News Flash

मराठमोळ्या मराठेंची अमेरिकी यशोगाथा

मराठे यांच्या प्रचाराची त्रिसूत्री होती : पारदर्शक कारभार, शानदार रस्ते आणि मजबूत नागरी सुविधा.

मूळचे मुंबईकर हेमंत मराठे जगप्रसिद्ध प्रिन्स्टन विद्यापीठ जिथे आहे त्या वेस्ट विंडसर नगरपालिकेचे महापौर म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या प्रचाराची त्रिसूत्री पाहिली की, त्यांना मुंबईतील वास्तव्याच्या अनुभवाचा किती लाभ झाला याचा प्रत्यय येतो.

मराठे यांचे प्रतिस्पर्धी होते मूळ भारतीय वंशाचे कमल खन्ना. मराठे यांनी त्यांचा निर्णायक पराभव करून पुढील चार वर्षांसाठी वेस्ट विंडसर नगरपालिकेच्या परिसराचा कायापालट करण्याचे वचन मतदारांना दिले आहे. त्यांच्यासह लिंडा गीव्हर्स आणि व्हर्जिनिया मांझारी या त्यांच्या पॅनेलमधील दोन्ही महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. मराठे यांनी २०१३ सालीही महापौरपदाची निवडणूक लढवली होती. ती अगदी थोडय़ा मतांनी ते हरले होते.

मराठे यांच्या प्रचाराची त्रिसूत्री होती : पारदर्शक कारभार, शानदार रस्ते आणि मजबूत नागरी सुविधा. ही आश्वासने मुंबईकरांना चांगलीच परिचित आहेत. फरक इतकाच की, मराठे यांच्यावर ती प्रत्यक्षात आणण्याची थेट जबाबदारी असेल. कारण अमेरिकेतला महापौर हा नगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि स्थानिक पोलीस खातेही त्याच्या आधिपत्याखाली असते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणे हासुद्धा महापौरांच्या कर्तव्याचा एक भाग असतो. अमेरिकेतील लोक स्थायिक होताना त्या परिसरातील शांततेला फार महत्त्व देतात. त्याखेरीज उत्तम शैक्षणिक सुविधा त्यांना हव्या असतात.

शैक्षणिक क्षेत्रात मराठे यांचे योगदान भरीव आहे. वेस्ट विंडसर स्कूल बोर्डाचे ते नऊ वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत शाळांचा दर्जा सुधारला, अर्थव्यवस्था भक्कम झाली आणि हा परिसर मुलांच्या संगोपनासाठी उत्तम असल्याचा त्यांचा लौकिक पसरला. येथील स्कूल बोर्डाचे वार्षिक अंदाजपत्रक १६५ दशलक्ष डॉलर्सचे असून त्यात ११०० कर्मचारी आहेत.

मोकळ्या जागांचे संरक्षण हा येथील प्रचारातील एक प्रमुख मुद्दा होता. वेस्ट विंडसर पालिका हद्दीतील एक प्रचंड भूखंड विकसित करण्याचा प्रयत्न एक मोठी विकासक कंपनी करत आहे. हा भूखंड निवासी वापरास खुला झाल्यास तेथे मोठय़ा प्रमाणात घरबांधणी होऊन गर्दी वाढणे आणि नागरी सुविधांवरील ताण वाढणे अपरिहार्य आहे. ‘या विकासास आपण कोणत्याही परिस्थितीत परवानगी देणार नाही’ या घोषणेसह मराठे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. आता त्यांचा विरोध आणखी धारदार होणार आहे. ‘स्टँडिंग अप फॉर वेस्ट विंडसर’ हे आपले घोषवाक्य खरे करून दाखवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

नगरपालिकेचा कारभार आणखी कार्यक्षम करून खर्चावर नियंत्रण आणण्याच्या मार्गाने मालमत्ता कर कमी करून दाखवण्याचे आव्हानही मराठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले आहे. न्यू जर्सी राज्यातील या पालिका क्षेत्रातील सुमारे २५ टक्के लोकसंख्या मूळची आशियाई आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांचा विजय लक्षणीय ठरतो.

निवडणुका म्हटल्या की कमी-अधिक फरकाने सारख्याच. याचा अनुभव मराठे यांनाही आला. त्यांनी केलेले एक विधान अर्धवट आणि संदर्भाविना समाजमाध्यमात फिरवून त्यांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठे यांनी त्याचा सडेतोड प्रतिवाद करून आपली भूमिका स्पष्ट केली आणि या अपप्रचाराचा निषेध केला. अखेर विजयश्रीने त्यांच्या गळ्यात माळ घातली.

मराठे मूळचे दादरचे रहिवासी. कीर्ती कॉलेजजवळ राहणारे. मुंबई आयआयटीमधून विद्युत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर १९८४ साली ते अमेरिकेत आले. प्रतिष्ठित व्हर्जिनिया टेक विद्यापीठातून मास्टर्स आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधून त्यांनी पीएच.डी. प्राप्त करून काही काळ नोकरी केली. नंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

पती-पत्नी आणि चार मुली असा मराठे परिवार गेली अनेक वर्षे वेस्ट विंडसर परिसरात राहत आहे. या परिसराचे सुंदर स्वरूप टिकवणे आणि येथे अर्निबध विकासाला प्रतिबंध करणे यासाठी मराठे प्रयत्नशील राहणार आहेत.

patrakar@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 12:33 am

Web Title: hemant marathe elected first indian american mayor
Next Stories
1 प्रतिजैविके – वेळ निघून चाललीय..
2 फेरीवाल्यांवर नियंत्रण, मग पार्किंगचे काय?
3 समकालीनतेच्या ‘आदिम’ खुणा
Just Now!
X