03 March 2021

News Flash

तत्त्वबोध : गण-पती

ॐ नमस्ते गणपतये।। सद्गुरू हाच ओंकारस्वरूप आहे, हे अनेक संतांनीही सांगितलं आहे.

कोणतंही स्तोत्र हे सद्गुरूचंच माहात्म्य मांडतं, असं मला वाटतं. आपल्या अंतरंगात भक्ती किंचित जागी होते तेव्हा सद्गुरूंची माहितीच नसते, तर महती कुठून कळणार? तेव्हा कुठला तरी इष्ट देव हा आपला या भक्तीपंथाचा आधार असतो. मुळात भक्ती म्हणजे नेमकी कोणती, हे माहीत नसतं. त्यामुळे त्या देवतेच्या मंदिरात जाणं, त्याच्याशी संबंधित वारांचे उपास धरणं, त्याची स्तोत्रं वाचणं म्हणजे त्या देवाची भक्ती करणं, अशी सर्वसाधारण धारणा असते. त्यातूनच त्या-त्या देवाची स्तोत्रं, पोथ्या, आरत्या वाचताना वा म्हणताना त्या त्या देवाविषयीचं प्रेम किंचित जागं होऊ लागतं. त्या देवाचं दर्शन झालेला आणि ते आपल्यालाही घडवून देणारा असा कुणीतरी तो सद्गुरू, हे प्राथमिक आकलन होऊ लागतं तेव्हा त्या देवदर्शनासाठी सद्गुरूच्या शोधाची निकड भासू लागते. अध्यात्माच्या बाजारात खरा सद्गुरू कुठून मिळणार? तरी आपल्या अंतरंगातली तळमळ खरी असेल तर ईशकृपेनं खरा सद्गुरू जीवनात येतो. त्याच्या सहवासातून खरा बोध ग्रहण करता आला आणि त्या बोधानुरूप खरं जगणं सुरू झालं तर मग सर्व देवकल्पनेचंच अंतरंगातून विसर्जन होतं आणि जो समोर आहे, जो या डोळ्यांना दिसत आहे, ज्याचं बोलणं या कानांनी ऐकता येत आहे, ज्याच्याशी बोलता येतं, ज्याला स्पर्श करता येतो तोच सद्गुरू त्या देवापेक्षाही जवळचा होतो. साक्षात माउलीही निवृत्तीनाथांना उद्देशून सांगतात, ‘‘तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।’’ तो जो विठ्ठल आहे तो हाच (निवृत्तीनाथ) आहे आणि हा ‘विठ्ठल’ आमच्यासाठी सहज आहे, सोयीचा आहे, त्याच्याशी आम्ही बोलू शकतो, त्याचं बोलणं ऐकू शकतो.. मग सारी स्तोत्रं, साऱ्या पोथ्या, साऱ्या आरत्या एका सद्गुरूतत्त्वानंच ओतप्रोत भरलेल्या वाटू लागतात.

कोणत्याही धार्मिक कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या वंदनेनं होते. म्हणूनच या स्तोत्रपथावरचं पहिलं पाऊलही ‘श्रीगणपतीअथर्वशीर्ष’ हेच आहे.

गणपती म्हणजे सद्गुरूच! माझ्या इंद्रियगणांचा जो अधिपती आहे तो सद्गुरूच आहे. या स्तोत्राची सुरुवातच पाहा..

ॐ नमस्ते गणपतये।। सद्गुरू हाच ओंकारस्वरूप आहे, हे अनेक संतांनीही सांगितलं आहे. नाथांचा प्रसिद्ध अभंग आहे.. ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो! तेव्हा या स्तोत्राच्या आरंभीच ओमकारस्वरूप सद्गुरूचं स्मरण आहे आणि त्याला गणपती म्हटलं आहे. अर्थात माझ्या इंद्रियगणांचा अधिपती अशा हे ओमकारस्वरूप सद्गुरो तुला नमस्कार असो! त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि।। प्रत्यक्ष म्हणजे अक्षांना अर्थात डोळ्यांना दिसणारं. तर ते जे विराट परमतत्त्व आहे ते केवळ तुझ्याच रूपात या डोळ्यांना दिसतं. डोळ्यांना दिसणारं व्यापक तत्त्व तूच आहेस! त्वमेव केवलं कर्तासि।। त्वमेव केवलं धर्तासि।। त्वमेव केवलं हर्तासि।। मी कठपुतळी आहे, खरा कर्ता, खरा धर्ता  तूच आहेस. माझ्या अशाश्वत जीवनातल्या प्रत्येक घडामोडीला तूच शाश्वताकडे वळवतोस. अशाश्वतातून मला शाश्वताकडे नेत माझ्या समस्त भवदु:खाचं तूच हरण करतोस. म्हणूनच तुला हरि म्हणतात. म्हणून तूच केवळ हर्ता आहेस.. त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि।। पार्वतीमातेला शिवजींनी गुरूगीतेत सांगितलं आहे की, ‘‘गुरूविनां न ब्रह्म अन्यत् सत्यं सत्यं वरानने’’ जे परब्रह्म म्हणतात तेच सद्गुरूरूपात प्रकटलं आहे. परब्रह्म म्हणजे व्यापक, सर्वातीत, अलिप्त, केवलम् असं तत्त्व.. हे सारे गुण सद्गुरूचेच आहेत! म्हणून खऱ्या अर्थानं हे सद्गुरो तूच ब्रह्म आहेस. त्वं साक्षादात्मासि नित्यम्।।  तूच साक्षात आत्मस्वरूप होऊन माझ्यात नित्य वास करून आहेस!

(चैतन्य प्रेम यांच्या ‘स्तोत्रबोधमाला’ या पुस्तिकेमधून  संकलित)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 3:42 am

Web Title: ganaptu vishesh
Next Stories
1 ‘सरस्वती’चा देव्हारा!
2 खाकीवरील हल्ल्याचे काळे वास्तव
3 भाषेच्या चक्रव्यूहामध्ये भाजप
Just Now!
X