09 August 2020

News Flash

सामान्य हिंदूंना काय हवे आहे?

 ‘माणसाचे खरे स्वरूप पाहायचे असेल, तर त्याला सत्ता द्या!’

|| अ‍ॅड. राजा देसाई

आकाशाएवढी उदार जीवनदृष्टी देणाऱ्या धर्माला राष्ट्र, मंदिर-मशीद इत्यादी तुलनेने मर्यादित गोष्टींत कोंडण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. अशा अधर्मासाठी हिंसा करणे ही राष्ट्रभक्ती ठरत आहे, तर राष्ट्रासाठी आपले कर्तव्यकर्म बजावताना प्राणाचे बलिदान करणारे  हेमंत करकरे यांनाही जाहीरपणे राष्ट्र-धर्मद्रोही ठरविले जात आहे. हिंदूंना हे धर्मरक्षण वाटते आहे का हे काळ ठरवील, केवळ २०१९ नव्हे!

‘माणसाचे खरे स्वरूप पाहायचे असेल, तर त्याला सत्ता द्या!’ संघटना आणि तिचे तत्त्वज्ञान याही बाबतीत हे खरे आहे. या दोहोंचाही दाहक अनुभव सध्या भारत घेतो आहे. धर्म, ईश्वर, सत्य, प्रज्ञा, साध्वी, योगी अशा भारतीय संस्कृतीविचारातील अत्यंत पवित्र व उच्च अशा अनेक संकल्पनांना इथे विषाक्त करून टाकण्याचा काळाने जणू विडा उचलला आहे. ही कलियुगाच्या तारुण्याची सुरुवात तर नाही?  प्रत्येक व्यक्तीत जसा एखादा गुण इतर गुणांपेक्षा फारच अधिक प्रभावी असतो, तसाच तो धर्म-समूहांतही असतो; त्याचा विकास हा त्यांचा प्रमुख जीवनोद्देश बनतो. स्वामी विवेकानंद म्हणाले होते – ‘सहिष्णुता हे हिंदू जातीचे मानवी संस्कृतीला प्रमुख योगदान आहे. तो ‘ईशवास्यमिदं र्सव..’ या प्राणिमात्राच्या एकत्वाच्या तत्त्वाचा आविष्कार आहे. हे एकत्व धरून ठेवील तेवढा काळ भारताच्या प्राणाला कोणीही धक्का लावू शकणार नाही. मात्र त्याचा तो त्याग करील, तेव्हा कोणीही भारताला वाचवू शकणार नाही.’

पण सृष्टिचक्राच्या कराल दाढेत काहीच टिकत नाही. शुभ संपून अशुभाचे राज्य येते, तर पुन्हा अशुभ संपून शुभाचे. ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात पाहता, भारताला धर्मभूमी म्हणणे आजच्या परिस्थितीतही अवाजवी नाही. दुर्दैवाने, आज येथील वातावरण कमालीचा द्वेष आणि असहिष्णुता यांनी भरून गेले आहे. एवढे की असे केवळ म्हणणे हाही धर्मद्रोह-राष्ट्रद्रोहाचा गंभीर गुन्हा ठरावा! आकाशाएवढी उदार जीवनदृष्टी देणाऱ्या धर्माला राष्ट्र, मंदिर-मशीद इत्यादी तुलनेने मर्यादित गोष्टींत कोंडण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. अशा अधर्मासाठी हिंसा करणे ही राष्ट्रभक्ती ठरत आहे, तर राष्ट्रासाठी आपले कर्तव्यकर्म बजावताना प्राणाचे बलिदान करणारे अगदी हेमंत करकरे यांनाही जाहीरपणे राष्ट्र-धर्मद्रोही ठरविले जात आहे. हिंदूंना हे धर्मरक्षण वाटते आहे का हे काळ ठरवील, केवळ २०१९ नव्हे!

