मुंबई हल्ल्याला पाच वष्रे पूर्ण होत असतानाच पाकिस्तानी वकिलाने भारताकडून देण्यात आलेले पुरावे बनावट असल्याचा कांगावा केला आहे. मुंबई हल्ला प्रकरणातील लष्कर-ए-तोयबाच्या ७ पाकिस्तानी संशयित अतिरेक्यांचे वकीलपत्र घेतलेल्या रजा रिझवान अब्बासी यांनी हा दावा केला आह़े
भारताने या हल्ल्यासंबंधी पाकिस्तानला पुरवलेली फाइल ही हल्ल्याची माहिती देणारी आह़े  न्यायालयाला आवश्यक असणारे पुरावे त्यात नाहीत़ आणि पुरावे म्हणून जे काही आहे ते बनावट आहे, असे अब्बासी यांनी म्हटले आह़े  अब्बासी यांनी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख झकिउर रेहमान लख्वी आणि अन्य सहा संशयितांचे वकीलपत्र घेतले आह़े

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय भारताला समाधान मिळणार नाही. पाकिस्तानने या दोषींना कठोर शिक्षा होईल अशी तजवीज करावी. २६/११चा हल्ला झाला त्यावेळी सागरी किनाऱ्याच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी होत्या. मात्र, आता सर्वच प्रमुख किनाऱ्यांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
– संरक्षणमंत्री ए. के. अँटनी

दहशतवादविरोधी लढय़ात अत्यंत कठोरपणे एकत्रित उपाययोजनेची आवश्यकता असतानाच केंद्र सरकार मात्र मतांच्या राजकारणासाठी जाणीवपूर्वक मंद गतीने काम करीत आहे.  ‘९/११’ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेने ज्याप्रमाणे लढा दिला, त्याप्रमाणे दहशतवादाविरोधात लढा देण्याकामी आपण अपयशी ठरलो आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास आता पाच वर्षे पूर्ण झालेली असताना दहशतवादी विरोधी लढय़ात आपण नक्की कोठे आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची आता वेळ आली आहे.
– अरुण जेटली, भाजप नेते