कल्पना पांडे / संजय पांडे

अमेरिकेत बंदूक-रायफल बाळगणे सामान्य बाब झाली आहे. या बंदुका अगदी लहान मुलांच्या हातांपर्यंतही पोहोचतात. मोठय़ांपासून लहानांपर्यंत अनेकांनी बंदुकांचा वापर करून केलेल्या हिंसाचाराच्या घटना तिथे वारंवार घडत असतात. मुख्य म्हणजे या बंदूक संस्कृतीला रोख लावावा, अशी मागणी काही जणांकडून होत असली, तरी ती दडपून टाकणारी यंत्रणाही प्रबळ आहे..

चालू वर्षांच्या फक्त ऑगस्ट महिन्याच्या २१ दिवसांतच शस्त्रास्त्र हिंसेच्या ३५,८३५ घटना घडल्या आहेत. ज्यात २६३ घटना सार्वजनिक बंदूक हिंसाचारातून झालेल्या सामूहिक हत्याकांडांच्या आहेत. त्यात ८,४४१ नागरिक मरण पावले. २००२ साली प्रसिद्ध अमेरिकी माहितीपट-चित्रपट निर्माते मायकेल मूर यांनी ‘बॉलिंग फॉर कोलंबाइन’ हा गाजलेला माहितीपट तिथल्या शाळांमध्ये मुलांनी गोळीबारी करून केलेल्या सामूहिक हत्याकांडांच्या कारणांचा आढावा घेताना तयार केला. एकेकाळी स्वत: ते ‘नॅशनल रायफल असोसिएशन (एनआरए)’ या संघटनेचे सदस्य होते. ती संघटना आणि अमेरिकेची भांडवलशाही आधारित राजकीय व्यवस्था त्यासाठी कारणीभूत असल्याच्या निष्कर्षांपर्यंत ते त्यात येतात. अमेरिकेच्या कोलंबिया राज्यात सर्वात जास्त लोक यामुळे मरण पावतात, म्हणून त्यांनी त्या राज्याला आपल्या संशोधनाचे केंद्र बनवले होते.

अमेरिकेत दररोज सुमारे १०० लोक बंदुकांतून केलेल्या हिंसेत मरण पावतात. अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले की, २०११ साली आठ हजार लोकांची बंदुकीने हत्या करण्यात आली, सोबतच २० हजार लोक बंदुकआधारित आत्महत्या व दुर्घटनेमुळे मेले, तसेच ६० हजार अमेरिकी नागरिक जखमी झाले. एकटय़ा २०१५ या वर्षांत बंदूक वापरून ३६ हजार लोक मरण पावले, ज्यात ६० टक्के आत्महत्या होत्या. हा आकडा वाढत जात २०१७ साली ३९,७७३ लोक बंदुकीने मरण पावले.

‘अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसीन’च्या २०१०च्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत खुनांचे प्रमाण इतर विकसित देशांच्या तुलनेत सातपट जास्त आहे. खून करण्यासाठी बंदूक वापराचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत २५ पट अधिक आहे. १५ ते २४ वयोगटात बंदुकीने खून घडवून आणण्याचे प्रमाण ४९ पट जास्त आहे. नकळत हत्या केल्याचे प्रमाण सहा पट जास्त आहे. याच सर्वेक्षणात आणखी एक महत्त्वाची माहिती मिळते. खून झाल्याच्या घटनांपैकी ८२ टक्के बंदुकीने झाल्या होत्या. बंदुकीने खून झालेल्यांमध्ये ९० टक्के मृतक स्त्रिया होत्या. १४ वर्षे वयापर्यंत खून झालेल्या बालकांपैकी ९१ टक्के मुले बंदुकीची गोळी लागल्याने मरण पावली. १५ ते २४ वयोगटात खून झालेल्या मुलांत ९२ टक्के मुलांचा खून बंदुकीने करण्यात आला. अमेरिका व कॅनडा या डीपीएनएच देशांच्या सीमेवरच्या दोन शहरांची तुलना केल्यास कॅनडाचे वेंकोवर शहरात १२ टक्के, तर अमेरिकेच्या सिएटल शहरात ४१ टक्के लोकांकडे बंदुका आहेत. त्याचा प्रत्यक्ष परिणाम असा की, सिएटल शहरात बंदुकीच्या हिंसाचारात मरणाऱ्यांची संख्या ही वेंकोवर शहराच्या तुलनेत पाचपट जास्त आहे.

वर्ष २०१२ च्या अमेरिकी सरकारच्या आकडेवारीनुसार, बंदुकीच्या गोळीने ३३,३६३ लोक मरण पावले; ज्यात १२,०९३ ही खून प्रकरणे, तर २०,६६६ आत्महत्या प्रकरणे होती. यातून दिसून येते की, बंदुकांचा वापर आत्महत्येसाठी खुनापेक्षाही जास्त झाला आहे. खून आणि आत्महत्यांचा बंदुकीच्या मालकीशी प्रत्यक्ष संबंध आहे. याचाच परिणाम म्हणजे, गोळी मारून हत्या करणाऱ्यांमध्ये आणि स्वत:ला गोळ्या झाडून आत्महत्या करणाऱ्यांमध्ये लहान व तरुण मुलांचे प्रमाण मोठे आहे. जपान किंवा कोरिया इथे आत्महत्येचे प्रमाण अमेरिकेपेक्षा अधिक असले, तरी स्वत:ला गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. कॅनडा देशात शस्त्र खरेदी-विक्रीवर प्रतिबंध लावल्यानंतर तिथे बंदुकांमुळे होणाऱ्या हत्या व आत्महत्यांच्या घटना वेगाने कमी झाल्या आहेत.

याचा अर्थ, मुख्य चिंतेचा विषय बंदुकीमुळे रोज घडणाऱ्या हत्या आहेत. १९८२ ते २०१२ दरम्यान झालेल्या ६२ सामूहिक हत्याकांडांच्या घटनांत वापरण्यात आलेल्या ७९ टक्के बंदुका कायदेशीर प्रकारात मोडणाऱ्या होत्या. ज्या ठिकाणी बंदुका ठेवल्या जातात किंवा मुलांची पोहोच जर बंदुकांपर्यंत असली, तर त्याचाही प्रत्यक्ष संबंध त्यामुळे होणाऱ्या हत्यांशी आहे. अमेरिकेत बंदुकांसाठी केवळ दहा राज्यांमध्येच कायदे आहेत. याबाबतचा सर्वात कडक कायदा कॅलिफोर्निया राज्यात आहे, ज्यामुळे तिथे हे प्रमाण २३ टक्क्यांपर्यंत कमी आणण्यात यश आले आहे. मात्र, ज्या लोकांना बंदुकांची गरज नाही, त्यांच्या हातात बंदुका पडू नयेत या दिशेने अमेरिकेची राजकीय व्यवस्था काम करत नाही.

‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’च्या याबाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार, कृष्णवर्णीय, मुस्लीम किंवा अपरिचितांकडून धोक्याचे कारण पुढे करून जी हत्यारांची विक्री केली जाते ती निराधार आहे. बंदूकहल्ल्यात मृत झालेल्यांपैकी ७७ टक्के लोकांचा खून त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. अपरिचित हल्लेखोरांनी गोळी मारलेले लोक फक्त चार टक्के होते. घरात बंदुका असणे, हे कौटुंबिक हत्यांमागील सर्वात मोठे कारण असल्याचे यातून दिसून आले आहे. त्यामुळे घरात बंदुकांचे अस्तित्व असल्यास बाहेरच्यांपेक्षा कुटुंबीयांकडूनच अधिक धोका हे स्पष्ट आहे. जर कुटुंबीय अमली पदार्थाचे व्यसनी, भांडखोर किंवा हिंसक असतील, तर हा धोका अनेक पटींनी वाढतो. ‘अ‍ॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीन’ने केलेल्या १६ वेगवेगळ्या चाचण्यांमध्येदेखील बंदुकांची सोय व खून होण्याच्या धोक्याचा खोलवर संबंध दिसून आल्याचे जाहीर झाले. घरगुती हिंसाचारांमध्ये १९९० ते २००५ दरम्यान ६७ टक्के प्रकरणांत विवाहित जोडप्यांनी एकमेकांच्या हत्या बंदुकांनीच केल्याचे उघड झाले आहे. रागाच्या किंवा भावनिक त्वेषाच्या क्षणात घरात असलेली बंदूक आत्महत्येचे उपयुक्त साधन बनले आहे.

भीतीचे मानसशास्त्र 

हत्याकांडांसाठी बंदुका नव्हे, तर अमेरिकी चित्रपटांतील हिंसा व व्हिडीओ गेम्स कारणीभूत असल्याचा बचाव ‘एनआरए’कडून दर वेळी केला जातो. ओबामा यांच्या कार्यकाळात बंदूक नियंत्रणावर चर्चा वाढल्यावर एनआरएकडून लोकांमध्ये त्यांचे स्वातंत्र्य व सुरक्षितता सरकार हिरावून घेत असल्याची चर्चा पसरवण्यात आली. हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास बंदुकवापराचे स्वातंत्र्य हिरावले जाईल, असा प्रचार सर्वत्र पेरण्यात आला होता. यातून लोकांमध्ये घबराट पसरून मोठय़ा प्रमाणात शस्त्रे विकली जातात. प्रत्येक सामूहिक हत्याकांडानंतर हा वेग आणखी वाढतो आणि अमेरिकेत बंदूक व रायफल्सची विक्री झपाटय़ाने वाढते.

२०१२ साली न्यूटन शहारातील सँडी हुक प्राथमिक शाळेत हत्याकांड झाल्यानंतरच्या तीन दिवसांत भीतीपोटी १.३० लाख बंदूक- रायफल्स अमेरिकेत विकल्या गेल्या. सामूहिक हत्याकांड घडल्यानंतर शस्त्रांवर लोकांच्या उडय़ा पडतात. एनआरए प्रवक्त्यांकडून सतत सांगितले जाते की, ‘धोका वाढत आहे आणि अशा परिस्थितीत बंदूक हाती असलेल्या वाईट माणसाला थांबवणारी एकमेव गोष्ट म्हणजे चांगल्या माणसाच्या हाती असलेली बंदूक आहे.’ तसेच ‘मेक अमेरिका व्हाइट अगेन’सारख्या चळवळी अमेरिकेत बाहेरून येऊन बस्तान बसवलेल्या लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार करत आहेत. मुस्लिमांवर अमेरिकेत हल्ल्यांची प्रकरणे झाल्यानंतर त्यांच्याकडूनही बंदुकांची मागणी वाढली आहे. या दोन्ही समूहांमध्ये बंदूक बाळगण्याचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे.

एल पासो, डॅल्टन, पार्कलँड, फ्लोरिडा, त्यापूर्वी लास वेगास या सर्व ठिकाणी करण्यात आलेल्या हत्याकांडांत अर्ध-स्वयंचलित बंदुका वापरण्यात आल्या आहेत. सैनिक युद्धासाठी जास्तीत जास्त मारक क्षमता असलेल्या बंदुका वापरतात. तिथे युद्ध व सैनिकांच्या गरजा ध्यानात घेऊन अर्ध-स्वयंचलित बंदुका तयार केल्या जातात. अनेक कंपन्या या बंदुकांच्या डिझाइन्स खरेदी करून त्यांच्या स्थानिक आवृत्त्या व नकला काढतात आणि सार्वजनिक विक्रीसाठी बाजारात आणतात. त्यामुळे अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उद्योगाचे आज सैन्यकरण झाले आहे. या प्राणघातक बंदुकांमध्ये उच्च मॅगझिन धारणक्षमता असते. या शस्त्रांतून काही मिनिटांत भरपूर गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. त्याच शाळा व इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारांमध्ये वापरल्याचे दिसून येते.

शस्त्रास्त्रांचा व्यापार

आज अमेरिकेत मॅक्डॉनल्डच्या रेस्टॉरंटपेक्षा परवाना असलेल्या शस्त्रविक्रीच्या दुकानांची संख्या जास्त आहे. वस्तू तारण ठेवण्याच्या ५० हजारांपेक्षा अधिक दुकानांतून १०-१२ बंदुका एखाद्याला सहज खरेदी करता येतात. लॅपटॉपच्या किमतीत बंदुका आणि अ‍ॅपलच्या मॅक्बुकच्या किमतीत तिथे सहज रायफल्स मिळतात. ७० लाखांपेक्षा अधिक परवानाधारक बंदूकमालक अमेरिकेत आहेत. प्रत्येक अमेरिकी नागरिकावर एक बंदूक एवढय़ा बंदुका सध्या अमेरिकेत घराघरांत आहेत. जगभरात निर्मित होणाऱ्या सर्व बंदुकांतील अर्धा साठा अमेरिकेत खरेदी केला जातो. २००५ ते २०१६ या कालावधीतच सहा पट अधिक क्षमतेच्या, अधिक गोळ्यांच्या फैरी झाडू शकणाऱ्या ३० लाख पिस्तुलांचे उत्पादन करण्यात आले. २०१६ साली शस्त्रास्त्र कंपन्यांनी १.६ कोटी बंदुका बाजारात आणल्या. २००६ साली हे उत्पादन ३६ लाख एवढेच होते; पण दहा वर्षांत त्यात तिप्पट वाढ झाली. केवळ काही मोजके गनमेकर शस्त्रविक्री बाजारावर अधिराज्य गाजवतात. आघाडीच्या दहा कंपन्या ६५ टक्के शस्त्रास्त्रनिर्मिती व विक्री करतात.

अमेरिकेतील शस्त्रास्त्र उत्पादक या वर्षी सुमारे सहा अब्ज डॉलर्स किमतीच्या शस्त्रास्त्र आणि दारूगोळा इतर देशांमध्ये निर्यात करतात. यांचे सर्वात मोठे ग्राहक कॅनडा, ग्रेट ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारखे देश आहेत- जिथे बंदुकांसंबंधित कायदे अधिक कडक आहेत. या तीन देशांमध्ये एकूण निर्यातीपैकी ४० टक्के निर्यात होते. शिवाय चोरटय़ा मार्गाने दहा पट किमतीत या बंदुका तिथे विकल्या जातात. वॉलमार्ट आता अमेरिकेतील बंदूक आणि दारूगोळा विकणारा सर्वात मोठा विक्रेता आहे. वॉलमार्टची साथ मिळाल्याने बंदुकांच्या विक्रीत व त्यातील नफ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

लपवून आणण्यासारख्या व वाढत्या मारकतेच्या बंदुकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणी-पुरवठा तत्त्वावर प्राणघातक रायफल्ससह अर्ध-स्वयंचलित रायफल्सच्या उत्पादनानेही वेग धरला आहे. एकटय़ा २०१६ साली ४२ लाख रायफल्सचे उत्पादन करण्यात आले. रायफल्सच्या तुलनेने कमी किमतीची, ठेवायला, लपवायला आणि हाताळायला सोयीच्या असल्याने पिस्तुलांची (हँडगन) संख्या अमेरिकेत प्रचंड वेगाने वाढली आहे. सध्या अर्ध्यापेक्षा जास्त बंदुक उत्पादन पिस्तुलांचे होत आहे. अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उद्योगाच्या नफ्यात दारूगोळा हा कमाईचा मोठा भाग आहे. २०-२२ हजारांची एक पिस्तूल घेणारा माणूस वयाच्या ८०व्या वर्षांपर्यंत सरासरी सव्वासात लाख रुपयांपर्यंतचा दारूगोळा खरेदी करत असतो. हा विषय गुंतागुंतीचा भावनिक आणि अमेरिकी नागरिकांच्या सामथ्र्य व नियंत्रणाच्या मानसिकतेशी निगडित असल्याने गंभीर बनला आहे. बंदुकांच्या जोडीने अमेरिकेत गोळ्या, बुलेटप्रूफ जॅकेट, बंदुका लपवण्यासाठी विशिष्ट कपडे, पट्टे, सुरक्षा प्रशिक्षण सल्लागार, बंदूक ने-आण करण्याची आच्छादने व पेटय़ा असा समांतर व्यवसायही उगवला आहे.

शस्त्रांच्या उलाढालीतून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुमारे सव्वातीन लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तसेच करांच्या स्वरूपात सुमारे ४५ हजार कोटी रुपये एवढी रक्कम मिळाल्याची २०१७ची एक आकडेवारी सांगते.

नियंत्रण कोणाला नको आहे?

अमेरिकेत बंदुका नियंत्रण करण्यास सर्वाधिक विरोध ‘नॅशनल रायफल असोसिएशन (एनआरए)’ ही शस्त्रास्त्रे बाळगण्याच्या हक्कांचा पुरस्कार करणारी संस्था करते. एनआरएच्या संकेतस्थळावर ही संस्था आणि तिच्याशी संबंध असलेल्या अनेक संघटना स्वत:ला नागरी हक्क संस्था म्हणून नमूद करतात! ६५ लाखांच्या वर सभासद संख्या असलेली ही संस्था शस्त्रास्त्रांची माहिती देणारी व प्रचार करणारी अनेक मासिके चालवते. बंदुका लोकप्रिय व्हाव्यात म्हणून नेमबाजी स्पर्धेचे कार्यक्रम प्रायोजित करते. शस्त्रास्त्रांच्या कंपन्या अमेरिकेच्या राजकीय धोरणांच्या दिशा ठरवणाऱ्या सर्वात मोठय़ा ‘लॉबिंग’ गटांपैकी एक आहेत.

एनआरएचा स्वत:चा ‘इन्स्टिटय़ूट फॉर लेजिस्लेटिव्ह अ‍ॅक्शन (एनआरए-ईएलए)’ हा एक विभाग आहे, जो राजकीय कृती समिती (पीएसी), पॉलिटिकल व्हिक्टरी फंड (पीव्हीएफ) असे दोन विभाग सांभाळतो. शस्त्रास्त्र उद्योग आपल्या फायद्याच्या तत्त्वावर माध्यमे, प्रचार यंत्रणा आदींच्या माध्यमातून स्थानिक, राज्य आणि संघराज्य पातळीवरील विविध उमेदवारांना मान्यता, समर्थन देतो किंवा विरोध करतो. अमेरिकेचे बंदुकांबद्दलचे धोरण जणू एनआरएच ठरवते. अब्जावधी रुपयांची आर्थिक संसाधने व मोठय़ा सभासद संख्येचा प्रभाव वापरून ही संस्था लोकप्रतिनिधींच्या धोरण, मत व वर्तनावर नियंत्रण मिळवते. जेव्हा गोळीबारीच्या घटनांमुळे हादरलेल्या काही स्वराज्य संस्थांनी बंदुका बाळगण्यावर नियंत्रण आणण्याचे कायदे करण्याच्या हालचाली सुरू केल्या, तेव्हा राज्य आणि स्थानिक पातळीवर एनआरएने बंदुका नियमनमुक्त करण्यासाठी यशस्वीरीत्या मोहीम राबविली. सार्वजनिक ठिकाणी बंदुका बाळगण्यावर लादण्यात आलेले निर्बंध हटवण्यासाठी राज्य सरकारांवर यशस्वी दबाव तयार करण्यात आला. बंदुका नियंत्रित करण्याची स्थानिक सरकारची क्षमता काढून टाकण्यासाठी राज्यांनी कायद्याचे केंद्रीकरण केले. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एनआरएचे सदस्य आहेत. हिलरी क्लिंटन जिंकल्यास बंदूक नियंत्रण कायदा लागू होईल आणि बंदीचा सामना करावा लागेल, हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या मुद्दय़ांपैकी एक मुद्दा होता. त्यामुळेच अध्यक्षपदी आल्यावर ट्रम्प यांनी प्राणघातक शस्त्रांवरील बंदी आणि उच्च क्षमतेचे मॅगझिन बाळगण्यासंबंधी र्निबधांची मागणी नाकारली. त्याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, अमेरिकन काँग्रेसचे सदस्य, सरकारी अधिकारीही एनआरए सदस्य आहेत. याच शक्तीच्या बळावर एनआरएने २०१२ पासून आजवर बंदूक नियमनासाठी अमेरिकी कायदेमंडळात सादर करण्यात आलेल्या सुमारे १०० विधेयकांना हाणून पाडले आहे.

तरी आशेला जागा..

मात्र, पार्कलॅण्ड गोळीबारानंतर, प्रमुख व्यावसायिकांनी एनआरएशी संबंध तोडले. ब्लॅकरोकसारखे आघाडीचे गुंतवणूकदार भागधारकांच्या प्रस्तावावर बंदूक नियंत्रण गटाच्या बाजूने उभे राहिले. अनेकांनी बंदूक कंपन्यांना नियमन पाळण्याचे व पूर्वेतिहास तपासून बंदुका देण्याचे आवाहन करायला संगितले. ‘टॉम्स’ नावाच्या एका बूट विक्री कंपनीने शस्त्रास्त्र हिंसाचारापासून संरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या संघटनांना ३६ कोटी रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले. लेवी स्ट्रॉस या प्रसिद्ध जीन्स उत्पादक कंपनीनेदेखील असाच पवित्रा घेतला होता.

परिणामी रायफल-बंदुकांची विक्री काही काळ कमी झाली. एनआरएने मागच्या वर्षी जाहीर केले की, त्यांच्या उत्पन्नात सुमारे चार अब्ज रुपयांची तूट आली आहे. अमेरिकी शस्त्रास्त्र निर्मात्यांनाही अशाच प्रकारच्या घसरणीचा अनुभव आला. शस्त्रास्त्र विक्रेत्यांसाठी आणखी एक उलटा पडलेला डाव आहे. तो असा की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात बंदुकांवर नियंत्रण घातले जाणार नाही, यामुळे निश्चिंत झालेल्या अमेरिकी नागरिकांनी बंदुकांची खरेदी तुलनेने कमी केली आहे.

kalpanasfi@gmail.com