22 November 2019

News Flash

आगरकर का आठवतात?

महाराष्ट्राने आता आतापर्यंत मोठी माणसे पाहिली.

|| प्रसाद हावळे

महाराष्ट्रीयांच्या विवेकाला साद घालत मराठी विचारविश्वाची जडणघडण करणाऱ्या ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या शतकोत्तर रौप्य स्मृती वर्षांची सुरुवात १७ जून रोजी होत आहे. अवघे ३९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या आगरकरांनी सर्वव्यापी चिकित्सेचा आग्रह धरत उंचावलेला विवेकाचा ध्वज फडकत ठेवण्याची, किंबहुना अधिक उंच करण्याची जबाबदारी आजच्या महाराष्ट्रीयांवर आहे. महाराष्ट्रीयजन ते करणार का?

महाराष्ट्राने आता आतापर्यंत मोठी माणसे पाहिली. खुजांच्या लांबोडक्या सावल्यांच्या छायेत वावरणाऱ्या आजच्या महाराष्ट्रास याची कितपत जाणीव असेल, ठाऊक नाही. पण आजच्या महाराष्ट्रीय जीवनाचे हेच खुजेपण आधीच्या महाराष्ट्रातील मोठय़ांची आठवण नेहमी करून देत असते. त्या मोठय़ा माणसांची यादीही तशी मोठीच (अशांच्या याद्या करण्याचा प्रयत्न वि. का. राजवाडेंपासून अनेकांनी केला आहेच!); मात्र त्यातले काही तर आताही तितकेच, किंबहुना कांकणभर अधिकच ‘आज’चे वाटू लागलेत. गोपाळ गणेश आगरकर हे त्यांपैकी एक. अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरात घडलेल्या अनेक घटना या आगरकरांची आठवण पुन:पुन्हा निघावी, अशाच होत्या.

पहिली घटना तर अगदी अलीकडे घडलेली. तिही थेट आगरकरांशी संबंधित. झाले असे की, यंदाच्या जानेवारीत साताऱ्याच्या टेंभू गावात- म्हणजे आगरकरांच्या जन्मगावी असलेल्या त्यांच्या पुतळ्याची मोडतोड एका टोळक्याने केली. महाराष्ट्रीय विचारविश्वाची घडण केलेल्या या विचारकाच्या पुतळ्याच्या विटंबनेने मात्र महाराष्ट्र कणभरही हलला नाही. त्याला कारणे अनेक. त्यातले प्रमुख दिसते ते जातीय. आपापल्या जातींची कप्पेबंदी करण्याची खोड आता महाराष्ट्राच्या अंगवळणी पडल्याचेच हे लक्षण. अन्यथा, महाराष्ट्रीयांच्या विवेकाला साद घालणाऱ्या आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना मराठी स्मृतीतून विरघळून गेली नसती. आगरकरांनी जातिव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली नाही, त्यांच्यापुढे केवळ पुण्याच्या ब्राह्मणांचेच जगणे होते, त्यांच्याशीच ते संवाद करत होते, महात्मा फुलेंची वा त्यांच्या चळवळीची त्यांनी दखलच घेतली नाही.. अशी टीका आगरकरांवर केली जाते. त्यातला तपशिलांचा भाग काही प्रमाणात तथ्याचा वाटला; तरी मग हयातीतच आगरकरांनी स्वत:ची प्रेतयात्रा पाहिली, ती कशासाठी? ‘तुम्ही सुधारणा करताय ना, तर तुम्हा सुधारकांचीच एक वेगळी जात करा’ असेही सल्ले त्यांना दिले गेले, ते का? सत्यशोधकांच्या ‘दीनबंधू’ने एका लेखात- ‘न्हाव्यांनी कट करून विधवाकेशवपनाची राक्षसी चाल बंद पाडावी’ अशी सूचना केली; तिचे आगरकरांनी ‘दीनबंधू’कारांचे अभिनंदन करत स्वागत केले, ते काय होते? बालविवाहाला विरोध, संमतिवयाच्या कायद्याला पाठिंबा, अनिष्ट रूढींवर प्रहार आगरकरांनी केला, त्याचे कारण काय? स्त्री व पुरुषांना समान शिक्षणाची मागणी आगरकरांनी का केली? आगरकरांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह हा अंतिमत: महात्मा फुलेंच्या विचाराला पूरकच ठरणारा आहे, हे आपल्या ध्यानात का येत नाही?

प्रश्नांची यादी अशी आणखी वाढवता येईल. पण आता थोडे आगरकरांच्या घडणीकडे पाहु या. टेंभूसारख्या गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले (१४ जुलै १८५६) आगरकर मामलेदार कचेरीत काम करून, कधी माधुकरी मागून शिक्षणासाठी वणवण फिरले. कऱ्हाड, रत्नागिरी, अकोला अशा ठिकाणी शिक्षण घेत ते १८७५ साली पुण्यात आले. डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथे टिळक त्यांचे सहाध्यायी, मित्र होते. दोघेही बुद्धिमान. देशाभिमानी. भौतिक सुखाचा मार्ग त्यागून दोघेही विष्णुशास्त्री चिपळूणकरांना जाऊन मिळाले. त्यांनी पुण्यात १८८० साली ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. त्याच्या पुढच्याच वर्षी ‘मराठा’ आणि ‘केसरी’ ही वर्तमानपत्रे काढली. टिळक ‘मराठा’चे, तर आगरकर ‘केसरी’चे संपादक. दोघांनी निर्भीडपणे ती चालवली. कोल्हापूर संस्थानच्या दिवाणांनी केलेल्या कारस्थानांची कठोर शब्दांत टीका दोघांनी केली. या दिवाणांनी अब्रुनुकसानीचा दावा लावला. दोघांनाही चार महिन्यांची शिक्षा झाली आणि डोंगरीच्या तुरुंगात रवानगी झाली (त्याबद्दलचे ‘डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस’ हे अप्रतिम अनुभवकथन आगरकरांनी लिहिले आहे.). तिथून सुटल्यावर मात्र टिळक-आगरकरांनी फग्र्युसन महाविद्यालय स्थापण्यात पुढाकार घेतला.

पण पुढे दोघांच्यात मतभेद झाले. त्याला अनेक कारणबिंदू असले, तरी गाभ्याचे कारण हे दोघांच्या वैचारिक बैठकीत आहे. आणि तेच भारतीय समाजाच्या मन:प्रवाहाचे दोन कोन आहेत. टिळकांवर सनातनी विचारांचा पगडा अधिक. एकाएकी सामाजिक रूढी तोडण्यास त्यांचा विरोध. तर आगरकर त्याउलट. त्यांनी विद्यार्थिदशेतच मिल, स्पेन्सर, गिबन, रुसो, व्हॉल्टेअर, मोर्ले आदी विचारवंतांचे ग्रंथ वाचलेले होते. त्यामुळे युरोपातल्या उदारमतवादाचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य-समता या तत्त्वांचा त्यांच्यावर अधिक प्रभाव.

इथे आणखी एक बाब ध्यानात घ्यावी लागेल, ती म्हणजे अव्वल इंग्रजीत घडलेले स्थित्यंतर! ब्रिटिश संपर्क आणि शिक्षणामुळे इथे आधुनिकता बाळसे धरू लागली होतीच; पण इंग्रजांच्या आर्थिक धोरणांमुळे उत्पन्नाचीही साधने तयार होऊ लागली होती, ती जिथे आहेत त्या शहरांकडे स्थलांतर सुरू झाले होते, गावगाडय़ाला पहिला धक्का तिथेच मिळाला होता आणि एकत्र कुटुंबाचा आर्थिक पाया ढासळू लागला होता. त्यामुळे आगरकरांसारख्या साक्षेपी विचारकाला ‘व्यक्ती’विचार महत्त्वाचा वाटला, हे योग्य झाले. त्यामुळे आगरकर वेगळे झाले. त्यांनी १८८८ साली ‘सुधारक’ हे पत्र सुरू केले. त्यातून ते विचार मांडू लागले.

‘सुधारक’मधले आगरकर आजही आठवावे असेच! नव्हे, त्यांची हटकून याद यावी, असेच लेखन त्यांनी त्यात केले. तेही निर्भीडपणे अन् एकाकी, जर्जर अवस्थेत. त्यात टिळकांबरोबरच्या त्यांच्या (आणि टिळकांकडूनही) वादाने गाठलेले व्यक्तिगत टोक हा(च) चर्चेचा विषय झाला. त्याला वलय मिळाले. पण त्या वलयात आगरकरांनी ‘सुधारक’मध्ये मांडलेले मूलभूत विचार झाकोळले गेले.

अलीकडे शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वाद पेटला. तेव्हा आगरकरांचा ‘सोंवळ्याची मीमांसा’ हा लेख आठवल्याशिवाय राहिला नाही. त्यात ते लिहितात : ‘पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिकांस विश्वासाशिवाय त्राता नाहीं व थारा नाहीं. या संबंधानें बुद्धिवादांचे नांव काढलें कीं त्यांच्या अंगावर काटा उभा रहातो! श्रद्धाळू धार्मिकांस आपल्या धर्मसमजुती व त्यांवर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाहीं. या तीव्र धगीचा खरपूस ताव देण्यास तयार होण्यांत त्यांची धडगत दिसत नाही! त्यांना अशी भीति वाटते कीं, ते हिणकस ठरल्यास पुढें काय करावें? आम्हांस असें वाटतें कीं, असलें भित्रेपण फार दिवस चालावयाचे नाहीं. विवेक पूर्ण जागृत झाला नव्हता तोंपर्यंत विश्वासाने किंवा श्रद्धेनें प्रत्येक गोष्टींत आपला अंमल चालविला, यांत कांही वावगें झालें नाही. पण हें कोठपर्यंत? अधिक चांगले तत्त्व अस्तित्वांत आलें नाहीं तोपर्यंत. तें आलें कीं जुन्या प्रमादी तत्त्वानें आपली राजचिन्हें श्रेष्ठ तत्त्वाच्या स्वाधीन केली पाहिजेत.’

