17 December 2017

News Flash

कन्या सासुऱ्यासी जाये। मागे परतोनि पाहे।।

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे शुक्रवारचे चौथे पुष्प. आजच्या या स्वरसोहळ्याची सुरुवात पल्लवी पोटे यांच्या

शशिकांत चिंचोरे, वेणु विशारद | Updated: December 15, 2012 1:44 AM

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे शुक्रवारचे चौथे पुष्प. आजच्या या स्वरसोहळ्याची सुरुवात पल्लवी पोटे यांच्या गायनाने झाली. पल्लवी यांनी आपली गायन कला मधुसूदन भावे, माधुरी ओक, तसेच अलका देव मारुलकर या गुरुत्रयींकडून प्राप्त केली.
‘मुलतानी’ या रागाने आपल्या गायनाची सुरुवात ‘झुमरा’ तालामध्ये अतिशय आकर्षक पद्धतीने त्यांनी सादर केली. स्व. विष्णू दिगंबर पलुस्करजी आपल्या शिष्यांना उपदेश करीत- बंदिश ही ३०० वेळा घोटा, चांगली पाठ होईल; ५०० वेळा घोटा, मरेपर्यंत स्मरणात राहील; १०००वेळा घोटा, या बंदिशीला सोन्याची  झळाळी प्राप्त होईल. आलाप, ताना, बोलबाट  हे काहीही नको. फक्त बंदिश-स्थायी अंतरा.
सांगावयास आनंद वाटतो, पल्लवी यांनी ही झळाळी ‘मुलतानी’ च्या बंदिशीला दिली आहे हे त्यांच्या सफाईदार मांडणीवरून दिसून येते.
स्वरस्य कंपो गम, श्रोतुचित्त सुखावह।। या सिद्धांतानुसार त्यांचे गमकाचे अनंत प्रकार श्रोत्यांच्या चित्ताला सुख देत होते. त्यांच्या गमकामध्यचे ‘कुरुल’ हा प्रकार मेग, धप्, निध् सों, तार षड्जवर किंचित थांबून पुन्हा षड्जपासून याच पद्धतीने अवरोही िमड घेणे हे अतिशय सुरेख जमले. याखेरीज खटक्याच्या, मुरकीच्या ताना सर्वकाही सौंदर्यपूर्ण नजरेमधून सादर केल्या. यानंतर ‘मोरे मंदीर’ ही द्रुत त्रितालातील बंदिश सादर केली. शेवटी ‘देस’ रागामधील ‘प्रियाकर वन  देखो’ ही एकतालात सादर केली. ‘बसंत की बहर आया’ हे ‘मंदारमाला’ नाटकामधील पद सुंदर रंगविले. स्वरसंवादिनीमधून बंदिश, गीत, नाटय़गीतामधील शब्द श्रोत्यांना स्पष्ट ऐकू येणे हे त्या वादकाचे खरे यश असते. सुधीर नायक हे त्या कसाला निश्चितच उतरले आहेत. तबल्यावर मिलिंद पोटे यांनी अतिशय धीराने साथ म्हणजे साथच केली. तबलावादकाने साथ करताना गायन मनापासून ऐकावे,म्हणजे त्या त्या वेळच्या आलाप, तानेला पोषक, उचित साथ करून गायनाचे सौंदर्य वाढते. यासाठी उदार दृष्टिकोन, दिलदार मन,खिलाडू वृत्ती असावी लागते. अशी वृत्ती मिलिंद पोटे यांच्याकडे आहे. म्हणूनच अतिशय संयमी, आश्वासक साथ त्यांनी केली आहे, हे इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. श्रुतीवर सोनम आणि तनुजा डांगे यांनी उत्तम साथ केली. प्रचंड टाळ्यांच्या वर्षांवाने श्रीमती पोटे यांनी आपले गायन संपविले.
दुसरे कलाकार पं. पद्मभूषण, पद्मविभूषण हरिप्रसाद चौरासिया यांचे वेणूवादन, ज्याची श्रोते अत्यंत उत्कंठतेने वाट पाहात होते. त्यांचे स्वरमंचावर आगमन झाले. ‘बासरी’ या वाद्याबाबत  थोडेसे लिहितो.
बासरी हे भगवान श्रीकृष्णाचे वाद्य. या वाद्याचा जन्म किमान पाच हजार वर्षांपूर्वीचा. निसर्गाने मानवाला दिलेले हे वाद्य आहे. वेणूच्या बनात बांबूच्या झाडाला किडे भोके पाडीत. वारा या छिद्रांना छेदून जाई आणि एक जोरकस स्वर ऐकू येई. तो हा वेणूचा पहिला रव. विविध, असंख्य बांबूंमधून वारा जिकडे वाही तिकडे हा वेणू रव, असे हे ‘रांगडे गीत’ पाव्यामधून घुमत असे; जणू वेणूंचे सामूहिक संगीत संमेलन २४ तास चालते असे.
