News Flash

नाही तिज ठायी..

एवढय़ात जलसंपदा विभागात कार्यरत असलेले मित्र सुकुमार पाटील यांची मोबाइलवर रिंग वाजली.

|| दिगंबर शिंदे

नागपंचमीचा दिवस होता. जिवंत नागाची पूजा करण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळ्याची बातमी करण्याचा विचार मनात घोळत होता. याच वेळी रेडिओ एफएम वाहिनीवर मराठी गाणी वाजत होती. पद्मजा फेणाणी यांचे ‘हसरा, नाचरा, जरासा लाजरा.. सुंदर साजिरा, श्रावण आला..’ हे सदाबहार गीत सुरू असतानाच एकदम केंद्रावरील प्रसारण बंद झाले. रेडिओचे बटन फिरवून पाहिले तरी गाणे वाजत होते ते केंद्र काही सुरू होईना. आता राहू दे म्हणून दुसऱ्या वाहिनीवरील कार्यक्रम ऐकतच सकाळचे नित्याचे विधी आवरण्यास घेतले. एवढय़ात जलसंपदा विभागात कार्यरत असलेले मित्र सुकुमार पाटील यांची मोबाइलवर रिंग वाजली.

पाणीपातळी किती आहे, हे नित्याचे विचारण्यापूर्वीच त्यांनी सांगितले की, ‘‘नदीचे पाणी उद्यापासून मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. निर्माण होणाऱ्या संभाव्य स्थितीची सांगलीच्या मित्रांना माहिती द्या. कोल्हापूरची पंचगंगा, चांदोलीची वारणाही पात्राबाहेर पडली असून कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार आहे. तातडीने हालचाली करून सुरक्षित स्थळी जाण्यास सांगा.. आणि नदीकाठी जनावरे असलेल्यांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला तर होणारी हानी टाळता येऊ शकते..’’

त्यांच्यासारखी जबाबदार व्यक्ती सांगते आहे म्हटल्यावर त्याबद्दल खात्री वाटलीच. कारण जून महिना चालू झाल्यापासूनच त्यांच्या संपर्कात होतो. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या विश्वासार्हतेबद्दल काहीच शंका नव्हती.

जुलैच्या अखेरच्या आठवडय़ापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत होता. २८ जुलैला तर एका रात्रीत कृष्णेच्या पातळीत तब्बल १३ फुटांची वाढ झाली होती. ३० जुलैला आयर्विन पुलाजवळ पाण्याने ३० फुटांची पातळी गाठताच मगरमच्छ कॉलनीत कृष्णेचे पाणी शिरले. वसाहतीतील शंभरएक लोकांचे स्थलांतर तातडीने केले गेले. तेव्हाच खरे तर पुराची चाहूल लागली होती.

कृष्णाकाठी राहणाऱ्यांना २००५ च्या पुराची आठवण होती. त्या वेळेसारखीच स्थिती यंदाही राहील असा अंदाज होता. या अंदाजावरून अनेकांनी तीच पूररेषा समजून घरातील सामान उंचीवर ठेवले. ज्या भागापर्यंत पाणी येईल असे वाटत होते, तो भाग मोकळा करीत त्यापेक्षा उंचीवर असलेल्या ठिकाणी आसरा शोधला, तर कोणी निवारा केंद्रात गेले. १४ वर्षांपूर्वीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन जाणती माणसे पूररेषा दाखवत होती, तर तरुणाई सेल्फीच्या नादात महापूर ‘एन्जॉय’ करत होती. तेव्हा पूर आला होता, आताही येईल; चारदोन दिवसांत पाण्याला उतार येईल, तोवर कसे तरी काढू.. असे एकमेकांना सांगत धीर देत होते.

मात्र, पाण्याला उतार येण्याऐवजी कृष्णेने रुद्रावतारच धारण केला. कोयना, चांदोलीतून विसर्ग वाढविल्याने ६ ऑगस्टला ४५ फुटांची धोकापातळी ओलांडून पुढच्या दोनच दिवसांत सर्वोच्च- ५७ फूट ५ इंच इतक्या पातळीवर पाणी गेले. नदीकाठचा भाग, कृष्णा-वारणा काठाची १०२ गावे पाण्याबरोबर अंधारात बुडाली. अगोदर घर सोडण्यास नकार देणारे गावकरी मिळेल त्या होडीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, अपुऱ्या यंत्रणेमुळे घरातून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झालेले, त्यातच हातातील मोबाइलच्या बॅटरीने मान टाकलेली, घरात बारा महिने विजेचा दिवा असल्याने चिमणी परागंदा झालेली आणि रॉकेलमुक्तीच्या घोषणेमुळे दिवा, दिवटी लावण्यास तेलही नाही; गोडेतेलाच्या आधारावर देवघरातील पणती लावायची म्हटले, तर काडेपेटीही भिजलेली.

आज पुराला उतार पडेल, उद्या तरी स्थिती सुधारेल या आशेवर एकेक तास भलामोठा वाटत होता. होडी घेऊन येणारे अगोदर बायका, मुले आणि वृद्धांना घेऊन जात होते. या दिवसात मृत्युभयाने मनाचा ताबा घेतला होता, जणू जिवंतपणीच त्याचा अनुभव येत होता. कधी एकदा यातून बाहेर पडतो, असे अडकलेल्या सर्वानाच झाले होते.

