वनौषधी
बदलत्या जीवनशैलीचे मानवी आयुष्यावर विपरीत परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्राबद्दल येणाऱ्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘वनौषधी’चा दिवाळी अंक वाचनीय झाला आहे. सांधेदुखी, मधुमेह, सोरायसिस, हृदयविकार अशा विकारांवरील काही परिणामकारक औषधींची माहिती या अंकात देण्यात आली आहे. जेवणानंतर पान खाण्याची सवय अनेक खवय्यांना असते. ही सवय अन्न पचनासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकते. मात्र या सवयीचे व्यसनांत रूपांतर होता कामा नये, असा विचार ‘पानसेवन, सवय असावी पण व्यसन नसावे’ या लेखात मांडला आहे. वैद्य दिलखुश तांबोळी यांनी ‘चाळिशीनंतरचे आरोग्य’ या लेखात उपचारात्मकतेपेक्षा प्रतिबंधात्मक पद्धतीने आरोग्य उत्तम कसे राखावे याचा धांडोळा घेतला आहे. कोल्हापूरचे डॉ.सुनील पाटील यांनी आपल्या लेखातून निरोगी आयुष्यासाठी असलेले ध्यानाचे आणि योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. याव्यतिरिक्त आरोग्यासाठी लिंबूपाणी (लेखक – वैद्य स्नेहल पाटील), हृदयविकार आणि आयुर्वेद, डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांसाठी घरगुती उपाय आणि निरोगी केसांसाठी वनौषधी हे लेखही वाचनीय झाले आहेत.
संपादक – वैद्य सुनील पाटील,
 पृष्ठे – ९६, मूल्य – १००/-
कलामंच
सुप्रसिद्ध साहित्यिक चिं.त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या स्मरणार्थ काढला गेलेला, कलामंचचा दिवाळी अंक अत्यंत वाचनीय झाला आहे. कथा, कविता, प्रवासवर्णन, मुलाखती, लेख, पाकक्रिया आणि व्यंगचित्रे अशा सर्व साहित्यप्रकारांनी हा अंक सजला आहे. आरती प्रभूंचीच फाटक्या शिडाचे पडाव ही कथा, अशोक लोटणकर यांची सलाम ही हृदयस्पर्शी कथा निव्वळ वाचनीयच नव्हे तर, अंतर्मुख करणाऱ्या झाल्या आहेत. साहित्यिक अनुपम बेहेरे यांनी कवी ग्रेस यांचा काव्यपट उलगडून दाखवणारा ‘कवित्वाच्या प्रकटीकरणाची व्याकुळता’ हा लेख अप्रतिम झाला आहे. विशेष म्हणजे, त्या लेखादरम्यान ग्रेस यांच्या अनेक काव्यपंक्ती कोणताही संदर्भ न हरविता मांडल्या गेल्या आहेत. ग्रेस यांच्या चाहत्यांसाठी हा लेख म्हणजे जणू सर्वोत्तम साहित्यिक फराळच ठरावा. लहानसाच असला तरी गिरगांवचा भूतकाळ रंगविणारा मधुसूदन फाटक यांचा गिरगांवकरांची करमणूक गृहे हा लेख ‘नॉस्टॅल्जिक’ केल्यावाचून राहात नाही. राजकारणातील महिलांचा सहभाग हा लेखही असाच वाचनीय झाला आहे. पं. जसराज यांचे शिष्य रतन मोहन शर्मा यांची शास्त्रीय संगीत याच विषयावर घेतलेली मुलाखतही मार्मिक झाली आहे. विशेषत शास्त्रीय संगीतात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांना आश्वस्त कसे करता येईल, यावर त्यांनी सुचविलेले उपाय निश्चितच स्वागतार्ह आहेत. या सर्वावर कळस चढविला आहे, तो मंगेश पाडगांवकर, महेश केळुसकर यांच्या स्वहस्ताक्षरातील कवितांनी. शिवाय दिवाळी अंकांमध्ये अभावानेच आढळणारा प्रत्येक लेखकाचा दिलेला परिचय हेही या अंकाचे आगळे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. एकूणच हा अंक निश्चितच मेजवानी ठरावा.
संपादिका – सौ. हेमांगी नेरकर,
पृष्ठे – २०४, मूल्य – ४०/-
किरात
मानवी आयुष्यातील नातेसंबंधांचा र्सवकष विचार करणारा दिवाळी अंक म्हणजे किरात! ८९ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या साप्ताहिक किरातचा हा ३९ वा अंक आह़े  केवळ माणसामाणसातीलच नव्हे, तर माणूस आणि प्राणी, माणूस आणि निसर्ग अशा मानवी आयुष्यातील सर्वच नातेबंधांवर या अंकातील कथा- लेख वेगवेगळ्या अंगाने प्रकाश टाकतात़  अंकाचे विशेष आकर्षण ठरत आहे, ती समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत, बाळ खानोलकर यांची कादंबरी आणि ‘मालवणिका’ अर्थात मालवणीतल्या वात्रटिका! त्या व्यतिरिक्त राम काळे, श्रीराम काळे, सीताराम टांककर, राम कोयंडे, डॉ़ सुभाष भांडारकर आदींच्या नात्यांचे विविध पैलू उलगडणाऱ्या कथा आहेत़  तसेच श्रुती संकोळी, उज्ज्वला केळकर, भक्ती करंबेळकर, मधुरा आठवलेकर आदींचे विशेष लेखही आहेत़  त्याचबरोबर कविता, व्यंगचित्रे असे दिवाळी अंकातील नेहमीचे घटकही आवश्यक प्रमाणात आहेत़
कार्यकारी संपादक- अ‍ॅड़  शशांक श्रीधर मराठे
पृष्ठे – १८४, किंमत- ७० रुपय़े
चैत्राली
पर्यटन आणि पर्यावरण किंवा पर्यावरणपूरक पर्यटन अशी संकल्पना घेऊन चैत्रालीचा दिवाळी अंक साकारला आह़े  अंकाचे हे ३० वे वर्ष आह़े  पर्यटन आणि पर्यावरण या विषयांशी जिव्हाळा असलेल्यांसाठी तर हा अंक विशेष मेजवानीच आह़े  कोकण पर्यटन विकासासाठी नवी दृष्टी या शीर्षकाखाली रजनीश जोशी यांचा विशेष लेख आह़े  कोकणचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी त्यात काही बाबी सुचविण्यात आल्या आहेत़  
 दुर्गाचा देश हा डॉ़ मिलिंद पराडकर यांचा गड-दुर्गाचे पुराणकाळापासूनचे महत्त्व विशद करणारा लेख वाचनीय आह़े  त्याबरोबर कान्हा- काझीरंगा अभयारण्यापासून ते गंगोत्री- यमुनोत्रीपर्यंत आणि प्राचीन- आधुनिक तीर्थक्षेत्रांपासून ते क्रांतिकारकांच्या पदस्पर्शामुळे राष्ट्रीय तीर्थक्षेत्रच झालेल्या अंदमानपर्यंत बहुतेक पर्यटनस्थळांचा धांडोळा यात घेण्यात आला आह़े  तसेच दुबई, ब्युनस एरिस आदी परदेशी शहरांचाही आढावा यात घेण्यात आला आह़े  दसरा- वटपौर्णिमा आणि पर्यावरण, जलसाक्षरता काळाची गरज, ग्लोबल वॉर्मिग, बिघडणाऱ्या पर्यावरणाविषयी अशा लेखांतून पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्यांना स्पर्श करण्यात आला आह़े
संपादक- रमेश पाटील,
पृष्ठे -१७६, किंमत- १०० रुपय़े