News Flash

काँग्रेसकडे कार्यकर्ते असते तर..

भाजपप्रमाणे तळागाळातील कार्यकर्ता नसल्याचा फटकाही काँग्रेसला या निवडणुकीत बसला आहे.

पाटीदार नेता हार्दिक पटेलचा झंझावाती प्रचार आणि सोबत दलित नेता जिग्नेश मेवानी व ओबीसी नेता अल्पेश ठाकूर या तिघांच्या मदतीने काँग्रेसने गुजरातमध्ये दणक्यात पुनरागमन केले असले तरी भाजपप्रमाणे तळागाळातील कार्यकर्ता नसल्याचा फटकाही काँग्रेसला या निवडणुकीत बसला आहे. प्रत्येक पानावरील केवळ ४० मतदारांना सांभाळणारी भाजपच्या पेजप्रमुखाची यंत्रणा काँग्रेसकडे असती तर या निवडणुकीचे निकाल आणखी वेगळे पाहायला मिळण्याची शक्यता होती.

निवडणुकीसाठी मते गोळा करण्यासाठी दोन पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. एक दृश्य स्वरूपात. प्रचारसभा, मोर्चा, जाहिराती, फलक अशा पारंपरिक पद्धतीने प्रचार होतो. आता त्याला सामाजिक माध्यमे आणि व्हॉट्सअपचीही जोड मिळाली आहे. गुजरातमध्ये फिरताना या स्वरूपात काँग्रेसने हवा तयार केल्याचे जाणवले. समाजमाध्यमांचा कल्पक वापर करत लोकसभा व अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या भाजपला यावेळी काँग्रेस व पाटीदार समाजातील युवकांनी समाजमाध्यमांवर चांगलीच लढत दिली. प्रचारसभा आणि मंदिरांच्या भेटींमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दृश्य स्वरूपाची ही आघाडी सांभाळली. प्रचाराचा दुसरा प्रकार बराचसा अदृश्य स्वरूपातील. पक्ष कार्यकर्त्यांकडून थेट मतदारांपर्यंत पोहोचत त्यांना मतकेंद्रांपर्यंत आणण्याचे प्रयत्न होतात. हा भाग फारसा उजेडात येत नसला तरी मतदानाची दिशा बदलून टाकण्याची क्षमता या प्रकारात असते. हा प्रकार गुजरात काँग्रेसमध्ये दिसत नव्हता.

शेतकरी, मच्छीमार, पाटीदार, ओबीसी, दलित अशा समाजातील विविध घटकांमधील राज्य सरकारविरोधातील रोषाला काँग्रेसने फुंकर घातली असली तरी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अभावी हा रोष मतदानामध्ये रूपांतरित करणे काँग्रेसला जड गेले. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी झालेली पेजप्रमुख संकल्पना गुजरातमध्येही राबवली.  गुजरातमधील कार्यकर्त्यांच्या जोडीला महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील खासदार, आमदारांपासून नगरसेवकांपर्यंत लाखभर कार्यकर्ते गुजरातमध्ये तंबू टाकून बसले होते. मतदारसंघातील पदयात्रांमध्येही दुसऱ्या राज्यातून आलेले कार्यकर्ते सहज ओळखू येत.

काँग्रेसनेही परराज्यातून नेत्यांना बोलावले असले तरी तळागाळात काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यकर्त्यांची मोट बांधणे या पक्षातील नेत्यांना जड जात होते. २२ वर्ष सत्तेत नसल्याने संघटनेतील कार्यकर्त्यांची फळी मोडली. गेल्या निवडणुकीत तर अनेक मतदारसंघांमध्ये बुथवर बसण्यासाठीही कार्यकर्ते मिळत नव्हते. दोन महिन्यांआधी पक्षनेतृत्वाने निवडणुकीत प्रचार सुरू केल्यावर जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला असला तरी दोन महिन्यात कार्यकर्त्यांची फौज बांधता आली नाही, असे सौराष्ट्रमधील काँग्रेसचे काम पाहणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्याने कबूल केले. त्यामुळेच राज्य सरकारविरोधातील असंतोष वाढूनही प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी २०१२ पेक्षा कमी राहिली व त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला.

या सामन्यात अनेकदा पारडे इकडून तिकडे झुकत होते. कधी राहुलच्या मंदिर भेटी, कधी विकास गांडो थयो छे, कधी हार्दिकच्या सीडी, कधी गब्बर सिंग टॅक्स, कधी मणिशंकर अय्यर यांचे विधान, कधी मोदींचा मनमोहन सिंग यांच्यावरील आरोप.. काँग्रेसमुळे मोदींना पूर्ण क्षमतेने प्रचारात उतरावे लागले. अटीतटीच्या सामन्यात अनुभवाच्या आधारे अंतिम क्षणी खेळ उंचावणारा अनुभवी खेळाडू सामना जिंकतो. त्याचप्रमाणे भाजपने नियमितपणे उभी केलेल्या पक्षकार्यकर्त्यांच्या सैन्याने काम केले आणि निसटता का होईना पण विजय मिळवला.

पन्नाप्रमुख महत्त्वाचे

भाजपने उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी झालेली पन्नाप्रमुख संकल्पना गुजरातमध्येही राबवली. मतदारयादीतील प्रत्येक पानावरील ४०-४५ मतदारांसाठी एक कार्यकर्ता नेमायचा व त्यासाठी इतर राज्यांमधून कार्यकर्त्यांची फौज आणायची ही संकल्पना भाजपने गुजरात निवडणुकीतही अमलात आणली. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील साधारण दोन ते अडीच लाख मतदारांसाठी चार ते पाच हजार कार्यकर्ते नेमले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 3:41 am

Web Title: gujarat election result 2017 congress bjp congress workers
Next Stories
1 सहाव्यांदा सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी विजय हा चमत्कारच!
2 भाजपला रोखले हा नैतिक विजयच !
3 भय्यू महाराज
Just Now!
X