माजी पंतप्रधान व ज्येष्ठ समाजवादी नेते चंद्रशेखर यांनी प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व केलेला जिल्हा म्हणून बलिया ओळखला जात असला तरी तेथील एकूणच परिस्थिीती चिंता करावी अशीच आहे. रस्ते , वीज, पाणी या पायाभूत सुविधांचा पत्ता नाही, दहावीनंतर शिक्षणाची सोय नाही, रोजगाराच्या संधी नाहीत. अशा अभावग्रस्तेत लोक वर्षांनुवर्षे जगत आहेत केव्हा तरी बदल होईल या आशेवर.. भाजपच्या ज्येष्ठ राज्यसभा सदस्याने बलिया व लगतच्या परिसराचा दौरा करून मांडलेला लेखाजोखा..

वर्षांनुवर्षे उत्तर प्रदेशातून लोक मुंबई आणि देशाच्या अन्य शहरांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी का जातात? त्यांना आपला परिसर सोडून ‘अन्नासाठी दाही दिशा’ का धराव्या लागतात? गंगेच्या किनाऱ्यावर वसलेल्या अनेक गावांमधल्या जीवनाच्या गुणवत्तेच्या तुलनेत दिल्ली, मुंबई वा कोलकात्यात गचाळ परिसरात, प्रसंगी झोपडपट्टीत राहून चार पैसे मिळविण्याची वेळ या मंडळींवर का म्हणून येते? गाजीपूर, फेफना, बलिया, बेलथरा रोड, सिकंदरपूर या साऱ्या परिसरातून वावरताना हे प्रश्न पाठ सोडत नाहीत.

पक्षाच्या जबाबदारीचा भाग म्हणून जवळजवळ आठवडाभर प्रचारासाठी बलिया जिल्ह्यात सर्वदूर प्रवास करताना ‘पूर्वाचल’ या नावाने ओळखला जाणारा विशालकाय उत्तर प्रदेशाचा हा हिस्सा मुदलात केवढा जटिल प्रश्न-प्रदेश झाला आहे याची जाणीव पदोपदी होत राहते!

वाराणसीच्या उत्तरेस असलेला आजमगढ, मऊ आणि बलिया या तीन जिल्ह्यांचा हा भाग प्रशासनिक भाषेत आजमगढ मंडल म्हणून ओळखला जातो. वाराणसीहून बलिया फक्त १६० किलोमीटर अंतरावर आहे, पण रस्त्यांची विलक्षण दुर्दशा असल्याने प्रसंगी पाच तासही खर्च करावे लागतात. रेल्वे मार्ग आहे, पण तो एकेरी; त्यामुळे अगदी लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ाही वेळेवर पोहोचण्याची शक्यता नसतेच. संपूर्ण प्रवासात दुतर्फा हिरवीकंच शेते डोळे निववतात. गहू, भात, मसूर, बटाटे, भाज्या आणि काही ठिकाणी ऊस ही मुख्य लागवड! मधून मधून जी खेडी लागतात त्यात बहुसंख्य शेतकऱ्यांच्या परसात दोन-तीन दुभती जनावरं दगडी घंगाळासारख्या पात्रात तोंड खुपसून खाताना तरी आढळतात किंवा आळसावून निवांत बसलेली! जवळजवळ सर्वच घरांच्या अंगणात हँड पंप (आणि त्यातून पाणीही), शेणाच्या गोवऱ्यांचे निगुतीने रचलेले लिंगोरचे, बसायला खाटा आणि कानाशी सेल फोन घेऊन बसलेली माणसं असं दृश्य दिसतं. रस्त्यावरून राज्य परिवहन विभागाच्या पार रया गेलेल्या बसेस क्वचितच दिसतात. त्या मानाने खासगी बसेस भरपूर! हंगाम निवडणुकीचा असल्याने पांढऱ्या बोलेरो, स्कॉर्पिओ आणि त्याहीपेक्षा भारी गाडय़ांची सततची ये-जा! प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप गाडय़ांच्या यच्चयावत अवयवांवर लीलया उभी राहून प्रवास करणारी माणसं हेदेखील नेहमी दिसणारं दृश्य.

छोटय़ा-मोठय़ा गावांमधून जातानाही सफरचंद, संत्री आणि मुख्य म्हणजे नाशिकची द्राक्षं विकणाऱ्या हातगाडय़ा सर्वत्र दिसतात. अख्ख्या- होल बलिया जिल्ह्यात जवळपास एकही रेस्टॉरंट नाही. आहेत त्या टपऱ्या आणि तिथे मिळतो कागदी मिनी-कपातून किंवा मातीच्या पणतीपेक्षाही छोटय़ा कुल्हडमधून चहा, शिवाय तिन्ही त्रिकाळ इकडची मंडळी आवडीने खातात ती मटारची घगुनी (उसळ), नानाविध मिठाया आणि क्वचित पकौडे! भडक लाल किंवा केशरी रंगाच्या जिलब्यादेखील सर्वत्र मिळतात. आणखी एक म्हणजे द्रोणात फोडी करून पपईदेखील विकायला असते.

टपऱ्यांच्या आजूबाजूला उघडी गटारं, कचऱ्याचे ढीग, भटकी कुत्री आणि गलिच्छ पाण्याचे ओघळ हे आता बलिया ते बदलापूर; इतकं अंगवळणी पडलंय की त्याचा उल्लेख करण्याचीही गरज नाही.

अशा या परिसरात नाव घेण्याजोग्या चांगल्या शाळाही नाहीत, तिथे कॉलेजेसची काय कथा? शेती आणि भाजीपाला भरपूर असूनही अन्नप्रक्रियेच्या सुविधा नाहीत, त्यामुळे ना शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ, ना नवे रोजगार. तीच कहाणी दुग्ध व्यवसायाची. इथं जाल त्या घरी, जाल तेव्हा पुढय़ात येतं घट्ट मलईदार दही आणि त्यात गूळ अथवा साखर! दूधदुभतं मुबलक, पण दुधाचा भाव चाळीस रुपये आणि प्रक्रियेच्या सोयी शून्य.

चंद्रशेखर हे इथले नाव कमावून गेलेले मोठे राजकारणी. अल्पकाळ पंतप्रधान राहिलेल्या चंद्रशेखरांनीही बलियाच्या ताटात फारसं काहीच वाढलं नाही. ‘‘उनको भी यही न लगता था, कि बिकास करेंग तो फिर जनता हमे वोट कैसे और क्यों देगी?’’ ही एका चहा टपरी मालकाची प्रतिक्रिया बोलकी होती. ठाकूर, ब्राह्मण हे इथले मुख्य सामाजिक गट! शिवाय भूमिहार, ओबीसींचे विविध समाज आणि अनुसूचित जातींमधले विविध गट आणि अल्पसंख्य समाजही आहेतच. बलियाला खेटूनच जयप्रकाश नारायणांचं सिताब्दीआरा आहे आणि तिथूनच बिहारची हद्द सुरू होते. जेपींच्या विचारांच्या प्रभावामुळे असेल, पण आजही अनेक सु-शिक्षित आपलं आडनाव एक तर लावत नाहीत किंवा सांगायचं टाळतात.

प्रचाराच्या निमित्ताने ज्या भेटीगाठी झाल्या त्यात काही पत्रकार, शिक्षक आणि प्राध्यापकही होते. एकानं इथल्या आत्तापर्यंतच्या राजकारणावर खूप भेदक भाष्य केलं. म्हणाला, ‘‘भाई साब, यहाँ के लोगों को बिकास के सपने तो कईयोने दिखाए, मगर बिकास हुवा तो केवल और केवल ठेकेदारी का. चाहे राज सपा का हो या बसपा का, उन्ही लोगो ने टेंडर हडपे, हमेशा बिगडनेवाले रास्ते बनाए, न बिजली की किल्लत समाप्त हुवी, न गंगा के पाने में आर्सेनिक का प्रतिशत कम हुवा.’’

