युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी (ब्रेग्झिट) ब्रिटनला आता आणखी मुदतवाढ मिळणे अशक्य आहे. हे लक्षात घेता, ब्रेग्झिट पार पाडण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना संसदेत बहुमताची आवश्यकता आहे. त्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ब्रेग्झिटसाठी मुदतपूर्व निवडणुकीचा जुगार आधीच्या पंतप्रधान थेरेसा मे याही खेळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर निवडणूक जुगाराच्या संभाव्य परिणामांचे अंदाज-आडाखे बांधले जात आहेत.

ब्रेग्झिटसाठी मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा जॉन्सन यांचा जुगार त्यांना सर्वच बाबतींत महागात पडू शकतो, असा इशारा देणारे विश्लेषण ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या ऑनलाइन आवृत्तीतील लेखात आहे. ‘ब्रेग्झिट कायद्यासाठी संसदेत बहुमताची गरज आहे आणि ते नसल्याने निवडणुकीचा जुगार खेळणे हा एकमेव पर्याय जॉन्सन यांच्यापुढे होता. परंतु मतदार विचार बदलू शकतात. शिवाय २०१७ मध्ये थेरेसा मे यांना सुरुवातीला जेवढा पाठिंबा मिळाला, तेवढाही जॉन्सन मिळवू शकले नाहीत, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे,’ असे निरीक्षण साऊदॅम्प्टन विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक विल जेनिंग्ज यांनी नोंदवले आहे. मजूर पक्ष हाही जॉन्सन यांच्यापुढील एक यक्षप्रश्न आहे. त्याचे नेते जेरेमी कॉर्बीन यांनी थेरेसा मे यांच्याकडे ब्रेग्झिट तडीस नेण्याची योजना तयार असतानाही २०१७ च्या निवडणुकीत प्रभावी प्रचार केला आणि अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकून आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी जेरेमी यांचे काम जॉन्सन यांनीच सोपे केले आहे. कारण जॉन्सन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री. ‘ट्रम्प ब्रिटिश नागरिकांमध्ये फारसे लोकप्रिय नसल्याने जेरेमी यांच्या ते पथ्यावरच पडले आहे,’ असेही या लेखात म्हटले आहे.

‘सीएनएन’च्या व्यापार आवृत्तीतही ब्रिटनची ही निवडणूकही मंदीच्या सावटाखाली असलेल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूकदारांसाठीही मोठा जुगार ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ‘असाच जुगार थेरेसा मे खेळून बहुमत गमावून बसल्या होत्या,’ अशी टिप्पणीही या लेखात आहे.

ब्रिटनमधील इच्छुक उमेदवार, विद्यमान खासदार आणि काही प्रतिष्ठितांच्या प्रतिक्रियांवर आधारित वृत्तान्तात ‘फायनॅन्शियल टाइम्स’नेही मध्यावधी निवडणुकांना ‘जुगार’ म्हटले आहे. पंतप्रधान जॉन्सन यांच्या एका सहकाऱ्याच्या वक्तव्याचा हवाला या वृत्तान्तात दिला आहे. ब्रेग्झिट पक्षाचे नायजेल फराज यांनी जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाविरुद्ध सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची धमकी दिल्यामुळे ही निवडणूक म्हणजे जुगारच ठरण्याची शक्यता जॉन्सन यांच्या त्या सहकाऱ्याने व्यक्त केली. ‘ब्रेग्झिट समर्थक आणि विरोधक अशी विभागणी झालेले अस्वस्थ ब्रिटिश मतदार आणि ‘ब्रेग्झिट’मुळे विस्कळीत झालेली पारंपरिक द्विपक्षीय व्यवस्था या पाश्र्वभूमीवर होणारी ही निवडणूक म्हणजे जुगारच. परंतु मजूर पक्षाकडे असलेल्या कामगार विभागांतील जागा जिंकण्याची रणनीती हुजूर पक्षाने आखणे आवश्यक आहे. अर्थात, मतदारांमधील अस्वस्थतेमुळे त्यात त्यांना फारसे यश मिळण्याची शक्यता कमी आहे,’ असे फायनॅन्शियल टाइम्समधील निरीक्षण आहे.

‘ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावरून ब्रिटनचे राजकारण सैरभैर झाले आहे. निवडणुकीत चार पक्षांमध्ये रस्सीखेच असल्याने त्यांना मिळणाऱ्या जागांमध्ये कमी फरक असेल. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी फारसा फरक पडणार नाही,’ असे भाकीत तज्ज्ञांच्या हवाल्याने ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेखात केले आहे. याच विश्लेषणात ऑक्सफर्ड विद्यापीठातील युरोपीय राजकारणाचे अभ्यासक टिमोथी गार्टन अ‍ॅश यांनी मिश्कील मत मांडले आहे. ते म्हणतात, ‘‘ब्रेग्झिट हे एक महाकाव्य असून सध्या त्याचे विडंबन सुरू आहे. आपण जे पाहात आहोत, ते ब्रिटनच्या पक्षीय राजकारणाचे युरोपीयकरण आहे. ब्रेग्झिटच्या दबावामुळे द्विपक्षीय यंत्रणाच धोक्यात आली आहे.’’

‘निवडणुकीत हुजूर पक्षाने बाजी मारली तर ब्रेग्झिटची प्रक्रिया लवकर संपवण्याच्या दृष्टीने संसदेत आवश्यक असलेला पाठिंबा जॉन्सन यांना मिळेल. परंतु मजूर पक्ष वरचढ ठरला तर मात्र ब्रेग्झिट लांबू शकते,’ असा अंदाज ‘स्लेट’ या अमेरिकी नियतकालिकातील लेखात जोशुआ केटिंग या राजकीय विश्लेषकाने मांडला आहे.

जॉन्सन यांच्या दृष्टीने या निवडणुकीत ब्रेग्झिट हाच प्रतिष्ठेचा आणि प्रचाराचा केंद्रबिंदू असला, तरी मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बीन यांनी मात्र जॉन्सन यांना जेरीस आणण्याचा चंग बांधला आहे. शिवाय ब्रेग्झिट पक्षानेही सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करून जॉन्सन यांची अडचण केली आहे. म्हणून हा जुगार त्यांच्यासाठी किती लाभदायी ठरतो, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई