुंबईस्थित अभियंत्याच्या तक्रारीवरून अनिकेत व अमोलवर चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपये आणि मोबाइल लुटल्याची तक्रार रविवारी दाखल करण्यात आली. याच्या चौकशीसाठी कामटे याने दोघांना रविवारी रात्रीच पोलीस ठाण्यात आणले.

सोमवारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. घरची मंडळी वकील देऊन दोघांना सोडविण्याच्या प्रयत्नात असतानाच परस्पर वकील देऊन पोलीस कोठडी न्यायालयात मंजूर करून घेण्याची घाई करण्यात आली. वास्तविक आरोपीला त्याच्या घरच्या लोकांना यादरम्यान भेटण्यासही मज्जाव करण्यात आला. हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका येण्यासारखी स्थिती मंगळवारची रात्र उजाडल्यानंतर निर्माण झाली.

कधी ड्रायव्हरचे तर कधी एखाद्या दुकानात काम करणारा अनिकेत अट्टल लुटारू कसा असू शकतो. तीन वर्षांची प्रांजल, पत्नी संध्या, आई-वडील, भाऊ यांच्यासह कोल्हापूर रोडवरील भारतनगरमध्ये राहणारा कुटुंबवत्सल तरुण असे करू शकेल यावर विश्वास ठेवणे घरच्यांना कठीण वाटले. यातच मंगळवारी सकाळीच अनिकेतचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याची बातमी अख्ख्या सांगलीत पसरली.

चौकशीच्या वेळी पोलीस अधिकाऱ्याकडून दिलेली उत्तरे असमाधानकारक तर होतीच, याचबरोबर दंडुक्याच्या जोरावर आम्ही काहीही केले तरी तुमचा विचारण्याचा अधिकारच काय, अशा पद्धतीची भाषा अधिकारी वापरत होते. कोठडीत एकाचा मृत्यू होऊनही अन्य कोणालाही याची माहिती असत नाही यावर सांगलीकर विश्वास ठेवायला राजी नव्हते. उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे मात्र दोघेही पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन पळून गेले आहेत असे सांगत होत्या. पळून गेलेल्या दोघांना पकडण्यासाठी कामटे त्यांच्या मागावर असल्याचे छातीठोकपणे सांगत राहिल्या.

यादरम्यान, अनिकेतच्या भावाशी मध्यस्थाने संपर्क साधून एवढा आकांडतांडव करू नका, आपण परस्पर मिटवू असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. यामुळेच अनिकेतचा घातपात झाला असण्याची शक्यता बळावली. मात्र खुद्द आमदार सुधीर गाडगीळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनीही याचा जाब विचारल्यानंतर उलटसुलट उत्तरे देण्याचा प्रयत्न अधिकारीवर्गाकडून करण्यात आला. मंगळवारी रात्री अनिकेतबरोबर असलेल्या अमोलला निपाणीत पकडले असून त्याला घेऊन कामटे सांगलीस येत असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. याच वेळी अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आरोपीला हुबळीत पकडल्याचे सांगितले.  यामध्ये तफावत तर दिसून आलीच मात्र आमदारांनी बुधवारी दुपापर्यंत दोघांना हजर करण्याचे आदेश दिल्यानंतर घडलेला प्रकार सांगण्याविना पोलिसांसमोर अन्य पर्यायच उरला नाही.

बुधवारी दुपारी पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी माध्यमांसमोर अनिकेतचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याची नि:संदिग्ध शब्दांत कबुली देत असताना कामटेसह सहा जणांना अटक करण्यात आल्याचे सांगितले.  हे सांगण्यास पोलीस यंत्रणेला तब्बल २४ तास वेळ लागला. हा वेळ का लागला, याची उत्तरे शोधावी लागतील.

उपअधीक्षक डॉ. काळे यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला हे उघड गुपित आहे. कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार अनिकेतचा मृत्यू रात्री साडेनऊ वाजता कोठडीत झाला.या वेळी पोलीस ठाण्यात गर्दी असणारच, मग ही बातमी कुणालाच ज्ञात नव्हती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचे मृतदेह जाळण्याच्या प्रकारावरून स्पष्ट होते. पोलीस  कर्मचारी ज्ञात असूनही अज्ञानाचे सोंग कशासाठी घेत होते? की त्यांना हे प्रकरण फारसे ताणले जाणार नाही, परस्पर मिटविले जाईल याची खात्री वाटत होती, या प्रश्नांची उत्तरे सडलेल्या व्यवस्थेमध्ये आहेत.

या प्रकरणात काही तरी लपविण्याचा अथवा कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा समज सांगलीच्या जनतेचा झाला आहे. आता यामध्ये बडे राजकीय नेतेही सहभागी झाल्याने हा केवळ कोथळे कुटुंबाचा विषय राहिलेला नाही. या प्रकरणावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गरमागरम चर्चा होणे अपेक्षितच आहे. मात्र सरकार पक्षाची बाजू कोण आणि कशी मांडणार? कारण गृह खाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असल्याने विरोधकांकडून या घटनेचे राजकीय भांडवल केले जाणार हे स्पष्ट आहे.  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा विषय अधिक काळ तेवत ठेवणे सत्ताधारी भाजपलाही परवडणारे नाही. त्यातच खुद्द भाजपचे स्थानिक आमदारच पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत साशंक असल्याने सरकारलाही वेळ मारून नेणे कठीण जाणार आहे.

सांगलीत अधीक्षक म्हणून काम केलेले अशोक कामटे हे अतिरेक्यांच्या गोळीबारात मुंबईत शहीद झाले. मात्र याच कामटेंचे आडनाव घेऊन युवराज कामटे याने आपणही कामटेंच्या कर्तृत्वाचा वारसा चालवीत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. एकाच पोलीस ठाण्यात सलग पाच वर्षे नोकरी करीत असताना तक्रारी येऊनही त्याला क्लीन चिट का देण्यात आली? खातेनिहाय चौकशी का केली नाही, याची उत्तरे शोधत असताना वरिष्ठांचा असलेला आशीर्वाद कारणीभूत असल्याचे पोलीस दलातील लोकच सांगत आहेत.

अनिकेतच्या खुनाचे प्रकरण दडपण्याची आणि दडपले जाण्याची खात्री पोलीस दलात आज निर्माण झालेली आहे असे म्हणता येणार नाही. जहागिरीसारखे तेच तेच चेहरे ठाण मांडून बसले आहेत. स्थानिक पातळीवरील राजकीय लागेबांधे मदतीला आहेतच. यातून अंगी आलेला निर्ढावलेपणा कामटे प्रवृत्तीला पोषक ठरला. याला वेळीच ठेचण्याची हिंमत शासन दाखविणार का? पोलीस अधिकाऱ्यांचा जनतेशी आणि माध्यमांशी संवाद अलीकडच्या काळात तुटला आहे, तो पुन्हा प्रस्थापित होण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण केवळ आणि केवळ लोकरेटय़ामुळेच उघडकीस आले, अन्यथा या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेला अमोलही आज कुठे असता हे विधात्यालाच ज्ञात..