अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन नुकतेच ऐतिहासिक फिलाडेल्फिया शहरात झाले आणि हिलरी क्लिंटन यांच्या अध्यक्षीय उमेदवारीवर तेथे शिक्कामोर्तब करण्यात आले.  महिला उमेदवार निवडून डेमोक्रॅटिक पक्षाने परिवर्तनास चालना दिली आहे.  रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय यांचा वरचष्मा सतत जाणवत होता. तसे काहीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात नव्हते. दोन्ही पक्षांची अधिवेशने पाहिल्यानंतर असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही की, भारतातच राजकीय पक्षांची दुरवस्था झालेली नसून पुढारलेल्या अमेरिकेतही राजकीय पक्षांची अवस्था चांगली नाही. हिलरी यांना जोमदार प्रतिस्पर्धी नाही याचे एक कारण म्हणजे बाकीच्यांना उभे राहण्यास अप्रत्यक्षपणे परावृत्त करण्यात आले होते.

डे मोक्रॅटिक पक्षाने हिलरी क्लिन्टन यांची अध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड ज्या फिलाडेल्फियात केली ते ऐतिहासिकदृष्टय़ा  महत्त्वाचे शहर आहे. तिथेच अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार झाला.

त्या जाहीरनाम्यावर सही करणाऱ्यांतील एक सदस्य बेंजामिन फ्रँकलिन हा फार हरहुन्नरी होता. तो मूळचा बॉस्टनचा. पण तो फिलाडेल्फियाचा रहिवासी म्हणून ओळखला जातो. फिलाडेल्फियात त्याने पहिले अग्निशामक दल व वर्गणी भरून चालणारे पहिले वाचनालय सुरू केले. तो पहिला पोस्टमास्टर जनरल. टपाल इकडून तिकडे नेण्यास लागणाऱ्या वेळेत त्याने निम्म्याने कपात केली. बायफोकल चष्मा त्याने तयार केला.

अशा या शहरात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एका महिलेला उमेदवार निवडून डेमोक्रॅटिक पक्षाने परिवर्तनास चालना दिली आहे. तसे पाहिले तर रिपब्लिकन पक्ष नव्हे तर डेमोक्रॅटिक पक्षाने राजकीय क्षेत्रात सामाजिकदृष्टय़ा परिवर्तनास चालना दिलेली दिसेल. उपाध्यक्षपदासाठी मोठय़ा पक्षातर्फे निवडलेली पहिली महिला (जेराल्डिन फेरारो) डेमोक्रॅटिक पक्षाची होती. काँग्रेसचे सभापतिपद महिलेला (नॅन्सी पलोसी) दिले डेमोक्रॅटिक पक्षाने. देशाच्या अध्यक्षपदी काळ्या समाजाचा उमेदवार त्याच पक्षाने आणला आणि आता अध्यक्षपदासाठी एक महिला निवडली. काळ्या लोकांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा अध्यक्ष जॉन्सन यांनी केला तेही डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. अर्थात तेव्हा त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध झाला व दक्षिण भागातील डेमोक्रॅटिक पक्षातील लोक रिपब्लिकन पक्षात गेले. रिपब्लिकन पक्ष लिंकनचा पक्ष म्हणून रोज स्वत:भोवती आरती ओवाळून घेत असला तरी सामाजिक सुधारणा डेमोक्रॅटिक पक्षाने केल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे काँग्रेसमध्ये ४३ सभासद काळे आहेत. रिपब्लिकन पक्षातर्फे एकही नाही. रिपब्लिकनांच्या अधिवेशनातही गोरेतर लोक जवळजवळ नसतात.

अधिवेशनात हिलरी यांची निर्वेधपणे निवड झाली नाही. हिलरी यांना येथे तीव्र स्वरूपात विरोध होण्याचे कारण डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा डेबी वॉसरमन शुल्ट्झ आणि त्यांचे सहकारी यांच्या ई-मेलवरचे संदेश हे होते. ते संदेश विकिलीक्सतर्फे प्रसृत झाल्यावर रानच पेटले.

हिलरी यांचे प्रतिस्पर्धी सॅण्डर्स अनेकदा म्हणत की, डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय पातळीवरूनच त्यांच्याविरुद्ध प्रचार व हालचाली होत आहेत. विकिलीक्सने केलेल्या गौप्यस्फोटामुळे सॅण्डर्स यांची तक्रार खरी ठरली. बाहेर आलेल्या ई-मेलमध्ये सॅण्डर्स नास्तिक असल्याचे सांगून धार्मिक लोकांची मते त्यांना मिळणार नाहीत अशा रीतीने प्रचार करावा, वगरे अनेक विरोधी गोष्टी होत्या.

यामुळे सॅण्डर्स यांची निवडणुकीतील हार हीच खोटी असल्याचे मानणारे लोक पुढे आले. त्या सर्वाच्या निदर्शनांमुळे अधिवेशनाचे काय होणार, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. पण पक्षाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बठक होऊन डेबी यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले. पक्षाच्या घटनेप्रमाणे लोकांनी निवडलेले साधे प्रतिनिधी व पक्षाने निवडलेले ज्येष्ठ प्रतिनिधी अशी विभागणी असते; आता ज्येष्ठ प्रतिनिधींची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव असून पक्षाच्या कार्यक्रमात सॅण्डर्स सुचवीत असलेल्या काही महत्त्वाच्या कार्यक्रमांचा समावेश होईल. पक्षाच्या कार्यकारिणीची रचना वगरे नव्या नियमांप्रमाणे होणार आहे.

सॅण्डर्स यांचा हा नतिक विजय म्हटला पाहिजे. तो मिळाला नसता तर डेमोक्रॅटिक पक्ष दुभंगणे अनिवार्य झाले असते. ते टळले. सॅण्डर्स व त्यांचे सहकारी यांच्या प्रचारामुळे अशी हवा निर्माण झाली होती की, हिलरी आवश्यक तितक्या साध्या प्रतिनिधींच्या जोरावर उमेदवार झाल्या नाहीत तर ज्येष्ठ प्रतिनिधींमुळे झाल्या. हे खरे नाही. हिलरी यांना मतदान आणि साध्या प्रतिनिधींची संख्या या दोन्ही बाबतीत काहीच कमतरता नव्हती. ज्येष्ठ प्रतिनिधींच्या मदतीची त्यांना आवश्यकता नव्हती. सॅण्डर्स यांचा प्रचार बरोबर नव्हता.

या निमित्ताने असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही की, भारतातच राजकीय पक्षांची दुरवस्था झालेली नसून इतक्या पुढारलेल्या अमेरिकेतही राजकीय पक्षांची अवस्था चांगली नाही. हिलरी यांना जोमदार प्रतिस्पर्धी नाही याचे एक कारण म्हणजे बाकीच्यांना उभे राहण्यास अप्रत्यक्षपणे परावृत्त करण्यात आले होते. अपक्ष सॅण्डर्स हे निवडणुकीच्या सुमारास डेमोक्रॅटिक पक्षात आले आणि रिपब्लिकन पक्षाशी संबंध नसलेले ट्रम्प यांनी निवडणुकीसाठी पक्षाचे सदस्य होऊन त्या पक्षाची अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवली.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या एका समारंभात सॅण्डर्स यांनी जाहीर केले की, आता जेव्हा सेनेटचे अधिवेशन सुरू होईल तेव्हापासून ते पूर्वीप्रमाणे अपक्ष म्हणून काम करू लागतील, डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य असणार नाहीत. म्हणजे केवळ निवडणुकीसाठी पक्षसदस्यत्व ही एक प्रकारे सौदेबाजी झाली. पण डेमोक्रॅटिक पक्ष दुर्बळ असल्यामुळे त्याने इतकी तडजोड केली.

