राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात राष्ट्रवादाचे निव्वळ सुलभीकरण आहे, परंतु रणगाडय़ाचा राष्ट्रवाद धोकादायक आहे. राष्ट्रवादाचे अंतिम ध्येय शांततामय सहजीवनाचे, युद्ध होता होईतो टाळण्याचे आहे. त्याऐवजी युद्धखोर राष्ट्रवादाचे प्रतीक आणि पुरस्कार यांसाठी उदारमतवादी राष्ट्रवाद पुसून टाकणार का?
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ‘ओझे’ किती असावे याविषयी काही काळापूर्वी महाराष्ट्रात हिरिरीने मोहीम राबवली गेली आणि नंतर, आपल्या हिरिरीच्या मोहिमा ज्या झपाटय़ाने ओसरून जातात त्याच झपाटय़ाने विरूनही गेली. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे तर कमी झाले नाहीच, पण त्यांच्यावर आणि त्यांच्या मोठय़ा- कॉलेजात जाणाऱ्या भावा- बहिणींवर अनेक नवी ओझी मात्र येऊन पडली आहेत. ही ओझी आपल्या ‘भावी पिढीकडून असणाऱ्या अपेक्षांची’ जशी आहेत तशीच जुन्या पिढीच्या अपयशांचीदेखील आहेत. तिसरीकडे, आपल्या शिक्षणव्यवस्थेत असलेल्या दिशाहीनतेची ओझीदेखील आपण विद्यार्थ्यांनाच वाहायला लावतो आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा (आणि तितकाच दुर्दैवी) भाग म्हणजे एक राष्ट्रीय समाज म्हणून आपल्याला नेमके काय साधायचे आहे, कोणते भविष्य घडवायचे आहे याच्याविषयीची स्पष्टता आपण हरवत चाललो आहोत. या हरवलेपणाचे ओझेदेखील विद्यार्थ्यांच्या-तरुणांच्या वाकलेल्या खांद्यांवर ढकलण्याचे प्रयत्न आपण चालवले आहेत. विद्यार्थ्यांना नव्याने ‘राष्ट्रवाद’ शिकवण्याच्या सध्याच्या तडफदार मोहिमेत या नव्या-जुन्या ओझ्यांचे दाखले एकत्र आलेले दिसतील.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जाहीर शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी आपली स्वत:ची गणनादेखील परीक्षार्थीमध्ये केली आणि बजेटरूपी परीक्षेत त्यांचे सरकार पास होते की नापास याची परीक्षा करोडो देशवासीय घेणार आहेत असे या मुलांना सहानुभूतीखातर सांगितले. दहावीची परीक्षा देणाऱ्या एका मुलीची याविषयी मार्मिक प्रतिक्रिया होती. तिचे थोडक्यात म्हणणे असे की, ही भूमिकांची गल्लत कशासाठी? विद्यार्थी परीक्षा देतात आणि सरकार बजेटनामक एक गुंतागुंतीचे प्रौढ प्रकरण हाताळते यातला (तपशील माहीत नसला तरी) फरक आम्हाला माहीत आहे. आणि कृपया तो फरक तसाच राहू दे. त्यासाठी सरकारच्या भूमिकांचे प्रतीकात्मक सुलभीकरण घडवण्याची गरज नाही. तिचेच म्हणणे पुढे चालवायचे झाले तर विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे आपले नेमके आकलन कोणते आणि त्या आकलनानुसार आपण त्यांच्यावर जबाबदारीची किती आणि कशी ओझी टाकणार याविषयीसुद्धा थोडी स्पष्टता असायला हवी.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आणि आणखी काही नामवंत केंद्रीय विद्यापीठांच्या, प्रख्यात शिक्षणसंस्थांच्या विद्यार्थ्यांवर आपण ‘देशद्रोहा’ची गंभीर जबाबदारी टाकली. यापकी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाविषयीच्या काही जणांच्या तीव्र भावना काही अंशी समजू शकतात. जेएनयू हे एक अभिजन विद्यापीठ आहे आणि तो डाव्या विचारांचा बालेकिल्ला आहे, अशा त्याविषयीच्या प्रतिमांमधून जेएनयूविषयी टोकाच्या तीव्र भावना असू शकतात. आणि त्याचे दुर्दैवी प्रत्यंतर अलीकडच्या घटनांमधून आले. परंतु या तथाकथित ‘देशद्रोही’, देशाविरुद्ध कट-कारस्थाने घडवण्याची क्षमता असणाऱ्या (!) विद्यार्थ्यांना राष्ट्रवाद नव्याने शिकवण्याचा कुठला मार्ग सरकारने शोधला? एक म्हणजे केंद्रीय विद्यापीठांमध्ये दोनशे सात फुटांवर राष्ट्रध्वज फडकत ठेवण्याचा फतवा निघाला. पाठोपाठ शाळकरी मुलांवरही राष्ट्रवादाचे ताबडतोबीचे संस्कार व्हावेत म्हणून केंद्रीय विद्यालयांनाही तेच आदेश देण्यात आले. सगळ्यात कहर केला तो माजी सनिकांनी. विद्यार्थ्यांना राष्ट्रवादाची ठसठशीत संथा देण्यासाठी जेएनयूच्या आवारात एक प्रदर्शनीय रणगाडा आणून ठेवण्याची सूचना त्यांनी केली आहे.