कोणत्या धर्माच्या अनुयायांनी धर्माच्या नावावर अधिक रक्त सांडले, हे मोजणे शक्य मानले तरी याचा अर्थ काय? असे रक्त सांडणे हा ‘अधर्म’च नाही काय? ज्या धर्माच्या अनुयायांनी हे कमी प्रमाणात केले, त्यांना ‘कमी अधर्म’ केल्याने झालेले ‘नुकसान’ भरून काढणे हे ‘धर्मकार्य’ वाटते काय? धर्म-राष्ट्रवादाच्या कॉकटेलने पाकिस्तानची झालेली दयनीय अवस्था हा आपल्यासाठी अजूनही पुरेसा इशारा ठरत नाही का? की अधर्माच्या शर्यतीतही पाकिस्तानचा ‘पराभव’ करणारे धार्मिक विजिगीषुत्व आता हिंदूंना हवे आहे? अर्थात अज्ञान आणि द्वेषांधतेपायी अधर्मालाच धर्म मानणाऱ्या अशा मंडळींनाही भारताचा एकत्वाचा विचार वगळीत नाही. द्वेष-असहिष्णुतेला तो प्रतिद्वेषाचे उत्तर सांगत नाही. विशेषत: आजच्या सत्ताकारणग्रस्त वातावरणात हे उत्तर आपल्याला हीनतम व्होटकारणाच्या अधिकच खोल चिखलात रुतवून ठेवील. हे जे सारे घडत आहे, ते आपल्याला धर्मापासूनच तर दूर नेत नाही ना, याचा विचार आपण सश्रद्ध धार्मिकांनी करायला हवा. हेच आजच्या स्थितीत आपल्या धर्मसाधनेचे प्रमुख अंग ठरायला हवे. सतत द्वेषपूर्ण कलह-हिंसाग्रस्ततेत रुतून बसलेल्या समाजाच्या राष्ट्राचे, धर्माचे काय भले होईल? ग्लोबल व्हिलेज बनलेले जग आपल्याकडे कसे बघत असेल? कोणी धर्माचार्य याची जाणीव समाजाला करून देत आहे, असे चित्र दिसत नाही, हीसुद्धा वेगळय़ा प्रकारची धर्मग्लानीच नाही काय?

ही सारी परिस्थिती आम्हा सामान्य धार्मिकांसाठी निराशाजनक ठरते. अज्ञाननिर्मित द्वेषभावापोटी इथे अधर्मच धर्माचा बुरखा बेमालूमपणे पांघरून दंड थोपटीत आहे. त्यामुळे आम्ही संभ्रमित होतो आणि ही निराशा विशेषच गडद होते. ‘असत्याला सत्याचा, अधर्माला धर्माचा बुरखा पांघरण्याची सदैव वाटणारी गरज ही त्यांनी सत्य-धर्म (म्हणजे ईश्वरच) यांना दिली जाणारी सर्वश्रेष्ठ आदरांजली असते,’ असे म्हटले जाते, त्यात खूप अर्थ आहे. स्वामी विवेकानंद हेच वेगळय़ा शब्दांत मांडतात – ‘सत्य स्वसमर्थ आहे; म्हणूनच ते सत्य आहे.’ भगवद्गीता ‘सत्यमेव जयते नानृतम्’ म्हणते ते म्हणूनच. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगेयुगे.. भगवान श्रीकृष्ण ऊठसूट धावत नाहीत, आपण सामान्यांनी अज्ञान दूर करण्याची पराकाष्ठा केली की भगवान अवतरतात.

आम्हीही अधर्मालाच धर्म मानायला लागतो, तेव्हा तो धर्मावरचा सर्वात मोठा प्राणघातक हल्ला ठरतो. अशा वेळी खरा धर्म सांगणारा आमच्याच नजरेत सहजपणे धर्मद्रोही ठरवला जातो. सुडाच्या सत्ताकारणासाठी ‘श्रद्धा, श्रद्धा’ म्हणून अभिमानाने छाती पिटली जाण्याच्या या काळात मार्ग काय? ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’, गीतावचनाच्या प्रकाशमार्गाने जाणे हाच! कारण हे जे घडते आहे, ते सर्वज्ञ ईश्वराला कळत नाही आहे, असे थोडेच आहे? आजही तो ‘प्रज्ञा’वंतांची विपरीत बुद्धी उघड करून त्यांच्या अधर्माचे घडे भरतच आहे. आपल्याला ते कळत नाही म्हणून आपण अधीर, निराश होतो. ती सुप्रसिद्ध बोधकथा कोणाला ठाऊक नाही? संकटकाळी चालताना आपल्या दोन पावलांच्या जोडीला ईश्वराची आणखी दोन पावले दिसत नाहीत म्हणून तक्रार करणाऱ्या भक्ताला ईश्वर म्हणतो- ‘हे बघ, तुझी माझ्यावर अतूट श्रद्धा असती तर तुझ्या लक्षात आले असते की ती दिसणारी व तुझी स्वतची वाटणारी दोन पावले ही माझीच होती. तू माझ्या खांद्यावर होतास!’ याच अतूट श्रद्धेपोटी बालक नामदेवाचा नवेद्य पांडुरंग खायचा, तर ध्यानधारणेत एक दिवस मोहम्मद आपल्याकडे आले नाहीत, म्हणून पर्वत त्यांचे क्षेमकुशल विचारायला गेला. या बोधकथा असतील, पण त्यांत दडलेल्या श्रद्धेचे सामथ्र्य अचाट आहे, याकडे बौद्धिक काथ्याकुटात आपले दुर्लक्ष झाले, तर जीवनातील एका अमोघ शक्तीला आपण गमावून बसू.

