दाभोलकर-पानसरे-कलबुर्गीच्या हत्येमुळेच वर्णजातिसमर्थक कट्टरपंथी दहशतवादाचे आणि फॅसिझमचे संकट उंबरठय़ात येऊन उभे आहे, हे दिसून आले. हे संकट परतवून लावण्यासाठी जमातवादाची व छद्मइतिहासाची वारंवार चिकित्सा करून पुनपुन्हा खरा इतिहास मांडत राहण्याची गरज आहे. आज महाराष्ट्र कशाला इतिहास म्हणावे आणि कुणाला इतिहासकार म्हणावे याविषयी संभ्रमात आहे.
जमातवाद आणि जातवर्चस्ववादास जेव्हा छद्मइतिहासाची (Pseudohistory) जोड मिळते तेव्हा त्यापासून तयार होणारे रसायन भयंकर विस्फोटक असते. तशा प्रकारच्या लेखनामुळे राजकारणात धर्मविद्वेषाचे विष कालवले जाते; अन् इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतो. आपल्या देशात सतत या ना त्या निमित्ताने धर्माध-जमातवादी राजकारणाला नवनवीन धुमारे फुटत असतात आणि त्यात बहुतकरून इतिहास केंद्रवर्ती असतो. राजकीय ईप्सित साध्य करण्याच्या हेतूने धर्म किंवा धार्मिक प्रतीकांचा वापर करून मतांचे ध्रुवीकरण करू इच्छिणाऱ्या धर्माध-जमातवादी-जातवर्चस्ववादी शक्ती इतिहासाची मोडतोड करीत असतात. मोडतोड स्वरूपातला हा जो छद्मइतिहास असतो त्याला आजकाल मोठी मागणी आहे. आपल्याकडे जणू काही इतिहासाखेरीज दखल घेण्याजोगे अन्य कुठले प्रश्न शिल्लक उरलेले नाहीत, असे वाटते.
ऐतिहासिक स्मारके नष्ट करून, एखाद्या शहराचे किंवा रस्त्याचे नाव बदलून, इतिहासाचे पाठय़क्रम बदलून, इतिहासाच्या पुस्तकांवर बंदी लादून किंवा इतिहासकारांचे मुडदे पाडून इतिहासातील तथ्ये पुसली जाऊ शकत नाहीत. खरे तर त्याअर्थी इतिहास खूपच निष्ठुर असतो. इतिहासातील तथ्ये आणि घटिते इतकी निश्चल आणि निर्वकिार असतात की ती कुणाच्या मर्जीबरहुकूम बदलत नसतात. तसा निष्फळ प्रयत्न करणारे मात्र स्वतसह इतरांचाही वर्तमान नासवून टाकतात. इतिहासातील घटना- घडामोडी- प्रसंग- व्यक्ती- विचार- संस्था किंवा संस्कृतीसंबंधीची तथ्ये आणि घटिते कुणाच्या आवडीनिवडीवर अवलंबून नसतात. भूतकाळात जमा झाली की ती अचल आणि अपरिवर्तनीय बनतात. कारण इतिहासाचा पुनप्रत्यय घेता येत नसतो. ती केवळ अशक्य बाब आहे. ऐतिहासिक तथ्ये आणि घटितांची माहिती इतिहासकार ज्या साधनांमधून प्राप्त करतो ती साधनेही तशीच निश्चल, निर्वकिार आणि अपरिवर्तनीय असतात. त्यातून प्राप्त होणाऱ्या माहितीवर आधारित जी अन्वयार्थन प्रक्रिया असते त्याबाबतीत इतिहासकारास बरेच स्वातंत्र्य घेता येणे शक्य असते. पण तेही अर्थातच ऐतिहासिक अन्वेषण पद्धतीस अनुसरून आणि इतिहासाचे प्राणतत्त्व असलेल्या सत्यशोधनाप्रति अस्खलनशील निष्ठा ठेवून.
इतिहासकाराला अन्वयार्थनाचे स्वातंत्र्य असल्यामुळेच इतिहासलेखनाचे विविध दृष्टिकोन आणि विविध प्रवाह प्रचलित असल्याचे दिसतात. किंबहुना इतिहासलेखनातील विविध दृष्टिकोन, विविध प्रवाह आणि त्यातून व्यक्त होणारी मतमतांतरे इतिहासशास्त्राचा अंगभूत विशेष आहे. त्याअर्थी इतिहास नेहमी बहुवचनी स्वरूपातच अस्तित्वात असतो; कधीच तो एकवचनी स्वरूपात अस्तित्वात असत नाही. त्याचे हेच वैशिष्टय़ इतिहासाचे स्वरूप अधिक चतन्यदायी, बौद्धिकदृष्टय़ा आव्हानात्मक आणि प्रस्तुत बनण्यास कारणीभूत ठरते. तथापि उपलब्ध असलेल्या सिद्ध पुराव्यांची, साधनांची आणि तथ्यांची मोडतोड करून हवा तसा संदर्भच्युत निष्कर्ष काढणे, कसल्याही प्रकारच्या तर्कसुसंगतीच्या अभावी अनमानधबक्याने इतिहासाचा अर्थ लावणे हे इतिहासशास्त्रास मान्य नसते; ते इतिहासाचे विकृतीकरण असते. तसे लेखन इतिहास या संबोधनास पात्रदेखील नसते.
