|| हरिहर कुंभोजकर

जो विश्वाकार आहे त्याला वस्त्र कसे नेसवणार? जो तृप्त आहे त्याला नैवेद्य कशाचा दाखवणार? जो वेदांनाही कळला नाही त्याचे स्तवन कसे करणार?… मूर्तिपूजेचे ‘षोडशोपचार’ एरवी ठीक; पण मूर्तिपूजेला पंचायतनाचे अधिष्ठान देणाऱ्या आद्य शंकराचार्यांनीच सांगितलेली, त्यापलीकडे जाणारी ‘परापूजा’ कोणती?

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

या वर्षी १७ मे रोजी शंकराचार्य जयंती आहे. भारतीय पंचांगाप्रमाणे हा दिवस वैशाख शुद्ध पंचमी असतो. भारतातील एका श्रेष्ठ तत्त्वज्ञान्याचा तो जन्म दिवस. पण आदि-शंकराचार्य या नावाचा उल्लेख सुशिक्षित भारतीयांच्या वर्तुळात क्वचितच होताना आढळतो. पुरोगामी लोकांना शंकराचार्य हे उच्चवर्णीय हिंदूंच्या बुरसटलेल्या विचारसरणीचे प्रतीक वाटते, तर धार्मिक हिंदूंना आचार्य परलोकी मिळवायच्या मुक्तीचे मार्गदर्शक वाटतात. पण या लोकीच मुक्ती मिळवायचे मार्ग त्यांनी सांगितले आहेत, याकडे कुणाचेच लक्ष गेलेले नसते. त्यामुळे, त्यांच्या ‘परापूजास्तोत्रा’कडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

परापूजास्तोत्रात कोणत्याही देवतेची स्तुती नाही. ते स्तोत्र अद्वैत तत्त्वज्ञानाचे काव्यमय प्रकटीकरण आहे. परापूजास्तोत्रात दहा श्लोक आहेत. पहिल्या श्लोकात आचार्य सच्चिदानंदस्वरूपाशी आपण तादात्म्य पावल्यावर पूजेचा विधी कोणता, असा प्रश्न उपस्थित करतात. पूजाविधीसाठी पूजा घेणारा आणि पूजा करणारा दोघे अस्तित्वात असावे लागतात. येथे तर दोघे एकत्व पावले आहेत. मग पूजा कोणी कोणाची करायची? नंतरच्या आठ श्लोकांत सगुण-साकार देवासाठी सांगितलेला रूढ पूजाविधी निर्गुण, निराकार अनंतासाठी कसा अशक्य आणि निरर्थक ठरतो हे ते स्पष्ट करतात. शेवटच्या श्लोकात काव्यमय कलाटणी देऊन, आपण स्वत: ही ‘पूजा’ कशी करतो हे ते सांगतात; तीच ही ‘परापूजा’!

‘परा’ या शब्दाचा एक अर्थ ‘पलीकडची’ असा आहे; तर दुसरा अर्थ ‘उत्कृष्ट किंवा अधिक वरच्या दर्जाची’ असाही आहे. दोन्हीही अर्थ येथे योग्य आहेत. कारण आठ श्लोकांत वर्णन केलेले अनुभव आणि तर्क आपल्याला पूजेपलीकडच्या अवस्थेत घेऊन जातात. दहाव्या श्लोकात श्रेष्ठ पूजेचा मार्ग सांगितला जातो. त्यांनी सांगितलेली परापूजा आश्चर्य वाटेल इतकी धर्मातीत आहे.

मात्र आचार्यांच्या काव्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वसामान्य हिंदू माणूस ईश्वराची पूजा कशी करतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. आणि या पूजाविधीचा अर्थ समजण्यासाठी परमेश्वराकडे पाहण्याचा हिंदू दृष्टिकोन कळणे गरजेचे आहे. हिंदू भक्त परमेश्वराला ‘त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव’ म्हणतो. भारतीय परंपरेने केवळ अतिथीलाच देव मानले नाही, तर देवालाही आपला आप्त अथवा पाहुणा मानले आहे. ज्ञानेश्वरांसाठी, पैलतीरी कोकत असणारा काऊ ‘पाहुणे पंढरीराऊ’ घरास येणार आहेत असा निरोप घेऊन येतो. श्रावण-भाद्रपदात खेडेगावात ‘गौराई आमची बाळाई, सकरुबा आमचा जावई’ हे लोकगीत आजही म्हटले जाते. श्रावणात येणारी गौर माहेरवाशीण असते, शंकर जावई असतो आणि या दाम्पत्याच्या मुलाला निरोप देताना सर्वसामान्य मराठी माणूस ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे कौतुकाने म्हणतो. हिंदू व्यक्तीच्या घरात मंगलकार्य असेल तर त्याची निमंत्रणपत्रिका प्रथम देवापुढे ठेवून देवाला कार्याला येण्याचे निमंत्रण दिले जाते. देवाला ‘आवडता पाहुणा’ मानल्यामुळे हिंदूंच्या पूजा-पद्धतीत आणि पाहुण्याचे स्वागत करण्याच्या चाली-रीतीत विलक्षण साम्य आढळते. षोडशोपचार पूजेत सोळा उपचार सांगितले आहेत. त्यातील प्रत्येक उपचार पाहुणचाराशी संबंधित आहे. उदाहरणादाखल हे उपचार पाहा : (१) आवाहन किंवा प्राणप्रतिष्ठा, म्हणजे पाहुण्यांचे स्वागत करणे (२) बसायला आसन देणे (३) अभिषेक म्हणजे स्नान घालणे, (४) नैवेद्य दाखवणे म्हणजे पाहुण्याला भोजन देणे, (५) विसर्जन करणे म्हणजे पाहुण्याला समारंभपूर्वक निरोप देणे.

पण शंकराचार्यांना यातले काहीच करता येत नाही. परापूजा स्तोत्रात शंकराचार्य पहिल्याच श्लोकात विचारतात :

अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्परूपिणे ।

स्थिते अद्वितीय भावेस्मिन कथं पूजा विधीयते ।।

अनुवाद :

अखंड सच्चिदानंदी पावता एकरूपता ।

लोपता भाव द्वैताचा पूजेचा विधि कोणता ।।१।।

परब्रह्माशी एकरूप झाल्यावर पूजा करणाऱ्याला जर वेगळे अस्तित्वच उरले नाही, तर पूजेचा विधी कोणता असू शकतो? नंतरच्या आठ श्लोकांत पूजाविधीतला प्रत्येक उपचार कसा निरर्थक किंवा अशक्य आहे हे ते स्पष्ट करतात. मातीच्या मूर्तींत देव नसतो. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्यात देवत्व येते. त्यासाठी भक्त परमेश्वराला अमुक मूर्तीत ये असे आवाहन करतो. मग तो देव होतो. पण ब्रह्म सर्वव्यापी असल्याने ते सर्व ठिकाणी सर्वकाळी असतेच. म्हणजे ब्रह्माला ‘अमुक जागी ये’ हे आवाहन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा अशक्य आहे. तीच गोष्ट पूजेतील प्रत्येक उपचाराची होते.

जो विश्वाकार आहे त्याला वस्त्र कसे नेसवणार? जो तृप्त आहे त्याला नैवेद्य कशाचा दाखवणार? जो वेदांनाही कळला नाही त्याचे स्तवन कसे करणार? जो चराचरांत भरलेला आहे त्याचे विसर्जन कोठे करणार? अशा प्रकारे षोडशोपचार पूजेतील विधी एक तर अशक्य ठरतात, नाही तर निरर्थक तरी. त्यामुळे, परमेश्वर पूजेच्या पलीकडे आहे. अशा ईश्वराची पूजा कशी करायची? पण पूजेच्या पलीकडेही एक पूजा आहे. ती श्रेष्ठ पूजा आहे. ती ते दहाव्या श्लोकात सांगतात. ती आहे, प्रत्येक काम परमेश्वराची पूजा समजून करणे :

सञ्चार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्राणि सर्वा गिरो

यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम् ।।१०।।

अनुवाद

चालती पाउले तुझी प्रदक्षिणा।

सर्वदा स्तोत्रांना। वदे वाणी।।

जे मी करी ते ते तुझी आराधना

अन्य ना साधना। शंभू देवा।।१०।।

आचार्यांनी येथे शंभूचा उल्लेख केला आहे, कारण परंपरेने ते शैव होते. पण बद्रिनाथाची मूर्ती शोधून तिची स्थापना त्यांनीच केली. बद्रिनाथला विष्णूची उपासना केली जाते. त्यांनी अनेक देवी-देवतांची स्तवने रचली. पंचायतनाची पूजा त्यांनीच सुरू केली. पंचायतनपूजेला आध्यात्मिक ‘नज थिअरी’ म्हटले पाहिजे. पंचायतनात केंद्रस्थानी ‘इष्ट देवता’ असते आणि तिच्या चारी बाजूला शिव, विष्णू, गणेश आणि सरस्वती असतात. हिंदूच्या बहुतेक तीर्थक्षेत्रांत स्थानदेवतेच्याच प्रांगणात अनेक अन्य देवांची छोटी देवळे असतात. ‘तुमचा देव पूजा; पण अन्य देवांचीही बूज राखा’ ही त्यामागची भावना असते. ‘माझाच देव खरा’ या एकेश्वरी धार्मिक उन्मादावर पंचायतन हा उतारा आहे. आचार्यांनी दोनदा भारतभर भ्रमण करून हे कार्य केले.

आज जर आचार्य असते, तर कदाचित, जगभर फिरून जगातील सर्व धर्मांना एकत्र आणणाऱ्या ‘धर्मपंचायतना’ची स्थापना करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता: ‘तुम्ही परंपरेने करत असलेली उपासना केंद्रस्थानी ठेवा; पण, त्याचबरोबर अन्य उपासना पद्धतीचा आदर राखा’, अशी शिकवण दिली असती. अनेक उपास्य-देवतांना आणि उपासना-पद्धतींना एकत्र आणणे ही ‘विश्वात्मक’ देवाकडे जाण्याची एक पायरी असते. अंतिम पायरी परापूजा, पूजेच्या पलीकडे जाणे, आपले प्रत्येक काम ईश्वर-पूजाच आहे या भावनेने करणे

अशी परापूजा धर्माच्या व्यासपीठावरून अधिकारवाणीने सांगणाऱ्या संन्याशाची उणीव, आजच्या जागतिक परिस्थितीत, प्रकर्षाने जाणवते.

hvk_maths@yahoo.co.in