या उपायांमध्ये जशी विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबतची गल्लत आहे तशीच राष्ट्रवाद म्हणजे काय याविषयीचीदेखील. राष्ट्रवादाच्या कोणत्याही मांडणीत प्रतीकांना महत्त्व असते. म्हणून राष्ट्रध्वजाचे प्रतीकही महत्त्वाचे बनते. परंतु सामाजिक शास्त्रांपासून तर अणुविज्ञानापर्यंत नानाविध विषयांचा सखोल परामर्ष घेणारी आपली महाविद्यालयीन मुले राष्ट्रध्वजाचे प्रतीक ओलांडून केव्हाच पुढे गेली असतील हे लक्षात घ्यायला नको काय? राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात राष्ट्रवादाचे निव्वळ सुलभीकरण आहे, परंतु रणगाडय़ाचा राष्ट्रवाद धोकादायक आहे. देशाच्या रक्षणार्थ सीमेवर लढणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता बाळगूनदेखील राष्ट्रवादाचे अंतिम ध्येय शांततामय सहजीवनाचे, युद्ध होता होईतो टाळण्याचे आहे. त्याऐवजी युद्धखोर राष्ट्रवादाचे प्रतीक आणि पुरस्कार विद्यार्थ्यांच्या ‘कोवळ्या’ मनावर घातक संस्कार करणारे ठरेल. शिवाय युद्धखोर राष्ट्रवाद आक्रमक राष्ट्रविरोधालाही जन्म देतो, ही बाब विद्यार्थ्यांना राष्ट्रवाद शिकवताना आपण ध्यानात घेणार की नाही?
प्रतीकात्मकतेच्या पलीकडे जाणारा आशयसंपन्न राष्ट्रवाद साकारण्यात एक राष्ट्रीय समाज म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत आणि या अपयशी राष्ट्रवादाचे ओझे नव्या पिढीवर लादून त्यांना जणू वठणीवर आणण्याचे उद्योग आपण चालवले आहेत. दिल्लीत ज्या वेळी वकील आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांना, पत्रकारांना मारहाण होत होती, त्याच वेळेस शेजारच्या हरियाणात जातियुद्ध पेटले होते. गुजरातेत हार्दकि पटेल नावाचा आणखी एक ‘देशद्रोही’ तरुण पाटीदारांसाठी आरक्षणाची मागणी करत होता. कापूंनी आंध्र प्रदेश पेटवला होता आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची तात्पुरती थंडावलेली चळवळ केव्हा पेट घेईल याचा नेम नव्हता; आजही नाही. जाटांसारख्या अनेक प्रस्थापित शेतकरी जातींनी केलेली आरक्षणाची मागणी आणि तिचे हिरिरीने नेतृत्व करणारे हार्दकि पटेलसारखे तरुण या दोन्ही घटना अंतिमत: निरनिराळ्या सामाजिक गटांच्या आíथक- भौतिक वैफल्याचे, विकासप्रक्रियेत योग्य वाटा न मिळाल्याने निर्माण झालेल्या असमाधानाचे प्रतीक आहे याविषयी अनेकदा लिहिले गेले आहे. त्याचबरोबर ते आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या दारुण अपयशाचेदेखील प्रतीक आहे.