धर्मसत्य (धर्ममरतड नव्हे!) कधीही सत्तेची दासी बनणार नाही, याचा विसर सत्तामदाने अंध झालेल्यांना नेहमीच पडतो. त्यांचा अहंकार, उन्माद, द्वेषच त्यांच्या अधर्माचा खड्डा हळूहळू खणीत असतो. हिंदूंना आपले धर्मसत्य आज ना उद्या खडबडून जागे करीलच याविषयी शंका नाही. मधले अग्निदिव्य अटळ असते. राम, कृष्ण, येशू, मोहम्मद, गांधी यांचीही त्यातून सुटका झाली नाही!

माणसाला जीवनातील उच्च तत्त्वे पेलत नाहीत म्हणून सर्वच धर्मानी मंदिर, मशीद, चर्च यांसारखे अनेक पांगुळगाडे त्याला दिले. त्यांची गरज संपत जाणे यात मानवाचा खरा धार्मिक विकास आहे. उलट त्यांनाच आपण अहंकार, सुडाचा विषय बनवून कलह वाढवीत आहोत. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञान समाजात प्रचंड घुसळण करीत विविध राष्ट्रे, धर्म, पंथ, भाषा यांच्या लोकांना एकत्र आणत आहेत. त्यातून दुसऱ्या देशांत स्थलांतरे होत आहेत. त्यातून जगभर उभे राहणारे समूहअस्मितांचे नवे संघर्ष, हे प्रखर समाजवास्तवही आहे. भारत हे तर स्वतच एक विविधतेने भरलेले जग आहे. अशा स्थितीत सुखी-समाधानी, कलहरहित व्यक्ती आणि समाजजीवनासाठी सर्व मानवी समाजाला एकत्र बांधणारे असे केवळ भावुक नव्हे, तर विज्ञान विवेकवादाच्या निदान विरोधी नसलेले सूत्र असणे ही काळाची गरज आहे. भारताजवळ सुदैवाने असे सुस्पष्ट आणि सखोल असे सूत्र हजारो वर्षांपासून उपलब्ध आहे- वसुधव कुटुंबकम्!

‘खरा धर्म हा हृदयातील ईश्वराच्या अनुभूतीत आहे; बाकी सारी धर्माच्या नावावरची बाष्कळ बडबड,’ असे विवेकानंद म्हणायचे. स्वामी विवेकानंदांनी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ दृष्टी आपल्याला दिली आहे – धर्माने मानवाची जेवढी सेवा करून घेतली आहे, तेवढी दुसऱ्या कशानेही नाही, पण धर्माच्या नावावर मानवाचे जेवढे रक्त सांडले गेले आहे, तेवढे दुसऱ्या कशानेही नाही, हेही तेवढेच सत्य आहे. धार्मिक उन्माद माणसाला पशू बनवितो. त्यातून येणारी असहिष्णुता मानवी संस्कृतीच नष्ट करील. मग कोणता धर्म उरेल?  काय हवे आहे, आम्हा सामान्य हिंदूंना? द्वेषविष की स्वामीजींचे गीता धर्मामृत?

लेखक भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2019 2:41 am

Web Title: hindu community in india
Next Stories
1 आरोग्याचा प्रश्न राजकीयच
2 पहिली बाजू : विकासाचा मुद्दा कुणामुळे नाही?
3 ‘नोत्र दाम’ची शोकांतिका
Just Now!
X