अशा या सगळ्या अभावग्रस्ततेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागृत केलेला विकासाचा विश्वास जनसामान्यांना आकर्षित करतोय.  हे जाणवल्याशिवाय राहत नाही की, विजेच्या टंचाईने कावलेल्या, उखडलेल्या रस्त्यांनी जेरीस आलेल्या आणि पोकळ आश्वासनांच्या वर्षांवाने निरंतर आपण फसविले गेलो आहोत या भावनेने अंतर्यामी विलक्षण हतबल झालेल्या लोकांना ही विश्वसनीयता आकर्षून घेतेय. या आकर्षणाची गती आणि टिकाऊपणा वाढतोय तो भाजपच्या संघटनात्मक रचनेमुळे.

निराशेच्या गर्तेतील नौरंगा!

बलिया जिल्ह्यातील बैरिया विधानसभा मतदारसंघात फिरताना मुख्य रस्त्याच्या उजवीकडे सतत गंगाजीची साथ असते. याच विस्तीर्ण आणि स्वच्छ, सखोल जलप्रवाहाच्या मधोमध १५ हजार लोकवस्तीचं गाव आहे नौरंगा! या गावातल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घोषित केल्याचं समजलं म्हणून साहजिकच पावलं तिकडे वळली. हमरस्त्यापासून जेमतेम पाच-सात किलोमीटर आत असलेल्या गावाला पराकोटीच्या निराशेनं घेरलं आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे गंगाजीवर नसलेला पूल आणि स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे होऊनही गावात न पोहोचलेली वीज. आजही हमरस्त्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी नीट रस्ता नाही. सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा पन्टून पद्धतीचा पूल (महाकाय पिपे जोडून वर फळ्या टाकून बांधून बनविलेला)- जो फक्त पावसाळा नसतानाच उभारला जातो- हाच या गावाला उत्तर प्रदेशाशी जोडणारा एकमेव दुवा. गावाच्या पूर्वेला बिहार आहे, पण १९६७ च्या त्रिवेदी आयोगाच्या निवाडय़ामुळे नौरंगा उत्तर प्रदेशात आहे, आणि अवस्था ‘आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना’ अशी!

गावात पीक-पाणी उत्तम, त्यामुळे तशी संपन्नता आहे. दूधदुभतंही भरपूर. पण तरुणांना काही भविष्य नसल्याची जाणीव अस्वस्थ करते. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही आणि गुरांच्या दवाखान्याला कधीचेच कुलूप. १० वीनंतर शिकण्याची सोय नाही. धट्टी-कट्टी, व्यायाम करणारी मुलं भरपूर. त्यांना सैन्यात जायचंय, पण भरतीचा कॅम्प मागणी करूनही लागत नाही. पण सर्वाधिक मोठा प्रश्न आहे तो वाहतुकीचा आणि नंतर सततचे पूर व वीज नसण्याचा. भाजपचा उमेदवार त्याच गावात जाणं-येणं असणारा; पण भाजपला मत दिलं तर सपा-बसपाच्या नाराजीची धास्ती. म्हणून मग बहिष्काराचा निर्धार.

सुमारे दोन तास गावाच्या मंदिरात तरुणांशी चर्चा करून खासदार या नात्याने मीही प्रयत्न करू शकतो याबद्दलचा विश्वास निर्माण झाला, तेव्हा कुठे बहिष्कार मागे घेतला गेला.

नौरंगाहून परतताना अलाहाबादच्या गोविंद वल्लभपंत सामाजिक विज्ञान संस्थेतले प्राध्यापक आणि विचारवंत बद्री नारायण यांचा ‘हिंदुस्तान’मधला एक लेख वाचत होतो. लेखात त्यांनी म्हटलंय, ‘‘(बदलत्या वातावरणात) सरकार आणि लोकशाहीकडून लोकांच्या अपेक्षा निरंतर वाढतायत, या दोन्हीवर समाजाची अवलंबितताही वाढतेय आणि भारतीय लोकशाही व त्यात निवडून आलेली सरकारे या अपेक्षांची पूर्तता कशी करणार, हा प्रश्नही जटिल होत चाललाय!’’

चांगली गोष्ट अशी की, भाजपला आणि पंतप्रधानांना या अपेक्षांच्या ओझ्याची जाणीव आहे; अगदी लख्ख!

 

विनय सहस्रबुद्धे

vinays57@gmail.com