12 December 2017

News Flash

दुर्गसाहित्याचे बुरूज

महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश. या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले किल्ले अन्यत्र कुठेही नाहीत.

अभिजित बेल्हेकर - abhijit.belhekar@expressindia.com | Updated: January 25, 2013 1:09 AM

महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश. या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले किल्ले अन्यत्र कुठेही नाहीत. इतिहास, भूगोल, पर्यटन, संस्कृती, कला आणि संरक्षण अशा किती तरी अंगांनी या किल्ल्यांचे आजच्याही तरुणाईशी नाते जुळलेले आहे. या दुर्गावरच गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दर वर्षांआड ‘दुर्गसाहित्य संमेलन’ भरवले जाते. यंदाचे हे संमेलन २५ ते २७ जानेवारी रोजी  विजयदुर्गवर होत आहे. त्यानिमित्ताने आद्य, दुर्मीळ दुर्गसाहित्याचा हा आढावा..
‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग! ..गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण..!
छत्रपती शिवरायांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ या अद्वितीय ग्रंथातील ‘दुर्ग’विषयक प्रकरणातील हा उतारा! शिवकालीन दुर्गाविषयीचे हे आद्य साहित्य! २५ जानेवारीपासून विजयदुर्ग येथे तिसऱ्या दुर्ग साहित्य संमेलनास सुरुवात होत आहे. या निमित्ताने या विषयाचा शोध घेताना अगदी सतराव्या शतकातील या समकालीन ग्रंथापासूनच उत्खनन सुरू होते.
दुर्ग आणि महाराष्ट्राचे नाते सर्वश्रुत आहे. सहय़ाद्रीच्या रांगांनी या महाराष्ट्राला अगोदर दुर्गमता बहाल केली आणि मग या दुर्गम कडय़ा-कपारींवरच आमच्या दुर्गाची शेलापागोटी चढली. कधी सातवाहनांपासून इथल्या डोंगरांवर ही दुर्गसंस्कृती रुजली. पुढे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या झंझावातात तर या गडकोटांना जिवंत किल्लेदाराचे रूप आले. एकूणच महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलात या दुर्गाची मोठी भूमिका राहिली. यामुळे इथल्या मराठी माणसाच्या मनातही त्यांच्याविषयी आदराची-प्रेमाची भावना आहे. या भावनेतूनच कित्येक दशकांपासून एखाद्या पवित्र मंदिरी जावे त्याप्रमाणे ही मराठी पावले या धारातीर्थावर भटकत आहेत. दुर्गाविषयीच्या या आदरातून आधी त्याचे भ्रमण आणि नंतर दुर्गसाहित्य तयार होऊ लागले. या अशाच दुर्गसाहित्याचा हा सोहळा!
दुर्गसाहित्याच्या पहिल्या पर्वाचा मागोवा घेतला तर अगदी सुरुवातीला इंग्रजांच्या काळात आणि इंग्रजांकरवी काही लेखन झाले आहे. सन १८६० मध्ये इंग्रजांनी तयार केलेल्या ‘गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हिल फोर्ट्स’ या पुस्तकात कराची ते धारवाडपर्यंतच्या ४८५ किल्ल्यांची माहिती आली आहे. यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील २८९ किल्ल्यांचा समावेश आहे. सिडने टॉय या विदेशी लेखकाने लिहिलेली ‘अ हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन’ आणि ‘द फोर्टिफाईड सिटी ऑफ इंडिया’ ही पुस्तकेही महाराष्ट्रातील आणि त्यातही शिवकालीन किल्ल्यांविषयी बोलतात. दुर्मीळ नकाशे, छायाचित्रे आणि माहितीने ही दोन्ही पुस्तके भरलेली आहेत. परंतु किल्लेविषयक आद्य साहित्यात मैलाचा दगड ठरतात ते या इंग्रजांनीच १८८५-८६ मध्ये लिहिलेली ‘जिल्हा गॅझेटिअर’! एकेका जिल्हय़ाची सविस्तर माहिती देणाऱ्या या ग्रंथांमध्ये आपल्या किल्ल्यांविषयीही बरीच माहिती मिळते.  
