लोकसभा निवडणुकीत साडेतीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भाजपने सर्वच्या सर्व २६ जागाजिंकल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. गुजरातमध्ये काँग्रेस संपली, असा प्रचार भाजपने सुरू केला होता. तेव्हा विधानसभेच्या फक्त १६ मतदारसंघांमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० जागांवर विजय मिळाला. (पक्षाने पाठिंबा दिलेले तीन जण विजयी झाले आहेत). पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचेही गृहराज्य. तरीही भाजपला शंभरीही गाठता आलेली नाही. हा भाजपला बसलेला मोठा फटका आहे. मोदी यांच्या गावात भाजपचा पराभव झाला. यापेक्षा आणखी वेगळे काही सांगण्याची आवश्यकताच नाही. आकडय़ांच्या खेळात काँग्रेसला सत्ता मिळालेली नसली तरी गुजरातमध्ये काँग्रेसचा नैतिक विजयच झाला आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापासून मतदानापर्यंत सारी सरकारी यंत्रणा भाजपच्या बाजूने होती. मतदानाच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी रोड शो करूनही निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी १५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची दर्पोक्ती केली होती. एवढय़ा जागा जिंकल्याशिवाय विजयोत्सव साजरा करणार नाही, असे जाहीर केले होते. शहा यांच्या १५०जागांच्या उद्दिष्टाचे काय झाले, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. १५० जागा जिंकू, असा दावा करणाऱ्या भाजपला किंवा शहा यांना शंभरी पार करता आलेली नाही. भाजपचे हे सारे अपयशच आहे. मोदी किंवा शहा यांच्यावर त्यांच्याच गृह राज्यातील जनता विश्वास ठेवण्यास तयार नाही हे निकालावरून स्पष्ट झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील जनताही मोदी यांना असाच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. प्रचाराच्या काळात भाजप किंवा मोदी यांनी सारी पातळी सोडली होती. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मोदी, शहा किंवा मुख्यमंत्री रूपानी यांनी कोणीच उत्तरे देऊ शकले नाहीत.  विकासाच्या या मॉडेलबद्दल काँग्रेसने अनेक प्रश्न किंवा शंका उपस्थित केल्या. त्याला भाजपकडून कोणीही उत्तर दिले नाही. कारण हे विकासाचे मॉडेलच खोटे होते. विकासामुळे विजय मिळाला, असा दावा आता भाजपचे शीर्षस्थ नेते करीत आहेत. मग भावनात्मक प्रचार करण्याची वेळ भाजप नेत्यांवर का आली? माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांना लक्ष्य करण्यात आले. प्रचारात पाकिस्तान, अल्लाउद्दिन खिलजी, औरंगजेब आणावे लागले यावरून भाजपने कोणती पातळी गाठली हे सिद्धच होते. काँग्रेसने मात्र प्रचारात कोठेही पातळी सोडली नव्हती.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. गुजरातमधील जनतेने काँग्रेसला भरभरून कौल दिल्याने भाजपला आपोआपच उत्तर मिळाले आहे. पटेल समाजाचे आंदोलन किंवा समाजाच्या नाराजीचा काहीही फटका बसणार नाही, असा दावा भाजपकडून केला जात होता. सौराष्ट्रातील निकालाने भाजप नेत्यांचे डोळे नक्कीच उघडले असणार.  विकासावरून काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपने प्रचाराच्या काळात उत्तरे दिली नसतील, पण आगामी काळात विधानसभेत किंवा बाहेर या प्रश्नांचा पाठपुरावा करणार आहे.  गृहराज्यातील निकाल मोदी आणि शहा यांना पुरेसा सूचक इशारा आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे नाराज असलेली जनता आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

गृहराज्यातील निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना सूचक इशारा आहे. सरकारच्या धोरणांमुळे नाराज असलेली जनता आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

राजीव सातव, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव