दिगंबर शिंदे, सांगली

२०२० हे वर्ष जवळजवळ करोनानेच उद्ध्वस्त केले. माणसांचे सारे जगणे उलटेपालटे करणाऱ्या या भयपर्वाचे अनेक दशावतार लोकांनी पाहिले, प्रत्यक्ष अनुभवले. या दाहकतेतून जे जगले-वाचले त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. लोकसत्ताच्या महाराष्ट्रभरातील प्रतिनिधींनी या संहारक काळातील टिपलेली लक्षवेधी प्रतिबिंबे.. सकारात्मक अन् नकारात्मक!     

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये

‘पाच-पाच किलोचं चाळ बांधून फडावर उभारलं की ढोलकीचा तोडा मनात गुंजी घालायचा. यात पहाटंची चाण्णी उगावल्यालीभी कळायची नाही. पब्लिकच्या शिट्टय़ा, आरोळ्या ऐकताना मन कसं फुलावानी हलकं हलकं हुयाचं. गेल्या साली आलेल्या करोनानं सगळंच इपरित घडलं. जत्रा, यात्रा थांबल्या आणि पोटआगीसाठी रोज एकाचा बांध तुडवण्याचा वकु त आला. गुदस्ता घेतल्यालं सावकाराचं कर्ज कसं भागायचं याची चिंता चिता जाळली तरी जाणार नाही..’

हे शब्द आहेत एका तमाशा कलाकाराचे. जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील कवलापूर, तासगाव तालुक्यातील सावळज, बस्तवडे, सावर्डे, चिंचणी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, बोरगाव, नागज, घाटनांद्रे, इरळी, तिसंगी, तसेच डोंगरापल्याडच्या पाचेगावातील तमाशा कलाकार गेल्या वर्षभरापासून तमाशाचे कार्यक्रमच होत नसल्याने रोजंदारीवर पोटपाणी चालवीत आहेत. अंगातील तमाशा कलेला गंज चढतो की काय, ही धास्ती तर आहेच; पण त्याचबरोबर करोनाचं हे संकट होत्याचं नव्हतं करून सोडते की काय, ही भीतीदेखील त्यांच्या मनात घर करून राहिली आहे.

दरवर्षी गुढी पाडव्याला विटा येथे लोकनाटय़ तमाशा मंडळाचे कार्यालय सुरू होते. सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्य़ांसह कर्नाटकातील विजापूर, बेळगाव, बागलकोट जिल्ह्यातील यात्रा-जत्रा सुरू होतात. या यात्रांमध्ये करमणुकीचा कार्यक्रम म्हणून तमाशा ठरवण्यासाठी पंच मंडळी विटय़ाला येतात. फडाच्या मॅनेजरशी बोलणी करून यात्रेची सुपारी ठरवली जाते. यात्रेच्या मुख्य दिवशी रात्री आणि दुसरे दिवशी दिवसा कुस्त्यांचा फड उभा राहीपर्यंत खेळ झाला पाहिजे; नर्तिका तर पाहिजेतच, पण सोंगाडय़ाही जबर पाहिजे, यासोबतच एखादा वगही फक्कड हवा- अशा अटींसह ही सुपारी २५ हजारापासून साठ हजारापर्यंत देण्यात येते.

पारंपरिक तमाशामध्ये गण, गवळण, बतावणी आणि वगनाटय़ असते. गवळणीच्या वेळी चालू चित्रपटगीतांचाच अधिक भरणा अलीकडच्या प्रेक्षकांना हवा असतो. नऊवारी साडीतील ललना पायात पाच-पाच किलोचे चाळ बांधून फडावर आली की पब्लिकच्या शिट्टय़ा आणि आरोळ्यांनी आसमंत दुमदुमून जातो.

