हुंदडण्याच्या वयातली एक स्वप्नाळू स्वीडिश मुलगी- ग्रेटा थनबर्ग चिंताग्रस्त आहे. तिचा चिंताविषय हा दुर्दैवाने जगाच्या आणि त्याच्या चिंतेचा घाऊक ठेका घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प आजोबांच्या दृष्टीने टवाळकीचा विषय. चीन, उत्तर कोरिया, इराण, अफगाणिस्तान, भारत-पाकिस्तान आणि तोंडावर आलेली निवडणूक अशा एक ना अनेक चिंता ट्रम्प आजोबांच्या मानगुटीवर बसल्या असताना ग्रेटा व्हाइट हाऊसवर थडकली. तिने आपल्यासारखीच चिंताग्रस्त माणसे जमवली आणि पृथ्वी तापतेय याकडे जगाचे लक्ष वेधले. अमेरिकी काँग्रेसपुढे केलेल्या भाषणात- ‘‘माझं ऐकू नका, किमान शास्त्रज्ञांचं तरी ऐका,’’ अशी कळकळीची विनंतीही केली.

‘फ्रायडेज् फॉर फ्यूचर’ या अनोख्या आंदोलनामुळे ग्रेटा चर्चेत आली. दर शुक्रवारी शाळेला दांडी मारून स्वीडिश संसदेसमोर मूक निदर्शने करणाऱ्या या मुलीने गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत भाषण केले. जगप्रसिद्ध ‘टाइम’ नियतकालिकाने तिच्यावर मुखपृष्ठकथा प्रसिद्ध केली आणि ‘नेक्स्ट जनरेशन लीडर’ अशी तिची नवी ओळख जगाला करून दिली. या पुढच्या पिढीच्या नायिकेबद्दल ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या ऑनलाइन आवृत्तीतील लेखात तिचा गौरव अशा शब्दांत केला आहे : ‘इतिहासाच्या काही विशिष्ट टप्प्यांवर जेव्हा यंत्रणा आणि प्रस्थापित नेते ठोस पावले उचलण्यास वा कृती करण्यास असमर्थ ठरले, तेव्हा तरुणांनाच पुढाकार घ्यावा लागला. आजही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. ग्रेटा ही १६ वर्षांची मुलगी हवामान बदलाच्या प्रश्नावर जगाला संघटित करायला निघाली आहे.’ बर्मिगहॅममध्ये एक हजार युवकांनी ५० वर्षांपूर्वी वर्णविद्वेषाविरुद्ध केलेल्या चळवळीची आठवणही ग्रेटाच्या निमित्ताने या लेखात जागवली गेली आहे.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?

‘‘आपली पृथ्वी मृत्यूशय्येकडे जात आहे. पृथ्वीच्या परिकथा सांगण्याचे दिवस आता संपले आहेत. तुम्ही जागतिक तापमानवाढीच्या संकटाला गांभीर्याने घ्यावं, असं माझं स्वप्न आहे. ते पूर्ण केलंत तर मी माझ्या लाडक्या बहिणीकडे आणि श्वानांकडे परत जाईन. मला त्यांची खूप आठवण येतेय..’’ अमेरिकी काँग्रेसमधील भाषणात ग्रेटाने घातलेली ही भावनिक साद अनेक वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्ध केली. बहुसंख्य प्रसारमाध्यमांनी ग्रेटाच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. स्वीडिश संसदेबाहेर फलक घेऊन शाळेच्या गणवेशात एकटीच बसलेल्या ग्रेटाचे गेल्या वर्षीचे छायाचित्र समाजमाध्यमांवरून जगभर प्रसारित झाले. ‘हफिंग्टन पोस्ट’ने त्यावर सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. ग्रेटाचे हे छायाचित्र ४० हजार वेळा ‘शेअर’ केले गेल्याचे आणि लाखो लोकांना ते भावल्याचे या वृत्तान्तात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलाविषयीच्या परिषदेसाठी ग्रेटा अमेरिकेत आली आहे. स्वीडन ते अमेरिका हा प्रवास तिने नौकानयन स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या सौरऊर्जेवरील नौकेतून केला. पण तिच्या टीकाकारांनी तिच्या नौकाप्रवासावरच कसे बोट ठेवले, याबाबतचा वृत्तान्त ‘फॉक्स न्यूज नेटवर्क’च्या वृत्तसंकेतस्थळावर विविध वृत्तपत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केला आहे. ‘ग्रेटाने प्रवासासाठी निवडलेली नौका फायबरची आणि महागडी असल्याबद्दल टीका करणारे वृत्त ‘ताज’ या डाव्या विचारसरणीच्या जर्मन वृत्तपत्राने दिले होते. त्याचा मथळाच- ‘ग्रेटाज् क्रूझ मोअर हार्मफूल दॅन फ्लाइट’ असा होता. तिचा नौकाप्रवास किमान सहा विमान उड्डाणांना कारणीभूत ठरेल. पण तिने विमानाने प्रवास केला तर तो जास्त पर्यावरणस्नेही असेल. कारण तिच्यासोबत नौकेतून प्रवास करणारे पाच लोक परतीचा प्रवास विमानानेच करणार आहेत. त्यांच्या विमान प्रवासामुळे घातक ग्रीन हाऊस वायूंचे मोठय़ा प्रमाणावर उत्सर्जन होईल. म्हणून तिने मालवाहू जहाजातून प्रवास करावा, असा सल्ला ‘ताज’ने ऑगस्टमध्येच दिला होता,’ असे ‘फॉक्स न्यूज’च्या वृत्तान्तात म्हटले आहे.

‘फोर्ब्सडॉटकॉम’ने जेफ मॅकमोहन या पर्यावरणवादी लेखकाचा ग्रेटाचे महानत्व अधोरेखित करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात मॅकमोहन म्हणतात, ‘प्रामाणिकपणा ही ग्रेटाची सर्वात मोठी शक्ती आहे. ती हॉटेलमध्ये परतण्यासाठी ‘लिमोझिन’ घेणार नाही, सोयीसाठी तडजोड करणार नाही किंवा मित्रांसाठी वा मित्र जोडण्यासाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही, ती केवळ सत्यच सांगत राहील.’ ‘ग्रेटा अहिंसेचे सिंह  म. गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, मदर तेरेसा यांच्या पंगतीला जाऊन बसली आहे. ती सडेतोड आहे, सत्याची कास सोडणार नाही,’ असे कौतुकोद्गारही मॅकमोहन यांनी लेखात काढले आहेत.

पृथ्वीला वाचवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांना संघटित करणाऱ्या ग्रेटाची शिफारस नोबेल शांतता पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात कौतुकाचे हार स्वीकारणारी आणि टीकाप्रहार झेलणारी ग्रेटा ही जगातली कदाचित पहिली पर्यावरणवादी असावी.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई