|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

रॉसिग्नॉलच्या ‘त्या’ बॉसला १९१८ साली नोबेल पारितोषक मिळाले. पुढे आपले देशप्रेम सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली. जर्मनीकडे दारुगोळ्याचा तुटवडा होता. रासायनिक तंत्रज्ञान वापरून त्याने ही तूट भरून काढली.  काहीही करून हे युद्ध जर्मनीने  जिंकलेच पाहिजे हा त्याचा ध्यास होता.‘शांततेच्या काळात वैज्ञानिक सर्व जगाचा असतो; युद्धकाळात फक्त आपल्या देशाचा’ हे त्याचे वाक्य विख्यात झाले. मात्र त्याच्या प्रयोगाने युद्धात हजारो लोकांना तडफडत जीव गमवावा लागला. नंतर त्याच्याही वाटय़ाला आली ती फक्त वणवण. फ्रिट्झ हेबर हे त्या वैज्ञानिकाचे नाव. त्याविषयी..

२२ एप्रिल १९१५. काळ मोठय़ा धामधुमीचा, पहिल्या महायुद्धाचा. बेल्जियन सीमेवरील इप्रे हे छोटेखानी शहर समग्र विध्वंसाच्या उंबरठय़ावर उभे आहे. हिरवीगार शेते व त्यातून खेळणारे पाणी, सारे काही  वाहत्या रक्ताने लालेलाल झाले आहे. दोस्तसेनेतील शेकडो सनिकांचे अर्धतुटके मृतदेह इतस्तत:  विखुरले आहेत. जर्मनांचा मारा इतका भीषण आहे की, त्यांचे दफन करायलाही दोस्तसेनेला सवड नाही. मृतदेहांचे लचके तोडणाऱ्या उंदीरघुशींच्या कल्लोळात पाय रोवून सनिक उभे आहेत. कारण इप्रेचा पाडाव झाला तर बेल्जियममधून जर्मन सन्य सरळ फ्रान्समध्ये घुसू शकेल. परिस्थिती दोन्ही बाजूंनी खूप बिकट आहे. तोफांचा भडिमार, दारूगोळ्याचा वर्षांव, प्रचंड जीवितहानी होऊनही कोणाचीच सरशी होत नाहीये. सीमेच्या दुसऱ्या बाजूला जर्मन सेनेची अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. काहीही करून प्रेतांच्या चिखलात पाय रोवून उभी असलेली दोस्तसेना आडवी केली पाहिजे, यावर सर्वाचे एकमत आहे. पण ते कसे करायचे याचा निर्णय अद्याप होत नाहीये.

अखेरीस इतर सर्वाचा विरोध मोडीत काढून, एका अभिनव युद्धतंत्राचा आग्रह धरणाऱ्या एका अवलियाच्या रणनीतीला सेनाधिकारी मंजुरी देतात. इप्रेच्या विरुद्ध बाजूच्या जर्मन सीमेवर हा अवलिया आता उभा आहे. बुटका, चष्मा लावणारा, पोट सुटलेला ‘तो’ लष्करी अधिकारी नाही, हे स्पष्ट आहे. त्याच्या समोर ६,००० लोखंडी टाक्या ओळीने मांडल्या आहेत. संध्याकाळचे ६.०० वाजतात. हवेतला गारठा वाढतो. आता जर्मन सीमेकडून बेल्जियम  सीमेकडे वारा जोराने वाहू लागला आहे. ‘त्या’ची अस्वस्थता वाढते. त्याने  इशारा करताच तोफखाना थंडावतो. पलीकडच्या बाजूची दोस्तसेना सुटकेचा श्वास घेते. पण तेव्हाच टाक्यांच्या झडपा उघडल्या जातात आणि १५ फूट उंचीची पोपटी रंगाच्या धुक्याची एक लाट वाऱ्यासोबत जर्मन सीमेवरून समोर झेपावते. तिचा स्पर्श होताच झाडावरील पानांचा रंग पालटून ती निष्प्राण होतात. हवेत उडणारे पक्षी क्षणार्धात खाली कोसळतात. सुटकेचा नि:श्वास टाकणाऱ्या दोस्त सनिकांचा श्वास छातीतच अडकतो. लालभडक वेदनेच्या असंख्य इंगळ्या त्यांच्या फुप्फुसाला डसतात. त्यांचा जीव घाबराघुबरा होतो. पोपटी रंगाच्या त्या वायूने आता त्यांना सर्व बाजूंनी वेढलेले आहे. त्यांच्या फुप्फुसात पू आणि कफ दाटून येतो. तोंडातून चिकट द्रव पडतो, पाठोपाठ रक्तही. जीवाच्या आकांताने ते धावत सुटतात. बघता बघता ५,००० सनिक इतस्तत: मरून पडलेले दिसतात. ‘ऑपरेशन र्निजतुकीकरण’ यशस्वीरीत्या पार पडले, म्हणून ‘तो’ समाधानाने हसतो. ‘तो’ – रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्झ हेबर.