इतिहास ही एक अशी ज्ञानशाखा आहे, जी चिकित्सेला अनुसरते. तिथे महत्त्व असते प्रमाणभूत तथ्ये आणि पुराव्यांना; त्यांच्या तर्कनिष्ठ, बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ चिकित्सेला. स्थळ- काळ- परिस्थिती आणि व्यक्ती-समूहाच्या संदर्भचौकटीशी प्रामाणिक राहून संभाव्यतेच्या कसोटीवर त्या विषयाची मांडणी करण्याला. श्रद्धाळूपणा, भावनातिरेक, कल्पनारम्यता, बुद्धिशरणता, धर्मशरणता, गूढवादी कल्पना, अतिनसíगक-अतिमानवीय चमत्कृती, दैववाद-प्रारब्धवाद, ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिमाहात्म्य किंवा भक्तिपरायणता असली कुठलीही अताíककता आणि भंपकपणा इतिहास अन्वेषणप्रक्रियेत त्याज्य असतो. जेव्हा इतिहासाच्या नावाखाली अताíककता आणि भंपकपणा खपविला जातो तेव्हा तो इतिहास नव्हे तर छद्मइतिहास असतो. छद्मइतिहासाचे सर्वात ठळक वैशिष्टय़ असते- समाजमनात पिढय़ान्पिढय़ा रुजविण्यात आलेल्या ‘ऐतिहासिक अफवां’वरील विसंबन व त्याआधारे तथ्य आणि कल्पिताची केली जाणारी बेमालूम सरमिसळ.
कादंबरी, नाटक, कथा, कविता, बालवाङ्मय, पवाडे, कवने, शाहिरी, बखर इत्यादी वाङ्मयीन प्रारूपात लिहिला गेलेला तसेच वृत्तपत्रे, मासिके, भाषणे आणि प्रवचनांमधून सांगितला जाणारा जो ‘ललितइतिहास’ असतो तो ‘लोकप्रिय इतिहासा’च्या सदरात मोडणारा ‘छद्मइतिहास’च असतो. त्यात इतिहास लेखकांना पाळावी लागते तशी अन्वेषण पद्धतीची शिस्त, सत्याप्रति बांधीलकी किंवा इतिहासाप्रति उत्तरदायित्व स्वीकारण्याची आवश्यकता नसते. छद्मइतिहासाच्या कुठल्याही प्रारूपात लेखन करणारी मंडळी ही बहुतकरून हौशी इतिहासप्रेमी किंवा बाजारू लेखक असतात. कधी ते सत्ताधाऱ्यांच्या दिवाणखान्यातील आश्रित भाट असतात, कधी नामस्मरणात तल्लीन होऊन गेलेले भक्तिसंप्रदायाचे पाईक असतात, कधी ते स्वकल्पित अस्मितेने पुरते झपाटलेले असतात, कधी ते मतप्रचारक (Propagandist) असतात; तर कधी त्यांनी इतिहास सांगत असल्याचा खोटाच दावा करून लोकानुनयास्तव बाजारपेठेच्या मागणीनुसार लोकानुरंजनाचा स्वार्थी धंदा मांडलेला असतो. त्यांच्याकडे इतिहासशास्त्राची तंत्रे, पद्धती आणि संशोधनशिस्त यांसारखी इतिहासकाराकडे अत्यावश्यकरीत्या असायलाच हवीत अशी कुठलीही व्यावसायिक नपुण्ये आणि तत्संबंधीचे प्रशिक्षण नसते; आणि असलेच तर त्यांना त्यांची वैयक्तिक लालसा आणि राजकीय ईप्सित इतिहासापेक्षा मोठे आणि महत्त्वाचे वाटत असते.