कृष्णामाईच्या सोबतीने काडीकाडी करून संसार मांडला होता. तो सारिपाट अध्र्यावर मोडण्याची वेळ आली होती. संसार म्हटले की एक लागतं का? नागठाण्याचा कवी रमजान मुल्ला तर पूर आल्यानंतर आष्टय़ात वास्तव्यास आला होता. विटय़ाच्या स्वाती शिंदे या हळव्या मनाच्या शिक्षिकेने विचारले, तेव्हा कातर आवाजात रमजान म्हणाला, ‘‘वर्षभरासाठी लागणारी सहा किलोची चटणी तर गेलीच, पण सालबिजमीसाठी घेतलेले गहू, तांदूळ, ज्वारी पाण्यात भिजली. घरात सहा फूट पाणी आल्याने ज्वारीच्या पोत्यातून कोंब आले.’’ कृष्णाघाटावर राहणारी द्रुपदा आजी सांगत होती, घरच्या म्हशीच्या दुधाचे लोणी करून मिरज बाजारात विकून संसार थाटला होता. आज हा संसार मोडून पडला..

औदुंबर तर गुरुदत्ताचे स्थान. या दत्त महाराजांच्या भेटीला आलेल्या कृष्णामाईने शिखरावर आठ दिवस तळ ठोकला. माहेरवाशीण म्हणून आलेली नदी वैरीण झाली. औदुंबरच्या उगवतीला असलेले भिलवडी, तर अगदी कृष्णेच्या अंगाखांद्यावर खेळत्या गाव, पेठांत पाणी शिरले. दोन मजली घरांच्या छतावर कृष्णा नाचू लागली. दूध, दही आणि ताकाचे आगर म्हणून ओळखली जाणारी ताकारी, दह्यरी, दुधारी ही गावेही महापुराच्या तडाख्यात सापडली.

माहेरवाशीण लेक ही दोन दिवसांची पाहुणी. मात्र यंदा आलेल्या कृष्णामाईने तब्बल दहा दिवस मुक्काम ठोकला. या मुक्कामात अंगणात नाही, तर छतावर आणि काठावरील माणसांच्या छाताडावर नाच-नाचली. गदिमांनी म्हटले आहेच, ‘नदी नव्हे ही निसर्गनीती, आत्मगतीने सदा वाहती, लाभहानीची लवही कल्पना, नाही तिज ठायी..’

महापुरापाठोपाठ आलेला अश्रूंचा महापूरही फिका पडावा अशी गत नदीकाठच्या गावांची आज झाली आहे. उभी पिके पाण्याखाली गेली. ज्यांच्या जिवावर तेला-मिठाची जुळणी व्हायची ती जित्राबं चाऱ्या-पाण्यासाठी तडफडली. महापुराच्या लाटेत आलेल्या सापांची, मगरींची भीती तर काळीज पिळवटून टाकत होती. ज्या सुपीक कृष्णा खोऱ्याने जिल्ह्य़ाला समृद्धी दिली, उसाचा पका दिला, वांग्याची चव दिली, तो कृष्णाकाठ आज उद्ध्वस्त झाला आहे. याचबरोबर या सुपीक जमिनीत प्रतिभा फुलविणाऱ्या तरुण साहित्यिकांचे लेखन, पुस्तके कृष्णेने पोटात घेतले. सावळजच्या राजेंद्र पोळ या नाटककाराच्या २८६ नाटय़संहिता, सात-आठशे पुस्तके कृष्णार्पणमस्तू झाले. ही वेदना पुसली जाणार आहे का?

महापुराने उद्ध्वस्त झालेला कृष्णाकाठ पुन्हा सावरेल यात शंका नाही; कारण १४ वर्षांपूर्वीचा महापूरही संथ वाहणाऱ्या कृष्णेने पचविला आहे. नव्याने संसार मांडले जातील. पण घरात पुजलेले मागच्या पिढीच्या बापजाद्यांचे फोटोही कृष्णेने सोबत नेलेत, त्याचे दु:खही पूरग्रस्तांच्या डोळ्यांत आहे. पाण्याच्या महापुरानंतर  माणुसकीचाही महापूर सध्या पूरग्रस्त अनुभवत आहेत. ज्या तरुणाईवर ते मोबाइलच्या आभासी जगात वावरत असल्याची टीका होत होती, ते मदतीसाठी धाव-धावले. दाता असलेला कृष्णाकाठ आज मदतीच्या रांगेत उभा आहे.  शेवटी कितीही मिळवले तरी जगण्यासाठी काय लागते? तर, भुकेसाठी भाकरी, लज्जारक्षणासाठी कपडा व अंग टाकण्यापुरता निवारा. या चिरंतन सत्याची जाणीव या महापुराने करून दिली.

digambar.shinde@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 11:29 pm

Web Title: heavy rainfall maharashtra floods part 2 mpg 94
Next Stories
1 आमचं पाण्यातलं गाव..
2 डोळेच कॅमेरा होतात तेव्हा..
3 उपेक्षेचा महापूर!
Just Now!
X