X

अमीट वारसा

अटलजींनी उजव्या विचारांच्या, संकुचित सांप्रदायिक जनसंघाचे भाजप या राष्ट्रीय पक्षात स्थित्यंतर घडवले.

|| एन. के. सिंग

अटलजींनी उजव्या विचारांच्या, संकुचित सांप्रदायिक जनसंघाचे भाजप या राष्ट्रीय पक्षात स्थित्यंतर घडवले. भाजप हा फुटकळ व्यापाऱ्यांचा आणि दुकानदारांचा पक्ष आहे, ही सामान्य भावना त्यांच्यामुळे कायमची बदलून गेली. तसेच वाजपेयी कालखंड हा आर्थिक आणि परराष्ट्र संबंधांतील महत्त्वाचा काळ होता. परराष्ट्रनीतीच्या बाबतीत, अमेरिकेशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न आणि पाकिस्तान भेट जी घरोघरी लक्षात आहे ती त्यांच्या पक्ष आणि प्रदेशापलीकडे जाणाऱ्या सद्भावनेचे प्रतीक आहे.

एखादा कालखंड एका स्तंभात बसवणे शक्य नाही. त्याचप्रमाणे वारसा शब्दात सामावणे अवघड आहे. अटलबिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. प्रथम १९९६ साली केवळ १३ दिवसांसाठी, नंतर १९९८ ते १९९९ या काळात ११ महिन्यांसाठी आणि त्यानंतर १९९९ ते २००४ या काळात. त्यांनी राष्ट्रीय मूल्यांवर अमीट ठसा उमटवला. असाधारण गुणवत्तेचे वक्ते आणि संसदपटू म्हणून आपण त्यांना कायम ओळखत आलो आहोत. त्यांचे संवाद आणि खास विनोदी शैलीने तणावाचा क्षण हलका करण्याची क्षमता, तसेच काव्यगुण प्रसिद्ध आहेत. आपल्या संसदीय शब्दकोशाचा तो अविभाज्य भाग आहे. हे माजी पंतप्रधान गेले काही दिवस आजारी होते, पण त्यांच्या निधनाने मला अतीव दु:ख झाले आहे. एक सर्वसमावेशक, विरोधी मतांबद्दलही आदर बाळगणारा कालखंड अचानक आक्रसल्यासारखे वाटते.

उजव्या विचारांच्या, संकुचित सांप्रदायिक जनसंघाचे त्यांनी भाजप या राष्ट्रीय पक्षात स्थित्यंतर घडवले. भाजप हा फुटकळ व्यापाऱ्यांचा आणि दुकानदारांचा पक्ष आहे, ही सामान्य भावना कायमची बदलून गेली. तो आता एक विश्वासार्ह राष्ट्रीय पर्याय बनला आहे. अटलजींचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, मनाचा मोठेपणा आणि सहज क्षमाशील वृत्ती विचारधारांची बंधने पार करून सर्वदूर पसरली. त्यांनी १३ पक्षांचे युती सरकार यशस्वीपणे चालवले. त्यांचे मित्र आणि शुभचिंतक सर्व पक्षांत पसरले होते. भारतात अशी खूप कमी उदाहरणे आहेत. १९-८-२००१ ते ३१-१-२००१ या काळात त्यांचा सचिव म्हणून मला त्यांच्या खूप जवळून काम करण्याचे भाग्य लाभले. त्यापूर्वी मी त्यांना ओळखत होतो, पण १९८४ साली जपानमध्ये त्यांच्याबरोबर काही वेळ घालवण्याची संधी मला मिळाली. त्यांची स्मरणशक्ती आणि सौजन्य मैत्रीपूर्ण होते. पंतप्रधान झाल्यानंतर मी जेव्हा त्यांचे अभिनंदन केले तेव्हा ते विनोदाने म्हणाले की, मी त्यांना  ज्या कारमधून विमानतळावरून घेऊन आलो होतो ती कार व्यवस्थित आहे का? त्या वेळी कल्पना आली नाही की, ही पुढील वर्षांतील संबंधांची सुरुवात ठरणार होती.