ब्रिटिशांकडून आमच्या किल्ल्यांवर हे असे साहित्य तयार होत असतानाच विसाव्या शतकाच्या सुरुवातीस चिंतामण गंगाधर गोगटे या एका मराठी माणसाने प्रथमच ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ हे पुस्तक दोन भागांत लिहिले. शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकातील वर्णने आज अचंबित करतात. यातील गडांना त्यांचे लाकडी दरवाजे शाबूत आहेत. तट-बुरूज ताठ मानेने उभे आहेत. सदर किंवा किल्लेदाराच्या वाडय़ावर अद्याप राबता सुरू होता. त्यामुळे आज ही माहिती वाचताना मजेशीर वाटते.
याच काळात अनेक संशोधकांनीही या गडांची वाट पकडली. यातूनच य. न. केळकर यांचे ‘चित्रमय शिवाजी’ (१९३५), कृ. वा. पुरंदरे यांचे ‘किल्ले पुरंदर’ (१९४०), शिवराम महादेव परांजपे यांचे ‘मराठय़ांच्या लढायांचा इतिहास’ (१९३४), ग. ह. खरे यांचे ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ अशी इतिहासाने भारलेली पुस्तके जन्माला आली. ‘चित्रमय शिवाजी’तील दुर्मीळ छायाचित्रे पाहिली, की आज थक्क व्हायला होते. ‘किल्ले पुरंदर’मधील तपशील वाचला की आपल्या इतिहासाबरोबरच भूगोलही किती बदलला हे समजते. ‘मराठय़ांच्या लढायांचा इतिहास’मधील माहिती आणि नकाशे तर धामधुमीचा सारा काळच उभा करतात. ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ हे पुस्तक तर एखादा संशोधन ग्रंथच म्हणावा अशा धाटणीचे आहे.
कधी १८९६ मध्ये गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर यांनी लिहिलेले ‘रायगडाची माहिती’ हे पुस्तक तत्कालीन गडाची माहिती सांगते. याची किंमत आहे केवळ अर्धा आणा! यानंतर १९२४ मध्ये गोविंदराव बाबाजी जोशी यांचे ‘रायगड किल्ल्याचे वर्णन’, १९२९ साली विष्णू वासुदेव जोशी यांचे ‘राजधानी रायगड’, शां. वि. आवळसकर यांचे ‘रायगडची जीवनकथा’ अशी किती पुस्तके घ्यावीत आणि त्यातील दुर्मीळ-मौलिक साहित्यावर चर्चा करावी. शे-पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकांवरच आजची दुर्ग साहित्याची विस्तृत-विशाल पंरपरा उभी राहिली आहे.
स्वातंत्र्यानंतर या दुर्गसाहित्याला संशोधन आणि व्यासंगाची जोड मिळाली. स. आ. जोगळेकर यांच्या सहय़ाद्री या पुस्तकाची दखल यासाठी स्वतंत्ररीत्याच घ्यावी लागेल. जोगळेकरांनी या पुस्तकामध्ये सहय़ाद्रीतील फक्त किल्लेच नाही तर अवघे सहय़ाद्री मंडळच आपल्यापुढे मांडले आहे. हे पुस्तक वाचल्याशिवाय खरे तर सहय़ाद्रीत फिरू नये. जे. एन. कमलापूर यांचे ‘द डेक्कन फोर्ट्स’ हे पुस्तक याच काळात आले. इंग्रजीतील या पुस्तकात शिवकाळातील ११७ किल्ल्यांची माहिती, नकाशे आणि रेखाचित्रे असा मोठा ऐवज दडलेला आहे. पुढे पं. महादेवशास्त्री जोशी यांचे ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ हे पुस्तक एक साहित्यकृती बनूनच आपल्यापुढे आले. त्यांच्या संवेदनशील लेखणीतून शिवरायांच्या दुर्गाच्या एका वेगळय़ाच वैभवाचे दर्शन घडते.
स्वातंत्र्यानंतरच्या याच काळात मराठी साहित्य क्षेत्रात एक नाव आपल्या लेखणीने सर्वदूर गाजत होते, ते म्हणजे गोपाल नीलकंठ दांडेकर! उत्तम भाषा, संवादी शैली आणि त्याहीपेक्षा या साऱ्यापाठी एक संवेदनशील-निष्पाप मन, यामुळे ‘गोनीदा’ एक साहित्यिक म्हणून मराठी मनावर अधिराज्य करतच होते. अशा या साहित्यिकाचे पाय आणि डोळे शिवरायांच्या या गडकोटांकडे कधी वळले हे बहुधा त्यांनाही ठाऊक नसावे. रायगड, राजगड, राजमाची असे एकेका गडावर ते शेकडो वेळा गेले आणि महिनोन्महिने राहिले. काही लोक त्यांना गमतीने म्हणायचे, ‘गो. नी. दांडेकर मुक्काम राजगड तिथे नच आढळले तर कदाचित तळेगावी सापडतील.’ असे किल्ल्यांशी अद्वैत झालेल्या या दुर्गपुरुषाचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील दुर्गप्रेम, अभ्यास आणि दुर्गवारी सुरूच होऊ शकत नाही. किल्ले, दुर्गदर्शन, दुर्गभ्रमणगाथा, शिवतीर्थ रायगड अशी त्यांची किती तरी पुस्तके एकाहून एक आहेत. या पुस्तकातील कुठलेही प्रकरण, पान वाचायला घ्यावे आणि थेट त्या गडावर पोहोचावे इतकी ती या दुर्गप्रेमाने ओथंबलेली-भारावलेली आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे नावही असेच, दुर्गसाहित्याच्या पहिल्या माळेतील! परंतु बाबासाहेबांचा कल दुर्गवर्णनापेक्षा त्याच्या इतिहासकथनाकडे जास्त! त्यांची जवळपास सर्व पुस्तके या शिवप्रेमाने ओथंबलेली आहेत. यामध्येही त्यांचे ‘महाराज’ हे पुस्तक तर महाराजांचा हा सारा मुलूख आणि त्यातील किल्ले फिरवून आणते. शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड, चाकण, पुरंदर, सिंधुदुर्ग, जंजिरा, सिंहगड आणि रायगड अशी स्वराज्यातील ही दुर्गरत्ने त्यांच्या अंगाखांद्यावर घडलेला इतिहास सांगत पुढे येतात. या गडांची सुंदर छायाचित्रे, ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांनी काढलेली सर्जनशील चित्रे आणि शिवशाहिरांची ओघवती लेखणी, या साऱ्यांनी हे पुस्तक जिवंत झाले आहे. यातील एकेका प्रकरणाची शीर्षके जरी वाचली तरी भारावून जायला होते..‘आहे शिवनेरी जागा, जरी झाली मध्यानरात! येतो हुंकार ऐकाया शिवाईच्या गाभाऱ्यात!’, ‘वाजले शिंग, चढे बाशिंग! तोरणा रणनवरा सजला!’, ‘असे फाकडा, थाट रांगडा, राजगडाचा मर्दानी!’ किंवा ‘पाझरती या चिऱ्यांचिऱ्यांतुनि रायगडाची सुखदु:खे! मुठीत या दिसतील चिऱ्यांच्या, इतिहासाची वाघनखे!’.. गडांवर प्रेम करणाऱ्या, त्यांवर फिरणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे-पाहावे, असेच आहे.
इतिहासाबरोबरच भूगोल, निसर्ग, पर्यावरण, स्थापत्य, पुरातत्त्व, खगोलशास्त्र, गिर्यारोहण, पर्यटन, विविध कला, साहित्य, समाजजीवन असे असंख्य विषय तिने कवेत घेतले आहेत. अभ्यासक-भटक्यांपासून ते लेखकापर्यंत अशी एक मोठी साखळी तयार झाली आहे. अभ्यास आणि उपक्रम यांना दुर्गसाहित्याच्या धाग्याने जोडण्याचे काम ‘दुर्ग साहित्य संमेलन’ चळवळीतून साधले जात आहे.

First Published on January 25, 2013 1:09 am

Web Title: fort bibliography
टॅग Fort