19 November 2017

News Flash

दलवाई आज का आठवावे?

मुस्लीम समाजात ‘ज्ञानेश्वर’ ठरू शकणारे मौलाना अबुल कलाम आझादांनाही अव्हेरण्यात आले.

डॉ. शमसुद्दिन तांबोळी | Updated: May 3, 2017 1:33 AM

तोंडी-एकतर्फी तलाकविरोधात आणि समान नागरी कायद्यासाठी हमीद दलवाई (अगदी उजवीकडे) यांच्या नेतृत्वाखाली, स्वधर्मातील दलालांचा धिक्कार करीत १८ एप्रिल १९६६ रोजी निघालेल्या मोर्चाचे छायाचित्र

 

हमीद दलवाई यांच्या चाळिसाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ३ मे रोजी दलवाईंचे ललित व वैचारिक लेखन या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र, हमीद दलवाई स्मृती पुरस्कार प्रदान समारंभ, तसेच सायंकाळी सर्वधर्मीय परित्यक्ता व तलाकपीडित महिलांचा मेळावा पुण्यात होतो आहे. हे सारे का महत्त्वाचे? याविषयीचे हे टिपण..

भारतातील मुस्लीम समाज हा एका संक्रमणावस्थेतून जात आहे. या समाजाची विविध क्षेत्रांत झालेली दुरवस्था होण्याची तीन कारणे आहेत. पहिले महत्त्वाचे कारण या समाजावर आश्रफी, पुरोहितशाही वर्गाने निर्माण केलेला सुधारणेविरोधातील प्रभाव, दुसरे कारण समाजप्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या खंबीर नेतृत्वाचा अभाव आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जमातवादी नेतृत्वापुढे गुडघे टेकवून शासनकर्त्यांनी केलेला अनुनय! लोकशिक्षणाऐवजी लोकानुनयाचे धोरण समाजाच्या या दुरवस्थेस अधिक कारणीभूत आहे.

सुमारे दोनशे वर्षांपूर्वी सर सय्यद अहमद खान यांची मुस्लीम शिक्षणासाठी प्रयत्न केले, पण त्यांनाही ‘काफर’ ठरवण्यात आले. मुस्लीम समाजात ‘ज्ञानेश्वर’ ठरू शकणारे मौलाना अबुल कलाम आझादांनाही अव्हेरण्यात आले. अगदी ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनाही स्वीकारार्हता देण्यात आली नाही. धर्मसुधारणा करणाऱ्या असगर अली इंजिनिअरवरही हल्ले करण्यात आले. हमीद दलवाई तर या सर्वापुढे चार पावले पुढचा विचार करणारे असल्याने त्यांचा मुस्लीम असण्याचा अधिकारही जमातवादी मानसिकतेने हिरावून घेतला. अर्थात, याला दलवाईंनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वास साजेसा प्रतिवादही केला आहे.

हमीद दलवाई यांना मुस्लीम समाजसुधारक म्हणून ओळखण्यात येते. वास्तविक हमीदभाईंचे कार्य हे एकूणच समाजात मानवी मूल्य रुजवणारे होते. एक माणूस म्हणून त्यांनी उंची गाठली होती. मानवी मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचे कार्य व मानवमुक्तीच्या चळवळीस बळ देणारे कार्य त्यांनी अल्पायुष्यात केले. हे कार्य करीत असताना एम. आर. ए. बेग, न्या. असफ ए. फैजी, डॉ. मुनीर शाकिर यांच्यासारखे बुद्धिवादी मुस्लीम त्यांच्यासमवेत असले तरी त्यांचा आधार हा मुस्लीम समाज नव्हता, तर प्रा. अ. भी. शहा, प्रा. नरहर कुरुंदकर, वसंतराव नगरकर व असा सेक्युलर समाज त्यांचा आधार होता. दलवाईंना अधिक काळ लाभला असता तर त्यांनी मुस्लीम समाजाचा विश्वास संपादन करून मोठे कार्य उभे केले असते याची खात्री वाटते.

मुस्लीम समाजात पुरोगामी व्यक्ती आहेत, पण असा वर्ग नाही. यामुळे मुस्लीम समाजात प्रबोधन झाले नाही. विविध मुस्लीम देशांत काही प्रमाणात सुधारणा झाल्या. परंतु त्या भारतात आल्या नाहीत म्हणून मुस्लीम सुधारणेचे कार्य एका संवेदनक्षम, साहित्यिक दलवाईंना हाती घ्यावे वाटले आणि याच कार्यासाठी त्यांनी आपली लेखणी, वाणी आणि देह झिजवला.

सर सय्यद अहमद खान, मौलाना आझादांपासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झालेल्या फातिमाबी शेख व भारताचे आदरणीय राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी मुस्लीम महिलांच्या दयनीय स्थितीबद्दल मौन बाळगले. धार्मिक व राजकीयदृष्टय़ा हे अवघड काम फक्त दलवाईच करू शकले म्हणून ‘इस्लामच्या इतिहासात क्रांतिकारक विचार’ मांडण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल.

‘इंधन’ या कादंबरीस व ‘लाट’ या कथासंग्रहास १९६६ साली राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार लाभलेल्या या साहित्यिकाने आपल्या साहित्यिक अंगाचा त्याग करून समाजसुधारणेच्या कार्यास वाहून घेतले. १८ एप्रिल १९६६ मध्ये केवळ सात मुस्लीम महिलांचा विधान भवनावर मोर्चा काढून, मुस्लीम पर्सनल लॉमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व, हलालासारख्या संविधानविरोधी तरतुदी काढून टाकण्याची मागणी केली. १९६८ मध्ये सदा-ए-निसवाँ (महिलांचा आवाज) तसेच याच वर्षी प्रा. अ. भि. शहासोबत इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना केली. धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे करताना त्यांच्या लक्षात आले, की हे कार्य फक्त बुद्धिजीवी वर्गापुरतेच मर्यादित राहाते व मुस्लीम समाज याकडे पाठ फिरवतो आहे. म्हणून २२ मार्च १९७० रोजी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली व पंधरा दिवसांत म्हणजे ८ एप्रिल १९७० रोजी इंडियन सेक्युलर सोसायटी आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने पाचशे स्त्री-पुरुषांच्या सहय़ांचे निवेदन ‘समान नागरी कायद्यासाठी’ मुख्यमंत्र्यांना दिले.

या काळात बुद्धिजीवी वर्गाशी चर्चा करण्यापेक्षा सामान्य जनतेशी संवाद साधण्याचे धोरण अवलंबिले. सभा, मेळावे, परिषदा, निवेदने अशा कार्यक्रमाचा झपाटा राज्य व राष्ट्रीय पातळीवर लावला. याचाच प्रतिकार करण्यासाठी मुस्लीम जमातवाद्यांनी मुस्लीम पर्सनल लॉ प्रोटेक्शन कमिटीची स्थापना केली व १९७३ मध्ये या कमिटीचे रजिस्ट्रेशन मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड असे करण्यात आले. हमीद दलवाई यांच्या समतावादी कार्यास विरोध करण्यासाठी उगम झालेले हे बोर्ड सातत्याने सुधारणेस विरोध करीत आहे. ते शहाबानो-शबानाबानो ते सायराबानो या सर्वोच्च न्यायालयातील समतेच्या लढय़ापर्यंत आजही हे बोर्ड समाज आणि शासनाची दिशाभूल करीत आहे. भारतीय संविधानाने दिलेले हक्क तर सोडाच, खुद्द कुराण आणि पैगंबर साहेबांनी मुस्लीम महिलेस दिलेली समता आणि अधिकारांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. हा अट्टहास आणि दुराग्रह केवळ जमातवादी राजकारणाचाच भाग आहे. राजकारण करीत असताना भारतीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मूल्यांनाच अव्हान देण्यात येत असून, संविधान व संसद यांच्या सार्वभौमापेक्षा अल्लाहचे सार्वभौम अधोरेखित करण्यात येत आहे. अर्थात, अल्लाहला काय अपेक्षित आहे, हे सांगण्यासाठी मुल्लाह पुढे येताना दिसत नाहीत. संविधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांनाच जर जुमानण्यात येत नसेल तर या बोर्डाचे अस्तित्व किती विखारी, उपद्व्याप करणारे आहे हे समजून घेतले पाहिजे.

तोंडी तलाक ‘चुकीचे’ असले तरी ‘योग्य’ आहे (Though wrong it is valid) ही भूमिका किंवा या समस्येवर मुस्लीम समाज उत्तर शोधेल व अशा तलाकचा वापर करणाऱ्यास समाज बहिष्कार घालेल, ही भाषा जात-खाप पंचायतीपेक्षा वेगळी नाही. एकविसाव्या शतकातील बोर्डाची ही बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. जमाते इस्लामी, महिला विंग आजही मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे कायद्याचे समर्थन करतात. मुस्लीम देशांत सुधारणा झाल्या आहेत त्यासही विरोध करतात. हे धर्मनिरपेक्ष, लोकशाही समाजनिर्मितीपुढील आव्हान म्हणूनच याकडे पाहिले पाहिजे.

असे असले तरी हमीदभाईंनी ५१ वर्षांपूर्वी सुरू केलेली स्त्रीमुक्तीची चळवळ अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर या चळवळीला पाठिंबा मिळत आहे. जवळपास ५० संघटना तोंडी-एकतर्फी तलाक विरोधात संघर्ष करीत आहेत. याचे श्रेय हमीदभाईंना देत असतानाच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अर्थात, महिला आंदोलनातील काही संघटना इस्लामचा आधार घेत तोंडी-एकतर्फी तलाकच्या विरोधात आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी ती एक पूरक मागणी म्हणायलाच हवी. सर्वच बाबतीत एकमत नसले तरी तलाकच्या समस्येच्या निवारणातील या आंदोलनास मुस्लीम सत्यशोधक मंडळ पाठिंबा देत आहे. हमीदभाईंचे क्रांतिकारकत्व हे आहे की ‘कुराणात असो अगर नसो ते वाईट आहे, विषम आहे, अन्यायकारक आहे हे बाजूला सारले पाहिजे’ ही निर्भीड भूमिका जगाच्या पाठीवर दलवाईंशिवाय कोणीही मांडली नाही. हे दलवाईंचे मोठे वैशिष्टय़ आहे.

दलवाईंनंतर ५० वर्षांनी आम्ही जे मुद्दे मांडतो ते समाज स्वीकारत नसला तरी किमान ऐकून घेतो अशी स्थिती अनुभवास येते, पण त्या काळी हमीदभाई जे मुद्दे मांडत होते ते स्वीकारण्याचा प्रश्नच नाही- नुसते ऐकणे म्हणजेसुद्धा एक प्रकारची धर्मनिंदाच आहे, असे समाज मानत होता.

दलवाईचा लढा हा मानवतावादाचा लढा होता. भारतातील एकात्मतेचा पाया समरसता नव्हे तर धर्मनिरपेक्षता पाहिजे, हा पायाभूत विचार आजही महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता, आधुनिक मूल्ये आणि विवेकवाद ही दलवाईंची चतु:सूत्री आजच्या भारतीय समाजासाठी अनिवार्य वाटते. याचसाठी माजी पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी म्हणाले, ‘दलवाई विचारांची आवश्यकता फक्त मुस्लीम समाजासाठीच नाही तर दलवाई विचार हिंदूंनीसुद्धा आत्मसात केला पाहिजे. दलवाईंची हिंदूंनाही गरज आहे.’ हे विधान पुढे नेत असेही म्हणता येईल, की आजच्या जागतिक वातावरणाच्या संदर्भात दलवाई विचार मानवतावादी असल्याने ते सर्व जगाच्याच दृष्टीने आवश्यक आहेत.

लेखक मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत.

ईमेल : tambolimm@rediffmail.com

First Published on May 3, 2017 1:33 am

Web Title: hamid dalwai memorial day hamid dalwai muslim social reformer