|| मिलिंद कसबे

आपल्या बुद्धीचा वापर करून सत्याकडे वाटचाल करावी, असे सुचवणाऱ्या बुद्धांना अपेक्षित असलेले ‘सत्य’ म्हणजे ‘विज्ञानवाद’ आहे. एक मानवतावादी धर्म म्हणून बुद्धधम्माच्या प्रसाराची वाट बिकट झाली असली, तरी माणुसकी हरवलेल्या समाजात प्रेमभाव पेरण्यासाठी प्रत्येक माणसाला बुद्धाची गरज लागणार आहे..

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

बुद्धांनी पृथ्वीवरच्या समग्र मानवजातीला अनमोल संदेश दिला : ‘अत्त दीप भव’.. ‘हे माणसा, तू स्वत: स्वत:चा प्रकाश हो, तू स्वत:च स्वत:चा स्वामी हो!’ या संदेशातून बुद्धांनी माणसाला स्वत:च्या बुद्धीवर व अनुभवावर विश्वास ठेवायला सांगितले. याचाच अर्थ माणसाने पुनर्जन्माच्या कथोकल्पित कहाण्या सांगणाऱ्या धर्मग्रंथांवर किंवा सत्तेवर विसंबून राहू नये असा होतो. आपल्या बुद्धीचा वापर करून सत्याकडे वाटचाल करावी, असे सुचवणाऱ्या बुद्धांना अपेक्षित असलेले ‘सत्य’ म्हणजे ‘विज्ञानवाद’ आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. भारतीय तत्त्वज्ञान, भाषा, साहित्य आणि कला यांवर बुद्धांचा मोठा प्रभाव आहे. भारतीय जल व कृषिक्रांतीतही बुद्धांचा मोठा वाटा असल्याचे इतिहासकारांचे मत आहे.

डॉ. आंबेडकरांचे नवयान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मातर ही गोष्ट बुद्धधम्माच्या पुनर्माडणीची यशोगाथा म्हटली पाहिजे. दारिद्रय़ाच्या आणि अस्पृश्यतेच्या विळख्यात अडकलेल्या दलित बांधवांना नवा स्वाभिमान बहाल करण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू धर्माला नाकारून बुद्धधम्माचा स्वीकार केला. हीनयान, महायान आणि वज्रयान या पंथांपेक्षा अधिक वेगळे सिद्धांतन बाबासाहेबांचे होते. म्हणून त्यांनी स्वीकारलेल्या बुद्धधम्माला त्यांनी ‘नवयान’ असे संबोधले. बाबासाहेबांचा बुद्ध हा सामाजिक बुद्ध होता, हे त्यांनी धर्मातरप्रसंगी दिलेल्या २२ प्रतिज्ञांवरून दिसते. बाबासाहेबांचा बुद्ध हा असामान्य असला, तरी त्याची शिकवण व्यक्तिविकासाकडून सामाजिक पुनर्बाधणीकडे जाणारी आहे.

‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे अतिशय प्रवाही भाषेतील बुद्धचरित्र  लिहून बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात बुद्धांचे सामाजिक विचार पेरले. बाबासाहेबांच्या अगोदर अनेक अभ्यासकांनी बुद्धांची चरित्रे लिहिली आहेत. या चरित्रात बाबासाहेबांनी योजलेल्या गोष्टींमुळे- त्यांनी बुद्धधम्माला समाजवादाचा पर्याय म्हणून समोर आणले, असेही म्हटले जाते. बाबासाहेबांच्या वैचारिक लेखनात त्यांच्यावर बुद्धांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता हे दिसतेच; परंतु त्यांनी मोठय़ा परिश्रमाने तयार केलेल्या राज्यघटनेतही तो प्रभाव दिसतो. संत कबीर, संत तुकाराम आणि महात्मा फुले यांच्या विचारांत बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव होताच. याच विचारधारेतून महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची परंपरा उभी राहिली.

आज जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर माणसामाणसांत मोठी स्पर्धा लागल्याचे दिसते आहे. आधुनिक आणि त्यावर उतारा म्हणून धार्मिक बदलाप्रमाणे धावताना माणसाची दमछाक होताना दिसत आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव त्याच्या आजच्या जगण्याला उसवतो आहे. प्रचंड स्पर्धा, सत्ता आणि पैसा मिळवण्याची धडपड दु:खाच्या मार्गावर नेते आहे. सुखाचा, शांतीचा आणि सम्यक जीवनमार्गाचा संदेश देणारा बुद्ध प्रत्येकाच्या मनात असतोच; पण प्रश्न त्याला आचरणात आणण्याचा आहे!

