फुकुशिमा दुर्घटनेला आज तीन वर्षे पूर्ण होत असल्याने आता जपान त्या धक्क्यातून सावरत असणार, असे मानले जाईल.. ते खरे आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी ही काही निरीक्षणे. फुकुशिमाचा धक्का एखाद्याच देशात बसतो, त्यानंतरचे अनास्थेचे तसेच बाधितांच्या मागण्यांना धूप न घालण्याच्या वृत्तीचे उपधक्के मात्र जगभर असतात, याच्या या नोंदी..
जपानच्या फुकुशिमा प्रांतातील भूकंप आणि त्यापाठोपाठ आलेल्या त्सुनामी लाटा यांचा फटका टेपको कंपनीच्या अणुभट्टय़ांना बसला आणि या प्रकल्पातील शीतकरण प्रकल्प बंद पडल्यामुळे मोठा अणुअपघात झाला. हे सारे ११ मार्च २०११ रोजी घडले. म्हणजे आता या अपघाताला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारने अपघातग्रस्त अणुभट्टय़ांपासून २० किलोमीटर त्रिज्येचा भाग पूर्णत: रिकामा केला. परंतु वाऱ्यासह किरणोत्सारही ६० ते ६५ कि.मी. पर्यंत पसरला होता, त्यामुळे आणखी काही गावे अंशत: रिकामी करण्यात आली. असे सुमारे सव्वा लाख बाधित- विस्थापित आजही जपानमध्ये आहेत. निर्वासित किंवा पुनर्वसितांच्या वसाहतींत राहताहेत. ते कसे जगत आहेत, हे या छावण्यांत गेल्यास त्यांच्याच तोंडून ऐकता येते. असे प्रत्यक्ष पाहणे-ऐकणे व्हावे यासाठी ग्रीनपीस या पर्यावरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने जगातील अणुप्रकल्पविरोधी कार्यकर्त्यांसाठी फुकुशिमा विटनेस टूर आयोजित केली होती. त्यातील एक सहभागी या नात्याने मी ऐकलेले अनुभव अस्वस्थ करणारे आहेत. ‘फुकुशिमा दिन’ म्हणून आजही ११ मार्च लक्षात का राहावा, याची कारणे स्पष्ट करणारे असेच हे फुकुशिमाच्या आपद्ग्रस्तांचे अनुभव आहेत.
केनीची हासेगावा हे दुग्धव्यावसायिक, टेपकोच्या (फुकुशिमातील) दाईची प्रकल्पापासून ४५ कि.मी.वर त्यांचे इताते हे गाव आहे. ते सांगतात, ‘प्रकल्पातील अपघात ११ मार्चला झाला, तर २२ एप्रिल २०११ रोजी आमचे गाव रिकामे करण्याची नोटीस आली. त्याआधी महिनाभर जपान सरकार अणुतज्ज्ञांना पाठवून इताते गाव सुरक्षित असल्याची ग्वाही देत होते.’ हासेगावा यांच्या ५० गायी आहेत. गायींच्या दुधातही किरणोत्सार पसरल्याचे सिद्ध झाल्याने, त्यांना गायी माराव्या लागल्या. ‘गावी परत जायचे आहे’ हाच घोर त्यांना लागला असला, तरी किरणोत्सारी माती आणि इतर कचरा यांचे ढीग अद्यापही त्या गावात पाहता येतात. त्याचे काय केले जाणार याची कुणालाही माहिती देण्यात आलेली नाही. किरणोत्सारापासून शुद्धीकरणाचे काम सरकारी पातळीवर हाती घेण्यात आलेले आहे, एवढेच सांगण्यात येते. या कामावर हासेगावांसारखे काही जण नाराज आहेत. ‘मातीचा वरचा पाच सेंटिमीटरचा थर काढून तेथे इतर ठिकाणची माती टाकून किरणोत्सार आटोक्यात आल्याचे दाखविण्यात येते’ असा आक्षेप ते घेतात. दाते नावाच्या गावातील पुनर्वसन छावणीतच अद्यापही हासेगावा राहत आहेत.
याच निर्वासित छावणीत राहणारे हिरोशी कान्नो हेही हासेगावांच्याच इताते या मूळ गावचे शेतकरी. ते आधीपासूनच पर्यावरणप्रेमी असल्याने सेंद्रीय पद्धतीने ३५ निरनिराळय़ा प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन करीत. ‘आम्ही मुळापासूनच उखडले गेलो आहोत. आमची संस्कृती, सणवार काहीच इथे नाही. एकोपाही कमीच आहे. इथे आहे फक्त तणाव,’ असे ते सांगतात. इताते गावातील विस्थापितांपैकीच २०० जणांचा मृत्यू गेल्या तीन वर्षांत झाला, ‘हे तणावाचेच बळी’ असे कान्नो यांचे म्हणणे. ‘एरवी आमच्या गावातील, आमच्या ‘तोहोको’ भागातील लोक खूप संयमी आणि तणाव सहन करणारे होते. पण सरकारच्या निष्काळजीमुळे संयम सुटतो, इथे या छावणीत तणाव ग्रासू लागतो,’ असे स्पष्टीकरणही ते देतात. जपानने अणुऊर्जेची निर्यातही थांबवावी आणि अन्य देशांना संकटात लोटू नये, असा आग्रह कान्नो मांडतात.
किरणोत्सारी अपघातानंतर सरकारच्या क्षमतांवर पूर्ण अविश्वास, हे एक समान सूत्र अनेकांमध्ये दिसले. दाते याच गावातील काही भाग किरणोत्सारग्रस्त झाला होता, तो आता सरकारने ‘किरणोत्सारमुक्त’ घोषित केल्यानंतर तेथील मूळच्या रहिवासी मिनाको सुगाने या मूळ घरी परतल्या नाहीत. त्यांना तीन मुले आहेत, या मुलांना शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थातही किरणोत्सार असू शकेल अशा संशयाने त्या घरचेच खाणे मुलांना देतात. ‘मेणबत्तीच्या प्रकाशात दिवस काढेन पण अणुऊर्जा नको. मानवाची – विशेषत: स्त्रिया व मुलांची सुरक्षितता महत्त्वाची,’ अशी भूमिका त्या मांडतात. आजघडीला सुगाने कट्टर अणुविरोधी कार्यकर्त्यां आहेत. जपानभर फिरून त्यांनी अणुऊर्जेचा घातकपणा व शासनाचा नाकर्तेपणा सांगण्यासाठी सभा घेतल्या आहेत.
इतकी टोकाची नव्हे, पण आहे त्यातून मार्ग काढणारी तणावाला थारा न देणारी भूमिका तात्सुको ओकावारा यांची दिसते. श्रीमती ओकावारा या अळिंब्यांची (मशरूम) शेती करीत, परंतु मशरूमचे ६० हजार ‘लॉग’ किरणोत्सारी ठरल्याने फेकून द्यावे लागले, घर तर सोडावे लागलेच. त्या हल्ली तमुरा शहरात सेंद्रीय अन्नपदार्थाचा कॅफे चालवतात. हे सांभाळून त्यांचे अणुऊर्जाविरोधी कार्य सुरू असते. कठपुतळीसारख्या हलत्या बाहुल्यांच्या खेळाद्वारे त्या स्वत:ची- मशरूमसकट स्वत:च्या आणि इतरांच्याही झालेल्या विस्थापनाची कहाणी सांगतात. या टापूतील शेती-उत्पादने बाजारात पाठवताना, आता किरणोत्साराची मात्रा धोकादायक नसली तरीही किरणोत्सार-मात्रेचा आकडा लिहूनच पाठवावीत, यासाठी त्यांचे सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. ‘फुकुशिमाला विसरू नका’ असे आवाहन करताना त्या म्हणतात – ‘आजदेखील जपान सरकारची अणुऊर्जा नीती जपानच्या आर्थिक संस्थांच्या आणि अणुकंपन्यांच्या मर्जीनेच चालली आहे’ .. पण जनतेच्या दबावामुळे ही नीती बदलू शकेल, काबूत तरी राहू शकेल, असा आशावाद त्यांनी जपला आहे.