इतिहासाचे विकृतीकरण करणारे जे लेखनप्रकार आहेत ते इतिहासाच्या ज्ञानशाखेस जितके अपायकारक आहेत तितकेच ते वैश्विक-मानवतेच्या हिताच्या दृष्टीनेही मारक असतात. त्याचा अनुभव मानवाने वारंवार घेतला आहे. उदाहरणार्थ, हिटलरच्या राजवटीतील जनसंहार किंवा भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडून आलेला रक्तपात. हिटलरच्या वांशिक दुरभिमानातून उद्भवलेल्या वांशिक राष्ट्रवादाने घडवून आणलेला जनसंहार आणि िहदू-मुस्लीम द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतातून उद्भवलेली भारत-पाकिस्तान फाळणी या दोन्ही घटनांमध्ये लाखो लोक मारले गेले, लाखो लोक विस्थापित होण्यास बाध्य झाले. लक्षणीय बाब अशी की, हिटलरचा नॉíडक वंशश्रेष्ठत्वाचा दावा किंवा िहदू-मुस्लीम द्विराष्ट्रवाद या दोन्ही विध्वंसकारी सिद्धांतांचा पाया एकसमानरीत्या विपर्यस्त अन् विकृत इतिहासलेखन हाच होता. विकृत, खोटय़ा आणि िहसक स्वरूपाच्या छद्मइतिहासलेखनाची अशी किंमत मानवाला वारंवार मोजावी लागली आहे. सुविख्यात इतिहास तत्त्वचिंतक एरिक हॉब्जबम एका व्याख्यानात म्हणतात, ‘‘विपर्यस्त इतिहास हा निरुपद्रवी असतो असे नाही. तो भयंकर संहारक असतो. वरकरणी निरागस वाटणाऱ्या कळ-फलकातून अभावितपणे लिहिली जाणारी अक्षरे; ही मृत्यूची अक्षरेदेखील असू शकतात.’’ इतिहासाच्या संवेदनशीलतेसंदर्भात त्यांचे हे विधान खूपच बोलके आणि उद्बोधक आहे. आपल्या देशात धर्माध जमातवाद्यांच्या झुंडींनी बाबरी उद्ध्वस्त करून देशभर जो िहसाचार माजवला होता त्यानंतर आता जवळपास अडीच दशकांचा कालावधी उलटून गेला आहे. तथापि त्यातून उद्भवलेल्या क्रिया-प्रतिक्रियेचे सत्र थांबले असेल असे म्हणायला मन धजावत नाही. बाबरीप्रकरणी जात-जमातवादी मूलतत्त्ववाद्यांनी राजकीय स्वार्थाखातर जो धर्मोन्माद निर्माण केला तो संघटित करतेवेळी त्यांच्या हातातील सर्वात प्रभावी अस्त्र जर कुठले असेल तर ते होते, छद्मइतिहास. काळजी करण्यासारखा मुद्दा हा आहे की, आपल्याकडे अलीकडच्या काळात त्याची चलती वाढली आहे.
फाळणी झाली तेव्हापासून पाकिस्तानात शासनपुरस्कृत इतिहास शिकवला गेला. अर्थातच तो मुस्लीम धर्मकेंद्री आणि परधर्मद्वेषाची शिकवण देणारा जमातवादी इतिहास होता. तिथल्या त्या जमातवादी इतिहासलेखनाला कट्टरपंथी दहशतवाद्यांच्या रूपात जी विषारी फळे आलीत, त्यामुळे तो देश आज संकटांच्या खाईत लोटला गेला आहे. लोकशाही भारताची वाटचाल त्या दिशेने होऊ नये असे वाटत असेल तर आपण त्यापासून बोध घ्यायला हवा. कारण दाभोलकर- पानसरे- कलबुर्गीच्या हत्येच्या निमित्ताने दिसून आले आहे की, वर्णजातिसमर्थक कट्टरपंथी दहशतवादाचे आणि फॅसिझमचे संकट उंबरठय़ात येऊन उभे आहे. ते संकट जर परतवून लावायचे असेल तर बुद्धिवादी-विवेकवादी इतिहासकारांनी त्याविरोधात निर्भीडतेने लेखणी चालविण्याची आणि बोलण्याची गरज आहे. जमातवादाची व छद्मइतिहासाची वारंवार चिकित्सा करून पुनपुन्हा खरा इतिहास मांडत राहण्याची गरज आहे. इतिहासाप्रति आणि समाजाप्रति असलेले त्यांचे खरे उत्तरदायित्वही तेच आहे.
विविध दृष्टिकोनांतून विविधांगी इतिहासलेखन करणाऱ्या इतिहासकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. मात्र आज तोच महाराष्ट्र कशाला इतिहास म्हणावे आणि कुणाला इतिहासकार म्हणावे याविषयी संभ्रमात आहे. ज्यांचा इतिहासशास्त्रातील गंभीर ज्ञानव्यवहाराशी दुरान्वयानेही संबंध नाही असे छद्मइतिहासकार इतिहासातील पेचांवर बोलू लागले आहेत. ही स्थिती अतिशय वेदनादायक आहे.
शेवटी, छद्मइतिहासाच्या बाजूने उभे असलेल्यांना उद्देशून एवढेच सांगावेसे वाटते की, त्यांनी किमान इतिहासाची साक्ष जाणावी! ती साक्ष अशी आहे की, जे इतिहासाला स्वाहा करण्याच्या प्रयत्नात होते ते स्वतच भस्म झाले; इतिहास तावूनसुलाखून निघाला!
(लेखक जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात, इतिहास विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत.
त्यांचा ईमेल ingledevs@gmail.com)