हवेतून अन्न

सन १९०६. जर्मनीच्या कार्लशृह विद्यापीठाच्या भौतिक-रासायनिक प्रयोगशाळेत दोघे जण श्वास रोखून उभे आहेत. गेली अनेक वर्षे खपून त्यांनी जे प्रचंड रासायनिक संयंत्र बनविले, शेकडो अडचणींवर मात करून, तापमान व दबाव ह्य़ांचे संतुलन साधत एक सांगायला अतिशय सोपी, पण घडवून आणण्यास अतिमुश्कील रासायनिक प्रक्रिया आजमावली, तिची आज अंतिम चाचणी आहे. एका लोखंडी टाकीत हवा सोडून त्यातच त्यांनी हायड्रोजन वायू मिसळला. अतिशय उच्च तापमान आणि दबावामुळे हवेतील नायट्रोजन वायूच्या रेणूंचे परस्परांना जोडणारे अतिशय मजबूत रासायनिक बंध तुटले. नायट्रोजनचा एक अणू हायड्रोजनच्या तीन अणूंशी जोडला जाऊन अमोनिया वायू तयार झाला व उच्च दबावामुळे त्याचे द्रवात रूपांतर झाले. थेंब थेंब करीत तब्बल १२५ मिलिलिटर द्रव अमोनिया संयंत्राच्या तळाला जमा झाला. जगात कोणालाही न साधलेली, जगाच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी ही रासायनिक प्रक्रिया यशस्वी होताना पाहून दोघेही थक्क व कृतकृत्य झाले. या अमोनियाचे रूपांतर नायट्रिक अ‍ॅसिडमध्ये व त्यातून नायट्रेटमध्ये करणे सोपे आहे. नायट्रेट – जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी अतिशय आवश्यक असणारा  घटक. प्रयोगशाळेच्या पातळीवरील हे तंत्रज्ञान औद्योगिक पातळीवर नेता आले, तर रासायनिक खतांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होईल. उपलब्ध जमिनीत अनेक पट उत्पादन घेता येईल. देशातील व जगातील अन्नधान्याची कमतरता संपुष्टात येईल.. रॉबर्ट ले रॉसिग्नॉल आणि त्याचा बॉस यांचे हे पोकळ स्वप्नरंजन नव्हते. त्यानंतर लौकरच कार्ल बॉशने हे तंत्रज्ञान औद्योगिक पातळीवर नेले. आजही दरवर्षी ५० कोटी टनांहून अधिक रासायनिक खते याच तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली जातात. मानवजातीवर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या शोधांमध्ये या प्रक्रियेची गणना होते. रॉसिग्नॉलच्या ‘त्या’ बॉसला १९१८ साली या शोधाबद्दल नोबेल पारितोषक मिळाले. हवेतून अन्न निर्मिणाऱ्या त्या जादूगाराचे नाव होते फ्रिट्झ हेबर.

संपन्न जीवन आणि वेदनादायी मृत्यू – दोन्ही हवेतून निर्माण करणाऱ्या फ्रिट्झ हेबरचा जन्म तत्कालीन जर्मनीचा भाग असलेल्या प्रशियात (आजचे पोलंड) १८६८ साली एका ज्यू कुटुंबात झाला. वडिलांशी त्याचे कधी पटले नाही. आई तर तो तान्हा असतानाच वारलेली. लहानशा शहरात वाढलेल्या फ्रिट्झची स्वप्ने मात्र फार मोठी होती. ‘मी आधी जर्मन आहे, मग ज्यू’ असे तो म्हणत असे. आपल्या पितृभूमीचे एकीकरण घडवून आणणाऱ्या कैसर विल्यमबद्दल त्याला आत्यंतिक आदर होता. या ‘नव्या जर्मनीत’ ज्यूंसह प्रत्येकाला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे आणि माझ्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून मी माझे व माझ्या देशाचे नाव जगभरात उंचावेन असे त्याचे स्वप्न होते. राष्ट्रभक्तीपुढे त्याला नातीगोती, मत्री-प्रेम, मानवता वगरे बाबी तुच्छ वाटत. वयाच्या तेविसाव्या वर्षी रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. कार्बनी रसायनशास्त्र आणि भौतिकी रसायनशास्त्र ह्य़ांच्यातील अनेक उपशाखांमध्ये त्याने संशोधन केले. १९०६ साली कार्लशृह विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात त्याला प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. तिथेच त्याने हवेपासून अमोनिया बनविण्याचे तंत्र शोधले. दरम्यानच्या काळात त्याने ज्यू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्मातील प्रॉटेस्टन्ट संप्रदायातील ल्यूथरवादी  पंथाचा स्वीकार केला होता. त्यामागे शैक्षणिक करिअरमध्ये किंवा सन्यात वरचे पद मिळण्याची आशा होती.

विरलेले नाते

ऐन विशीत त्याची भेट क्लारा इमरवर या बुद्धिमान ज्यू मुलीशी झाली. जर्मन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविणारी ही पहिलीच स्त्री. दोघेही बुद्धिमान, क्षेत्रही एकच- रसायनशास्त्र. फ्रिट्झभोवती अल्बर्ट आईनस्टाईन, जेम्स फ्रँक आणि लीझ मेटमर यांसारख्या प्रज्ञावंत मित्रांची मांदियाळी. आपल्याही वाटय़ाला असे समृद्ध बौद्धिक आयुष्य येईल या आशेने क्लाराने फ्रिट्झच्या लग्नाच्या प्रस्तावाला रुकार दिला. परंतु लग्नानंतर ती मुले, संसार, प-पाहुणे ह्य़ात पार गुरफटून गेली. आपले संशोधन, नवनवी स्वप्ने यात हरवलेल्या फ्रिट्झने क्लाराची मानसिक कुचंबणा समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. दोघांमधील मानसिक-वैचारिक अंतर वाढत गेले. अमोनियानिर्मितीच्या शोधानंतर  फ्रिट्झचा लौकिक जगभर पसरला. बर्लिन येथील प्रख्यात विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यावर त्याची प्रतिष्ठा आणि अहंकार – दोन्ही गोष्टी वाढीला लागल्या.

तेवढय़ात महायुद्ध आले. राष्ट्रभक्त फ्रिट्झला आपले देशप्रेम सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली. जर्मनीकडे दारूगोळ्याचा तुटवडा होता. रासायनिक तंत्रज्ञान वापरून त्याने ही तूट भरून काढली. केवळ त्याच्या तंत्रज्ञानाच्या भरवशावर जर्मनी हे युद्ध तीन वर्षे लांबवू शकली. काहीही करून हे युद्ध जर्मनीने जिंकलेच पाहिजे हा हेबरचा ध्यास होता. ‘शांततेच्या काळात वैज्ञानिक सर्व जगाचा असतो; युद्धकाळात फक्त आपल्या देशाचा’ हे त्याचे वाक्य विख्यात झाले. हेग कराराद्वारे रासायनिक शस्त्रांवर बंदी घातलेली असली, तरी युद्ध जिंकण्यासाठी पहिला हल्ला आपण केला पाहिजे (कारण दोस्त राष्ट्रेही ह्य़ा दिशेने संशोधन करीत आहेत, हे उघड गुपित होते), हा त्याचा आग्रह होता. अमोनियामिश्रित क्लोरिनचा त्यासाठी वापर करणे, ही त्याचीच कल्पना.

फ्रिट्झच्या पुरुषी अहंकाराशी सामना देऊन थकलेल्या क्लाराला त्याचे हे रूप मात्र असह्य़ झाले होते. ती केवळ वैज्ञानिक नव्हती, तर प्रखर शांततावादी होती. विज्ञानाच्या संहारक भूमिकेला तिचा ठाम विरोध होता. या प्रश्नावर तिची  नवऱ्याशी सातत्याने खडाजंगी होऊ लागली. दोघांमधील बेबनाव शिगेला पोहचला.

दि. १ मे १९१५. इप्रेच्या ‘कामगिरी’बद्दल फ्रिट्झला कॅप्टन म्हणून बढती देण्यात आली. तो आनंद साजरा करण्यासाठी घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले. आता मात्र क्लाराला राहावले नाही. आनंद आणि अहंकाराच्या शिखरावर असणाऱ्या फ्रिट्झला तिने फैलावर घेतले – ‘‘तू कसला शास्त्रज्ञ? तू तर माणसांची कत्तल करणारा सतान आहेस,’’ ती म्हणाली. ‘‘आणि तू? तू तर देशद्रोही आहेस,’’ त्याने प्रत्युत्तर दिले. क्लाराला हा आघात सहन झाला नाही. त्या रात्री तिने फ्रिट्झच्या सव्‍‌र्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला – हर्मनला तिच्या मृतदेहापाशी सोडून राष्ट्रभक्त, कर्तव्यदक्ष फ्रिट्झ दुसऱ्याच दिवशी युद्धभूमीवर रवाना झाला.

