29 November 2020

News Flash

विराटाच्या वाटेवरची..

गिरीश कुबेर निसर्गातील रंग-रूप-आकारांबद्दलची स्वीकारशील भावोत्कटता मांडणारी, माणसातील क्रौर्य, हिंसा पाहून करुणार्त होणारी कविता लिहिणारे ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर हे सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी

गिरीश कुबेर

निसर्गातील रंग-रूप-आकारांबद्दलची स्वीकारशील भावोत्कटता मांडणारी, माणसातील क्रौर्य, हिंसा पाहून करुणार्त होणारी कविता लिहिणारे ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर हे सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी नव्वदीचे होतील. त्यानिमित्ताने..

‘‘कवी तो दिसतो कसा आननी’’ असा प्रश्न ऐंशी-नव्वदच्या दशकांत डोंबिवलीकरांना कधीही पडला नाही. इतके कवी डोंबिवलीत दिसत की निर्धार करूनही त्यांना टाळणं शक्य नव्हतं त्या वेळी. बरं ते शहर पु. भा. भावे, शं. ना. नवरे, गोविंदराव तळवलकर वगैरेंसाठी ओळखलं जायचं. त्यामुळे त्या शहरातल्या प्रत्येक बोरूबहाद्दरास आपण लवकरच यांच्या पंगतीला जाऊन बसणार आहोत, असं वाटायचं. या त्याच्या वाटण्यावर त्या वेळी डोंबिवलीकरांचाही विश्वास बसत असणार. त्याशिवाय इतक्या कवींना गोड मानून घेणं शक्यच नाही. कवी/लेखकांच्या इतक्या सकल शहरी उत्पादनामुळे काव्यशास्त्रविनोदाचा बारमाही जल्लोष असायचा त्या शहरात.

द. भा. धामणस्कर त्या गर्दीत आपल्या कवितेला घेऊन मिरवायला कधीही गेले नाहीत. त्यामुळे त्यांची कविता खूप उशिरा भेटली. इनग्रिड बर्गमनच्या ‘‘व्हेन यू हॅव फिनिशड् विथ अदर्स, दॅट इज माय टाइम’’ या वाक्याप्रमाणे. मराठी वाङ्मयातच मुळात हे असं होणं हे अप्रूप. डोंबिवली/ पुण्यात/ पाल्र्यात वगैरे एखादा राहतोय, ‘सत्यकथा’त काही त्याचं प्रसिद्ध होतंय आणि तरीही तो हे मिरवत नाहीये.. हे सत्य उमगेपर्यंत बराच वेळ गेला. त्या वेळी डोंबिवली सांस्कृतिकदृष्टय़ा(च) इतकी उत्सवी असायची, की नाव झालेला/ होऊ घातलेला/ होईल अशी आशा असलेला कवी-लेखक त्या शहरातल्या मुशायऱ्यात स्वत:च्या निर्मितीचं पाणी जोखून गेलेला नसणं अगदीच अशक्य. पण डोंबिवलीचे रहिवासी असूनही धामणस्कर कवितांचा रतीब घालत हिंडले नाहीत. हे असं व्रतस्थपणा न मिरवताही ‘दास डोंगरी राहतो’सारखं व्रतस्थ असणं हे धामणस्करांचं आणि त्यांच्या कवितेचं मोठेपण.

ते कवितेसाठी वगैरे जगले नाहीत. ते कोणत्याही अन्य सामान्य डोंबिवलीकरांसारखेच दररोजचं जगणं सहन करत होते. हे असं जगताना कवी/कलाकार आपलं कवी/कलाकारपण नकळतपणे का असेना, पण मिरवतातच. एखाद्याला मधुमेह झाला की जवळचा नातेवाईक आपल्याला त्याची कशी काळजी आहे हे दाखवण्यासाठी मुद्दाम चारचौघांत ‘तुझ्या चहात साखर घातली नाहीये बरं का’ असं बोलून दाखवतो, तसं ही कलाकार मंडळी ‘आम्ही तुम्हा मर्त्यांपेक्षा काही वेगळे आहोत’ असं नेहमी दाखवून सर्वसामान्यास ओशाळं करतात. धामणस्करांनी असं केल्याचा एकही दाखला मिळणार नाही. इतक्या सहजपणे त्यांनी कविता आपल्यात जोजवली, की ती ओळखीची झाल्यावर आपण त्या वेळी धामणस्करांना ओळखू शकलो नाही, याची अनेकांना आता मन:पूर्वक लाज वाटत असेल. यात प्रस्तुत लेखकही आहे. एखाद्या सरकारी कारकुनाप्रमाणे निष्प्रभ असा धामणस्करांचा वावर असायचा. डोंबिवलीतल्या सीकेपी हॉल परिसरातल्या बँक कॉलनीत संध्याकाळी अन्य अनेक नोकरदारांप्रमाणे मान खाली घालून आपल्याच तंद्रीत घरी परतणारे धामणस्कर अनेकांनी पाहिले असतील. आता ते दृश्य आठवलं की वाटतं.. त्या वेळी धामणस्करांना रस्त्यात अडवून त्यांची अथांग कविता लिहिणारे हात एकदा तरी हाती घ्यायला हवे होते..

‘जास्वंदीची डहाळी

हातात फूल घेऊन

गाणे गात गात

वर-खाली झुलू लागली की समजा :

एक पक्षी तिच्यावर येऊन बसला आहे.

कालांतराने ती निमूट झाली की समजा :

पोटार्थी पक्षी

फूल कुरतडून निघून गेला आहे..’