मी त्यांचा सचिव म्हणून रुजू झालो त्या वेळी पंतप्रधानांचे कार्यालय असलेल्या साऊथ ब्लॉकमध्ये माझी नेमकी काय जबाबदारी असणार आहे हे विचारण्याची घोडचूक मी केली. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकून गूढगंभीर उत्तर दिले – सर्व. त्यांनी नम्रपणे मान्य केले की अधिकृत अर्थशास्त्र हा त्यांचा प्रांत नाही आणि आर्थिक धोरणांच्या बाबतीत मी त्यांना सल्ला द्यावा असे सुचवले.

काही काळाने त्यांनी मला पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाची आणि व्यापार आणि उद्योगविषयक मंडळाची स्थापना करण्यास सांगितले. आर्थिक मंडळाचे अध्यक्षपद भूषवण्यास कोण सर्वात योग्य असेल, असे त्यांनी विचारले. फारसा विचार न करता मी डॉ. आय. जी. पटेल हे योग्य व्यक्ती असू शकतील का, असे विचारले. त्यांनी स्मितहास्य करत मला माझे नशीब अजमावून पाहण्यास सांगितले. मग मी डॉ. पटेल यांना भेटण्यास गेलो, ज्यांना मी आधीपासून ओळखत होतो. त्यांनीही हसून मला उत्तर दिले – मी हे स्वीकारेन कारण मी पंतप्रधानांना दोनदा नकार देऊ शकत नाही. पटेलांचा रोख पंतप्रधानांनी देऊ केलेली कॅबिनेट सचिवाची जबाबदारी होती, जी दृष्टी अधू होत असल्यामुळे त्यांनी स्वीकारली नव्हती. व्यापार आणि उद्योगविषयक मंडळाच्या बाबतीतही असाच प्रसंग घडला. मला आठवते की मी पूर्व भारतातून आर. पी. गोएंका यांचे नाव सुचवले होते आणि ते काँग्रेसच्या जवळ असल्याने प्रधान सचिवांनी त्याला विरोध केला होता. पंतप्रधान त्यांच्या खास शैलीत हसले आणि म्हणाले, आज ते काँग्रेसच्या जवळ असतील, उद्या तुमची पाळी असेल. त्यांना जे योग्य वाटत होते त्याच्या आड त्यांनी पक्षीय विचार येऊ दिले नाहीत. त्यानंतर थोडय़ाच काळाने त्यांनी गोएंका यांना विशेष कामगिरीवर टोकियोला पाठवले हे खूप थोडय़ा जणांना माहीत आहे. आर्थिक सल्लागार मंडळ आणि व्यापार आणि उद्योगविषयक मंडळ अशा दोन्हींचे कामकाज हेतुपुरस्सरपणे ड्रॉइंग रूमच्या वातावरणात चालत असे. पंतप्रधानांच्या उपस्थितीने घाबरून न जाता तेथे  स्पष्टवक्तेपणा, सरळपणा आणि व्यावसायिकता होती.

त्यांना वारशाने मिळालेला दूरसंचार गुंता देशाची झेप थोपवू शकला असता. खासगी दूरसंचार कंपन्यांनी विसंगत बोली लावल्या होत्या आणि त्या चुकण्याच्या बेतात होत्या. त्याने कंपन्या आणि आशावादी गृहीतकांवर विसंबून त्यांना मुक्तपणे कर्ज देणाऱ्या बँका अशा दोघांचाही सत्यानाश झाला असता. ते तत्कालीन दूरसंचारमंत्र्यांचा बळी देण्यासही तयार होते, ज्यांनी नैतिक कारणांसाठी त्याला विरोध केला होता. मला आठवते की मी आणि तत्कालीन अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी खूप वेळ सर्वोच्च न्यायालय आणि भारत सरकारला मान्य होईल असे महसूल विभागणीचे प्रारूप तयार करण्यासाठी चर्चा करत होतो. त्याने भारताला दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची भूमिका परत मिळवण्यास मदत झाली. चौथ्या आणि पाचव्या औद्योगिक क्रांतीची शक्ती कोणीही आधी पाहू शकले नसते. अनेक प्रकारे, त्यांच्यात ते जाणतेपण होते.

त्याच प्रकारे फिक्कीच्या वार्षिक सभेसाठी त्यांनी माझे सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांना बदल घडवू शकेल अशा वेगळ्या संकल्पनेविषयी विचारले. त्यांनी पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर रस्ते मार्गिकांची कल्पना ताबडतोब मान्य केली, जी पुढे एनएचडीपी म्हणून ओळखली गेली. केवळ दोन दिवसांनी २४ ऑक्टोबर १९९८ रोजी त्यांच्या भाषणात त्याची घोषणा केली गेली.

दोन महिन्यांनी त्यांच्या ठरावीक पद्धतीने त्यांनी विचारले, जर तुम्ही हे  करवून घेतले आहे, तर आता तुम्ही त्याची अंमलबजावणी कराल का? त्यांनी असेही म्हटले की पंतप्रधानांच्या घोषणा या विनोद ठराव्यात असे त्यांना वाटत नाही. हे करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे यासाठी जमा झालेला उपकर व्यपगत न होणाऱ्या निधीत जमा करणे आणि भविष्यकालीन तजवीज म्हणून रोखे प्रसृत करणे. त्यासाठी भारताच्या संकलित निधीबाहेर व्यपगत न होणाऱ्या निधीबाबत अर्थ खात्याचे पारंपरिक ज्ञान नाकारण्याची गरज होती, जे त्यांनी आनंदाने केले. एनएचडीपी मोठय़ा प्रमाणात कर्जे उभे करू शकले आणि निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करू शकले. त्यांनी आम्हाला याचीही आठवण करून दिली होती की त्या उपकरामधून ग्रामीण भागातील रस्तेबांधणी केली जावी, ज्यातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तयार झाली.

काही वेळा त्यांच्या निर्णयाच्या धाडसीपणाला बाहेरच्यापेक्षा त्यांच्या पक्षातूनच अधिक विरोध झाला. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडून होणारा विरोध पाहता मी त्यांना जेव्हा विचारले की धोरणांची फेरआखणी केली पाहिजे का? तेव्हा त्यांनी ठरावीक पद्धतीने उत्तर दिले, तुम्ही तुमचे काम करा जे योग्य आहे. मी विरोधकांना सांभाळण्याचे माझे काम करेन. एखाद्या अवघड नातेसंबंधांचा त्यांनी कधीही कारभारावर परिणाम होऊ दिला नाही. सरकारला पक्षापासून अलिप्त ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्याकडे क्षमता, सद्भावना आणि वादविवादांना सामोपचाराने मिटवण्याची उंची होती, जी खूप खूप कमी जणांकडे असते.

परराष्ट्रनीतीच्या बाबतीत, अमेरिकेशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न आणि पाकिस्तान भेट जी घरोघरी लक्षात आहे ती त्यांच्या पक्ष आणि प्रदेशापलीकडे जाणाऱ्या सद्भावनेचे प्रतीक आहे. त्यांचे प्रधान सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी त्यांच्या अलौकिक बुद्धिसामथ्र्य आणि इतिहासाची जाण यांच्या आधारे अनेक गुंतागुंतीचे निर्णय घेतले. त्यांनी जसवंत सिंग-स्ट्रोब टाल्बोट यांच्या चर्चेला दिलेल्या आधारामुळेच पोखरण अणुचाचण्यांनंतर बिघडलेले अमेरिका-भारत संबंध व्यूहात्मक भागीदारीत बदलण्यास मदत झाली.

वाजपेयी कालखंड हा आर्थिक आणि परराष्ट्र संबंधांतील महत्त्वाचा काळ होता. भारतीय राजकारणाचा मुख्य प्रवाह पुन्हा कधीच मुक्तपणा, आधुनिकता आणि बदलाच्या शक्तींकडे वळणार नाही. आपले परराष्ट्र धोरण कधीही अंतर्मुख आणि स्वचालक बनणार नाही. त्यांनी त्याला कायमचे मुख्य प्रवाहात आणले आहे.

( लेखक निवृत्त सनदी अधिकारी आणि पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत.)