 लोपलेली जादू, बदललेले दिवस

पण रासायनिक शस्त्रांचा वापर करूनही जर्मनीला युद्धात सरशी मिळविता आली नाही. त्यानंतर दोस्तसेनेनेही त्यांचा मुक्तपणे वापर केला. युद्ध संपले तेव्हा दोन्हीकडचे मिळून १,००,००० सनिक रासायनिक युद्धात ठार झाले होते आणि १०,००,००० जायबंदी झाले होते. हेबरच्या शोधामुळे लांबलेले युद्ध जेव्हा संपले, तेव्हा जर्मनीचा त्यात अपमानास्पद पराभव झाला होता. ती जखम उरात घेऊन जर्मनीच्या पुनरुत्थानासाठी हेबर पुन्हा कामाला लागला. या वेळी त्याचे स्वप्न होते समुद्राच्या पाण्यापासून सोने निर्मिण्याचे. पण पाच वर्षे अथक प्रयत्न करूनही त्याला यश मिळाले नाही. जादूगाराची जादू काम करेनाशी झाली होती काय, नकळे!

सभोवतालची परिस्थितीही झपाटय़ाने बदलत होती. फ्रिट्झने दुसरे लग्न केले. तेही अयशस्वी झाले. जर्मनीच्या पुनरुत्थानाचे स्वप्न घेऊन १९३३ साली हिटलर जर्मनीचा सर्वसत्ताधीश झाला. पण त्याच्या जर्मनीत ज्यूंना स्थान नव्हते. त्याने सर्व संस्थांमधील ज्यूंना हटविण्याचा आदेश काढला. फ्रिट्झ आता ज्यू नव्हता, पण त्याच्या संशोधन संस्थेतील बरेच वैज्ञानिक ज्यू होते. त्यांना काढण्यासाठी त्याच्यावर दबाव आला. ते सारे अतिशय कुशल आणि राष्ट्रभक्त आहेत, हे त्याचे म्हणणे कोणी ऐकले नाही. त्याला आदेशाचे पालन करावे लागले. त्याची देशातील प्रतिष्ठा आणि जगभरातील वैज्ञानिकांमध्ये असणारी पत ह्य़ांचा उपयोग आता फक्त एकाच कारणासाठी करणे शक्य होते- जवळच्या माणसांना सुखरूपपणे जर्मनीबाहेर काढणे. आपली दुरावलेली पत्नी व तिच्यापासून झालेली दोन मुले यांना तो जर्मनीबाहेर पाठवू शकला. मोठय़ा मुश्कीलीने तोही जर्मनीबाहेर पडला.

त्याच्या वाटय़ाला उरली होती फक्त वणवण. इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात तो प्रोफेसर झाला, पण तेथील ब्रिटिश व फ्रेंच शास्त्रज्ञ या ‘युद्धखोर गुन्हेगारा’पासून दूर राहिले. तो युरोपमध्ये िहडत होता. पशांना ओहोटी लागली होती. तब्येत ढासळली होती. त्याला प्रेमाने जवळ करणारे कोणी उरले नव्हते. त्याला आता क्लाराची प्रकर्षांने आठवण येऊ लागली (पूर्वीही तिच्या आठवणीच्या रूपाने आपली सदसद्विवेकबुद्धी आपल्याला साद घालत होती, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले हे त्याला जाणवू लागले होते.). अखेरीस २९ जानेवारी १९३४ला स्वित्र्झलडमधील बेझल येथील एका हॉटेलात तो एकाकी अवस्थेत मृत्युमुखी पडला.

त्याचा मुलगा हर्मन आपल्या कुटुंबासह फ्रान्समध्ये व नंतर अमेरिकेत पोहोचला खरा, पण पत्नीच्या मृत्यूनंतर लौकरच त्यानेही आपल्या जीवनाचा अंत घडवून आणला. हर्मनची मुलगी क्लेअर आपल्या आजोबा-आजीसारखी रसायनशास्त्रज्ञ होती. क्लोरिनबाधित व्यक्तीचे प्राण कसे वाचविता येतील ह्य़ावर ती संशोधन करीत होती. परंतु अण्वस्त्रांवरील संशोधनाला प्राधान्य देण्याच्या नावाखाली तिचा संशोधन प्रकल्प बारगळला, तेव्हा तिनेही आत्महत्या केली. फ्रिट्झच्या असंख्य नातेवाईकांसह लाखो ज्यू ज्या गॅस चेम्बरमध्ये तडफडत मृत्युमुखी पडले, त्या झायक्लॉन-बी गॅसचा शोधही फ्रिट्झ हेबरनेच लावला होता.

ज्यांच्या कित्येक पिढय़ांचा रक्तपाताशी संबंध आला नाही, त्यांच्यासाठी  ‘हानी होवो किती भयंकर, पिढय़ा पिढय़ा हे चलो संगर’ म्हणणे सोपे आहे. रासायनिक युद्ध किंवा गॅस चेम्बरमधील मृत्यूंच्या कथा ‘रम्य’ मानाव्या का यावर आपले मानव्य अवलंबून आहे.

ravindrarp@gmail.com