राजस्थानमधल्या ‘कोटा’ शहरात स्पर्धापरीक्षांच्या तुरुंगात अडकलेली हजारो मुले आणि त्यांच्या नित्यनेमाने येणाऱ्या आत्महत्यांच्या बातम्या; लष्करभरतीच्या आशेने उन्हापावसात आलेले, त्यात नापास होण्याच्या भीतीने कॉपी करू पाहणारे आणि त्यांनी कॉपी करू नये म्हणून घेतलेल्या खबरदारीचा भाग म्हणून नेसत्या (अंत)र्वस्त्रानिशी परीक्षा देणारे आपले हजारो भावी जवान; शिक्षक-बसचालक-शिपाई अशा ‘जिवाभावाच्या’ माणसांपासून बलात्काराच्या भीतीने स्वत:चा बचाव करू पाहणाऱ्या शाळकरी आणि कॉलेजातल्या मुली आणि त्यांचे भांबावलेले पालक; रस्त्यावरच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या मुली; अस्पृश्यता कायद्याने बंद होऊन युगे लोटल्यानंतरही दलितांना वेगळा गणवेश देणाऱ्या, त्यांना स्वतंत्रपणे बसवणाऱ्या आपल्या शाळा आणि दलित बायकांनी शिजवलेले अन्न आमची मुले खाणार नाहीत असा पण केलेले पालक, ही आपल्या अपयशी राष्ट्रवादाची विषण्ण चित्रे आहेत आणि त्याच्या झळा समस्त विद्यार्थीवर्गाला कमी-अधिक प्रमाणात दैनंदिन आयुष्यात, रोजच्या घडीला सोसाव्या लागत आहेत. एकामागोमाग एक पदव्या मिळवल्यानंतरही मनाजोग्या नोकरीची कोणतीच शाश्वती नसणारे आणि पदव्यांच्या भडिमारात धड कोणतेच कौशल्य प्राप्त करू न शकलेले आपले तरुण आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तारांकित विद्यापीठांमध्ये आपली विद्यापीठे का नाहीत, या गहन चच्रेत अडकलेले शैक्षणिक अभिजन, अशा टोकाच्या हेलकाव्यांमध्ये आपले विद्यार्थीविश्व अडकले आहे. या हेलकाव्यांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रध्वजांची उंची किती याविषयीची हिरिरीने चर्चा घडवून काय साधणार?
निव्वळ चर्चाच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आणि शैक्षणिक क्षेत्राच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून भारतीय राष्ट्राने विद्यार्थ्यांना आपले जणू काही मुख्य शत्रू ठरवल्याचे चित्र गेल्या काही काळात दिसते. विवेकी राष्ट्रवादाला आपल्या मर्यादांचे भान असते आणि या विवेकात कोणता प्रश्न किती ताणायचा याविषयीची जाणीवदेखील काम करत असते. जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांवर तुटून पडलेले टीव्हीवरील पत्रकार, ट्विटरकत्रे आणि वकील यांनी जसे सार्वजनिक अविवेकाचे दर्शन घडवले, तसेच रोहित वेमुला खरेच दलित विद्यार्थी होता की नाही याचा जंगजंग शोध घेणाऱ्या सरकारनेही. दिल्लीच्या पोलीसप्रमुखांनी यावर कडी करून आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याची अभूतपूर्व जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकली. या उन्मादी, अविवेकी सार्वजनिक विचारविश्वाच्या चौकटीत राष्ट्रध्वजाभोवती आणि रणगाडय़ाभोवती गुंफला गेलेला प्रतीकात्मक राष्ट्रवाद आत्मसात करायचा म्हणजे विद्यार्थ्यांनी आजवर शिकलेले सहिष्णू, उदारमतवादी राष्ट्रवादाचे धडेदेखील पुसून टाकले पाहिजेत. त्यांच्यावर येऊन पडलेले हे आणखी एक नवे ओझे!

राजेश्वरी देशपांडे
लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. ई मेल
rajeshwari.deshpande@gmail.com