गुजरातमध्ये लागोपाठ सहाव्यांदा सहा टक्क्य़ांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवून भाजपने चमत्कारच केला आहे. अपवादानाचे हे चित्र आढळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजराती अस्मितेचे प्रतीक असून, त्यांनी केलेले भरीव कार्य गुजरातची जनता कदपिही विसरणार नाही. उत्तर प्रदेश, गुजरातच्या विजयाची परंपरा पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील.

गुजरातमध्ये भाजप सरकारच्या काळात मोठय़ा प्रमाणावर विकास झाला. या विकासालाच जनतेने कौल दिला. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून गुजरातमधील विकासाची चेष्टा करण्यात आली. विकास वेडा झाला, वगैरे वगैरे वेगवेगळा प्रचार करण्यात आला. पण असा उलटा प्रचार करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने धडा शिकविला आहे. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करावरून काँग्रेसने वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यालाही गुजरातच्या जनतेने साथ दिलेली नाही. सुरत हा केंद्रबिंदू ठेवून आंदोलन उभारण्यात आले. वास्तविक सुरतमधील व्यापारी किंवा जनता भाजपच्या विरोधात नव्हते. त्यांचा विरोध वस्तू आणि सेवा करातील काही तरतुदींना होता. पण, काँग्रेसने त्याला वेगळा रंग दिला. सुरतमध्ये काय झाले, हे सर्वासमोर आहेच. शहरातील सर्व १२ जागा भाजपने जिंकल्या आहेत. व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असती तर एवढे यश मिळालेच नसते. हे सारे व्यापारी भाजपचे समर्थक आहेत. त्यांची नाराजी केंद्र व राज्य सरकारने दूर केली. व्यापाऱ्यांना चिथाविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न साफ फसला आहे. सुधारणा, स्थित्यंतर आणि चांगली कामगिरी यावर भाजपने नेहमीच भर दिला. मतदारांनी यालाच पसंती दिली आहे. सुधारणांना काँग्रेसने विरोध केला. राहुल गांधी यांनी गुजरात दौऱ्यात विकास आणि सुधारणांच्या विरोधात भूमिका मांडली होती. गुजरातमधील जनतेने मात्र अशा नेत्यांना जागा दाखवून दिली आहे.

सुधारणांचा कार्यक्रम हा भाजपच्या अंत्योदय या गरिबांसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाशी जोडला जातो. गुजरातमध्ये मिळालेल्या कौलामुळे सुधारणांचा कार्यक्रम आणखी जोमाने राबविला जाईल. गुजरातच्या यशात उज्ज्वल ग्राम आणि जनधन या योजनांची महत्त्वाची भूमिका आहे. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर त्रुटी केंद्र सरकारने दूर केल्या आहेत. सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाते.

गुजरातमध्ये भाजपने लागोपाठ सहाव्यांदा सत्ता कायम राखली आहे. याउलट काँग्रेसने हिमाचल प्रदेशची सत्ता गमाविली.

२०१४ पासून काँग्रेसच्या पराभवाची सुरु झालेली मालिका अद्यापही खंडित झालेली नाही आणि ती यापुढेही कायम राहणार आहे. नव्या वर्षांच्या सुरुवातीला चार राज्यांच्या निवडणुका आहेत. यामध्येही भाजपला चांगले यश मिळेल. भाजपच्या यशाची चढती कमान कायम राहील. पुढील वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता येईल. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही हाच कल कायम राहील आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत येईल.

जनतेने विकासाला दिलेला हा कौल आहे. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून गुजरातमधील विकासाची चेष्टा करण्यात आली. विकास वेडा झाला, वगैरे प्रचार करण्यात आला. असा उलटा प्रचार करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने धडा शिकविला आहे.

संबित पात्रा राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप