भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या इतिहासात डॉ. शोभना गोखले यांच्या संशोधनानं मोलाची भर घातली. ब्रुसेल्स येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय नाणकशास्त्र परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या. जागतिक पातळीवर असा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय संशोधक! त्यांच्याच एका विद्यार्थिनीने जागवलेल्या आठवणी..
डॉ. शोभना गोखले म्हणजे भारतीय इतिहासाच्या अभ्यासात मोलाची भर घालणाऱ्या महान संशोधिका. पुराभिलेख आणि नाणकशास्त्रात बाईंनी केलेलं काम अतुलनीय आहे.
अमरावतीच्या बापट कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षण, वाचन, अभ्यासात सर्वच भावंडं अव्वल. आई-वडिलांच्या पाठिंब्यानं बाईंनी संस्कृत, प्राचीन इतिहास अशा विषयांचा व्यासंग वाढवला. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्वशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून काम करू लागल्या. घरून गोखले कुटुंबीयांची भक्कम साथ आणि कॉलेजमध्ये डॉ. हसमुख सांकलिया यांचं मार्गदर्शन! बाईंमध्ये एक सच्चा पुरातत्त्व अभ्यासक आकाराला येत होता.
पुरातत्त्वशास्त्रात एम.ए. करण्यासाठी मी पुण्यात आले. या विषयाचे जुने जाणते, ज्यांचे लेख वृत्तपत्रांत वाचले होते असे शिक्षक त्या वेळी निवृत्त झाले होते. मात्र तरीही टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते सर्वच जण शिकवत होते. त्यांच्याकडूनच शिकण्याचा मनात हट्ट होता. मी टि.म.वि.मध्ये एम. ए. इन्डॉलॉजीला प्रवेश घेतला. तिथे डॉ. शोभना गोखले याची खरी ओळख झाली.
आम्हाला सांकलिया सर प्रत्येक उत्खननावर पाठवत असत. ते नेहमी म्हणत, अश्मयुगीन साइट असो की ऐतिहासिक. प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीची माहिती घेतलीच पाहिजे. मग नाणकशास्त्राच्या व्याख्यात्याला मूर्तिशास्त्राचा एक विषय शिकवायला सांगत. तर कधी पुराजीवशास्त्राच्या शिक्षकाला हत्यारांचं तंत्र शिकवायला सांगत. आमचे बॉस नसून पित्याप्रमाणेच वागायचे सांकलिया!
सांकलियांच्या अशा तालमीत तयार झालेल्या बाई आम्हा मुलींनाही कामाला लावत. एकदा त्यांच्याकडे नाण्यांचा कॅटलॉग करण्याचं काम होतं. अगदी हक्कानं, आपुलकीनं बाईंनी प्रत्येकीला दोन दोन तासांची डय़ुटी दिली. नाण्यांना प्रत्यक्ष हातात घेऊन त्यावरची अक्षरं, चिन्हं, चित्रं ओळखून कॅटलॉग करण्याचं काम त्यांनी शिकवलं.
बाईंच्या स्वयंपाकघरात अभ्यासिका होती. एका बाजूला स्वयंपाकाचे जिन्नस तर एका बाजूला अभ्यासाची पुस्तकं अगदी छतापर्यंत कपाट लावलेलं. वरची पुस्तकं काढायला शिडीसुद्धा! एकदा त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं. टेबलपाशी येताच पुस्तकं दिसली. बाई हसून म्हणाल्या, ‘‘अग, मुलं लहान होती. सासूबाई होत्या माझ्याकडे. अभ्यास, संशोधन करायचं तर निवांत वाचन हवंच. मग मी स्वयंपाकघरात हे कपाट केलं. रोज पहाटे चारलाच उठायचे. व्यवस्थित अभ्यास व्हायचा मग शांतपणे. सासूबाई मुलांकडे, स्वयंपाकाकडे लक्ष देत. मी बरंचसं संशोधन, लेखन इथेच बसून केलंय बरं का!’’ खरोखरच, आमच्या बाई म्हणजे अद्वितीय स्त्री होत्या. त्यांनी घरच्या जबाबदाऱ्या जितक्या व्यवस्थित पाडल्या तितक्याच बाहेरच्याही!
सातवाहन, त्रकूटक, वांकाटक, क्षत्रप यांचे लेख वाचणं, नाण्यांचा अभ्यास करणं त्यांच्या खाती जमा आहे. शिवाय या सर्व पुराव्यांची संगती लावून प्राचीन भारतीय जीवनाचं चित्र स्पष्ट करणं हे त्यांचं महत्त्वाचं काम. सातवाहनांच्या लेख व नाण्यांचा समग्र अभ्यास त्यांनी केला. ‘एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेच्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी दोनदा भूषवलं. नाणकशास्त्राच्या ‘न्यूमिस्मॅटिक सोसायटी’च्या राष्ट्रीय परिषदेच्या देखील त्या अध्यक्ष होत्या. जागतिक पातळीवर प्राचीन नाण्यांचा अभ्यास करणाऱ्यांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. त्यात गोखलेबाईंना विशेष मान होता. ब्रुसेल्स येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय नाणकशास्त्र परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या. जागतिक पातळीवर असा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय संशोधक!
गोखलेबाई फार सुंदर शिकवत. साधी सोपी वाक्यं. ओघवती भाषा. त्यांचा स्वभाव अगदी साधा होता. डोक्यात सतत अभ्यास. संशोधनाचं चक्र फिरत असे. सातवाहन सम्राज्ञी नागनिका त्यांना विशेष प्रिय होती. नाणेघाटातला नागनिकेचा लेख त्या सर्वाधिक सुंदर शिकवत. त्यांचं वागणं-बोलणं अगदी घरगुती, आपल्या एखाद्या काकू किंवा मावशीसारखं. इतकं आपुलकीचं की त्यांचे सहकारी खरोखरच त्यांना ‘मावशीबाई गोखले’ म्हणत. यात कोणताही चिडवण्याचा आभास नसून जिव्हाळ्याचं नातंच अधिक होतं. त्यांनाही आपल्या स्वभावाला लपवण्याची कधी गरज वाटली नाही. अगदी स्वच्छ, सच्चेपणा!
मी डेक्कन कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहात होते. कॅटलॉगच्या निमित्तानं बाईंकडे जाणं नित्याचं. घरात पाय ठेवताच त्यांनी प्रथम आपुलकीनं चौकशी करावी आणि काहीतरी खाऊ हातात ठेवावा. हे अगदी परवापर्यंत ठरलेलं होतं. हळिवाचा लाडू, नारळाची वडी, पातळ पोह्य़ांचा चिवडा असे पारंपरिक घरगुती पदार्थ. त्यात साखर-मिठापेक्षा बाईंचं प्रेमच अधिक भरलेलं!  ‘‘तुम्हा आजकालच्या मुलींना वजनाचा भारी धाक. चांगलं व्यवस्थित खावं. काही वाढत नाही वजन.’’ असं नेहमीच त्या दटावत असत. प्रथम अभ्यासाच्या निमित्तानं जाणं व्हायचं. नंतर ते सवयीचं बनलं. ‘‘या भागात आले होते. म्हटलं बाई काय करताएत.. भेटून जावं म्हणून आले.’’ अशी प्रस्तावना करत घरात शिरले की अलिबाबाच्या गुहेचा फील यायचा. लगेचच बाई त्यांचं नवं संशोधन, लेखन याबद्दल सांगायच्या. आपली इच्छा पूर्ण होण्याचा जितका आनंद व्हायचा, त्यापेक्षा कितीतरी अधिक आश्चर्य वाटायचं या वयात बाई एवढं वाचन करतात, लिहितात, कमाल आहे! प्रत्येक वेळी बाई विचारत, ‘‘तुझं काय चाललंय?’’ माझं लेखन, वाचन त्यांच्या मानानं किती क्षुल्लक पण त्या कौतुक करत. प्रोत्साहन देत. वास्तविक ही वाक्यं त्यांचे सर्वच विद्यार्थी बोलतील. सर्वावर त्यांची अपार माया होती. पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास करणारा प्रत्येक जण त्यांना ‘आपला’ वाटे.
भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांच्या संशोधनानं मोलाची भर घातली. कान्हेरी गुंफांमध्ये शिलालेखांचा अभ्यास करताना तर प्रत्यक्ष वाघाशी त्यांचा सामना झाला. ‘‘गंमतच आहे. अगं, त्याला वाटलं असेल या पुरातत्त्ववालीला खाऊन काय मिळणार? त्यापेक्षा फास्टफूडच बरं! म्हणून गेला परत तो वाघ!’’ बाईंच्या बोलण्यात ‘गंमतच आहे’ हा शब्दप्रयोग नित्याचा. पण गंभीर विषयात गंमत निर्माण करणारा!
विदर्भात एका शिलालेखाचा त्यांना शोध घ्यायचा होता. त्या दगडाला हात लावला तर आजारपण येतं असा गावक ऱ्यांचा समज होता. मग जंगलात तो लेख बाईंनी शोधला. स्वत: कुदळ, फावडं घेऊन माती बाजूला केली. लेखाची बाजू खाली अशा अवस्थेत तो पालथा पडला होता. एकाच्या पाया पडून, विनवण्या करून बाईंनी तो दगड सरळ केला. बाई म्हणाल्या होत्या, ‘‘अगं, खरोखरच मी दुसऱ्या दिवशी आजारी पडले. पण हा काही लेखाच्या भुताचा प्रताप नव्हता. इतके श्रम केल्यावर शहरी माणसं आजारी पडणारचं!’’ अत्यंत बुद्धिवादी, विचारवंत होत्या गोखलेबाई.
डॉ. शोभना गोखले यांच्या जाण्यानं त्यांचे असंख्य विद्यार्थी खरोखरच खचले आहेत. आपुलकीनं चौकशी करणारं, अभ्यासात मार्गदर्शन करणारं हक्काचं माणूस निघून गेलंय. आमच्या मनाला हुरहूर लागली आहे. तितकाच प्राचीन लेख, नाण्यांचा अभ्यास पोरका झालाय.