सॅण्डर्स हे स्वप्नांचे सौदागर असल्यामुळे वास्तव परिस्थितीची दखल न घेता हिलरी अध्यक्ष झाल्यावर कसे क्रांतिकारक परिवर्तन होईल याबद्दल ते बोलत राहिले. सुप्रीम कोर्टावर एक न्यायाधीश नेमायचा आहे. हिलरी जो नेमतील तो डेमोक्रॅटिक पक्षाला अनुकूल असेल आणि साहजिकच कोर्टाचे निर्णय पुरोगामी होणार याबद्दल त्यांना शंका नाही.

परंतु सध्या असलेल्या न्यायाधीशांनी अनेक वेळा स्वत:ची राजकीय मते बाजूला ठेवून मत दिल्याची उदाहरणे आहेत. तसेच दोन-तीन न्यायाधीश ताबडतोब नेमायचे नसून एकच निवडायचा आहे. यामुळे फार मोठय़ा बदलाबद्दल इतकी खात्री देणे व्यर्थ.

तसेच अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांत सध्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. निवडणुकीनंतर दोन्ही सभागृहांत ते थोडय़ा प्रमाणात कमी होऊन डेमोक्रॅटिक पक्षाच्या सभासदांच्या संख्येत वाढ होईल ती मर्यादित असेल, हे डेमोक्रॅटिक पक्षसदस्यांना ठाऊक आहे. तेव्हा क्रांतिकारक बदल करण्यास वाव नाही.

दुसरे असे की, अमेरिकेच्या संघराज्यात ५० राज्ये असून ३१ रिपब्लिकन पक्षाच्या गव्हर्नरांच्या नियंत्रणाखाली आहेत आणि त्यांपकी अनेक राज्यांच्या दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅटिक पक्ष बहुमतात नाही. अमेरिकेत मध्यपूर्व देशांसारखी आज तरी परिस्थिती नाही. राज्य व केन्द्र पातळीवर संसदेत निर्णय होतात आणि अध्यक्षास अमर्याद खास हक्क नाहीत. न्यायालयाने एका प्रकरणात ओबामांनी अतिक्रमण केल्याचा निर्णय देऊन तो नुकताच रद्द केला. सॅण्डर्स यांना याचे काही वाटत नसेल कारण ते स्वप्नरंजनात गुंतलेले असतात.

तथापि सॅण्डर्स हे प्रामाणिक आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचे ते एक कारण आहे. पण केवळ निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्ष जवळ केल्याबद्दल त्यांच्यासंबंधीचा आदर उतरणीला लागेल. स्वत:ला डावे मानणारे पण वैयक्तिक बाबतीत समाजवादी वगरे काही नाहीत असेही बरेच आहेत. यात समावेश होतो सेनेटच्या सभासद एलिझाबेथ वॉरन यांचा. अधिवेशनात बोलताना त्यांचा आवाज नेहमीपेक्षा खाली होता. आपण गरिबांच्या फार कनवाळू असून ट्रम्प गरिबांना लुबाडण्यात आनंद मानतात असा प्रचार त्या ‘टेल ऑफ टू सिटीज’मधील मादाम दफार्जच्या आवेशात प्रत्येक भाषणात करत असतात.

घरांच्या किमती कोसळल्या होत्या तेव्हा ट्रम्प म्हणाले की, किमती कोसळण्याची ते वाट पाहात होते, कारण त्या कोसळल्यावर त्यांना स्वस्तात इमारती घेता आल्या. एलिझाबेथ वॉरन यांच्या मते असा दुष्टपणा फक्त कोत्या मनाचा, छोटा, असुरक्षित लोभी माणूसच करू शकतो. पण मोठय़ा मनाच्या कनवाळू वृत्तीच्या एलिझाबेथ वॉरन यांनी स्वत: जेव्हा घरांच्या किमती कोसळल्या तेव्हा गहाण पडलेली अनेक घरे स्वस्तात विकत घेऊन जास्ती किमतीला विकली व बराच फायदा करून घेतला. अशीच गहाण पडलेली घरे घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या भावाला साडेनऊ टक्के व्याजाने (म्हणजे बँकांच्या पेक्षा किती तरी जास्त) कर्जाऊ पसे दिले. त्याचाही खूप फायदा झाला.

‘रेड इंडियन’ लोकांना येथे राखीव जागा असतात. एलिझाबेथ वॉरन या गोऱ्या आहेत. टेक्सास विद्यापीठात त्यांनी तशी नोंदही केली होती. पण ‘पेन्सिलवानिया’ व ‘हार्वर्ड’ विद्यापीठात त्यांनी आपण ‘रेड इंडियन’ आहोत असे सांगून प्राध्यापकाची जागा मिळविली. यामुळे खऱ्या ‘रेड इंडियन’ व्यक्तीची हे पद मिळण्याची संधी गेली असणार. एलिझाबेथ वॉरन डेमोक्रॅटिक पक्षात अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या भोंदूपणाबद्दल पक्षातील लोकांना, तथाकथित पत्रपंडितांना वा दूरचित्रवाणीवरील पंडितांना काहीच वाटत नाही. कोणी त्यांना प्रश्नदेखील विचारत नाही. ‘ट्रम्प नको’ यासाठी बाकीच्यांचे सर्व काही चालवून घ्यावे हे त्यामागचे सूत्र दिसते. अशा या एलिझाबेथ वॉरन यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हिलरींना बरेच महिने वाट पाहावी लागली व बरीच मनधरणी करावी लागली.

हिलरी यांना पाठिंबा द्यायला अधिवेशनात अध्यक्ष ओबामा, मिशेल ओबामा, उपाध्यक्ष बायडन, माजी अध्यक्ष बिल क्लिन्टन, जिमी कार्टर, मायकेल ब्लुमबर्ग आणि इतर अनेक होते. मिशेल यांच्या भाषणाचा बराच बोलबाला झाला आणि तसा तो व्हावा असे ते होतेही.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात वक्ते व त्यांची भाषणे ऐकल्यावर जाणवत होते ते हे की, सर्व आखणी विचारपूर्वक झाली होती आणि ती योग्य रीतीने पार पडली. रोजचे विषय ठरवले नव्हते तर पक्षाच्या समावेशक धोरणाला धरून भाषणे होत होती. निरनिराळ्या प्रसंगांत व क्षेत्रांत हिलरींचा प्रत्यक्ष अनुभव काय आला, त्यांनी कोणाला केव्हा मदत केली हे दाखवून दिले जात होते. त्यावेळी काढलेल्या चित्रफितीसुद्धा होत्या.

ट्रम्प यांच्या एका पत्रपरिषदेत ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या शारीरिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या वार्ताहराने ट्रम्प यांच्यावर टीका केली तेव्हा ट्रम्प यांनी त्याच्या कंपवाताची नक्कल करून आपल्या असंस्कृतपणाचे फक्त प्रदर्शन केले. त्यामुळे देशभरात सर्वानाच संताप आला. प्रत्येक सभेत ते त्यांच्याकडे किती पसे आहेत याचे वर्णन करतात. हेही सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही.

उलट डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात काही अपंग व्यक्तींनी आपली मते मांडली आणि ट्रम्प यांच्या वर्तनाबद्दल टीका केली. त्या अपंगांची छोटी पण समर्पक भाषणे सर्व श्रोत्यांच्या मनावर परिणाम करणारी होती. त्यांना हिलरींनी मदत केलेली होती. ट्रम्प वारंवार आपण फार हुशार, स्मार्ट असून आपल्याला हुशार, स्मार्ट लोक हवेत व सध्याच्या व्यवस्थेत कोणी हुशार नाहीत असा प्रचार करतात. पण रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनाची आखणी आणि तिची अंमलबजावणी ही त्यांच्या याबाबतीतील हुशारीबद्दल शंका निर्माण करणारी होती. डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन सर्वबाबतीत सरस होते.

भाषणांचा विचार केला तर बिल क्लिन्टन म्हणजे लोकांना नेहमी आकर्षति करणारा वक्ता या त्यांच्या प्रतिमेला शोभेल असेच त्यांचे भाषण झाले. त्यांनी सुरुवात केली ती ते व हिलरी दोघेही एकाच वेळी कायदेविषयक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात शिकत होते इथपासून. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. नंतर भाषणात त्यांनी हिलरी यांच्या जीवनाचा अशा प्रकारे आराखडा मांडला की, त्यातून हिलरी यांची कर्तबगारी उमजत गेली. हिलरींचे व्यक्तित्व कोरडे असल्याचा ग्रह होतो. पण बिल क्लिन्टन यांनी खुबीदारपणे हिलरींचा मानवतावादी स्वभाव दाखवला. या भाषणाचे टीव्हीचे श्रोते २ कोटी ४७ लक्ष असल्याचे वृतपत्रांनी सांगितले आहे.

उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे भाषण आवेशपूर्ण होते तसेच आजच्या स्थितीचे योग्य रेखाटन करणारेही होते. बायडन निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठी का उभे राहिले नाहीत, असा प्रश्न अनेक श्रोत्यांना व तिथे उपस्थित असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांना पडल्याचे वृत्त आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय यांचा वरचष्मा सतत जाणवत होता. राष्ट्रध्वज मंचभर लावलेले होते. तसे काहीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात नव्हते. कारण रिपब्लिकन पक्षाप्रमाणे देशभक्ती, देवभक्ती, लष्करभक्ती यांचे प्रदर्शन डेमोक्रॅटिक पक्ष कधीच करत नाही.

ट्रम्प हे अब्जाधीश आहेत आणि आपल्या संपत्तीचा गाजावाजा ते करत असतात. या उलट फिलाडेल्फियातील अधिवेशनात मायकेल ब्लुमबर्ग हे एके काळचे न्यूयॉर्कचे महापौर हिलरींना पाठिंबा देण्याचे भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी असे काही केले नाही. ब्लुमबर्ग हे ट्रम्प यांच्यापेक्षा चौपटीने अधिक अब्ज डॉलर्सचे धनी आहेत. पण त्यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत. ते हीन दर्जाची भाषाही कधी करत नाहीत. कारण दोघेही खूप श्रीमंत व न्यूयॉर्कचेच असले तरी ते वेगळ्या वर्तुळात वावरतात.

ब्लुमबर्ग यांच्यासारख्यांच्या टीकेनंतर ट्रम्प यांची जाहीर प्रतिक्रिया अशी की ते या लोकांना असे मारतील की, त्यांचे डोके गरगरू लागेल आणि मग ते शुद्धीवरच येणार नाहीत. अध्यक्ष व्हायला निघालेल्याची ही भाषा. लोकांनी टीका केल्यावर ट्रम्प यांनी खुलासा केला की शाब्दिक टीका करून मारणार असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता, शारीरिक मारहाण नव्हे. पूर्वी ‘वॉिशग्टन पोस्ट’च्या पत्रकाराने अध्यक्ष ट्रमन यांच्या मुलीच्या गायनावर टीका केली असता ट्रमन यांनी ‘व्हाइट हाऊस’चा शिक्का असलेले पत्र त्याला लिहून तो जेव्हा प्रत्यक्ष भेटेल तेव्हा त्याला खूप बदडून, त्याचे नाक कापून, डोळे ओरबाडून, कंबर मोडण्याची धमकी दिली होती, हे यावरून आठवले.