मात्र, गेल्या वर्षी तमाशांचा ऐन हंगाम सुरू व्हायच्या वेळीच करोनाने देशभर टाळेबंदी लागू झाली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनोरंजन क्षेत्रालाही मनाई करण्यात आली. ज्या व्यवसायाचं गणितच गर्दीवर अवलंबून, ती गर्दीच होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज असल्याने सारा खेळच बंद पडला. मोठी तमाशा मंडळं पावसाचा जोर ओसरल्यानंतर दसऱ्याला गाव सोडतात. यंदा त्यांचेही अवघड झाले आहे. लहान लोकनाटय़ मंडळांना उन्हाळ्यातील जत्रा, यात्रांच्या सुपाऱ्या असतात. त्याही गेल्या वर्षांपासून बंद आहेत. यंदाही सुरू होतील याची खात्री नाही. कारण करोनाचे रोज नवनवे रूप समोर येते आहे.

तमाशाच्या दुनियेत ‘बालम’ नावाने ओळखला जाणारा बालक दामोदर कांबळे.. अख्ख्या तमाशा दुनियेत मावशीची भूमिका रंगवून फडात हशा आणि टाळ्या घेणारा हा हरहुन्नरी ६४ वर्षांचा तरणाबांड कलाकार.  छाया-आगर नागजकर यांच्या तमाशात गवळणींची पाठराखण करणाऱ्या मावशीची भूमिका करणारा, सोंगाडय़ा. हजरजबाबीपणा अंगी मुरलेला. रोजच्या घडामोडी समजून घेण्यासाठी पहिल्या एसटीनं गावात येणारा. पेपरांतील घडामोडी वाचून रोजच्या फडावर त्याबद्दल खुसखुशीत भाष्य करणाऱ्या या कलाकाराची करोनामुळे कलेपासून आज फारकत झाली आहे. जगण्यासाठी तो कधी सावळज, जरंडीतील द्राक्षबागेत कामाला जातो. काम नसेल तर घरच्या दावणीला असलेली चार शेरडं डोंगरकपारीला हिंडवायला घेऊन जातो. मात्र, शेरडामागं हिंडताना एखादं पुस्तक पिशवीत हमखास असतं. फडावर नसल्याची वेदना पुस्तकाच्या पानांत शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या बालमने लता लंका, जयसिंग पाचेगावकर या तमाशांतही काम केले आहे.

छाया आणि आगर नागजकर या नावाने तमाशाचा फड आहे. या फडाचे मालक आगर नागजकर यांनी सांगितले की, बालम मावशीपासून पडेल ती कामे करतो. कधी त्याच्या गळ्यात ढोलकी असते, तर कधी पायपेटीवर सूर साधण्याचं तो काम करतो. २५ ते ३० कुटुंबं या फडावर जगतात. मात्र, करोनामुळे त्यांचे प्रचंड हाल झाले. खायचे वांधे नसले तरी रिकामपणात करमत नाही. घरात बसून विरंगुळा म्हणून ढोलकी बडवली. तमाशातली वाद्यं खराब होऊ नयेत म्हणून घरात ती सतत वापरात ठेवली. बांधलेले वग, गाण्यांची उजळणी सतत करायची, एवढंच काम गेल्या वर्षभरात करावं लागलंय. याचं कारण- हेही दिवस जातील, ही चिवट आशा.

वाठारच्या तमाशात नृत्याचं काम करणारा तासगावचा चरण्या पारधी सांगतो की, टाळेबंदीच्या काळात हाल झाले तरी लोकांनीही मदतीचा हात दिला. मोकळ्या वेळात बसून काय करायचं, तर नव्या दमाची १०-१२ गाणी फडातल्या दहा पोरी आणि दोन पोरं घेऊन बसवली. उद्या उगवणारा दिवस करोनामुक्त असेल, या आशेवर प्रेक्षकांना नवीन काय देता येईल याचा सराव करतो आहे.

करोनामुळे तमाशाच्या फडावर भरजरी वस्त्रांत वावरणारा राजा सध्या रंक झाल्याचं चित्र दिसतं आहे. तमाशा ही अस्सल मराठमोळी कला जगली पाहिजे असे मोठमोठे लोक गळा काढून सांगतात. पण ही अस्सल कला फडावर जिवंत करणारे कलाकार आधी जगले पाहिजेत यासाठी कुणीच काही करत नसल्याची खंत सावर्डेचा भास्कर सदाकळे व्यक्त करतो.