‘जनतेनेच जनतेला सांभाळून घ्यावे.. सरकार केवळ अणुकंपन्यांनाच सांभाळते’ असा उद्वेग कात्सुताका इडोगावा यांनी व्यक्त केला. इडोगावा हे माजी महापौर- फुतुबा शहराचे! फुतुबा हे शहर आज ओसाड आहे.. इडोगावा यांनीच अपघातानंतर आठ दिवसांनी, १९ मार्च २०११ रोजी या शहरातील सर्वच्या सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. सरकारने आठही दिवस काहीच केले नाही आणि किरणोत्साराने तर शहराला ग्रासलेच होते, असे इडोगावा यांचे म्हणणे आहे. लोकांनी त्या वेळी त्यांचे ऐकले, कारण किरणोत्साराचा धोका सर्वानाच दिसत होता. आजही हे शहर खंडहरच आहे.
येथे किरणोत्सार मापन यंत्रे बहुतेक जणांकडे आहेत. अनेक ठिकाणचा किरणोत्सार सरकार सांगते त्यापेक्षा- सुरक्षित पातळीपेक्षा- किती तरी अधिक आहे, हे लोकांना मोजमापानिशी माहीत आहे. अशा स्थितीत, फुतुबा शहरात परतण्याचा निर्णय कुणीही घेत नाही, असे इडोगावा सांगतात. मात्र, ‘होते तसेच शहर पुन्हा दुसरीकडे वसवू,’ अशी आशाही इडोगावांप्रमाणेच अनेक फुतुबावासींना आहे. जपान सरकार पुरेशी माहिती देत नाही, प्रसारमाध्यमांनाही फुकुशिमाच्या बातम्या ‘अधिकृतपणे’च देता याव्यात अशी ‘काळजी’ हे सरकार घेते हा आक्षेप येथील अनेक कार्यकर्त्यांचा आहे. जपानच्या पूर्व किनाऱ्यावरची मासेमारी फुकुशिमानंतर आज तीन वर्षांनीही कशी कोलमडली आहे, याची आकडेवारीच अनेक जण देतात.
विस्थापित आणि काही प्रमाणात किरणोत्सर्गबाधित असे अनेक जण येथे भेटले. त्या सर्वाची मागणी अणुऊर्जा-बंदी ही आहेच, अन्य महत्त्वाच्या मागण्याही हे सारे जण करत आहेत. जपानमध्ये थेट फुकुशिमा-संहाराचे उदाहरण डोळय़ासमोर आहे.. तरीही जपानभरची जनता पेटून कशी उठत नाही? किंवा हे विस्थापित-बाधितही आपल्या मागण्या मांडत राहताना इतके शांत कसे? या प्रश्नांवर इडोगावांचे उत्तर लक्षात राहण्यासारखे आहे- ‘शिस्तप्रियता, आज्ञाधारकपणा आणि राज्यकर्त्यांवर निष्ठा ही मूल्ये जपानी माणसात पूर्वापार- राजघराण्यांनी अंगभूत गुणांसारखी भिनवली. हे गुण व्यवस्था बदलाला किंवा क्रांतीला अडथळाच ठरतात.’
जपानने सुरक्षा चाचण्यांसाठी अपघातानंतर ५० अणुभट्टय़ा ‘बेमुदत’ (पण कायमच्या नव्हे- फक्त मुदत न सांगता) बंद ठेवल्या आहेत. तोशिबा, हिताची आणि मित्सुबिशी या अणुतंत्रज्ञान व्यापारातील अग्रगण्य कंपन्यांना भारत, दक्षिण कोरिया, पोलंड आदी देशांशी निर्यात-व्यापारात रस आहे. अशा स्थितीत, स्वत:च्या अणुभट्टय़ा बंद ठेवणे जपानला परवडणारे नाही. सरकारचा अणुकंपन्या धार्जिणेपणा, अणुशास्त्रज्ञ झापडबंदच राहिल्याने आपण खोटेपणा करतो आहोत याचेही भान त्यांच्याकडून सुटण्याचे प्रकार, भरपाई एकमेकांवर ढकलण्यासाठी टेपको कंपनी आणि सरकार यांमध्ये सुरू असलेली चढाओढ.. हे सारे जपान वा भारतातच नव्हे, जगभर सारखेच असू शकेल याची खात्री या भेटीतील वास्तव-कथने ऐकून पटत होती.
* लेखक जैतापूर अणुवीज प्रकल्पविरोधी अभियान या संस्थेचे समन्वयक आहेत. ई-मेल  satyajitchavan@yahoo.co.in