हे वाचल्यावर भीती वाटली होती की आपलंही कवितेवरचं प्रेम हे असंच पोटार्थी तर नाही? जसंजसं धामणस्करांना अधिकाधिक वाचत गेलो तसतशी ही भीती कमी होत गेली आणि धामणस्करांमधल्या सच्चा कवीचीही ओळख होत गेली. या आपल्यातील कवीपणाची ‘वसुली’ समाजाकडून धामणस्करांनी कधीही केली नाही, ही किती मोठी गोष्ट आहे इतकं तरी या व्यवसायात चार दशकं गेल्यानंतर कळलंय आता. कवीनं आपल्याच मठीत असावं आणि फुलावरनं झाड शोधायची गरज वाटलीच तर समाजानं कवितेच्या पाऊलखुणांवरून कवीचा माग काढावा, यातला मोठेपणाही जाणवू लागलाय आताशा. बाजारपेठशरणता जणू प्राक्तनच असं मानत तिचा स्वीकार करण्याची स्पर्धा जोमात सुरू असताना आपल्या आनंदासाठी आपल्याला हवी तशी कविता करणारे धामणस्कर मोठे का, हेदेखील कळू लागलंय काहीसं.

खानोलकर, विंदा, मर्ढेकर, रॉय किणीकर अशा काही मोजक्यांच्या कवितेप्रमाणे धामणस्करांच्या ‘बरेच काही उगवून आलेले..’नंदेखील बरीच खोलवर टोचणी लावली. त्याही वेळी त्यांचे ‘प्राक्तनाचे संदर्भ’ माहीत नाही यावरून बरेच कवीप्रेमी खजिलही झालो होतो. धाकटीवरनं थोरलीची ओळख करून घ्यायची गरज वाटावी तशी त्यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहानं पहिल्याची आस लावली. म्हणजे आधी ‘बरेच काही उगवून आलेले..’, नंतर ‘प्राक्तनाचे संदर्भ’ हाती लागले. त्यांच्या ‘पत्रोत्तर’, ‘कंदील विकणारी मुले’, ‘परिपक्व झाडे’, ‘दुराव्यानंतर’, ‘फळ पिकू आले की’ अशा अनेक कविता इतक्यांदा आतल्या आत वाचल्या गेल्यात की ते सांगताही येणार नाही. या कवितांचा आवाज कधीही वाढत नाही. गवगवा करणाऱ्या चारचौघांत एखादा पुटपुटणारा असला की त्याचं जसं कान देऊन ऐकावं लागतं तशी धामणस्करांची कविता मनातल्या मनात वाचत ऐकावी लागते. तीसुद्धा कान देऊन. कारण काहीही भूमिका न घेता ती अनेक मुद्दय़ांवर भूमिका घेते.

‘हल्ली बागकाम मी फारच मनावर घेतलंय

रोज सकाळ संध्याकाळ फांद्या छाटून झाडांना मनाजोगते आकार द्यायचे

..

बागेची अशी काळजी घेऊन तिला

वेळीच पाणी देत गेले की झाडे

छान तरारतातच; पण आणखीही अद्भुत घडते :

आपण बागेत आलो की

झाडे पिंजऱ्यातील पाळीव पोपटासारखी

प्रेमळ शीळ घालतात. एखाद् दिवस

आपण दिसताच ती जागच्या जागी,

घरच्या पोपटासारखाच, आनंदाने

थयथयाटही करतील.. आपण अगदी

मनावरच घेतलं तर काय अशक्य आहे?’

असं जेव्हा धामणस्करांची कविता विचारते तेव्हा ती सामाजिक/ राजकीय भूमिका घेत नाही, असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला राहात नाही. ही अशी संयतता त्यांच्या कवितेचं मोठेपण आहे.

उद्या, सोमवारी २६ ऑक्टोबरला धामणस्कर नव्वदीचे होतील. अवघंच, पण कमालीचं सकस लिखाण इतकी वर्ष करीत असूनही साहित्यिक उचापतखोरांकडून ‘अमृत’, ‘हीरक’, ‘सहस्रचंद्रदर्शन’ वगैरे महोत्सवी सत्कारांपासून स्वत:चा बचाव ते करू शकले ही कमालच म्हणायची. धामणस्कर उद्याच्या कवींना मार्गदर्शनही करत नाहीत हेदेखील तसं आक्रीतच.

ते करायची गरज नाही अशी कविता त्यांनी लिहून ठेवलीये.

धामणस्करांच्या शारीर वयाची शताब्दीही व्हावी. त्यांच्या कवितेनं अशी शतकांची हमी आधीच आपल्याकडून घेतलेली आहे. बरंच काही उगवून येत असताना धामणस्करांची कविताही उगवलेलीच राहील, ही आनंदाची बाब.

‘माझी चाहुल लागताच पक्षी

घाबरून आकाशात उडाला.. मी

माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले :

क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे

विराटाकडे धाव घेतात..’

त्यांच्या कवितेला अशा क्षुद्रांचा धोका नाही. पण तरीही जन्मत:च शहाणी असल्यानं ती कधीच विराटाच्या वाटेवर निघालेली आहे.

त्या कवितेला अभिवादन!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 12:44 am

Web Title: girish kuber article on poet d b dhamanaskar zws 70
Next Stories
1 ‘हिमरू’ कलेचा सृजनशील तंत्रज्ञ
2 पुलंच्या विधानाला जागलेले विनायकदादा..
3 ध्रुवीकरणाचा ‘धर्म’प्रश्न..