रिपब्लिकनांना आपणच खरे राष्ट्रभक्त असा टेंभा मिरवायची हौस आहे. पण ९/११ला दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कच्या दोन गगनचुंबी इमारतीत दोन विमाने घुसवल्यानंतर त्या शहरातल्या रहिवाशांवर संकट कोसळले तेव्हा रिपब्लिकन महापौर जुलियानींनी अग्निशामक दलाला आवश्यक साधने पुरवण्याची व्यवस्था न केल्यामुळे काही जण हकनाक बळी गेले होते. नंतर एक आठवडय़ाने ब्लुमबर्ग महापौर झाले. त्या वेळची आठवण म्हणून त्यांनी भाषणात सांगितले की, शहरासाठी काय करायला हवे याची विचारणा करायला तेव्हा हिलरी आल्या होत्या. हिलरींनी केन्द्र सरकारकडून चांगल्यापकी मदत आणली असे अनेक वक्ते म्हणाले. ब्लुमबर्ग यांचे भाषण प्रभावी झाले.

जे लोक कुठच्याच पक्षात नाहीत अशांना व पक्षांत असूनही ज्यांना हिलरी व ट्रम्प दोघेही आवडत नाहीत अशा सर्वानाही बायडन किंवा ब्लुमबर्ग उभे राहावे असे आधीपासूनच वाटत होते. आता त्यांच्या भाषणांनंतर तर आणखीच प्रकर्षांने वाटू लागले आहे.  विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांचे भाषण फड गाजवणारे नव्हते. त्यांची कारकीर्द संपत आली आहे. त्यांचा सूर व भाषणाचा नूर प्रसंगाला शोभेल असाच होता. अमेरिका आíथक बाबतीत वेगाने प्रगती करत नसेल, पण बेकारी पाच टक्क्यांवर अनेक वर्षांत आली नव्हती ती आली आहे. सार्वजनिक आरोग्य योजना त्यांनी अमलात आणून देशाच्या इतिहासात जे घडले नव्हते ते घडवून आणले. यात सुधारणेला वाव आहे तसेच आíथक प्रगतीची लोकांची वाढती अपेक्षा पुरी व्हायला हवी. परराष्ट्र राजकारणातही अनेक कठीण समस्या आहेत.

ओबामा यांनी सर्वाचा उल्लेख करून बडेजाव मारण्याचा आव आणला नाही. आठ वष्रे कारकीर्दीला होत असल्यामुळे त्यांच्या भाषणात चिंतनशीलता जाणवत होती. त्यांनी ट्रम्प यांच्या बेलगाम विधानांचा चांगला समाचार घेतला. तथापि डेमोक्रॅटिक पक्षाच्या एकजुटीची निकड त्यांनी प्रतिपादन केली ती महत्त्वाची होती.

हिलरी यांच्या गुणांचे प्रतिपादन त्यांनी ज्या शब्दांत केले ते मनापासूनचे वाटून श्रोते त्यामुळे उल्हसित झाले. श्रोत्यांच्या प्रतिक्रिया टीव्हीमुळे दिसत होत्या. अनेक जण आनंदाने येणारे अश्रू आवरत असताना दिसले. हिलरींना आपल्या मागे पक्ष आहे याची खात्री पटेल असे वाटण्यास हरकत नाही.

शेवटच्या दिवशीचे हिलरी यांचे भाषण प्रसंग आणि ज्या पदासाठी लढा द्यायचा आहे त्यास शोभेल असेच होते, विनाकारण उंच सुरात नव्हते. सॅण्डर्स यांचा गौरव करण्यास त्या विसरल्या नाहीत. अमेरिकेपुढील अनेक प्रश्न आणि त्यासंबंधीची भूमिका यांचा ऊहापोह हा कंटाळवाण्या भाषेत झाला नाही. परंतु समारोप जवळ आल्यावर हिलरी यांनी दिलेली आश्वासने बरीच सढळ होती. चार वर्षांच्या काळातच नव्हे तर आठ वर्षांतही ती पुरी करणे कसे शक्य आहे, हा प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाही.

– गोविंद तळवलकर

govindtalwalkar@hotmail.com