हा एकच लेख नाही, तर स्त्री-स्वातंत्र्याचे विचार मांडणारे त्यांचे- ‘स्त्रियांस चरितार्थसंपादक शिक्षण देण्याची आवश्यकता’, ‘विवाहनिराकरण अथवा घटस्फोट’, ‘घटस्फोट अथवा काडीमोड’, ‘स्वातंत्र्याच्या वृथा वल्गना’, ‘मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता’ हे लेखही वारंवार आठवत राहतात. बोलके सुधारक, कर्ते सुधारक आणि सुधारणानिंदक असे तीन वर्ग आगरकरांनी केले आणि आपण- ‘इष्ट असेल तें बोलणार व साध्य असेल तें करणार’ हेही सांगितले. त्यांचा ‘आमचे दोष आम्हांस कधीं दिसूं लागतील?’ हा लेखही तसाच. त्यातील पुढील भाग वाचला, की आगरकर ‘आज’चे का ते कळते : ‘अलीकडे देशाभिमान्यांची जी एक जात निघाली आहे, तिच्यापुढें इंग्रजांची किंवा दुसऱ्या कोणत्याही अर्वाचीन, युरोपिअन लोकांची उद्योगाबद्दल, ज्ञानाबद्दल, किंवा राज्यव्यवस्थेबद्दल प्रशंसा केली कीं, तिचें पित्त खवळून जातें! या जातवाल्यांना दुसऱ्याचा उत्कर्ष किंवा त्याची स्तुति साहण्याचें बिलकूल सामथ्र्य नाहीं! पण करतात काय बिचारे! सूर्याला सूर्य म्हटल्याखेरीज जसें गत्यंतर नाहीं, तसें युरोपिअन लोकांचें श्रेष्ठत्व या घटकेस तरी नाकबूल केल्यास आपलें हंसें झाल्यावांचून राहणार नाहीं, हें त्यांना पक्कें ठाऊक आहे! तेव्हां ते काय हिकमत करितात कीं नेटिव युरोपियनांची तुलना करण्याची वेळ आली कीं, ते आपल्या गतवैभवाचें गाणें गाऊं  लागतात! या एककल्ली देशाभिमान्यांना आम्ही असें विचारितों कीं, बाबांनों, तुम्ही अशा प्रकारें गतवैभवाचें गाणें गाऊं  लागलां म्हणजे तुमच्या पक्षाचें मंडन न होतां उलट मुंडण होतें! पुष्कळ देशाभिमान्यांस अशा प्रकारचें लिहिणें आवडत नाहीं. पण आम्हीं त्याला काय करावें? जी गोष्ट उघडपणें बोलून न दाखविणें म्हणजे आजमितीस मोठा अपराध करणें आम्हांस वाटतें, ती बोलून टाकल्यावाचून आमच्यानें राहवत नाहीं, याला आमचा काय इलाज आहे? ज्या लोकांना आमची ही आत्मनिंदा रुचत नाहीं, त्यांनीं आम्हांस आत्मस्तुति करण्यासारखें आम्हीं गेल्या दोन हजार वर्षांत काय केलें आहे, हे दाखविण्याची कृपा करावी.’

आगरकर आज पुन्हा आठवण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचा चिकित्सेचा आग्रह! त्यांनी महाराष्ट्रीयांस लिहिलेले ‘अनावृत पत्र’ हे आजच्या महाराष्ट्राकडे पाहता चिंतनीय आहे. त्यात ते म्हणतात, ‘बांधवहो, विचारकलहाला तुम्हीं इतके कशासाठीं भितां? दुष्ट आचाराचें निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहींत. आजपर्यंत या देशांत हा कलह माजावा तितका कधीच न माजल्यामुळें व बहुधा आमचे लोक गतानुगतिकच असल्यामुळें हे भरतखंड इतकीं शतकें अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडलें आहे. हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊं न देण्याविषयीं मात्र खबरदारी ठेवली पाहिजे. नाहींतर त्यापासून पुढें खऱ्या लढाया आणि रक्तस्राव होण्याचा संभव असतो.’

आगरकरांच्या शतकोत्तर रौप्य स्मृती वर्षांचा प्रारंभ होताना, प्रश्न पडतो तो हाच की- आगरकरांचा विवेक आजचा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंगीकारणार का?

prasad.havale@expressindia.com

First Published on June 15, 2019 11:23 pm

Web Title: gopal ganesh agarkar 3
Just Now!
X