बुद्धत्व ही ज्ञानअवस्था

बुद्धत्वाचे चिंतन करणे म्हणजे महायज्ञ करणे नव्हे किंवा पूजापठण करणे नव्हे. बुद्धत्व ही एक ज्ञानअवस्था आहे. तो सत्याकडे जाण्याचा महामार्ग आहे. ती सदाचाराने आणि प्रेमाने काठोकाठ भरलेली मनोअवस्था आहे. ज्ञानप्राप्तीची मनोवृत्ती प्रत्येक माणसाच्या मनात असतेच, म्हणून पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक माणूस बोधिसत्त्व होऊ  शकतो. स्वत:च स्वत:च्या कर्तृत्वाने प्रकाशमान होऊ  शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्माची अथवा जातीची पूर्वअट नाही. बुद्धधम्मात जातीला आणि धार्मिक कर्मकांडांना स्थान नाही. मानवी समाजात जातिभेदाच्या जाचक भिंती आणि धर्माचे रूढीप्रिय अवडंबर नष्ट करण्यासाठी बुद्धांनी अथक प्रयत्न केले; परंतु त्यांच्याच विचारांना जातीच्या कुंपणात ठेवण्याचे प्रयत्न अनेकांकडून होताना दिसत आहेत. बुद्धांच्या विचारांना धर्माच्या रूढीग्रस्ततेत अडकवून त्यांनाच ‘अवतार’ कल्पनेत बसवण्याचाही जुना डाव खेळला जात आहे. जातीच्या कुबडय़ा घेऊन वावरणाऱ्या झापडबंद समाजाला आणि धर्माचे अवडंबर माजवणाऱ्या विचारशून्य समाजालाही डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेला नवबुद्ध समजणे तितकेच गरजेचे आहे.

जागतिकीकरणाच्या काळात ‘सेल्फ-हेल्प’पुरता किंवा तात्पुरत्या मन:शांतीपुरता बौद्धमार्ग विकण्याची दुकानेही उघडली आहेत; पण बुद्धांच्या विचारांचे काय होईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जगभरात बुद्धांच्या धम्मप्रसाराचा वेग मंदावत आहे. बाबासाहेबांनी धर्मातर करून भारतात बुद्धधम्माचे पुनरुत्थान केले; परंतु ही केवळ सुरुवात होती. बाबासाहेबांच्या धर्मातरामुळे महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात लाखो दलित संघटित झाले; परंतु त्याचबरोबर लाखो दलित या क्रांतिकारी घटनेपासून दूरही राहिले. शिवाय बुद्धधम्माच्या प्रसारात ज्या थोडय़ाफार सवर्णानी बुद्धधम्म स्वीकारला, ती प्रक्रियाही आता थांबली आहे. यामुळे ‘अस्पृश्यांचा धर्म’ अशी एक चुकीची ओळख बुद्धधम्माची तयार झाली. याशिवाय बुद्धधम्माच्या प्रसाराच्या पद्धती आणि ध्येयधोरणे अनुकरणप्रिय होत गेले. या सर्वाचा परिणाम म्हणजे बुद्धधम्म ‘धर्म’ म्हणून कप्पेबंद होत गेला. भारतीय समाजव्यवस्थेतील भटक्या-विमुक्त आणि वंचित समूहाने अलीकडे धर्मातराची टाकलेली पावले बुद्धधम्माला पुन्हा ऊर्जावान करतील हे खरे असले, तरी सध्याचे धार्मिक राजकारण त्यालाही प्रतिशह उभा करेल.

एक मानवतावादी धर्म म्हणून बुद्धधम्माच्या प्रसाराची वाट बिकट झाली आहे. तसेच बुद्धधम्माची आजची वाटचाल आणि बुद्धांचे मानवी कल्याणाचे वैश्विक विचार या दोहोंतही तफावत होताना दिसते आहे. परंतु बुद्धधम्म धर्म म्हणून बिकट वाटेने जात असला, तरी या पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक अनामिक बुद्ध मात्र सम्यक संबुद्ध बनवून तेजस्वीपणे उभा आहे. आजच्या ग्लोबल जमान्यात, माणुसकी हरवलेल्या समाजात प्रेमभाव पेरण्यासाठी प्रत्येक माणसाला बुद्धाची गरज लागणार आहे. प्रत्येक मनुष्याला आपले माणूसपण आपल्या विवेकाने मिळवावे लागेल. शेवटी बुद्धांनी सांगितलेल्या माणसाच्या स्वयंप्रकाशित होण्याच्या प्रज्ञावंत मार्गानेच उद्याचा समाज प्रेममय बनेल!

cantact@milindkasbe.com