मग पुढे बांबूचा तुकडा घेऊन छिद्रांची संख्या मानवाने गरजेनुसार वाढवत नेली आणि बासरी जन्माला आली. हे वाद्य सर्व वाद्यांचे ‘मातृवाद्य’ म्हटल्यास वावगे ठरू नये. भगवान श्रीकृष्ण वेणुबनात, मधुबनात गाईंच्या गुरांच्या कळपामध्ये उभा राहून वेणुवादन करीत असे. त्याच्या अंगावरच्या फुलांचा वास आणि बासरीचा स्वर यांनी भुंगे आकर्षित होत. भगवान  कृष्णाच्या शरीराभोवती पिंगा घालत आणि गुंजारव सुरु होई. हा गुंजारव हाच जैव तंबोरा मानून त्यामधील मिळेल त्या आधार स्वराला पकडून हे अमर आणि दीव्य वेणुवादन चाले आणि सर्वत्र शांतीचे साम्राज्य  पसरे.तर असे हे देखणे, साधे वाद्य उभ्या आयुष्यात कधीच वाजविले नाही, असा मनुष्य प्राणी सापडणार नाही. म्हणूनच बासरी हे आपले ‘राष्ट्रीय वाद्य’ आहे, हे इथे नमूद करावेसे वाटते.
स्व. पन्नालाल घोष यांनी या वाद्यास ऊर्जितावस्था दिली. बासरीची लांबी वाढवली. प्रचंड लोकप्रियता या बासरीला त्यांनी मिळवून  दिली. आज ही बासरी दिमाखाने देश-विदेशात अनेक मैफली गाजवते. त्याचे श्रेय स्व. पन्नालाल घोषांना जाते. पं. केशव गिंडे यांसारखे महान कलाकार या बासरीच्या संशोधनासाठी विकास, प्रचार, प्रसारासाठी आपले सकल आयुष्य पणाला लावत आहेत.
पं. हरिप्रसादजींचा बासरीचा स्वर तर वर्णनातीत आहे. संपूर्ण आयुष्यभर बासरीबरोबर जगलेले प्रतिभावंत असे हे कलाकार आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णाची ही बासरी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. अनेक चित्रपटांना संगीत दिले.
पंडितजींनी ‘मधुवंती’ राग सादरीकरणासाठी निवडला. आलाप, जोड, झाला या वादनपद्धतीनुसार त्यांनी या रागाचा विस्तार केला. आलापी अतिशय नजाकतीची होती. रागाचे सारे पदर दाखविल्यानंतर ‘रुपक’ तालामधील गत, विविध लयकारी, तंतकारी, गमक अंगाने वेगवान ताना घेऊन संपविली.
याच पद्धतीने राग ‘भूप’ सादर केला. यामध्ये पं. विजय घाटे यांचा तबल्याबरोबरचा सवाल- जबाब विक्रमी टाळ्या घेऊन गेला.  सुनील अवचट यांनी सुरेख वेणुसाथ केली.
शेवटी ‘मिश्र पहाडी’ धून अतिशय गोडवा प्रसृत करून आपले वेणुवादन पंडितजींनी थांबविले.वेणुचा प्रसन्न स्वर शामियान्यात विरल्यानंतर पं. आनंद भाटे तथा आनंद गंधर्व यांचे स्वरमंचावर आगमन झाले. सुरुवातीला त्यांनी ‘पुरिया कल्याण’ रागातील ‘आज सोबना’ ही बंदिश विलंबित एकतालात सादरीकरणासाठी घेतली.
मालिनी राजूरकर या ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका यांचे शेवटी गायन झाले. सर्वप्रथम ‘बिहाग’ हा राग सादरीकरणासाठी घेतला. दोन मध्यम असलेला हा राग आहे. मालिनीताईंच्या आवाजात एक प्रकारचा नैसर्गिक कंप आहे. त्यामुळे फिरकीच्या तानात इतकी सफाई आहे की पहिल्या एक-दोन आवर्तनातच हा राग उभा राहतो. कुठेही घाई नाही, गडबड नाही.  बिलंबित गायनामध्ये असो, भाषणामध्ये असो, ‘पॉझ’ला खूप महत्त्व आहे. हा ज्याला समजला, उमगला त्याला त्याची कला भरपूर काही देणारच. ती कला जगभर गाजणारच. विदुषी मालिनीताईंची हीच पद्धत आहे.  नुकताच गायिलेला आलाप काहीतरी परिणाम करत असतो; स्वतवर आणि श्रोत्यांवरपण. तो अनुभवायचा पॉझ घेऊन. मग गायन हे रंगणारच. गायन संपूच नये असे वाटते. पण ते संपते. शामियाना सोडताना सारखे मागे वळून वळून मालिनीताईंकडे श्रोते पाहतात. संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार ‘कन्या सासुऱ्यासी जाये। मागे परतोनि पाहे।। अशी अवस्था होते. असे भावबंधन मालिनीताईंशी श्रोत्यांचे झाले आहे.

First Published on December 15, 2012 1:44 am

Web Title: fourth day of sawai gandharva bhimsen festival