प्रदीप रावत

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे  दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वर्णन एका शब्दात करायचे झाले तर ‘युगान्त’ असे म्हणावे लागेल.

भारतीय लोकशाहीला समृद्ध करणारं, लोकशाही संकेतांचे मापदंड निर्माण करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली नव्याने जन्मास आलेल्या जनसंघाला लोकमान्यता मिळवून देण्याचे कार्य अटलजींनी केले. जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचा प्रदीर्घ प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला आहे. जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टी ह्य रूपाने ‘पुनश्च हरी ओम’ हा धाडसी प्रयोग होता. या निवडणुकीत त्या नवीन पक्षाचा दारुण पराभव झाला. केवळ दोन सदस्य निवडून आले. खुद्द वाजपेयींना पराभव स्वीकारावा लागला. अशा पराभवाने भले भले खचून जातात, परंतु वाजपेयींनी ह्य पराभवाचे एका सुवर्णसंधीत रूपांतर केले. ह्य अग्निदिव्यातून एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला देशाची सत्ताधारी पार्टी बनवली. भारतीय जनता पार्टीला त्यांनी कधीही व्यक्तिकेंद्रित होऊ  दिले नाही. जेव्हा समकालीन कम्युनिस्ट पार्टी वगळता सर्व पक्ष हे व्यक्तीकेंद्रित व घराणेशाहीवर चालत होते त्या कालखंडात भारतीय जनता पार्टीला मात्र घराणेशाहीपासून अलिप्त ठेवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. राजकारणामध्ये शत्रू नसतात, तर विरोधक असतात याचे भान त्यांनी राखले आणि त्यामुळेच अनेक छोटय़ा मोठय़ा पक्षांना बरोबर घेऊ न स्थिर सरकार देण्याचे श्रेय केवळ वाजपेयींना जाते. वाजपेयीं व्यतिरिक्त संमिश्र सरकार देण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसतील. त्याचवेळेला ‘राजकीय सौदेबाजी’ ही त्यांच्या तत्त्वातच बसत नव्हती. त्यामुळेच केवळ एक मत कमी पडत असताना सरकार सोडण्याचे त्यांनी पसंत केले.

चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे भारताचा आर्थिक विकास नव्वदच्या दशकापर्यंत खुंटला होता.  आर्थिक संकटांच्या अपरिहार्यतेमुळे पंतप्रधान नरसिंहरावांना खुले आर्थिक धोरण स्वीकारावे लागले, पण वाजपेयींनी खुल्या आर्थिक धोरणामध्ये असलेल्या दृढ विश्वासातून देशाला आर्थिक गती दिली. त्यांची ही आर्थिक व सामाजिक नीती पुढील सर्व सरकरांसाठी पथदर्शक ठरली आहे.

त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडातला एक खासदार ह्य नात्याने मी त्याचा साक्षीदार आहे. त्यांच्या सहवासातील काही आठवणी या प्रसंगी मला सांगाव्याश्या वाटतात.. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाणे लोकार्पण करताना अटलजींनी महाराजांचे केलेले मूल्यमापन किती मर्मग्रही आहे हे लक्षात येते. ते म्हणाले, की शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा इतिहास हा पराक्रमाचा पण हौतात्म्याचा आहे. महाराजांपासून पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रात विजयाची परंपरा सुरू झाली. अटलजी पुण्यात आले होते. विमानतळाहून राजभवनाकडे जाताना मी त्यांना सुचवले ‘तुम्हाला गाणे ऐकायला आवडेल का?’ त्यांनी विचारले ‘कु णाचे?’ मी पं. भीमसेन जोशींचे नाव सुचवले. त्यांनी विचारले, ‘ऐनवेळी सांगून येतील?’ मी म्हटले, हो नक्की येतील.  मी तत्काळ फोन लावला आणि पंडितजींनी होकार दिला. त्या रात्री पंडितजी आणि वीणाताई सहस्रबुद्धे यांची भजने ऐकताना तल्लीन झालेले अटलजी मी पाहिले. ज्योतिषाला विज्ञान म्हणून मान्यता द्यावी असा प्रस्ताव येऊ  घातला होता. त्याच्या विरोधात पार्लमेंट्री पार्टीच्या बैठकीत मी विरोध दर्शविला. अनेकांना वाटले माझी ही कृती राजकीय आत्महत्या आहे. पण बैठक संपल्यानंतर े माझी पत्नी आशा हिला अटलजी मिश्किल हसत म्हणाले, आज तो प्रदीपने धमाका उडा दिया. आणि माझ्या पाठीवर थाप मारून निघून गेले.  ज्योतिषाला शास्त्र ठरवण्याचा प्रस्ताव पूर्णपणे बारगळला.

(लेखक माजी खासदार आहेत.)