18 November 2019

News Flash

ओसाकातील संवादसरी

जपानचे ओसाका शहर पावसात चिंब भिजत असताना २० देशांच्या प्रमुखांमध्ये दोन दिवस चर्चेच्या सरी कोसळल्या.

जपानचे ओसाका शहर पावसात चिंब भिजत असताना २० देशांच्या प्रमुखांमध्ये दोन दिवस चर्चेच्या सरी कोसळल्या. व्यापार उदिमातले ताणतणाव, भूभागांचे वादविवाद, वाढता दहशतवाद, बिघडते पर्यावरण अशा अनेक प्रश्नांनी ढगाळलेले आकाश काही प्रमाणात स्वच्छ होईल आणि आपले राष्ट्रप्रमुख जी-२० परिषदेतून काहीतरी घेऊन येतील, अशा आशेवर काही देश होते. त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले असा नकारार्थी निष्कर्ष काढण्यापेक्षा, काही प्रमुख देशांतील वृत्तपत्रांनी या परिषदेची दखल कशी घेतली, हे पाहणे उद्बोधक ठरेल.

चीन आणि अमेरिकेत धुमसणाऱ्या व्यापार-शीतयुद्धावर ओसाकातील संवादसरींनी पाण्याचा शिडकावा मारला. त्यामुळे उर्वरित जगाला हायसे वाटले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात व्यापारी संबंध सुधारण्यावर एकमत झाले. परिषदेच्या या फलिताचा अर्थ सांगणारे वृत्त तज्ज्ञांच्या अवतरणांसह चीन सरकारचे मुखपत्र- ‘पीपल्स डेली’ने ठळकपणे प्रसिद्ध केले आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘क्षीनहुआ’ने ‘इस्लामाबाद कौन्सिल फॉर इंटरनॅशनल अफेअर्स’चे संचालक सईद चौधरी यांना या चर्चेबद्दल विचारले. ते म्हणाले, ‘दोन्ही प्रमुखांमधील चर्चा जगाला दिलासा देणारी आहे. संघर्षांची भूमिका घेतली तर दोन्ही देशांचे नुकसान होईल आणि जगालाही दुष्परिणाम भोगावे लागतील, हे अमेरिकेने लक्षात घेतले पाहिजे. पण संवाद वाढवला, सहकार्याची भूमिका घेतली, तर त्यांच्यासह सर्व जगाला लाभ होईल.’

जपानमधील वृत्तपत्रांना या परिषदेकडून मोठी अपेक्षा होती. जपान आणि रशियातील कुरिल द्वीपकल्प वादावर ठोस तोडगा काढण्याच्या दृष्टीने ओसाकातील परिषद फलदायी ठरेल, असे त्यांना वाटत होते. पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. जपानचे पंतप्रधान शिन्जो अबे आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन याबाबतीत अपयशी ठरले, असे वृत्त जगातील सर्वाधिक खपाच्या जपानमधील ‘योम्युरी शिम्बुन’ वृत्तपत्राने पहिल्या पानावर प्रसिद्ध केले आहे. पुतिन आणि अबे यांनी फक्त या प्रकरणावर चर्चा सुरू ठेवण्यावरच एकमत केले, असा टीकेचा सूरही त्यात आळवला आहे.

‘जपान आणि अमेरिकेतील सुरक्षा करार कालबाह्य़ झाला आहे, तो दुरुस्त केला पाहिजे’ अशी टीका ट्रम्प यांनी केली होती. त्या अनुषंगाने जपानच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात ‘आसाही शिम्बुन’ हे वृत्तपत्र म्हणते : ‘करारांचे ओझे अमेरिकेलाच जास्त वाहावे लागते. इतर देशांना करारांचा लाभ होतो. त्यासाठी त्यांनी किंमत मोजली पाहिजे, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. त्यात नवे असे काही नाही.’ ‘योम्युरी शिम्बुन’नेही अग्रलेखात ट्रम्प यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘करारानुसार जपानचे लष्करी तळ अमेरिका वापरते. त्यामुळे चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सागरी मार्गाच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेला मदतच होते. शिवाय, अमेरिकेचे आर्थिक हित जपण्यातही जपान साह्य़ करतो हेही ट्रम्प यांनी लक्षात घ्यावे’ असे हा अग्रलेख सुनावतो.

रशियाकडून एस-४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या टर्कीच्या निर्णयामुळे ट्रम्प यांनी आकांडतांडव केले होते. परिणामी दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. ट्रम्प टर्कीवर आर्थिक र्निबध लागू करतील, अशी भीती होती. परंतु त्यांनी ‘र्निबध लागू करणार नाही’ असे परिषदेतील द्विपक्षीय चर्चेत स्पष्ट केल्याचे टर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी सांगितले आणि टर्कीतील वृत्तपत्रांच्या दृष्टीने तीच मोठी बातमी ठरली. ‘हुरियत’ या वृत्तपत्राने ती प्राधान्याने प्रसिद्ध केली आहे.

या परिषदेतून अमेरिकेला काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने ‘फाइव्ह टेकअवेज फ्रॉम जी-२० समिट’ असा उपहासवजा विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध केला आहे. ‘ट्रम्प यांचे चीन व्यापारयुद्ध शमले ही या परिषदेतील सध्या तरी मोठी निष्पत्ती आहे’ अशी टिप्पणी या लेखात केली आहे. ‘ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग ऊन यांची होऊ घातलेली भेट (ही भेट रविवारी झाली) हीसुद्धा याच परिषदेचे फलित आहे. पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी एखाद्या भिन्न मताच्या व्यक्तीच्या मृत्यूपेक्षा सौदी अरेबियाशी असलेले अमेरिकेचे संबंध जास्त महत्त्वाचे असल्याचा संदेश जगाला दिला आहे,’ असा उपहासही या लेखात केला आहे.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई

First Published on July 1, 2019 12:07 am

Web Title: g20 osaka summit 2019
Just Now!
X