‘अश्लील सीडी तयार करून निवडणूक जिंकता येत असती, तर सनी लिओनीच भारताची पंतप्रधान झाली असती. तुम्हाला विवाहसोहळ्याच्या व्हिडीओ चित्रीकरणाची ऑर्डर द्यायची नसेल तर मग आमच्याशी संपर्क साधा. विकासने आता व्हिडीओ एडिटिंग आणि शूटिंगचं काम सुरू केलंय..’

हा ‘विकास गांडो थयो छे’च्या मालिकेतला नवाकोरा विनोद. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या ‘विकासा’च्या घोषणेचे मानवीकरण करून तिची खिल्ली उडवणारे असे अनेक विनोद गेल्या तीन महिन्यांपासून फिरत आहेत. हा वरचा, सध्या व्हाट्सअ‍ॅप गटांतून आणि फेसबुकवरून फिरत असलेला विनोद पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याची कथित अश्लील चित्रफीत  प्रसारित  झाल्यानंतरचा.

या सगळ्या विनोदांचे मूळ पाहू जाता, थोर विनोदवीर चार्ली चॅप्लीन यांचे एक वाक्य आठवते. ते म्हणाले होते, ‘खरोखरच हसायचे असेल, तर आपल्याला आपल्या वेदनेशी खेळता आले पाहिजे!’ ‘विकास’च्या विनोदाने आणि व्यंगप्रतिमांनी लाखो लोक आज खळखळून हसताना दिसत असले, तरी हा विनोद अहमदबादमधील २० वर्षीय सागर सावलिया याने अनुभवलेल्या तीव्र मानसिक आघातातून आणि वेदनेतून आकारास आला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

सागर हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी. पूर्व अहमदाबादेतील बापूनगर या पाटीदारबहुल विभागात राहणारा. ज्या ‘विकास गांडो थयो छे’ या वाक्याने भाजपला हैराण केले आहे, त्याचा हा उद्गाता. तो एकेकाळी मोदींचा कट्टर चाहता होता. पण २५ ऑगस्ट २०१५ रोजी पोलिसी अत्याचारांच्या मानसिक आघाताने तो बदलला.

हार्दिक पटेलला अटक झाली आणि अहमदाबाद आणि अन्य शहरांतील पाटीदारबहुल विभागांत जाळपोळ आणि दंगलीस सुरुवात झाली. ‘लोकसत्ता’शी बोलताना सागरने तेव्हाचा त्याचा अनुभव सांगितला. –

‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मी भाजपचा पाठिराखा होतो. कट्टर मोदी समर्थक होतो. इतका, की माझ्या व्हाट्सअ‍ॅपचं दर्शनचित्र म्हणून नेहमी मोदींचंच छायाचित्र असे. पण २५ ऑगस्ट २०१५च्या पाटीदार आरक्षण सभेनंतर सगळंच बदललं. त्या रात्री पोलीस छळवादी बनले. त्यांनी आंदोलकांवर केलेल्या अत्याचारांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो.’

२६ ऑगस्टच्या सकाळी आमच्या भागात दंगल आणि जाळपोळ सुरू झाली तेव्हा आम्ही सगळेच घाबरलो होतो. ‘काही लोकांनी सरळ आमच्या घरात घुसून तोडफोड करायला सुरुवात केली. आम्हाला पहिल्यांदा वाटलं ते कोणी गुंड असतील. पण मग समजलं, की ते पोलीस होते. माझा भाऊ आणि मी तर बाथरूममध्ये जाऊन लपलो.’

सागर सांगत होता, ‘पोलिसांनी जाताना आम्हाला आमच्याच घरात कोंडून टाकले. या सगळ्याने आम्ही इतके घाबरलो होतो, आम्हाला याचा इतका धक्का बसला होता, की जेव्हा शेजाऱ्यांनी येऊन आमचा दरवाजा ठोठावला तेव्हा आम्हाला वाटलं की तेच गुंड परत आलेत की काय. त्या घटनेने माझ्या काळजावर कायमची जखम करून ठेवलीय. भाजपच्या सुशासनाबद्दल माझा जो भ्रम होता, त्याचा चक्काचूर झालाय.’  यानंतर हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी ‘पाटीदार आंदोलन अनामत समिती’त सामील झाला. भाजपला पराभूत करायचे हेच एक ध्येय घेऊन तो समितीचा सक्रिय सदस्य बनला.

काही महिन्यांपूर्वी त्याने समाजमाध्यमांत एक छायाचित्र पाहिले. गुजरात परिवहन महामंडळाच्या एका बसचे चाक निखळून पडल्याचे ते छायाचित्र होते. सागर सांगतो, ‘मी ते छायाचित्र सहज फेसबुकवर टाकलं आणि त्याखाली एक ओळ टाकली – हवे विकास गांडो थयो छे – विकास आता वेडा झालाय.’ ती ‘एकोळ’ (वन-लायनर) लोकांना एवढी आवडेल याचा अंदाजही नव्हता त्याला. त्या ‘एकोळी’ला समाजमाध्यमांतून मिळालेला प्रतिसाद त्यालाही अचंबित करून गेला. यानंतर मग नागरी समस्यांच्या छायाचित्रांना आणि त्यातून ‘विकास’ची खिल्ली उडविण्याला धरबंधच राहिला नाही.

हा प्रतिसाद पाहून मग सागरने बेफाम न्यूज चॅनेल नावाचे एक स्वतंत्र फेसबुक पानच सुरूच केले. त्याच्या चॅनेलचे बोधचित्र होते – गर्जना करणारा सिंह. तो सांगतो, ‘सुरुवातीला या पानाला नाव दिले होते बेफाम विद्रोही असं. पण नंतर मी ते बेफाम न्यूज चॅनेल असं केलं.’

हे सरकार रोजगार आणि शिक्षणाबाबत फारसे काही करीत नाही, हा सागरचा रोषारोप आहे. ‘माझ्यापुढचा, माझ्यासारख्या इतर तरुणांचा एकच सवाल आहे, की आम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळतील का? अगदी सध्याच्या राखीव जागांमध्येही असे अनेक जण आहेत, की ज्यांच्यात चांगलं शिक्षण घेण्याची, चांगली नोकरी मिळवण्याची ऐपत आहे. सरकारने हे पाहिलं पाहिजे की, तो पाटीदार असो की दुसरा कोणी, त्याला सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळालाच पाहिजे. त्याला रोजगार मिळालाच पाहिजे. पण महाविद्यालयातल्या २४०० जागांसाठी किमान दोन लाख अर्ज आहेत. यातून कोणाला कसा न्याय मिळेल?’ हा सागरचा सवाल आहे.

२००२ नंतर हे असे पहिल्यांदाच घडत आहे. त्या वेळी गोध्रा दंगलीच्या मुद्दय़ावरून मोदी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. परंतु विकासाच्या मुद्दय़ावर त्यांनी बाजी मारली. हा मोदींच्या चाहत्यांच्या आणि समर्थकांच्या काळजाला भिडणारा मुद्दा आहे. या एवढय़ा वर्षांत कोणीही त्याचीच खिल्ली उडविण्याचे धाडस दाखविले नव्हते.

आता काँग्रेसने ही ‘विकास’ मोहीम आपलीच असल्याचे भासवून पळविण्याचा प्रयत्न चालवला आहे. राज्यातील प्रचारादरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही हा मुद्दा उचलला होता. एका प्रचारसभेत त्यांनी श्रोत्यांना प्रश्न केला होता, की ‘गुजरातमध्ये विकासला काय झालेय?’ समोरून जोरदार उत्तर आले होते, ‘विकास पागल झालाय.’ पण याने सागरसारख्या तरुण पाटीदारांना काही फरक पडत नाही. कारण भाजपला राज्यातील सत्तेतून खाली खेचणे हाच त्यांचाही एककलमी कार्यक्रम आहे.

मतदारांना भाजपपासून दूर नेण्यास हा असा उपहासगर्भ विनोद किती साह्य़भूत होईल हे सांगणे कठीण आहे. पण एक मात्र खरे, की यातून जी वातावरणनिर्मिती झाली आहे त्यामुळे सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत.

  • आमच्या एसटीत बसा, पण स्वतच्या जबाबदारीवर. विकास आता वेडा झाला आहे.
  • विकास ओव्हरटेक करायला गेला आणि डिव्हायडरला धडकला.
  • गुजरातमधील लटकता विकास.
  • बाजूला सरा. विकास मालमत्ता नोंदणीकरणासाठी आलाय..